अनाद्यविद्यायुक्तस्य, पुरुषस्यात्मवेदनम् ।
स्वतो न सम्भवादन्यस्तत्त्वज्ञो ज्ञानदो भवेत् ॥१०॥
प्रकृतिपुरुषमहत्तत्त्व येथें । अहंकार आणि महाभूतें ।
इंद्रियें विषयसमेतें । यें तत्त्वें निश्चितें पंचवीस ॥९२॥
येथ पुरुषाहोनिया भिन्न । जीव वेगळा करुनि जाण ।
तत्त्वसंख्यालक्षण । केलीं संपूर्ण सव्वीस ॥९३॥
जीवाच्या भिन्नत्वाचें कारण । अनादि अविद्येस्तव जाण ।
घेऊनि ठेला देहाभिमान । कर्मबंधन दृढ झालें ॥९४॥
अहंकर्तेपणाचा खटाटोप । तेणें अंगीं आदळे पुण्यपाप ।
विसरला निजरुप । विषयलोलुप्य वाढवितां ॥९५॥
लागलें बद्धतेचें बंधन । न करवे कर्मपाशच्छेदन ।
त्याच्या उद्धारालागीं जाण । ज्ञानदाता सर्वज्ञ ईश्वर ॥९६॥
गुरुद्वारा पाविजे ज्ञान । तेथें ईश्वराचा आभार कोण ।
येथ ईश्वरकृपेवीण । सद्गुरु जाण भेटेना ॥९७॥
झालिया सद्गुरुप्राप्ती । ईश्वरकृपेवीण न घडे भक्ती ।
सद्गुरु तोचि ईश्वरमूर्ती । वेदशास्त्रार्थी संमत ॥९८॥
गुरु-ईश्वरां भिन्नपण । ऐसें देखे तो नागवला आपण ।
एवं ईश्वरानुग्रहें जाण । ज्ञानसंपन्न होय जीवु ॥९९॥
गुरुंनीं सांगितली ज्ञानस्थिती । ते ईश्वरकृपेवीण चित्तीं ।
ठसावेना साधकांप्रती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१००॥
जीव नियम्य ईश्वर नियंता । जीव अज्ञान ईश्वर ज्ञानदाता ।
जीव परिच्छिन्न एकदेशिता । ईश्वर सर्वथा सर्वगत ॥१॥
जीव हीन दीन अज्ञान । ईश्वर समर्थ सर्वज्ञ ।
जीवास दृढ कर्मबंधन । ईश्वर तो जाण निष्कर्म ॥२॥
एवं ईश्वरकृपें जाण । जीवासी प्राप्त होय ज्ञान ।
यालागीं ईश्वराहून । जीव भिन्न या हेतू ॥३॥
म्हणशी करितां कर्माचरण । जीवासी प्राप्त होईल ज्ञान ।
हें सर्वथा न घडे जाण । जडत्वपण कर्मासी ॥४॥
कमा जडत्व जाण । त्यासी बहुत अज्ञान ।
त्या कर्मासी अत्यंत बद्धपण । हें सज्ञान जाणती ॥५॥
कर्म स्वरुपें जड अचेतन । त्यासी चेतविता ईश्वर जाण ।
तें न करितां ईश्वरार्पण । ज्ञानदाता कोण कर्मासी ॥६॥
कर्मासी जडत्वें नाहीं सत्ता । कर्मक्रियेचा ईश्वर ज्ञाता ।
ईश्वरचि कर्मफळदाता । कर्मचेतविता ईश्वरु ॥७॥
ज्ञान तोचि ईश्वर । तेणें रचिला हा विस्तार ।
संहारितां तोचि निर्धार । सत्तामात्र ईश्वर जाणावा ॥८॥
जीवासी ज्ञानसायुज्यता । कां स्वर्गभोगफळदाता ।
अथवा इहलोकीं वर्तविता । जीवासी तत्त्वतां ईश्वरु ॥९॥
यापरी अवश्य जाण । जीव ईश्वर करितां भिन्न ।
तत्त्वें सव्वीस संपूर्ण । बोलिले ब्राह्मण या हेतू ॥११०॥
पंचवीस तत्त्वांची कथा । ते जीवेश्वरांची ऐक्यता ।
तेही सांगेन मी आतां । त्यांच्या मता संमत ॥११॥