श्रीभगवानुवाच- प्रकृतिः पुरुषश्चेति विकल्पः पुरुषर्षभ ।
एष वैकारिकः सर्गो गुणव्यतिकरात्मकः ॥२९॥
प्रकृति पुरुष हे दोनी । सदा अत्यंत वेगळेपणीं ।
जैसा दिवस आणि रजनी । एक लोपोनी एक प्रबळे ॥२८०॥
दिवस लोपतांचि जाण । अंधकारेंसीं परिपूर्ण ।
घेऊनियां ताराग्रहगण । रात्री आपण उल्हासे ॥८१॥
तेवीं लोपतां पुरुषाचें भान । घेऊनि कार्येंसीं कारणगुण ।
ज्ञानाज्ञानेंसीं परिपूर्ण । प्रकृति जाण थोरावे ॥८२॥
येथ मुख्यत्वें जो देहाकार । तेंचि प्रकृतीचें दुर्ग थोर ।
तेथें ठेविला ठाणेदार । देहअहंकार महायोद्धा ॥८३॥
जो जिवलग विश्वासाचा । प्रकृतीस विश्वास त्याचा ।
तो नेटका झुंझार दुर्गींचा । भरभारु तेथींचा तो वाहे ॥८४॥
तेथ अभिमानें आपण । प्रकृतीस निर्भय देऊनि जाण ।
घालूनि सामग्री विकारभरण । दुर्ग दारुण बळकाविलें ॥८५॥
ऐक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । निजप्रकृतीचिया निष्ठा ।
देहदुर्गी अभिमान लाठा । जाहला वरिष्ठा या हेतू ॥८६॥
देहदुर्गीं गुण अहंकार । दुर्गसामग्रीविकार ।
अवघी प्रकृतीच साचार । तदाकार भासत ॥८७॥
गगनीं गंधर्वनगर जाण । माडया गोपुरें वन उपवन ।
तैशी प्रकृति आपण । नानाकारें जाण भासत ॥८८॥
जैशी मृगजळाची सरिता । दुरोनि दिसे प्रवाहतां ।
तेवीं प्रकृतीची सर्वथा । नानाकारता आभासे ॥८९॥
ऐसें प्रकृतिदुर्ग महाथोर । तेथें नाना सामग्रीविकार ।
जे जे घाली अहंकार । ते ऐक साचार सांगेन ॥२९०॥;