श्री दत्तप्रबोध - अध्याय अठरावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ॥

ॐ नमोजी सद्‌गुरुराया । ज्ञानसागरा परमात्मया । गुणातीता करी दया । हरी माया शरण तुज ॥१॥

सर्वज्ञा तूं सर्व साक्षी । औदार्यसदया माते लक्षी । मम रिपुसमूहा त्वरें शिक्षी । स्वपदीं रक्षी शरणागता ॥२॥

तूं भवभयाचें करिता नाशन । तुंझें नाम गा पतितपावन । तूं छेदिता माझें अज्ञान । तुज मी शरण गुरुराया ॥३॥

पादपद्म तुझ जे सकुमार । तेंचि माझें तारुं थोर । व्हावयालागीं भवपार । सत्य आधार हा माझा ॥४॥

तुझे चरणींचे जे रजकण । ते तीर्थरुप होती पूर्ण । तयांचें आवडीं करितां स्पर्शन । होय मोचन पापांचें ॥५॥

तुझिया चरणींचें पायवणी । तें सकळतीर्थां मुगुटमणी । प्राप्त होतांचि उद्धरोनी । जाती प्राणी मोक्षपदा ॥६॥

सर्व देवांचाहि तूं देव । दीनसखा तूं गुरुराव । तंव आधीन सर्व उपाव । जाणोनि भाव तारिसी ॥७॥

तुझिया कृपावलोकनें करुन । चालिलें या ग्रंथींचें निरोपण । दिवसेंदिवस रस गहन । देवोनि वरदान वाढविसी ॥८॥

गत कथाध्याय अंतीं । अवधूत बोले मातेप्रती । सद्‌गुरुकृपे पावलों आत्मस्थिती । भवभयभ्रांती वारिली ॥९॥

हे कथा श्रोते सज्जनीं । प्रीतिभरें ऐकिलीं श्रवणीं । पुढील कथेची आवडी मनी । बोलती म्हणोनी प्रेमादरें ॥१०॥

श्रोते बोलती वक्तयासी । बरवें शोधोनि निवेदिसी । ऐकोनि संतोष सकलांसि । सुख मानसीं अपार ॥११॥

तूं सद्भाग्य होसी संपन्न । आम्हां करविसी कथामृतपान । सद्‌गुरु दत्तप्रबोध सुलक्षण । देसी निवडून भवनाशा ॥१२॥

यदुप्रश्नाचे विचार । अनसूयेचा प्रश्नादर । करोनि अवधूत योगेश्वर । बोधपर व्याख्यान जें ॥१३॥

तें सुंदर गुरुगुणमाहात्म्य । निवडोनि निवेदिसी उत्तम । श्रवण करितां हरती श्रम । क्रोध काम वितुळती ॥१४॥

पावन अविनाशकथा हे सुधा । आता कैंची उरे भवभयबाधा । गुण ग्राहितां निवटी द्वंद्वा । भेदाभेदातीत हे करी॥१५॥

धन्य तुझे हे गोमटे बोल । आम्हां लागती बहु रसाळ । श्रवणीं पडतां करी शीतळ । वारी तळमळ जीवींची ॥१६॥

आम्हां श्रवणींची आवडी । मनभ्रमर लुब्धलें गोडीं । पुढील कथेची प्रौढी । चालवी चोखडी प्रेमळा ॥१७॥

श्रोतियांचा वाग्विलास । परिसोनि आनंदयुक्त जालें मानस । वक्ता विनवी सज्जनांस । पावन दीनांस कर्ते तुम्ही ॥१८॥

शरण जालों संतचरणीं । कळेल तैसी वदवा वाणी । माझी नोव्हे ही ग्रंथकरणी । बोलविते धणी तुम्हीच कीं ॥१९॥

तुमचें होतां कृपादान । मुका बोले पंडितासमान । अज्ञानासी होय प्राप्त ज्ञान । गाय गुण आवडी ॥२०॥

मी मूर्ख मूढ अत्यंत फार । अर्भका कैंचा ज्ञानविचार । परी तुम्हीं केला अंगीकार । पाहता पामर मी दीन ॥२१॥

माझिया बोबडया बोलासी । तुम्ही अंगीकरितां कृपाराशी । म्हणोनि सलगी करोनि पायांसी । निवेदितों कथेसी यथामति ॥२२॥

अवधूत म्हणे अनसूये । मज पावन केलें सद्‌गुरुरायें । दूर करोनि सकळ अपाये । अविनाश ठाये मज दिल्ला ॥२३॥

माते तया सुखासी । तूंही पावें अतिवेगेंसी । शरण जावोनि सद्‌गुरुसी । मिळे अविनाशी जननीये ॥२४॥

तंव अनसूया वदे गुणवर्या । निका बोध करिसी सत्य सखया । वारावया भवभया । सांगसी उपाया कळवळे ॥२५॥

हें हित वागलें माझे मनीं । परी एक विचारितें तुजलागूनी । हेतु गुंतला मागिले कथनी । तो निरोपोनि सांग मज ॥२६॥

यदुलागीं चोवीस गुरु । यांचे निवेदिले गुणप्रकारु । तो मज सांग सविस्तरु । वेधलें साचारुं मन तेथें ॥२७॥

आनंदोनि बोले दिगंबर । माते श्रोतेपण तुझें सत्य साचार । ऐकावया रंगलें अंतर । तरी ते प्रकार निवेदितों ॥२८॥

श्रीमत्सद्‌गुरु दयाघन । तेणें तारक उपदेश केला मजलागोन । तात्काळ केलें आपणासमान । द्वैतभाव निरसिले ॥२९॥

अनेकीं एकत्व दाखविलें । तत्त्वविचार जाणविले । परी म्हणे पाहिजे बाणविले । विवेकबळें करोनिया ॥३०॥

मन हेंचि असे चंचळ । याची निवारावी आधीं तळमळ । विषयलोभ त्यागावा निखळ । असक्त निर्मळ असावें ॥३१॥

उदकामाजी कमळिणी । पाहतां राहिलीसे व्यापोनी । परि पत्र नातळेचि जीवनीं । मेघस्त्रव धरोनि ते न राहे ॥३२॥

जगीं वर्तोनि ऐसें राहावें । विषयलोभ दिसोनि नातळावें । यालागीं शोधोनि गुण घ्यावें । अचळ व्हावें अमनस्क ॥३३॥

निर्विघ्न व्हावया पूर्ण योग । उत्तम गुणांचा कीजे संग । तेणें होसीं तूं अनुद्वेग । विचरसी निःसंग सर्वदा ॥३४॥

हें वाक्य ऐकोनि श्रवणीं । भाळ ठेविला सद्‌गुरुचरणीं । आज्ञे ऐसिया गुणग्रहणीं । गुरु शोधोनि म्यां केले ॥३५॥

अंगिकारितां त्या गुणांसी । पावलों मी अनुपम्य सुखासी । तोचि बोध केला यदूसी । पुसतां तुजसी तोचि सांगें ॥३६॥

येथें निर्विकल्प करीं मन । माते श्रवण करीं सावधान । जे म्यां ग्राह्य केले गुण । ते तुजलागुनी निवेदितों ॥३७॥

प्रथम गुरु केलें पृथ्वीसी । निरखितां लागलों त्रिगुणासी । पर्वत वृक्ष भूमीसी । घेतलें गुणासी ऐक तें ॥३८॥

पृथ्वीचा पाहतां गुण । तो विस्तारितों पृथकत्वें करुन । नांगरिती वखरिती तिजलागून । न दुखे मन पीक दे ॥३९॥

वापी कूप सरोवरें खाणिती । तयां भूमि जीवनची देती । मनीं न मानी खणिल्याची खंती । धरी शांतिं सर्वदा ॥४०॥

कोण्ही लघवी करिती शौच । नाना कर्म जीव करिती अशौच । शुची चांडाळ वागती पिशाच । नाना रेच वमनादी ॥४१॥

परी त्यां न म्हणेचि कदा कांहीं । सर्व अपराध सोसी देहीं । न विटे न दुखे कदाही । शांती पाही तिज अंगीं ॥४२॥

कोण्ही उत्तम पदार्थ पेरिले । कोण्ही गृहगोपुरें रचिले । कोण्ही घाट मंदिरें बांधिले । स्मशान केलें नरककूप ॥४३॥

परी सुख न मानी दुःखासी । द्वेष स्तुति नाणी मानसीं । अद्वय अभेद सर्वांसी । उपमा शांतीसी असेना ॥४४॥

मातें म्यां तो घेतला शांतिगुण । आणीक सांगतो वृक्षलक्षण । नाना परीचे तरुतृण । करिती छेदन सर्वही ॥४५॥

कोण्ही प्रेमें लावणीं करी । कोणी तोडी शस्त्रधारीं । परी छाया उभयांवरी । करोनि निवारी तापातें ॥४६॥

एकें लावोनि वाढविला चंदन । एक तोडी घाव घालोन । परी तो दोघांसि समान । न ठेवी विवंचून परिमळा ॥४७॥

अनेक वृक्षांतें माळियें लाविलें । पत्र फल पुष्पें रुपा आणिलें । तोडणारें इच्छेऐसें तोडिलें । मळ नाणितां दिल्हें इच्छित त्या ॥४८॥

माते पाहें ऊंस पेरिला । द्वादश मासीं वाढविला । सेखीं सेज धरोनि उपडिला । न सांडी गोडिला आपुल्या ॥४९॥

शस्त्रें खांडिलें तयासी । परी न सांडीच तो गोडीसी । चरकीं घाणीं घातला पिळणीसी । गोडी रसीं अधिकची ॥५०॥

रस तो पात्रीं घालोन । अग्निशिखें पचविला जाण । खोटी केलीसे आळोन । परी गोडपण न सांडी ॥५१॥

तयाचे करितां प्रकार । पडों नेदी गोडीस अंतर । त्या उसापासोनि गोड निर्धार । षड्‌गुण विस्तार होतसे ॥५२॥

प्रथम निघाला दिव्य रस । पाचितां आला गुळवण्यास । उत संघट्टनीं काहाकवीस । आळवितां राबेस उतरवी ॥५३॥

मळ छाटितां कादवी । घोटितां साखर होय बरवी । हे झारियाची पदवी । अधिक मोलवी गुळाहोनी ॥५४॥

मळ छाटणीं जरी घोटिला । तरी तो गूळ होवोनि ठेला । जंव जंव छाटावें त्याचि मळा । तंव तंव आगळा रुपा ये ॥५५॥

इंतुकें जरी त्या छळिलें । परी गोडीतें नाहीं टाकिलें । एवं या गुणातें अंगींकारिलें । गुण घेतले वृक्षाचे ॥५६॥

आतां तिसरा गुण पृथ्वीचा । तो भाग जाणा पर्वताचा । परोपकारार्थ संग्रह वनस्पतींचा । अंगी साचा वागवी ॥५७॥

धन्वंतर्‍याचा होय दाता । बहु वनचरांतें पाळिता । स्थान न सोडी अचलता । गुणसंग्रहता केली हे ॥५८॥

अग्निवायूच्या न भी भया । कदा न सोडी बैसलिया ठाया । अग्नि दग्धवितां न सांडी जडिया । बीज विलया जाऊं नेदी ॥५९॥

नाना उपाधींतें सोशिलें । परी बीज तेणें नाहीं टाकिलें । वर्षावकाळीं प्रगटविलें । आपण उभविले परासाठीं ॥६०॥

याचि वर्माते वोळखोनि । माते गुण घेतलें वेचोनी । शांती दया अचलत्व मनीं । तूंही धरोनी अद्वय राहें ॥६१॥

एवं या पृथ्वीपासाव । म्यां स्वीकारिला जो गुणभाव । तो तुज निवेदिला अनुभव । न करी वाव धरीं मनीं ॥६२॥

वायुगुरुचें आतां लक्षण । तेंही द्विपक्षी असे जाण । अंगीं लागतसे स्पर्शोन । परि दृश्यमान दिसेना ॥६३॥

नाना वस्तूंतें तुरंबितां । न गुंतेचि तो पदार्था । परी त्या अंशा होय उडविता । मकरंददाता सकळांतें ॥६४॥

बाह्य हालवी बाह्य प्रकारा । अंतरींचा खेळवी शरीरा । आंगुळें चालतो बारा । नासिकाद्वारा वावरे ॥६५॥

याचा जो आसक्तव्याप्तिगुण । तोचि अंगीकारिला प्रीतीं करुन । उपाधिऐसा होवोन । उपाधिभिन्न गुण हा ॥६६॥

बाह्य अंतरीं सर्व गत । धरुं जातां सर्वातीत । करीं न येतां भासत । नवल सर्वांत वायूचें ॥६७॥

या अलिप्तें संसार । करी माते प्रपंचीं व्यापार । मग तो न बाधी अणुभर राहाटी सुंदर जेवीं आम्हां ॥६८॥

आकाशगुरु केला माते । तेहीं लक्षण सांगतों तूतें । अंत नाहींच जयातें । आकाश त्यातें म्हणावें ॥६९॥

आकाशाचिया पोटीं । ग्रह तारा सूर्य इंदू राहाटी । मेघमाळांची सघन होय दाटी । वायु धुधाटी अद्‌भुत ॥७०॥

पक्षी धुरोळा भरे गगनीं । पाहणारा दिसे गेलें व्यापुनी । परि तें निळें यापासोनि । निर्मळपणीं सर्वदा ॥७१॥

जीवनामाजी भरलें दिसे । घटीं घटरुपचि भासे । ढवळितां ढवळिलें नसे । जैसें तैसेंचि पाहातां ॥७२॥

अदृश्यीं दिसे आकाश । अदृश्य भंगतां न पावे भंगास । अभंगपणें अविनाश । कदाहि उपाधीस न गुंते ॥७३॥

वायुस्पर्शे जींवनीं हाले । परी तें कदा हाले ना डोले । ठायींचें ठायींच संचलें । व्यापोनि उरलें निर्मळत्वें ॥७४॥

भासमात्र होय नाश । अभासत्व नांवें तें आकाश । निश्चळ निर्मळ निर्दोष । अंत पार त्या असेचिना ॥७५॥

या ब्रह्मांडकरंडयासी झांकण । हें प्रत्यक्ष दिसे सकळांलागोन । परी धरावया नसे ठिकाण । भूषणें गगन नाममात्र ॥७६॥

चतुर्थ गुरु तो उदक । त्याचेहि गुण सांगतों ऐक । निर्मळत्व त्यातें आवश्यक । करीत चोख आणिकां ॥७७॥

पांतळपणें असे कोमळ । वाहतां पवने दावी झल्लाळ । सदा सर्व अंगें शीतळ । प्राशितां तापानळ विझवी ॥७८॥

प्राशितां लागे मधुर । व्यापक पाहतां सर्वांतर । संगाऐसा रसप्रकार । रंगाकार होतसे ॥७९॥

पवित्रपण त्या उदकासी । संगें पवित्र करी आणिकांसी । स्वतेजें जीववी जीवासी । हरी मळासी परांच्या ॥८०॥

जीवनीं योग्य तीर्थपण । स्नानें करी पापमोचन । पवित्रता देतसे परांलागुन । निंद्य गुण न पाहे ॥८१॥

जिकडे वेळोनिया नेलें । तिकडे तिकडे उगलेंचि गेलें । अनेक काजीं तया योजिलें । नाहीं कुसमुसिलें जळ कांहीं ॥८२॥

संगाऐसें जाय होवोन । स्वस्थळीं राखी स्वच्छपण । यालागी याचे घेतले गुण । तूंहि सेवन करी माये ॥८३॥

पांचवा गुरु तो अग्नि । शोभला असे पंचगुणी । तोही पृथक् तुजलागोनी । सांगतों निवडोनि ऐकिजे ॥८४॥

तेज असंभाव्य धगधगीत । व्यापलें असे सर्वगत । शक्ति त्याची अतिअद्‌भुत । त्यावीण रिक्त ठाव नसे ॥८५॥

दाहकपणें सबळ । उठे तेथें करी बंबाळ । ब्रह्मांड ग्रासील सकळ । कृतांतकाळ कायसा ॥८६॥

सांठवण पाहतां मोठे । दहनीं सर्वही त्या आटे । उरों नेदी कांहीं कोठें । सेखीं पोटें रिताची ॥८७॥

विशेष गुण असे त्याचा । सर्व भक्षणीं योग्य साचा । उत्तम न म्हणे हा नीचा । ग्रास सकलांचा घे मुखीं ॥८८॥

भक्ष्य अभक्ष्यादि भक्षोनी । सेखी पवित्रताचि त्यालागोनी । असतां नीच उच्च स्थानीं । कदा अवमानी न पावे तो ॥८९॥

नाना वस्तूंतें दाहितां । त्या आपणाऐसाचि होय करिता । विसरवी अवघी नामरुपता । गुण पाहतां थोर हे ॥९०॥

म्हणोनि गुरु केलें अग्नीसी । धगधगीत वैराग्य अनुताप मानसीं । रुची नाणी जिव्हेसी । अद्वय मानसीं वावरे ॥९१॥

आतां जो का चंडकीर्ण । तो म्यां गुरु केला असे जाण । त्याचे सांगतों मी गुण । सावधान परियेसी ॥९२॥

धगधगीत तेजें तापतां । दृश्य दावोनि मोडी शीतता । स्वतेजें तिमिर होय छेदिता । ज्ञानदाता वस्तूंचा ॥९३॥

आपुले रश्मियोगें जाण । शोषी सागरींचें जीवन । तेवींच शुष्क भूमी करोन । ऋतुमान मानवी ॥९४॥

सवेचि मेघें करोनि द्रवे । बीज भूगर्भीं संभवे । जीवनें करोनि जीव जीवे । लवे ओलावे फळपुष्पीं ॥९५॥

षड्‌ऋतूंचें भोगी मान । तेवींच होवोनि दावी आपण । दक्षिणायन उत्तरायण । दावी प्रमाण गति लोकां ॥९६॥

जागवी जीवा प्रभाकर । जवळी न ठेवी अंधःकार । भ्रमणीं आनंद मानी थोर । दिगंतर उजळवी ॥९७॥

हें योगिया उत्तमगुण । म्यां ते घेतले अंगीं बाणोन । तुजलागीं करविलें श्रवण । अंगीकार पूर्ण असावा ॥९८॥

आतां शीतांशाचा योग । तोही सांगतों बरवा प्रसंग । श्रवण करोनि सर्व अंग । गुण अव्यंग सांठवी ॥९९॥

आपुले शीतत्व तेजाचिये बहुडी । उपजवी सुजनांत संतोष आवडीं । कुमतीतें पाववील लज्जा झोंपडी । दे सुखसुरवाडी वारी तापा ॥१००॥

अमृताचेनि पाझरी । नाना वनस्पतींची वृद्धि करी । जे सेवितांचि रोग वारी । सुख दे अंतरीं जीवांतें ॥१॥

गुण येथेंचि हा घेतला । तोही तुज म्यां निवेदिला । आणि त्वां गृहस्थाश्रमीं आग्रह केला । तो न अंगिकारिला तें एक ॥२॥

स्वईच्छें रमतां वनोपवनीं । तंव कपोताकपोती देखिली नयनीं । विषयासक्त होवोनी । भ्रम्ला कामिनी कामसंगें ॥३॥

अत्यंत विषयीं जडली प्रीति । स्त्रीसंग न सोडी कल्पांतीं । दोघे एकच ठायीं बैसती । गुज बोलती ऐक्यत्वें ॥४॥

एकमेकांतें विसंबोन । न राहती कदा एकही क्षण । नाना वनीं करिती भ्रमण । दोघेंजण सवेंची ॥५॥

तृप्ती होता गृहा यावें । रजनीं पक्षासनीं युग्म निजावें । अणुमात्र विभक्त न व्हावें । सुख भोगावें विषयाचें ॥६॥

ऐसे लोटतां कांहीं दिवस । गर्भ राहिला कपोतीस । आनंद झाला कपोत्यास । नाचे बहु वसति भोंवता ॥७॥

उभयतां बरोबरी जाती । चरोनी गृहा युग्म येती । कपोतीस जपे दिनरातीं । मनीं प्रीति उभयातें ॥८॥

तैं भाग्योदय झाला प्राप्त । कपोती झाली तेव्हां प्रसूत । आनंदें कपोता नाचत । अंडी निरखीत सप्रेमें ॥९॥

तृणसेजें अंडीं ठेवोनी । रक्षण ठेवी कपोतीलागुनी । आपण जावोनि काननीं । आहार आणोनी देतसे ॥११०॥

विषयलोभेंसी गुंतला । येरझारें श्रमता झाला । परी नुपजे त्या कंटाळा । सुख जिव्हाळा मानी जीवा ॥११॥

ऐसे लोटतां दिवस कांहीं । तंव अंडीं फुटलीं लवलाहीं । दोन बाळें निपजलीं पाहीं । आनंद देहीं उभयातें ॥१२॥

बाळें पाहतां मोहो जडला । चारा घालोनि पोसिती त्यांला । उभयीं विचार तेव्हां मांडिला । प्रपंच वाढला निजभाग्ये ॥१३॥

आतां या चहुंपोटांसी । भरलें जाईल कंवीं एकल्यासी । जाणेंचि आलें उभयांसी । या बाळांसी पोसावया ॥१४॥

ऐसिया विचारें दोघें जाती । चारा घेवोनि त्वरें येती । बाळ मुखीं नेवोनि घालिती । येरझारा करिती क्षणक्षणा ॥१५॥

स्वपोटा भरती अल्प कांहीं । सकळ जींव बाळांचें ठायीं । मुख भरतांचि लवलाही । उभयतांही देती बाळां ॥१६॥

आहार निद्रेतें त्यजिलें । मोहोलोभें वरपडे जालें । स्वशरीराकडे न पाहिलें । श्रमें वाढविलें सकुमारा ॥१७॥

पाद पक्ष चंचु नयन । अवयव लाधले तयां पूर्ण । उभय शिकविती खेळून। गमनागमन पक्षबळें ॥१८॥

बाळकां अंगीं नसे शक्ति । ठायींच ठायीं दोघें खेळती । कपोताकपोती आनंदती । उल्हास चित्तीं न समायें ॥१९॥

तंव कवणे एके काळीं । कपोताकपोती दूर स्थळीं । चारा घ्यावयालागीं लांबलीं । न मिळे जवळी म्हणोनी ॥१२०॥

प्रारब्धाची गति गहन । पारधी शोधीत आला कानन । पक्षी धरावयालागोन । जाळें पसरोन दीधलें ॥२१॥

तंव कपोतीचीं बाळें । उडतीं झालीं सहज लीळें । जाळियामाजी येवोनि पडिले । गुंतोनि मेले ते ठायीं ॥२२॥

तंव अकस्मात आली कपोती । बाळे पाहिलीं नेत्रपातीं । शोक मोहें आक्रंदती । पडली भ्रांति देहाची ॥२३॥

बाळांचें दुःख पाहोनी । अंग टाकिलें आक्रंदोनी । तेही पाशीं पडिली जावोनी । गेला प्राणी अट्टहास्यें ॥२४॥

तंव कपोता आला धांवत । स्वस्थलातें जंव अवलोकित । कांता बाळांसी निरखीत । तिघें जाळियांत देखिले ॥२५॥

नेत्रीं देखोनि तिघांसी । दुःखे आरंबळे तैं मानसीं । अहा नागवलों विषयसुखासी । मुकलों कुटुंबासी धिक् जिणें ॥२६॥

