मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय बाविसावा|
श्लोक ३० वा

एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


ममाङग माया गुणमय्यनेकधा विकल्पबुद्धिश्च गुणैर्विधत्ते ।

वैकारिकस्त्रिविधोऽध्यात्ममेकमथाधिदैवमधिभूतमन्यत् ॥३०॥

माझी माया गा आपण । सर्वांगें जाहली तिनी गुण ।

तेही अभिमानें आपण । निजसत्ता जाण आवरिले ॥९१॥

तेचि देहदुर्गाभंवतीं जाण । त्रिगुणांचें आगड पूर्ण ।

तेथें मांडूनि त्रिपुटीविंदाण । मारा दारुण अभिमान करी ॥९२॥

त्या दुर्गाचें दृढ रक्षण । मुख्यत्वें त्रिपुटीचि जाण ।

ते त्रिपुटीचें मूळ लक्षण । तुज मी आपण सांगेन ॥९३॥

अगा उद्धवा बुद्धिमंता । तुज मी सांगेन ऐक आतां ।

तेथ असती तिनी वाटा । दोनी अव्हाटा एकी नीट ॥९४॥

त्या मार्गीची उभारणी । सैन्य रचिलें दाही आरणीं ।

युद्धकार जो निर्वाणीं । तो तेथूनी निरीक्षी ॥९५॥

तेही मार्ग धरिले चौपाशीं । राखण बैसले तिनी वाटेशीं ।

तेथ रिघावया सायासीं । ज्ञानियासी काय काज ॥९६॥

आतां असो इतुली परी । देहदुर्गाची थोर भरोभरी ।

म्हणे ऐकें गा यया थोरी । उद्धवातें हरी सांगत ॥९७॥

कार्य कारण कर्तव्यता । कर्म क्रिया अहंकर्ता ।

ध्येय ध्यान विषयध्याता । दुर्ग सर्वथा दृढ केलें ॥९८॥

तेथ भोग्य भोग भोक्ता । कर्म कार्य आणि कर्ता ।

अभिमान जाहला वसता । प्रकृतिसंमतासंयोगें ॥९९॥

तेथ चोरद्वाराचिया लक्षीं । उघडूनि कामक्रोधखिडकी ।

घाला घालितां एकाएकीं । सकळ लोकीं कांपिजे ॥३००॥

त्यांचा घेऊनिया भेदरा । तापस पळाले सैरा ।

लंगोटी सांडिल्याही दिगंबरा । क्रोध थरथरा कांपवी ॥१॥

लोभयंत्राचे कडाडे । तमधूम दाटे चहुंकडे ।

महामोहाचें गडद पडे । मागेंपुढें दिसेना ॥२॥

दुर्गासभोंवतीं नवद्वारें । नवद्वारीं नवही यंत्रें ।

तेणें तेणें यंत्रद्वारें । विषय महामारें मारिती ॥३॥

देहाभिमानाचें चाळक । मुख्यत्वें मनचि एक ।

तें दुर्धर महामारक । दुर्गअटक तेणें केलें ॥४॥

माळ चढोनि अवचट । पारके रिघती घडघडाट ।

ते दशमद्वाराची वाट । देऊनि कपाट दृढ बुजिलें ॥५॥

यापरी स्वयें मन । दुर्ग पन्नासी आपण ।

त्यासी सबाह्य राखण । घरटी जाण स्वयें करी ॥६॥

धरोनि कामाचा हात । मन रिगे पारक्यांत ।

मुख्य धुरांसी लोळवीत । इतरांचा तेथ कोण पाडू ॥७॥

ऐसें मनाचें मारकपण । अनिवार अतिकठिण ।

त्रिविधतापें खोंचूनि जन । हुंबत जाण पाडिले ॥८॥

देवांपासूनि आधिदैविक । मानस ताप आध्यात्मिक ।

भूतांपासाव तो भौतिक । या नांव देख त्रिविध ताप ॥९॥

सत्त्वगुणें देख अंतःकरण । रजोगुणें इंद्रियें जाण ।

महाभूतें विषयभान । तमोगुणें जाण प्रसवत ॥३१०॥

त्रिविध विकारीं विकारबहुळ । ते हे प्रकृतीच येथें केवळ ।

हेचि दुर्गसामग्री प्रबळ । प्रपंच सबळ येणें जाहला ॥११॥

संकल्पमहापर्जन्योदकीं । वासनाजीवनें भरलीं टांकीं ।

तेणें जीवनें दुर्गाच्या लोकीं । संसारसुखदुःखीं विचरिजे ॥१२॥

दुर्गनवद्वारीं समस्तें । आधिदैव आणि आधिभूतें ।

अध्यात्म तें कोण येथें । ऐक निश्चितें सांगेन ॥१३॥

कोण द्वारीं कोण यंत्र । कोण चेतविता कैसें सूत्र ।

कैसा होतसे विषयमार । तोही निर्धार तूं ऐक ॥१४॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP