माला दहा प्रकारच्या असतात. प्रवाळ, मोती, स्फटिक, शंख, चांदी, सोने, चंदन, पुत्रजाविका, कमल व रुद्राक्ष. ह्या माला अ पासून क्ष पर्यन्त अक्षरांनी अनुभावित करुन धारण केल्या जातात . माळेसाठी सोने, चांदी व तांबे यांचा ओवण्यासाठी उपयोग केला जातो. मुखास मुख व शेपटीस शेपटी लावून मण्यांची ( रुद्राक्षाची ) माळा तयार केली जाते. यात छिद्रात असलेले सूत्र ब्रह्म, उजव्या भागास शैव व डाव्या भागास वैष्णव म्हणतात. मुख सरस्वती व शेपटी गायत्री आहे . छिद्र विद्या व गाठ प्रकृती आहे. तसेच स्वर सात्त्विक असल्यामुळे श्वेत आहेत. स्पर्श सत् व तम् यांचे मिश्रण असल्याकारणाने पिवळा व या सर्वांपरता जो आहे तो राजस असल्याकारणाने लाल आहे.
वरीलप्रकार दश मालांचे वर्णन झाले परंतु या सर्वांत रुद्राक्षाची माला अधिक श्रेष्ठ आहे व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
रुद्राक्षमालया जप्तो मन्त्रः सर्वफलप्रदः ।
रुद्राक्षमालेद्वारा जपलेले मंत्र समस्त फल देणार होतात. शास्त्रात रुद्राक्षाची माला तीन प्रकारची सांगितली आहे.
अष्टोत्तरशतं कार्या चतुष्पंचाशदेव वा ।
सप्तविंशतिमाना वा ततो हीनाधमा स्मृता ॥
रुद्राक्षाचीं माला एकशे आठ मण्यांची बनवावी किंवा चौपन, सत्तावीस मण्यांची बनविल्यास श्रेष्ठ असते. यापेक्षा कमी मण्यांची माला हीन समजली आहे.
माला बनविते वेळी पुढील गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. मालेचे सर्व मणी ( रुद्राक्ष ) समान असावेत. पाहाण्यास सुंदर असावेत . लहान मोठे मणी असू नयेत. कुमारी मुलीने माला बनविल्यास फार चांगले. ही मुलगी उपवर झालेली नसावी. ब्राह्मण कन्यका असल्यास फार चांगले .
ब्राह्मणाने श्वेतवर्णी, क्षत्रियाने लाल वर्णाची, वैश्याने पिवळ्या रंगाची व शूद्राने काळ्या रंगाची माला उपयोगात आणावी. या प्रकारच्या माला न मिळाल्यास लाल वर्णाची माला उपयोगात आणण्यास हरकत नाही .
कर्मानुसारसुध्दा माला व सूत यांचाही विचार केला जातो. शान्तिकर्मासाठी श्वेत, वशीकरणासाठी लाल व अभिचारासाठी काळ्या रंगाचा उपयोग करावा. ऐश्वर्य तसेच मोक्ष प्राप्तीसाठी रेशमी सूत उपयोगात आणावे .
माला बनवितेवेळी दोरा तीन पदरी घ्यावा व पुन्हा त्याच्या तीन घडया कराव्यात व प्रत्येक मणी ओवतेवेळी ओंकार उच्चार करीत अ पासून क्ष पर्यन्त एक एक अक्षराचे उच्चारण करावे. अक्षर मालिकोपनिषद्मध्ये त्याच्या विधीचा निर्देश या प्रकारे मिळतो .