सकुमार दोघीं बाळकें । ते वाढविले म्यां कवण्या दुःखें । आतां कोठोनी प्राप्त हीं सुखें । मरण अचुकें मज आले ॥२७॥

विषय पूर्ण माझा नाहीं झाला । तों अकस्मात घाला कोठोनि आला । खेळतां पूर्ण नाहीं देखिलें बाळां । उठती ज्वाळा मोहाच्या ॥२८॥

विरहें दाटलासे कपोता । म्हणे त्यागोनि गेलीं बाळकांता । तरी वांचोनि काय आतां । देह सर्वथा त्यागीन ॥२९॥

पुत्रकांतेचा मनीं ध्यास । विषयीं गुंतली सक्त आस । दुःखें उबगोनी देहास । पावला पाश मोहो जाळीं ॥१३०॥

लोभ मोहो विषयप्रीति । येणें बद्ध कपोताकपोती । देखोनि अनुताप बाणला चित्तीं । धिःकार निश्चिती म्यां केला ॥३१॥

हा बाधकचि जाणिजे सत्य गुण । अनुताप अंगीकारी नंको म्हणोन । माते न गुंतावें त्वांही जाण । विवेक बंधन मुक्त करी ॥३२॥

अनसूया म्हणे दत्तासी । विषयलोभातें नातळसी । प्रीति मोहो दवडोनी देसी । वीतरागी होसी सर्वभावें ॥३३॥

परी या काया रक्षणा । कांहीं उपाय असावा कीं विचक्षणाः । ऐसें वाटतें माझिया मना । करी प्रश्ना यासाठीं ॥३४॥

मातेसि बोले योगिराज । प्रश्न केलासी तुवां मज । निरखोनि म्या हेंचि काज । अजगर वोज घेतली ॥३५॥

गुरु अजगर मानोन । घेतला म्यां तयाचा गुण । तुज सांगतां विवरोन । श्रवणीं कर्ण वोढवी ॥३६॥

सर्व सर्पांपरीस थोर । विशाळ शरीर अजगर । चपळगती नोव्हे निर्धार । चाले स्थिर मंद बहु ॥३७॥

नाना उपाधीपाठीं कडाडी । पुढेंही पातळी आडमोडी । पैरी कदा तो न हाडबडी । मनीं गडबडी करीना ॥३८॥

जैं कोणी तया डंवचिलें । कीं पायरें करोनि ताडिलें । यद्यपि पुच्छ धरोनि वोढिलें । परी तो न हाले चपळत्वें ॥३९॥

नाम तयाचें अजगर । सर्व योगें असे तो धीर । ठायींच करी वायो आहार । प्रयत्‍न व्यापार न करी तो ॥४०॥

आणीक एक तयाची वृत्ती । वृत्ति सदैव तया अयाचिती । सन्मुख जवळी पदार्थ येती । तेचि सेविती आनंदे ॥४१॥

नाहीं विवंचनेतें करणें । सव्य अपसव्य दूरीं न धांवणें । कदा कवण्यापाशीं न मागणें । ठायींच सेवणें आली वस्तू ॥४२॥

तो सर्वस्वें उद्योगरहित । न करीच कांहीं यातायात । देहीं असे चिंतारहित । त्यासी विश्वनाथ पुरविता ॥४३॥

प्रयत्‍न कांहीं न करितां । बैसलिया ठायीं पदार्था । ते सेवोनि होय सुख मानिता । म्हणोनी असक्तता त्या शोभे ॥४४॥

एवं ऐसिया गुणासी । माते म्यां अंगीकारिलें निश्चयेंसी । कासया चिंता व्हावी मानसीं । पाळिता सर्वांसी जगदीश्वर ॥४५॥

तळमळ न करावी अणुमात्र । दृढ विवेकें असावा विचार । सैराट न जाऊं द्यावा इंद्रियव्यापार । मर्यांदा थोर पाहिजे ॥४६॥

यासाठीं म्यां माते । गुरु केलें सागरातें । स्वीकारिलें त्याच्या गुणवर्मातें । तेंहि तूतें सांगतों ॥४७॥

शत योजनें विस्तीर्ण । खोली त्याची अत्यंत गहन । उंची भेदिता दिसे गगन । जीवही दारुण जया पोटीं ॥४८॥

नाना रत्‍नें पोटीं निपजती । अगणित माजी असे संपत्ती । नामें उदंड तया असती । तीरें शोभतीं अनुपम्य ॥४९॥

प्रवाहाचा अमोघ खल्लाळ । गर्जना घोष महाप्रबळ । लाटा उसळती जैसे अचळ । पाहतां नेत्रकमळ चाकाटती ॥५०॥

नाना बेटें गर्भीं थोर । नाना जाति विशाळ तरुवर । स्थळोस्थळीं शोभलें बंदर । किराणें अपार वेव्हारिया ॥५१॥

