श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ।
जयजय सद्गुरु अनंता । जय कृपाघना समर्था । तू अनन्याचा होसी त्राता । अनाथनाथा नमो तुज ॥१॥
जय सर्वाध्यक्षा गुणसागरा । धीरगंभीरा उदारा । मायातीता परात्परा । दीनोद्धारा नमो तुज ॥२॥
जयजयाजी आनंदघना । जय सद्गुरु ज्ञानसंपन्ना । त्रितापहारका भवमोचना । पतितपावना नमो तुज ॥३॥
तव पदसरोज तारू । आम्हा अनाथासी आधारू । भवार्णवाचा पैलपारू । पावविते निर्धारू सत्य हे ॥४॥
सद्गुरु तुझिये चरणारविंदी । अर्पिली तनमनप्राणेसी बुद्धी । अपंगी दीना कृपानिधी । जन्ममृत्युव्याधी निवटी हे ॥५॥
मी तरी तुझे अज्ञान लडिवाळ । तुज शरणागताची कळवळ । सद्गुरुमाये तू स्नेहाळ । पुरविसी आळ वत्साची ॥६॥
तुझिया कृपाप्रसादे करोन । या ग्रंथी होतसे निरूपण । ते तुजे तू घेसि सांभाळोन । न्यून ते पूर्ण करोनिया ॥७॥
आता पुढील कथारस । तोहि वदविता तूचि सुरस । श्रोते बसले श्रवणास । यांची आस पुरवावी ॥८॥
करिता चरणांचे चिंतन । निरूपणी देसी तूचि स्मरण । तव कृपायोगे करोन। उद्गार वचन निघती ॥९॥
गत कथाध्याय अंती । दुर्वासजन्माच्या निश्चिती । नामकर्मादि सोहोळे निगुती । परिसिले श्रोती सादर ॥१०॥
येथोनि श्रोता सावधान । पाहता कुमाराचे वदन । अत्री अनसूया आनंदघन । लालन पाळन करिताती ॥११॥
हेचि प्रपंचाचे सुख । मंदिरी असावे बाळक । उजळला कुळी कुळदीपक । पुण्य चोख उभयांचे ॥१२॥
योगी तापसी आश्रमा येती । बाळ देखोनी आनंद चित्ती । धन्य उभया वाखाणिती । मुख चुंबिती बाळाचे ॥१३॥
नित्य मंदिरा येती ऋषिललना । आडवा गेह्वोनि खेळविती तान्हा । आनंद अत्री-अनसूयेच्या मना । घेती अंगना इटिमिटी ॥१४॥
अनसूया नित्य अस्तासी । स्वकरे उतरी बालदृष्टीसी । चरणरज लावी भाळासी । खेळवी कौतुकेसी सप्रेमे ॥१५॥
करोनिया पतिसेवन । करी बाळाचे लालन । तेवी अभ्यागताचे अर्चन । समसमान सर्वा राखी ॥१६॥
धन्य माऊली ते पतिव्रता । कधी न करिती तीव्रता । सम राखी सर्व व्रता । निर्मळ चित्ता गंगावत ती ॥१७॥
दिवस मासे बाळ वाढविले । बाळक खेळी खेळते झाले । उभयता आनंदे सुखावले । पाहती उगवले कौतुके ॥१८॥
वेळोवेळा आठविती नारदा । म्हणती पावविले प्रयत्ने वरदा । पुरविले आमुचिया छंदा । पावविले आल्हादा तेणेंचि की ॥१९॥
ऐसिया सुखवार्ता कल्लोळी । उभय आनंदाचे मेळी । सुखे रमती सिंहाचळी । ऋषीमंडळी सभोवती ॥२०॥
ऐसे लोटता काही दिवस । आठव झाला अनसूयेस । त्रिदेवे दिधले वरांस । एका लाभांस पावले ॥२१॥
शेष उरले द्वय अर्थ । ते केधवा होतील प्राप्त । वाया नवजे ते वचनामृत । लाभ मनात व्हावा तो ॥२२॥
केधवा पावेल जगज्जीवन । श्यामसुंदर मनमोहन जाता अनुपम्य बोलिला वचन ॥ तेथे मन वेधले ॥२३॥
असती कुसुमसम ज्याची कांति । सुहास्यवदन जो श्रीपति । चतुर्भुज भव्य दिव्यमूर्ति । वदला वचनोक्ति प्रियकर ॥२४॥
मी त्रिगुणात्मक रूप प्रगटेन । अनसूये बाळ तुझा होईन । तो अजुनि न वळे कृपाघन । कोण कारण करू या ॥२५॥
यापरी अनसूया वेल्हाळी । संचित लाभार्थ ह्रदयकमळी । ध्यानी निरखी मूर्ति सावळी । म्हणे पुरवी आळी कमळाक्षा ॥२६॥
पूर्ण अनसूयेचे वेधले चित्त । ऐसे जाणोनि स्वामी अनंत । ओळखोनी प्रेमा अद्भुत । म्हणे धन्य भावार्थ सतीचा ॥२७॥
शुद्ध देखोनि अंतर कृपे द्रवला विश्वंभर । लीलालाघवी करुणाकर । भाव थोर प्रगटवी ॥२८॥
निस्सीम अनन्यता देखोन । त्याचे निवार स्वयेशीण । पुरवी लळे संपूर्ण । स्वये आपण प्रगटोनी ॥२९॥
दीनबंधु सर्वेश्वर । होय पूर्ण कृपेचा सागर । करावया जगदोद्धार । धरी अवतार स्वलीले ॥३०॥
तो अनुपम सुखसोहळा । होई येथोनि आगळा । पाहावया प्रार्थितो सकळा । उतावेळ चला सर्वही ॥३१॥
अनंतसुत विनवी सज्जना । दया त्या उपजली करुणाघना । अवतार धरितो जगत्कल्याणा । देवराणा सकृपे ॥३२॥
अवतार प्रगटत जगतावर । त्रिविध तापाचा करील परिहार । दुःख दारिद्र्य पीडा पापसंहार । निवटील निर्धार दैन्याते ॥३३॥
प्रगटतांचि ज्ञानदाता । निरसेल सहजे तिमीरता । वारील समस्तांची चिंता । कैची व्यथा उरेल मग ॥३४॥
त्याचे होता कृपादान । जीवाचे मिटले जन्ममरण । मागुती न पवेल बंधन । भवभयमोचन करील तो ॥३५॥
यास्तव प्रार्थना तुम्हांसी । चला त्वरा करा वेगेंसी । सोडा माईक व्यवधानासी । साधा लाभासी निजलोभे ॥३६॥
हे महापर्व उत्तम । साधिता पावेल सुखधाम । पूर्ण होतील सकळ काम । सर्वां विश्राम या पदी ॥३७॥
आदिअनादीचे बीज । तुम्हा साधुसिद्धांचे निज । पुरवावया सकळांचे चोज । साकार सतेज प्रगटे पाहा ॥३८॥
जे अगमानिगमाचे सार । जो श्रुतीगर्भींचा गुह्य विचार । जो का व्यापक सर्वांतर । तो परात्पर प्रगटे पाहा ॥३९॥
जे शिवह्रदयीचे ध्येयध्यान । जे सनकादिकांचे आराध्य पूर्ण । जे प्रणवाचेही कारण । होवोनि सगुण प्रगटे पाहा ॥४०॥
आनंद सिंहाचळ पर्वती । स्वानंदे ऋषिसमुदाय वसती । अनुलक्षे तपाचरणी मिरवती । तपश्री संपत्तीसमवेत ॥४१॥
माजी भक्ती अनूसया विराजमान । नवविधायोगे मंडित भूषण । पतिव्रता धर्मसद्गुण । ती माहेरपूर्ण पांथिकांची ॥४२॥
ब्रह्मरूप अत्रिमहाराज । तपे भास्कर तेवी सतेज । सभोवता ब्रह्मसमाज । दुर्वास आत्मज शिशु शोभे ॥४३॥
केवळ ज्ञानाचा आगर । अंगी वैराग्याचा भर । शांति क्षमेचा सागर । दयाभूत अंतर जयाचे ॥४४॥
उभय सप्रेमाचे मेळी । सुखस्वानंदकल्लोळी । अद्भुत दाविली नव्हाळी । जठरकमळी अनसूयेच्या ॥४५॥
जगदात्मा जगदीश्वर । मायावी गर्भ दावी सुंदर । कळता झाला संभवविचार । आनंद थोर सतीते ॥४६॥
पूर्वीचे वाक्य हे फळले । संभवगुण उदरी दाविले । महद्भाग्य उदयासि आले । स्वलाभार्त भले जागावे ॥४७॥
चला प्रेमभावे घाला कास । निर्विकल्प करा मानस । एकाग्र निरखा धरा ध्यास । लाभ आपणास होईल ॥४८॥
भक्ति ज्ञान वैराग्य आनंद । तेथेंचि प्रगटेल परमानंद । दर्शनेचि हरपतील खेद । वृत्ति अभेद होतील ॥४९॥
मागा शिवरूपी दुर्वास । प्रथम बाळ ते तामस । ते गुण कळले उभयांस । आणि सर्वांस पाहता ॥५०॥
झाले जातकादि वर्णन । ते तेथेही हटी तामसकथन । डोहोळ्यांत आले आढळोन । शिवमुद्रा पूर्न ओळखिली ॥५१॥
बहु दिवसांशी मागोनिया । पुन्हा गर्भीण झाली अनसूया । सुखानंद वाटे देहा । उल्हास ठाया अपार ॥५२॥
उदरी दाविता गर्भधारण । दिशा दुमदुमिती आनंदेकरून । लाभ होती चहूंकडोन । अप्रयासे सन्मान जोडती ॥५३॥
धन्य त्या गर्भाचा प्रभाव । कौतुक वर्ते अतिअपूर्व । चौपासी शोभा अभिनव । सुरमानव पाहाती ॥५४॥
आंगणीचे वृक्ष असती । ते कल्पद्रुमाऐसे फळती । गोधने सर्वकाळ दुभती । रस देती अपूर्व ॥५५॥
जरा क्षीणता गेली पळोन । व्याधी गेल्या सर्व उठोन । दारिद्र्ये त्यागिले ते स्थान । सौभाग्य वर्षोन राहिले ॥५६॥
खडा ना गाई रस देती । सदा सफलित वृक्ष होती । खडकी जळप्रवाह सुटती । वांझ राहती गर्भिणी ॥५७॥
कुरूप ते स्वरूपराशी । निधाने फिरती प्रगट निशी । येऊ म्हणती गृहासी । आश्चर्य ऋषीसी वाटत ॥५८॥
सकळा मनींची कामना । ती सहजे पुरावी होता वासना । मुके बोबडे वेदपठणा । बधिर श्रवणा ऐकती ॥५९॥
पांगुळे पायी चालती । अज्ञानी ते ज्ञानी कथिती । ज्ञानी पावले विज्ञानस्थिती । ब्रह्मानंदी डुल्लती ते ईश्वर ॥६०॥
ही गर्भसंभवाची कळा । पूर्वीच फलद्रुप होतसे सकळा । कोणा न कळती काही लीला । भाग्यसोहळा अद्भुत ॥६१॥
विस्मय करिती चित्ती । म्हणती कोणत्यायोगे लाभ होती । नेणो कोण प्रगटे पुण्यमूर्ती । धन्य जगती वाटते ॥६२॥
असो अनसूयेचे उदरी । गर्भ संभवला निर्धारी । तेजप्रभा कांतीवरी । मुखश्री साजिरी टवटवीत ॥६३॥
उदयापासोनि भानू । जैसा भेदीत वाढे गगनू । तेवी चढे गर्भमानू । दिवस प्रमाणू गाठित ॥६४॥
की शुद्ध बीजेचा अंबुघर । दिवसेंदिवस कळा प्रसर । तेज दावितसे अपार । तेवी प्रकार गर्भवृद्धि ॥६५॥
प्रथमेपासोनि वाढे तिथी । की मासे मास जेवी वाढती । तेवींच जाणा गर्भगती । प्रभा फांकती पै होय ॥६६॥
प्रथम गर्भाहोनि अधिक । या गर्भाचा नवलाव देख । तेज पाहता वाटे कौतुक । देही सुख अनसूयेच्या ॥६७॥
सप्त मासांची होता भरती । मनी डोहाळे उद्गारती । तव शास्त्रीची जाणोनि रीती । अत्रि प्रीती पुसतसे ॥६८॥
अत्रि म्हणे चातुर्यखाणी । मम प्रिये कुरंगलोचनी । काय आवडे तुझिये मनी । ते मजलागुनी निरोपिजे ॥६९॥
सज्ञानसरिते मराळी । न धरी संकोच तू ये वेळी । आनंदे उकलोनि स्वात्मकळी । वदे नव्हाळी अंतरींची ॥७०॥
परिसोनी स्वामीचेः वचन । सती झाली आनंदघन । भावे वंदोनिया चरण । करी भाषण नम्रत्वे ॥७१॥
अहो जी स्वामी प्राणेश्वरा । दयानिधी जी कृपासागरा । माझी विनंती अवधारा । उदारधीरा सतेजा ॥७२॥
तुमचे करावे चरणसेवन । मज आवडते हे तपोवन । स्वइच्छे करावे भ्रमण । आणि तीर्थाटण करावे ॥७३॥
करावा वाटे योगाभ्यास । जप अनुष्ठानादि तापस । भिक्षाटाणी उल्हास । कृती विशेष दावावी ॥७४॥
विषयभोगी वासना । नरुचे काही माझिया मना । कुतर्क विपरीत भावना । न ये ध्याना काहींच ॥७५॥
आत्मचर्चा ज्ञानविवेक । वेदांतविषय ऐकता सुख । आत्मनिष्ठत्व अलोलिक । संवास साम्यक संयुक्त ॥७६॥
बोध आवडे अत्यंत मानसी । वाटते करू सिद्धि ऋद्धी दासी । जीवकलवळा उपजे मानसी । उदंड भाग्यासी वोपावे ॥७७॥
नाना सुरस करावे सेवन । करवावे ते आणिकालागोन । हेचि इच्छिते माझे मन । वैराग्य धारण करावे ॥७८॥
ऐकोनिया गर्भोद्गारा । आनंद झाला ब्रह्मकुमरा । म्हणे राजयोगी उद्भवेल हिरा । जगदुद्धारा निश्चये ॥७९॥
मग सुदिनाते पाहोनी । ऋषिपत्न्या पाचारिल्या सदनी । षड्रस अन्ने निर्मोनी । सुपुष्पवनी सिद्ध केले ॥८०॥
पाचारोनिया तेथे ऋषी । भोजने दिधली सर्वांसी । ऋषिपत्न्या अनसूयेसी । ग्रासोग्रासी प्रार्थिती ॥८१॥
जे रुचेल हो तुम्हांते । तेचि घेईजे मागोनि आम्हांते । निवांतपणे स्वस्थचित्ते । आपुले आवडीते सारावे ॥८२॥
यापरी सारिले भोजन । करशुद्धी मुखशुद्धी करोन । तांबूल वाटिले सकळांलागून । मग हेलन मांडिले ॥८३॥
द्राक्षमंडपा तळवटी । शय्या करविली गोमटी । लीलालाघवे सांगता गोष्टी । निद्रे दृष्टी झांकोळली ॥८४॥
किंचित सुषुप्ती सारून । प्राशित्या झाल्या सुवासिक जीवन । नाना वृक्षी हिंदोळे बांधोन । गीत गावोन झूलती ॥८५॥
झूले सरता मागुती । रमणीक छायेसी बैसती । मध्यपीठ अनसूयासती । सवे शोभती सुवासिनी ॥८६॥
केळी नारळे द्राक्षांचे घड । उतोतिया खिरणिया गोड । चारो बोरे जांब आक्रोड । पक्व निवाड आणिती ॥८७॥
नारिंगे अंजिरे सीताफळ । साखरनिंबे फणस रामफळ । मुखरसिक जे सुढाळ । मेवा सकळ आणिला ॥८८॥
ते अनसूयेपुढे ठेविती । स्वकरे ऋषिपत्न्यांसी वाटिती । जयावरी उपजे प्रीती । ते स्वीकारिती आवडीने ॥८९॥
हेही परवडी सारोन । हळदीकुंकुमे वाटिती पूर्ण । करोद्वर्तन कर्पूरचंदन । करविती लेपण सकळांसी ॥९०॥
सेवंती जाई मोगरा । जुई बकुली पुन्नागरा । ऐसिया पुष्पे गुंफोन हारा । घालिती सुंदरा अनसूये ॥९१॥
वस्त्रे आभरणे देवोनी । फळे ओटी भरिती कामिनी । याचि रीती सुवासिनी । अनसूया पूजोनि गौरवी ॥९२॥
यापरी सातव्यात गौरव । डोहाळे जेवणादि अपूर्व । देवोनी बोळविल्या कामिनी सर्व । आनंदमेव अनसूया ॥९३॥
परम आनंदाचे मेळी । सुखसंतोषे नांदती स्वस्थळी । आठव्यामाजी परस्थळी । जाय वेल्हाळी भोजना ॥९४॥
तव तो वैष्णवमहामुनी । तात्काळ प्रगटला येवोनी । अत्रिअनसूया देखता नयनी । संतोष मनी वाढला ॥९५॥
दोघांसी झाले आलिंगन । परस्परा पुसती क्षेमकल्याण । तव अनसूयेने आणून । पायी नंदन घातला ॥९६॥
म्हणे हा कोणाचा किशोर । अनसूया म्हणे आपुलाचि कृपाकर । दुर्वासनामे हा प्रथम कुमर । उमावरप्रसाद हा ॥९७॥
नारदे करोनि हास्यवदन । म्हणे असो या क्षेमकल्याण । अनसूयेसी पाहता आनंदघन । गर्भचिन्ह वोळखिले ॥९८॥
मनी म्हणे हा त्रिगुणात्मक । स्वये अवतरेल वैकुंठनायक । जगी दावील कौतुक । तिन्ही लोक भजती या ॥९९॥
धन्य अनसूये भाग्य विशेष । जठरी साठविले त्रिभुवनमांदुस । जे तारक सकळ जीवास । त्या प्रसवास पावसी ॥१००॥
जे महासिद्ध योगेंद्र म्हणविती । तेही शरण याते येती । याचेनि हे धन्य जगती । वाचे किती अनुवादू ॥१॥
पाहोनि उल्हास नारदमना । अनसूयेसी करी प्रदक्षणा । दत्तनामाचा करोनि सूचना । स्वर्गभुवना जातसे ॥२॥
ज्या ज्या पदा नारद जात । पुसता हाचि कथी वृत्तांत । अनस्ये उदरी साक्षात । कमलाकांत त्रिगुणात्मके ॥३॥
प्रथम झालासे एक कुमर । तो केवळ भव्य शिवअवतार । नाम तयाचे प्रियकर । मुनीश्वर दुर्वास ॥४॥
त्यासी दृष्टी म्या पाहिले । अनसूयागर्भाते ओळखिले । त्रिगुणात्मके संचले । मन निवाले पाहता ॥५॥
बहु अवतार झाले आणि होती । परि ये अवताराची अनुपम स्थिती । उद्धरील हे सकळ जगती । लीला कीर्ती न वर्णवे ॥६॥
सरला अनसूयेचा अष्टमास । नववा लागला अति विशेष । आतांचि येईल उदयास । ऐकता सकळांस आनंद ॥७॥
तैसाच नारद वेगी निघाला । उमा सावित्री रमेसी भेटला । सकळ वृत्तांत निवेदिळा । पावती सुखाला ऐकोनि ॥८॥
धन्य धन्य ते अनसूया । धन्य तिची तपक्रिया । प्रसन्न करोनि देवत्रया । वरदे सुखा या पावली ॥९॥
हा सुरवरे ऐकोनिया वृत्तांत । लक्षिते झाले सावचित्त्त । येरीकडे गर्भ वाढत । मास भरत पै आले ॥११०॥
नवमासाचे अवसरी अद्भुत तेज अनसूयेवरी । जेवी भानुप्रभा अंबरी । तेचि परी दिसतसे ॥११॥
उरकू न शकेचि पंथ । आळस सुषुप्ति देही दाटत । उमासा क्षणक्षणा येत । नुठवे त्वरित बैसलिया ॥१२॥
विगलित देखोनी अवस्था । अत्रि पाचारी ऋषिकांता । स्थळ नेम करोनि आतौता । केली सिद्धता प्रसंगापरी ॥१३॥
नव मास पूर्ण गेले । शेष नव दिवस उरले । कामिनी जपती ते वेळे । लागले डोळे सुरवरांचे ॥१४॥
गात्रोगात्री फाकती कळा । पूर्वत्वे दावी गर्भलीला । व्यथा वाटे अनसूयेला । नववा लागला दिवस तो ॥१५॥
नवविधा तेचि जाण । नवमास भरले नव दिन । स्वर्गी दाटले सुरगण । विमानी विमान थाटले ॥१६॥
अमरआज्ञे वृंदारक । पुष्पजाती मिळवी अनेक । भरोनी विमानी सम्यक । सुगंधिक आणिले ॥१७॥
शचीसहित शचीरमण । सवे बृहस्पतिगुरु देवगण । यक्ष किन्नर गंधर्व जाण । अप्सरा लावण्य देवांगना ॥१८॥
शुभ्र सतेज ऐरावत । युक्त मंडित विराजित । वरी बैसोनी अमरनाथ । परिवारे साधित वेळ उभा ॥१९॥
सिद्ध करौनि नंदिकेश्वर । उमेसहित पावला शंकर । साठीसहस्त्र गणभार । वीरभद्र षडानन ॥१२०॥
अष्टमसिद्धी समवेत । मूषकवहनी गणनाथ । फरशांकुश करी शोभत । विघ्ने नाशीत मंगल करी ॥२१॥
गायत्री सावित्री सरस्वती । विमानी बैसोनि पाहू येती । मंगल अक्षवणे प्रदीप ज्योती । मंगल गाती देवकांता ॥२२॥
स्वये पावला चतुरानन । त्याचे पृथकची विमान । सत्यवासी अवघे जन सवे वेष्टून राहिले ॥२३॥
यम वरुण नळ कुबेर । सनकसनंदन सनत्कुमार । नारद आणि तुंबर । विद्याधर विमानी ॥२४॥
वंदोनिया मेघःश्यामा । कामारीसहित आली रमा । त्रिगुणात्मकाचा महिमा । पाहू उत्तमा पातल्या ॥२५॥
ग्रह शशी सूर्य तारांगणे । पृथकची शोभली ती विमाने । लोकलोकाधिपतीचे येणे । झाले पाहणे पाहावया ॥२६॥
ऋतु नसता वसंत आला । तया वना शोभविता झाला । पक्षी श्वापदांचा पाळा । आनंद वाटला तयांसी ॥२७॥
वृक्ष पत्रे विस्तारले । फळपुष्पे करोनि लवले । वायुसंगे सुटले । परिमळ आगळे घमघमीत ॥२८॥
मयूर साळ्या कोकिळ । मंजुळ बोलती शब्द रसाळ । भ्रमर सेवावया परिमळ । गुंजार प्रबळ ध्वनी करी ॥२९॥
नाना सुपक्षियांचे पाळै । अत्रिसदना घालिती मंडळे । तैशीच श्वापदे आनंदकल्लोळे । करोनि किलोले प्रदक्षणीती ॥१३०॥
पर्वती पावले ऋषिभार । सिद्धयोगी दिगंबर । साधक साधु यतीश्वर । पाहु चमत्कार पावले ॥३१॥
अत्यंत शोभा शोभायमान । भूलोकापासोनि भरले गगन । केधवा अवतार प्रगटे त्रिगुण । वेधले लोचन पाहावया ॥३२॥
सकळांचे वेधले मानस । काही नाठवेचि दुजे यांस । हे जाणोनि सर्वेश । म्हणे अवकाश न करावा ॥३३॥
घ्यावया अवतारदर्शन । उदित ठेले अवघे जन । तयांसी करावया पावन । साधीत सुदिन परिसा तो ॥३४॥
हेमंतऋतु मार्गेश्वर । शुक्ल पक्ष इंदुवासर । साध्य योग रोहिणीनक्षत्र । चतुर्दशीपर पौर्णिमा ॥३५॥
अमृतवेळा साधून । उभय आडवेळा ती लक्षून । न जाणता कवणालागून । अविनाश पूर्ण प्रगटले ॥३६॥
तेज असंभाव्य दाटले । नेत्र सकळांचे झांकोळले । दिप्ती समावोनि पाहिले । त्रिगुणात्मक देखिले रूपासी ॥३७॥
रूप पाहताचि आनंदघन । जयवाद्ये वाजविती सुरगण । पुष्पवृष्टि स्वकरे करोन । गजानन करीतसे ॥३८॥
गंधर्व गायन सुस्वर गाती । अप्सरा विमानी नृत्य करिती । मंगलघोषे वाद्ये वाजती । घंटारव होती अपार ॥३९॥
येरीकडे ऋषिकांता । आनंदल्या तेव्हा बाळ पाहता । प्रीती तया उचलता । अनसूयामाता विलोकी ॥१४०॥
उभया उष्णोदके न्हाणोन । स्नेहद्वारा केले मर्दन । अनसूये देवोन वसन । मधुसेवन बाळाते ॥४१॥
त्रिगुणात्मके सतेज बाळ । षड्भुजा जयाते कोमळ । सुहास्य त्रिमुख कोमळ । वोसंगा तात्काळ दिधला ॥४२॥
तव देवललना धावोनि येती । मंगल आरत्या करी घेती । आक्षवणे करोनी ओवाळिती । मुख पाहती बाळाचे ॥४३॥
उतरल्या सुरवरांच्या कोटी । ऋषि देवा झाल्या भेटी । सिंहाचळा पुष्पवृष्टी । सघन दाटी अनिवार ॥४४॥
गुढीया तोरणे उभवोनि द्वारी । हरिद्रा कुंकुमे वाटिती नारी । रमा उमा सावित्री । सरस्वती गायत्री पावल्या ॥४५॥
इंदिरा आदिकरून । पाहती बाळाचे वदन । देखोनि होती संतोषमान । म्हणती धन्य अनसूया ॥४६॥
ब्रह्मसुत अत्रिमुनी । देव पातले तया दर्शनी । तव नारद पावला तत्क्षणी । सकळालागुनी भेटवी ॥४७॥
अत्रीसी म्हणे भाग्य थोर । तुझे भेटी पावले सुरवर । ते पाहोनि आनंद थोर । करी सत्कार सकळांचा ॥४८॥
देव वर्णिती अत्रीसी । धन्य धन्य गा तू होसी । त्रिगुणात्मक फळ पावलासी । सकळ कुळांसी तारक जे ॥४९॥
धन्य धन्य तू ऋषिवर्या । धन्य अनसूया तव भार्या । जे प्रसवली या गुणत्रया । आदिमाया केवळ हे ॥१५०॥
ऐसे करोनि वर्णन । निघती अत्रीसी पुसोन । पर्वता प्रदक्षणा करोनि तीन । आरंभिती स्तवन सप्रेमे ॥५१॥
जय जय अविनाश परात्परा । अज अजिता विश्वंभरा । जय गुणातीता निर्विकारा । करुणा करा जगद्गुरू ॥५२॥
जय मायातीता निरंजना । त्रिगुणरूपा चैतन्यघना । जय पूर्ण ब्रह्म सनातना । सच्चिद्घना व्यापका ॥५३॥
जय जय तू अखिल अभंगा । जय सर्वातीता निःसंगा । कर्मविमोचका भवभंगा । अनंतरंगा अनंता ॥५४॥
जय पन्नगहारा पन्नगभूषणा । जय अष्टदलाक्षा कमलासना । श्यामसुंदरा अनंतशयना ॥ दीनपावना जगत्पते ॥५५॥
जयजय तमोद्भवतामसा । जय रजोद्भवा सृष्टिविलासा । जय सत्त्व रूपा सर्वेशा । जय आदिपुरुषा सर्वज्ञा ॥५६॥
