कुठल्याही मंत्राचा पुन्हा पुन्हा उच्चार करणे म्हणजे जप होय. याचे तीन प्रकार आहेत. १) वाचिक, २) उपांशु व ३) मानसिक. वाचिक जपात मंत्राचे उच्चार दुसरे लोकसुद्धा ऐकू शकतात. हा जप अधम श्रेणीचा समजला जातो . यापेक्षा श्रेष्ठ उपांशु जप आहे. यात जपकर्ता आपले ओठ हालवीत असतो, परंतु जवळ बसलेल्या व्यक्तीला त्याचा मंत्र ऐकू येत नाही. यास मध्यम श्रेणीचा जप मानतात . मानसिक जप सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या मंत्राचा उच्चार जिव्हेने होत नसल्याकारणाने जपकर्ताही तो ऐकू शकत नाही.
हवन :
जपाच्या दशांश संख्येने हवन केले जाते. यात घृत, मध, शकरा, तिळ, जव, तांदूळ, मेवा, तसेच समिधा इत्यादी द्रव्यांची आहुती अग्नीस दिली जाते. याचा प्रयोग साधनेनुसार केला जातो. आहुतीस उपयोगी पदार्थसुद्धा विधि -निर्देशानुसार घ्यावे लागतात.
तर्पण :
तर्पण याचा अर्थ पितरांची तृप्ती करण्यासाठी त्यांना जलादी प्रदान करणे. परंतु ही क्रिया आपल्याच पूर्वजांच्या संबंधी नाही तर तर्पणाच्या अंतर्गत ऋषी व देवतांनासुद्धा तर्पण करावे लागते . अनुष्ठान, जपक्रिया यांची समाप्ती यावेळी याचे विशेष महत्त्व आहे.
अन्य नियम :
जपसाधना निश्चित वेळी आरंभ करुन सुविधाजनक आसनावर बसून मंत्र शक्तीच्या अनुभवार्थ नित्यजप कमीत कमी अकरा माला जपाव्यात. हे शक्य नसल्यास कमीत कमी एक माला जपावी.
चित्तास एकाग्र करावे. मन मंत्राबरोबर चालत असेल तर साधना सफल होते. जपाच्या वेळी मेरुदंड सरळ ठेवावा. साधनाकालात पूर्ण ब्रह्मचर्य व्रत पाळावे . मिथ्याचारापासून निवृत्त व्हावे. स्वभावात नम्रता, शिष्टता व सौम्यता असावी.
अनुष्ठानाच्या अंती हवन तसेच तर्पण, मार्जन करावे. त्यानंतर आपल्या शक्तीनुसार ब्राह्मणभोजन तसेच दान-दक्षिणा द्यावी. जपाच्या वेळी आपल्या उपास्यदेवतेविषयी श्रद्धा, विश्वास व प्रेम असावे. मंत्रोच्चार किंवा नाम-जप काहीही असो, त्याबरोबर उपास्यदेवतेचे ध्यान तन्मयपूर्वक करावे .