तिरी पसरली मर्यांद वेली । लवलवीत पर्णें विराजलीं । ते सागरें मर्यांदा पाळिली । नाहीं उल्लंघिली अद्यापि ॥५२॥

पाहतां त्याचिया बळासी । क्षणें बुडवील पृथ्वीसी । सामर्थ्य असोनि मर्यांदेसी । न करी उल्लंघनेसी वेलीतें ॥५३॥

आपुले पात्राचे आंत । पूर्णपणें असंभाव्य वाहत । करोनि गर्जना लाटा सांडित । अचळवत स्वठायीं ॥५४॥

विशेष उदकाची निर्मळता । गढळूं नेणेंचि कांहीं पडतां । सदा जीवनीं स्वच्छता । देहीं विमळता पाटव्य ॥५५॥

स्वदेहीं सदा आनंदघन । अणुमात्र नोव्हेंचि उद्विग्न । सदा सौभाग्यसंपन्न । औदार्यगुण विशेष ॥५६॥

करी जीवांचें पालन । मेघा उदक दे जीवालागोन । सदय उदार परिपूर्ण । नोव्हे अकिंचन कदा काळीं ॥५७॥

नित्य जाळीतसे वडवानळ । परी दुःख नमानीच अळुमाळ । राहावया उदरीं दिधलें स्थळ । सदय कृपाळ सागर हा ॥५८॥

एवं गुण यां उदधीसी । ते अवश्य पाहिजेत योगियासी । अंगीकारोनी निवेदी तुजसी । ऐसेंच यदूसी बिंबविलें ॥५९॥

त्यागीं पतंग घेतला । तोहि गुण पाहिजे निवेदिला । याविषयीं कथितों वहिला । सावध ऐकिला पाहिजे ॥६०॥

पुरुष स्त्रियेच्या रुपा भुलोनी । विषयासक्त झाला मनीं । दिनरात्र न सोडी कामिनी । गेला चेवोनी विषयांत ॥६१॥

उत्तम रुपी ज्या स्त्रिया असती । त्यांतें कामदृष्टीं न्याहाळिती । भोगालागीं सर्वस्व वोपिती । अंकित होती श्वानापरी ॥६२॥

कामे गंधर्व माजला अपार । खाय गर्दभीचे लत्ताप्रहार । परी वीट न मानी अणुभर । गोड फार देहीं मानी ॥६३॥

देह पावावया ये पतन । तरी न सोडी विषयाची अंगवण । स्त्रीरुपीं गेला भुलोन । राहिली जडोन वासना ते ॥६४॥

मग तो होय गा पतंग । दीपरुपा ओढवी अंग । झडपोनि करुं पाहतां संग । विषयीं दंग मन ज्याचें ॥६५॥

तो संगेचि पावे मरण । पाद पक्ष जाती जळोन । हें प्रत्यक्ष दृष्टी देखोन । दुजा धावोन उडी घाली ॥६६॥

ऐसे एकामागें एक मरती । परी विंषयसुख न सोडिती । अनिवार विषयाची भ्रांती । फेरी फिरती गर्भवासी ॥६७॥

आतां स्त्रियेचें कारण । तेंही सांगतों निवडोन । धनविषयीं होवोनि मोहित मन । करिती सेवन पर ठायां ॥६८॥

रुप वित्तातें भुलती । कळे त्याचा संग करिती । त्या ऊर्वशी जगीं होती । किंवा गति पतंगापरी ॥६९॥

पाप नानापरी करणें कुडें । त्या पापें पापची जोडे । जन्ममरणाचे पायीं खोडे । घालोनि वेडे वावरती ॥१७०॥

किंवा कामलोभें करोन । करी भ्रताराचें वरिवरी सेवन । भ्रतार जात देह त्यागून । मनीं उबगोन निघे सती ॥७१॥

मागें दुखवितील स्वजन । त्रासें त्रासवितील मजलागून । मरण्यापरी तें भोगावें हीन । यासाठीं मरण हेंचि बरें ॥७२॥

मी सवें सती जातां । तरी मागें उरेल लौकिकता । आणि हाचि पति पावेन मागुता । राहोनि सत्ता न चाले ॥७३॥

पतिव्रता जाती पतिसवें । हे वृद्धाचार असती बरवे । आतां निश्चयेंसी अंगीकारावें । सवें जावें पतीच्या ॥७४॥

न होता सतीपणाची वृत्ति । पतिसवें घालोनि घेती । अग्नि दाहितां तरफडती । रिपुत्व मानिती अग्नीसी ॥७५॥

त्या वैरदोषें करोनी । पतंगासवें पतंगी होवोनी । भ्रमतां दीपातें देखोनी । क्रोधें मनीं खवळे ती ॥७६॥

येणें जाळिला माझा भ्रतार । मम शरीरीं दाहो केला थोर । तरी आतां ग्रासीन या सत्वर । पक्ष प्रहार मारोनी ॥७७॥