तू या जगदुद्धारासाठी । त्रिगुणात्मक अवतार धरिला सृष्टी । तुज पाहता आनंद पोटी । कृपादृष्टी पाहे का ॥५७॥
तू सकळांचा तारू । शरणागताचे माहेरू । या त्रिभुवनींचा दातारू । जगद्गुरु जगदात्मा ॥५८॥
तू होसी कृपाघन । आम्ही तूते अनन्यशरण । नित्य द्यावे जी दर्शन । आपुले चरण दावावे ॥५९॥
तव चरणांची होता भेटी । जन्ममरणा होय तुटी । दग्ध होती विघ्नकोटी । कृपादृष्टी भाग्य पावे ॥१६०॥
ऐसी पृथक आपुले ठायी । स्तवने करिती अपार पाही । पुष्पसंभारे वाद्य घाई । संतोष देही सकळांच्या ॥६१॥
बाळ विलोकुनी देवललना । वंदोनि भावे ऋषिअंगना । निरखोनी अत्रीचिया चरणा । वेगी विमानारूढ झाल्या ॥६२॥
देवही विमानी बैसती । जयजयकारे आनंदे गर्जती । वेळोवेळा भावे नमिती । उंचावती विमाने ॥६३॥
मुखे वदती हा धन्य अवतार । करील आता जगदुद्धार । लीला दाखवील अपार । कृपाकर सर्वेश ॥६४॥
वर्णीत जगद्गुरूचे गुण । देव पावले स्वस्थान । येरीकडे अनसूया आनंदघन । बाळा स्तनपान करवीतसे ॥६५॥
यापरी आनंदसुखसोहळा पाहता सुख नरनारी बाळा । सिद्ध साधक ऋषींचा पाळा । अक्षयी मेळा घनदाट ॥६६॥
संत साधु भाविक । तेही मानिता अत्यंत सुख । म्हणती हा आम्हा तारक । सुखदायक जन्मला ॥६७॥
या अवताराचेनि आगमने । जन्मपंक्तीचे फिटले पारणे । पापकाळाचे धरणे । उठविले येणे वाटते ॥६८॥
करावया सकळांचा उद्धार । येणे धरिला त्रिगुणात्मक अवतार । याचे चिंतनेचि भवपारा । होय दातार शरणागताचा ॥६९॥
हा दीनबंधु दीनानाथ । कृपाळू उदार होय समर्थ । पुरवी अंतरीचे अर्थ । प्रेमभावार्थ पाहोनी ॥१७०॥
पुरवावया दीनाची आळ । सिद्धची उभा असे दयाळ । तो तुम्ही संत जाणता सकळ । येरा आकळ निश्चये ॥७१॥
म्हणोनि या संतचरणी । राहावे उगेची वास करोनी । संत द्रवता अंतःकरणी । कृपादानी तोषविती ॥७२॥
हे श्रेष्ठाचे ऐकोनि उत्तर । केला तयाचा अंगिकार । मनी धरोनिया निर्धार । झालो सादर सेवेसी ॥७३॥
तनमनधनेसी शरण । होवोनि धरिले संतचरण । स्तवावे तया स्वमुखे करून । तरी मी अज्ञान मूढमती ॥७४॥
मी हीन दीन पामर अत्यंत । पाहाता द्रवले संताचे चित्त । संत अनाथांचे नाथ । कृपावंत सदयत्वे ॥७५॥
तेणे देवोनि कृपाकर । चालविला हा ग्रंथ सुंदर । अनंतसुत हा किंकर । पादधर संताचा ॥७६॥
गोड दत्तकथेचे अनुसंधान । तेणेंचि वदवोनि केले श्रवण । पुढेही रसभरितपूर्ण । आवडी निरूपण करवीती ॥७७॥
इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । यासी नारदपुराणीचे संमत । सदा परिसोत भाविक संत । नवमोध्यायार्थ गोड हा ॥१७८॥
॥ इति नवमोध्यायः समाप्तः ॥