यथाऽम्भसा प्रचलता तरवोऽपि चला इव ।
चक्षुषा भ्राम्यमाणेन दृश्यते भ्रमतीव भूः ॥५३॥
जेवीं गंगातीरींचा तरु । जळीं वाहतां देखे नरु ।
तेवीं मायागुणअनुकारु । भासे विकारु आत्मत्वीं ॥१५॥
ज्याचे डोळां भवंडी सबळ । तो भंवतां देखे भूमंडळ ।
तेवीं मायिक विकारमेळ । मिथ्या केवळ आत्म्यासी ॥१६॥
जो अश्वारुढ होऊनि पाहे । जळीं प्रवाहासंमुख राहे ।
तो देखे मी जळीं प्रवाहें । ऐसा मिथ्या होये अनुभवू ॥१७॥
तेवीं आत्मा नित्य निर्विकार । तेथ मायावी गुणसंभार ।
कल्पनायोगें साचार । मानिती नर मनोमय ॥१८॥
आब्रह्मस्तंबपर्यंत । नाना योनी विकारवंत ।
कर्म क्रिया फळभोग येथ । जाण निश्चित मनोजन्य ॥१९॥
ऐसें सांगतां हरि सांवळा । तेणें उल्हास उद्धवजीवाला ।
तया आनंदाच्या कल्लोळां । उद्धवचि लीला पोखित ॥६२०॥
निववावया उद्धवाचा ताप । स्वयें सांगे तो विश्वतोमुख ।
जेणें उद्धवां बहु हरिख । तेंचि श्रीकृष्ण देख सांगतसे ॥२१॥