तैं ते दीपातें झडपितां । जळोनी जाय मृत्युपंथा । केवढी म्हणावी मूर्खता । विषयीं घाता पावती ॥७८॥

अनिवार हा पंचशर । येणें बहुतांसी केलें जर्जर । याचेनि संगे घात थोर । भोगणें अघोर नरकातें ॥७९॥

या पतंगातें पाहोन । भयें चिळसावलें माझें मन । त्यागार्थ घेतला हा गुण । विषयभान निर्दाळिलें ॥१८०॥

माते या संसारीं । विषयीं न गुंतावें निर्धारीं । हें मायिक क्षणभरी । असक्त अंतरीं असावें ॥८१॥

एवं अक्रां गुरुंचें लक्षण । हें चोविसांतील सांगितलें निवडून । उरलें तेरांचें विवरण । तेही निवेदीन तुज माते ॥८२॥

या व्यतिरिक्त आठ गुरु । तो आदौ निवेदिला विचारु । अनेक बहुधा असती गुरु । परी सारासारु बोलिलों ॥८३॥

हें गुरुमाहात्म्य विख्यात । जे आदरें गा श्रवण करीत । विवेकें स्वीकारोनि रमत । तेचि पावत मुक्तदशा ॥८४॥

हेंचि श्रीकृष्ण उद्धवाप्रति । निवेदिता झाला भागवतीं । तें शुकमुखें परीक्षिती । श्रवण प्रीतीं करीतसे ॥८५॥

हें सुतमुखें करोनी । ऋषि परिसिती नैमिषारण्यीं । तेचि कथा श्रोतियांलागोनी । निवेदी विनवोनी अनंतसुत ॥८६॥

हे दत्त प्रासादिक वाणी । ज्याचा तोचि बोलविता धणी । हीं कर्णभूषणें संतालागोनी । ठेविलीं घडवोनी अवधूतें ॥८७॥

दत्त योगी दिगंबर । जो अविनाश परब्रह्म साचार । त्याचे आवडते प्रियकर । भाविक योगेश्वर संत साधु ॥८८॥

त्यांसी द्यावया दर्शन । शरणागता करावया पावन । दीनबंधु जगज्जीवन । उभा प्रगटोन पंढरीये ॥८९॥

कर ठेवोनि कटीवर । शोभविलें चंद्रभागातीर । उभा समपदीं विटेवर । जो का माहेर सर्वांचे ॥१९०॥

तो कृपादृष्टीं करुन । न्याहाळी अवघे भक्तजन । येत्या जना दे अलिंगन । वारी शीण तयांचा ॥९१॥

तया भाविकांची आवडी । सप्रेम कीर्तनीं बहुत गोडी । हांकेसरशी घाली उडी । संत परवडीं नाचतां ॥९२॥

संत कीर्तनीं देखोनि आनंद । तेथेंचि प्रगटे ब्रह्मानंद । सकळ आनंदाचा कंद । पुरवी छंद भक्तांचे ॥९३॥

भक्त तेचि साधुसंत । संत तेथेंच अनंत । अनंत तेथेंचि गुरुदत्त । त्या पदीं सुत प्रेमभावें ॥९४॥

भावेचि विनवी तो सज्जना । गोड असे पुढील रचना । दत्त मातेसी करी सूचना । सावध श्रवणा राहिजे ॥९५॥

श्रवणांतीं कीजे मनन । मननीं निजध्यास करावा पूर्ण । ध्यास बाणतां तद्रूपपण । साक्षात्कार येऊन ठाके पुढें ॥९६॥

तया दर्शनातें पावतां । परमानंद उपजे चित्ता । सुख सदैव संतोषता । होय लाभता लाभ बहु ॥९७॥

दायक दाता लाभासी । होय सद्‌गुरु हा अविनशी । अनन्य होवोनि त्या चरणांसी । कृपादानासी मागावें ॥९८॥

मागावें भातुकें आवडीचें । हेचि हेतु असती मनींचे । म्हणोनि पाय धरावे संतांचे । आश्रय आणिकांचे सोडोनि ॥९९॥

सोडोनिया कुभावना । विनट व्हावें संतचरणां । ते सदयत्वें देती वरदाना । बहु करुणा अंतरीं त्या ॥२००॥

त्यांची सकुमार पाउलें । अनंतसुतें प्रेमें वंदिलें । संतसेवनीं मन रंगलें । जेंवी लुब्धले भ्रमर सुमनीं ॥२०१॥

मनीं धरोनिया आस । झालों संतपदाचा दास । ते मज न करिती उदास । अभयवरदास देती सुखें ॥२०२॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ । भाविक परिसोत श्रोतेसंत । अष्टदशोध्यायार्थ गोड हा ॥२०३॥

॥ इति अष्टदधोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP