श्री दत्तप्रबोध - अध्याय चवथा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.


॥श्रीगणेशसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुदत्तात्र्येनमः ॥

ॐनमोजी सद्‌गुरु दत्तात्रेया । तुझिया स्मरणें नाश तापत्रया । तूं वंद्य सकळ भुवनत्रया । गुणत्रया व्यापका ॥१॥

तुझा अनुपम्य गा महिमा । वर्णूं न शके चितोब्रह्मा । होसी सर्वश्रेष्ठ सर्वोत्तमा । सुखधामा नमो तुज ॥२॥

तूं अविनाश आनंदभरित । सदय आणि सदा शांत । सर्वज्ञ असोनि मायातीत । तव पदीं रत सुरमुनी ॥३॥

तूं महाशुद्धि योगेश्वर । निःसंग निरंजनी दिगंबर । धीर गंभीर उदार । तूं दातार अनाथाचा ॥४॥

तूं शरणागताचा तारु । तूं दीन पतिताचा माहेरु । तूं कृपेचा सागरु । होसी कृपाकरु प्रेमळाचा ॥५॥

तूं अपेक्षिताचा दाता । मनोरथातें पुरविता । जाणोनि चरणीं ठेविला माथा । पुरवी समर्था आळ माझी ॥६॥

मी हीन दीन मतिमंद । अर्भकपणें घेतला छंद । दत्ता तूं माउली प्रसिद्ध । कोण अगाध हे तुझे ॥७॥

आजवरी मातें पाळिलें । लळे पुरवोनि सांभाळिलें । तव चरणीं विश्वासलें । लाचावलें मन माझें ॥८॥

तरी आतां कृपाबळें करुन । तुझें त्वांची वदवावें गुण । मी मूढ केवळ अज्ञान । करितां लेखन तुझा तूंची ॥९॥

या श्रोतयाचें मानस । जाणोनी वर्षें कथामृतरस । हे या मानससरोवरीचे हंस । अर्थमुक्तास भुकेले ॥१०॥

त्यांचे मन हेंचि चकोर । श्रीदत्ता तूं अंबुधर । तव कथामृत सुंदर । श्रवोनि अंतर तोषवी ॥११॥

परिसोनिया विनीत वचन । बुद्धिप्रदाता झाला आपण । पत्रलेखणी करितां धारण । साहित्य पूर्ण सरसावी ॥१२॥

मागें तीन अध्याय बोलविले । ते श्रोतीं आदरें श्रवण केले । आतांही सावधान भले । श्रव्णीं बैसलें पाहिजे ॥१३॥

गतकथाध्यायअंतीं । सावित्री रमा पार्वती । वचनी गुंतवोनिया पती । अभय निगुती घेतलें ॥१४॥

ब्रह्मा विष्णु महेश्वर । वचनीं गुंतले साचार । म्हणती कोणता करावा विचार । चिंतातुर तिघेही ॥१५॥

म्हणती आतां काय करावें । कवणातें जावोनी विचारावें । केसे जावोनि सत्त्व हरावें । कार्य करावें कवण योगें ॥१६॥

शंकर म्हणे दुर्घट । स्त्रियांनीं घातलें आम्हां संकट । अनसूया पतिव्रता श्रेष्ठ । तेथें गोष्ट न घडे हे ॥१७॥

तंव बोले चतुरानन । मजहि कार्य दिसतें कठीण । स्नुषेठाईं विपरीत भान । केंवी आंगवण करावी ॥१८॥

मग बोले तो रमेश । तेथें न पवेची कदा यश । स्त्रीबुद्धि करवी नाश । येईल आपेश वाटतें ॥१९॥

बुडोनि चिंतेच्या सागरीं । युक्ती रचिंती नाना परी । भांबावोनी स्तब्ध अंतरीं । काळकुसरी विसरले ॥२०॥

स्त्रीवचनाचे बंदिखानीं । गुंतोनि गेले ते क्षणीं । मुक्त व्हावया लागोनी । उपाय कोण्ही दिसेना ॥२१॥

म्हणती स्त्रीलोभें नाडलों । आपुल्या कर्मा विसरलों । बुद्धिज्ञान युक्ती नागवलों । फांसां पडिलों जावोनि ॥२२॥

कामचेष्टे धरुं भाव । तरी तो आप्तपणाचा ठाव । त्याविण हरावे कैसें सत्त्व । कोण उपाय रचावा ॥२३॥

ऐसेंचि जावें जरी तेथें । तरी उभय आचरतील सेवेतें । मग वरप्रदानचि द्यावें त्यांतें । हेंचि आपणातें घडेल ॥२४॥

जरी क्रूरवेषाते धरिलें । नाना रीतीं त्या छळिलें । उभय शांत दांत आगळे । कदा काळे तम नये ॥२५॥

आपण करुं जातां एक । त्यापाशीं निघेल आणिक । तरी सत्त्व हरावें आवश्यक । हे तो निःशंक दिसेना ॥२६॥

ते सत्त्व धीर उदार तापसी । निर्लोभ नैरास्य मानसी । अनसूया अनुसरली सेवेसी । सतेज राशी तपाच्या ॥२७॥

कर्मधर्म सांगोपांग । जाणती सर्व भागविभाग । ओळखोनि घेती मानसरंग । तैसाचि प्रसंग साधिती ॥२८॥

प्रपंच परमार्थ एक मूस । ओळखोनि चालती सावकाश । ज्याचे आचरण अति निर्दोष । तेथें दोष कोण लावी ॥२९॥

आकाशीं भानुमंडळ । स्वतपें सतेज निर्मळ । तयालागी लावीता मळ । अळुमाळ लागेना ॥३०॥

तथापि लाऊ जातां । तात्काळ होय दग्धता । तेंवी आपुलिया आतां । कर्म माथा ओढवलें ॥३१॥

तव वैकुंठीचा सकुमार । काय बोलता झाला उत्तर । होणार न चुके अनिवार । घडोनि सत्वर पैं येतें ॥३२॥

प्रारब्धें आलें ओढवोन । तें न सुटे भोगिल्यावीण । व्यर्थ कां संशयी पडोन । दिवसमान लोटिता ॥३३॥

घडणें तेंचि आतां घडेल । होणें तैसें होवोनि जाईल । परी या स्त्रियांचे न घ्यावे बोल । वचन फोल जाऊ द्या ॥३४॥

अंतरी जाणे तो मुकुंद । अनसूयातप आचरे शुद्ध । तिसी जेणें होय आल्हाद । परमानंद संसारी ॥३५॥

आणि अभिमानल्या आमुच्या कांता । भलतेचि दोष घेती माथा । अविचारें पेटती अनर्था । हेही भ्रांतता फेडावी ॥३६॥

तेचि करुं आतां कारण । म्हणोनि पुढती करुं निरुपण । म्हणे ऐका सावधान । युक्ती पूर्ण सुचली ॥३७॥

गुंतलो स्त्रीयांचे वचनीं । सुटावें आतां येथुनी । ऐसें जरी वागेल मनीं । तरी योजोनी सांगतों ॥३८॥

ऐकोनि चंद्रचूड विधाता । म्हणती युक्ति ते सांगा आतां । तेचि स्वीकारुं जी अनंता । कमलाकांता मधूसूदना ॥३९॥

हरी म्हणे ऐसें करा । द्विजवेषातें वेगें धरा । मी सांगेन तैसें करा । द्वैत विचारा नाणिजे ॥४०॥

भूमंडळीं सिंहाचळ । तो मद्‌रुप आहे केवळ । तेथें वसती पुण्यशीळ । ऋषिमंडळ योगी तें॥४१॥

महाविषाळ पर्वतोदरीं । तेथें नगर नामें मायापुरी । तया पर्वताचे शिखरीं । मुनी अत्रि वसतसे ॥४२॥

गुप्तरुपें तेथें जाऊन । तयाचें घ्यावें दर्शन । विलोकावें आचरण । तैसें कारण करावें ॥४३॥

कांहीं न्यून न येतां हातीं । नारद निवेदनीं आली प्रचिती । तयालागी हेंचि युक्ति । असतां एकांतीं प्रगटावें ॥४४॥

अत्रि नसतां मंदिरीं । द्विजरुपें प्रगटोनि द्वारीं । नग्न भिक्षेतें अवसरी । अति सत्वरीं मागावी ॥४५॥

अनसूया करितां अनुमान । शापशस्त्रें कराजी ताडन । सत्त्व तिचें सांडवून । करावें गमन तेथोनी ॥४६॥

ऐसें बोलतां तो अनंत । तें उभयासी मानली मात । आनंद घोषें टाळी पिटीत । म्हणती युक्ति बरवी हे ॥४७॥

मग न कळवितां कवणासी । निघते झाले एके दिवशीं । विप्रवेश धरोनि वेगेसी । भूलोकासी पावले ॥४८॥

नाना तीर्थे क्षेत्रें पहाती । पर्वत दरी आश्रम धुंडिती । शोधिता सिंहाचळ पर्वतीं । गुंफा विलोकितीं ऋषीच्या ॥४९॥

तंव तें मायापुरीचें शिखर । दाविता झाला सर्वेश्वर । परम रमणीय वृक्ष अपार । लावले भार फळपुष्पीं ॥५०॥

शाल तमाल नारळी । जांब जांबूळ खिरणिया । देवदार कृष्णागर मलिया । जाईजाई मोगरे ॥५२॥

हिरडे बाहाळे रातांजन । आंवळी व्याहाडे अंजन। फणस पांगारे कांचन । वंशसधन तोरणें ॥५३॥

सिरस हिंगण धावड । रुई मांदार केवडा । केतकी करंजी पेवडा । ताड माड खर्जुरा ॥५४॥

बाभळी बकान सेवरी । चिंच शमी आंबे बदरी । अश्वस्थ्य भेदले अंबरीं । वट सविस्तरी वाढले ॥५५॥

अगस्ती शेवगे सारफळ । बरु सूर्य देव नळ । अशोक औदुंबर टाकळ । आपटाये कळकठकि ॥५६॥

बेल तुळसी शेवती । पाच दौने घमकारती । मर्वे कोर्‍हाटे शोभती । कमळें विकासती जळठाईं ॥५७॥

कुड्रगुल छबुगुल्लतुर । गुल्लमेहदि गुल्लदावनी अनार । नारंगी नेवाळी तगर । तरटी खदिर ते दुबे ॥५८॥

लवंगा दोडे नागवेली । द्राक्षमंडप पवळवेली । तोंडले पडोळे गुळवेली । परवर कारली कढवंचे ॥५९॥

फणस मोहो पारिजातक । कौठ भोंकरे साग देख । दहिंवन रुदाक्ष अलोलिक । मिरी झुबक धायटी ॥६०॥

चार पिस्ते बदाम ऊंस । कर्पूर कर्दळी विशेष । वैजयंतीचा सुवास । आसपास धावत ॥६१॥

वृक्ष वर्णिले अल्पमता । परी अनेक असती वनस्पती । कंदमुळां नाहीं गणती । श्वापदें वसता त्यामाजीं ॥६२॥

जेथें मकरंद अपार । तेथें वसती उरग म्रमर । जेथें लवले फळभार । तेथें संचार बहुतांचा ॥६३॥

ते यथामती करुन । वर्णिल्यातील किंचित निरुपण । परिसा श्रोते चित्त देवोन सुशोभित वन ज्यायोगें ॥६४॥

साळ्या शुक मयोरे । बकवे लाल तीतरे । भारद्वाज तास नकुळ फिरे । माकडें वानरें रीस पैं ॥६५॥

घारी कावळे कोळसा । गृध्र ससाना ढोकसा । कर्कोट पांडव सारसा । कोकिळा सुरसा बोलती ॥६६॥

बक बदकें हंस । कुकडि जळीं करी वास । चकवीचे डोल खबुतरें विशेष । पारवे सुरस घुमघुमती ॥६७॥

चिमण्या तिटवी नीलकंठ । शकुंत कुकडे परीट । चित्रुक पिंगळे कलकलाट । रजनीं धीट वाघुळा घुगु ॥६८॥

पतंग पाकोळ्या भ्रमर । शार्दूल कुकुट थोर । सायाळ बिल्लबिला अनिवार । मैना सुंदर बोलती ॥६९॥

अनेक पक्षियांचे पाळे । गुजबुजिती कर्कश रसाळे । तेंवी श्वापदांचीं कुळें । आनंदमेळें डुल्लती ॥७०॥

मृग चितळे सांबर । सिंह व्याघ्र कूंजर । रोही म्हैसे शूकर । अरण्यें अपार ते ठाईं ॥७१॥

जवादि मृग मांजरें । गौतमीचीं वनखिल्लारें । ससे टेभे वृक भयंकरें । तरस खोंकरें जंबुक ॥७२॥

ससे गेंडे आणि नीळ । उद भुमी वृक्षी नीळ । सर्प नाग माहंडूळ । अजगर विशाळ पसरले ॥७३॥

पक्षी श्‍वापदांच्या नाना याती । त्या वनीं शब्दीं गर्जती । जळचरें जळीं फिरती । यथामती निवेदूं ॥७४॥

मीन मासोळी टोक । वाबटि असती लंबक । किडे कांसवें मंडूक । विरोळे देख सळसळती ॥७५॥

मगर सुसरी विषाळ । जळीं तंतूतें सबळ । खेंकडे गाई द्विगुल । मनुष्यें कोमळ सान जळीं ॥७६॥

जळचरें जळीं विचरती । वनचरें भूमी धावती । वृक्षीं विहंगम बोलती । भूगर्भी वसती श्वापदें ॥७७॥

ऐसिया वनगव्हारीं । जळस्थानें नाना परी । आश्रम गुहा कपारी । कुटिका नागरी ठाईं ठाईं ॥७८॥

तेथें अत्रिमुनीचा आश्रम । तपाचरणीं युग्म उत्तम । तो सकळांचा विश्राम । दे आराम पांथिका ॥७९॥

त्या वनाप्रति जातां । सुखसंतोष उपजे चित्ता । दूर पळे उद्विग्नता । अंगी व्यथा नुरेची ॥८०॥

तेथें ब्रह्मा विष्णु महेश्वर । स्थळ पाहतां आनंदले थोर । सव्य प्रदक्षिणा करोनी सत्वर । करिती नमस्कार गुप्तरुपें ॥८१॥

स्थळ देखताचि निवाले । उपमें स्वर्गा तुच्छ केलें। धन्य या भूलोकिचें दैव आगळे । वास केले ते धन्य ॥८२॥

अद्‌भुत आनंदें देखोन । विसरले कार्याची आठवण । मन झालेंसें उन्मन । नारद वचन आठविती ॥८३॥

आपी आपणा बोलति बोले । अहा स्त्रियांनीं हें काय रचिलें । येथें तो युक्ती कांहीं न चले । संकटीं घातलें अर्भकीं ॥८४॥

असो आतां संधी पाहून । घेऊं मातेसी प्रसाद मागोन । म्हणोनिया रात्रंदिन । रहाती जपोन तिघेही ॥८५॥

अत्रि नसता सदनाठायीं । प्रसाद मागावा लवलाही । पावताच आपुले गृहीं । निघोनी सोई जाईजे ॥८६॥

अत्रि असे अंतरज्ञानी । जरी भाव ओळखिला त्यांनीं । तात्काळ टाकितील श्रापोनी । सावध मनीं असावें ॥८७॥

असो इकडे अत्रिमुनी । स्वकांतेलागी पाचारोनी । गुज सांगे तियेचे कर्णीं । तपोवनीं जातों मी ॥८८॥

स्वस्थचित्तें मानसीं । सुखें राहे तूं आश्रमासी । तप झालिया वेगेसी । भेटूं तुम्हांसी सत्वर ॥८९॥

तव अनसूया होवोनि विनीत । मुनी अत्रितें प्रार्थित । आपण आरंभिला योगयुक्त । तपोवनांत जावया ॥९०॥

मज आज्ञापितां आपण । आश्रमीं असावें सावधान । परी केंवी गमेल मजलागून । स्वामिचरण अंतरती ॥९१॥

आणि मंदिरीं येती अभ्यागत । त्यांचें कैसें होय स्वागत । तुम्ही समीप नसतां स्वामिनाथ । भय अद्‌भुत जीवीं कीं ॥९२॥

व्रत कैसें हें चालवावें । नून्य पूर्ण कोणें करावें । आलिया विघ्न निवारावें । हें काय घडावें स्त्रियांसी ॥९३॥

यदर्थीच माझी विज्ञापना । केली आदरें स्वामीचरणा । स्वस्थ करोनि माझी यामना । तपोवना जाइजे ॥९४॥

परिसोनि अनसूयेचें उत्तर । काय बोले तेव्हां मुनीश्वर । निर्भय करावी सेवा सत्कार । पूजा आदर अतिथीचा ॥९५॥

माझे चरणोदकें करुन । ठेवी कमंडलू भरुन । तुज संकट वोढवतां दारुण । करी सिंचन कार्य होय ॥९६॥

दृढवचन धरोनि मानसीं । अनसूया पूजी पतिपायांसी । सद्‌गद होवोनियां मानसीं । प्रेमें चरणांसी वंदिलें ॥९७॥

पतिव्रतेचें समाधान । करोनि जातसे ब्रह्मनंदन । इकडे विधिविष्णुईशान । अर्थार्थी पूर्ण जागती ॥९८॥

ऐसें संधान साधिता । तंव तो सुदिन उगवला अवचिता । ऋषि तपासी जाला जाता । घरीं माता एकली ॥९९॥

एकटी अनसूया मंदिरीं । हें देखोनि ते अवसरीं । द्विजवेषें प्रगटोनि द्वारीं । मधुरोत्तरीं बोलती ॥१००॥

माते आम्ही तिघे ब्राह्मण । अति क्षुधेनें पीडिलों जाण । नग्न भिक्षा घाली भोजन । उदार पूर्न तूं होसी ॥१॥

अनूसये धन्य तूं पतिव्रता । औदार्य सदय ऐकोनि वार्ता । टाकोनिया दूर पंथा । प्रसाद आर्था पावलों ॥२॥

तूं साध्वी सुलक्षण माउली । कोमळ हृदयीं तूं वेल्हाळी । तरी इच्छित भिक्षेची पुरवी आली । ऊठ ये वेळीं जगदंबे ॥३॥

अति लाघवी ऐकोनि भाषण । अनसूया करी त्यां अवलोकन । मनीं म्हणे हे कैसे ब्राह्मण । विपरीत दान मागती ॥४॥

मग निरखी आपुले मानसीं । वाटतें आले छळावयासी । अव्हेरुनी जरी द्यावें यांसी । तरी सत्त्वासी हरितील ॥५॥

तैसियांत स्वामी नसता घरीं । द्विज पातले ये अवसरीं । आतिथ्य न करितां निर्धारी । शब्द मजवरी येईल ॥६॥

मग आठवोनि पतीचे चरण । पाचारिले ते ब्राह्मण । अर्घ्यपाद्यादि पूजोन । केलें वंदन सप्रेमें ॥७॥

येरु म्हणती आम्ही क्षुधातुर । न रुचती आम्हां उपचार । इच्छीत भिक्षा करी सादर । नसतां उत्तर दे त्वरें ॥८॥

ऐकोनि तयांचें भाषण । म्हणे जी स्वस्थ करावें आतां मन । आपण जैसें मागीतलें भिक्षादान । सिद्ध करुन आणितें ॥९॥

पतिसेवेचें तप प्रबळ । त्या कृपें ज्ञान विशाळ । ओळखोनिया त्यांचे बोल । कौतुक तात्काळ रचियलें ॥१०॥

जावोनियां मंदिरीं । पालखशय्या केली साजिरी । आपण येवोनि बाहेरी । काय करिती तेधवां ॥११॥

पतिचरण तीर्थें करुन । अक्षयीपात्र भरित पूर्ण । तें आदरें करीं घेऊन । करी सिंचन तिघांवरी ॥१२॥

उदक सिंचिताचि तात्काळ । तिन्ही मूर्ति झाल्या बाळ । सुहास्य वदन कोमळ । करिती कोल्हाळ क्षुधेनें ॥१३॥

विलोकितां अनसूयासती । झाली मोहाची उत्पत्ति । पान्हा फुटला सत्वर गती । दर्दरीति पयोधरें ॥१४॥

येणें नग्नभिक्षे मागितलें । तरी तेचि पाहिजे पुरविलें । म्हणोनि तात्काळ वसन टाकिलें । नाहीं ठेविलें कंचुकीसी ॥१५॥

अतृप्त ते तृप्तपर्यंत । आडवे घेवोनिया पाजित । क्षुधानळ करविला शांत । संतोषभरित तिघेहि ॥१६॥

बाळें वस्त्रावरी ठेवोनी । स्ववसन नेसली तेच क्षणीं । अंतरगृहीं प्रवेशोनी । जल तापवोनि आणिलें ॥१७॥

तिघे बाळक उचलिले । तैलाभ्यंग त्यातें केलें । पायांवरि न्हाणिलें । वेगळाले घेवोनि ॥१८॥

स्ववस्त्रें तेव्हां आंग पुसी । वेगीं फुंकिलें कर्णासी । स्नेहें भरोनि तालुकेसि । पालखीं तयांसी पहुडवी ॥१९॥

एक असे तो श्यामसुंदर । एक गौरवर्ण तो सुकुमार । एक दिसे कर्पूरगौर । नाटकी प्रियकर दीसती ॥२०॥

वस्त्रें घालोनि पोटावरी । अनसूया पालखदोरा धरी । जो जो म्हणोनि सुस्वरीं । सप्रेम कुसरी गीत गायें ॥२१॥

गौरांगा तूं चतुर्मुखा । सृष्टिकर्ता श्रमसी देखा । निजनिज बाळा घेई सुखा । हालवी पालखा जो जो म्हणे ॥२२॥

श्यामांगा तूं चतुर्भुजा । अवतार घेवोनी पाळिसी प्रजा । शिणलासी निज गा अधोक्षजा । भक्तकाजा जो जो रे ॥२३॥

स्मशानवासी दिगंबरा । भस्मधूलित कर्पूरगौरा । निज गा बापा भूतसंव्हारा । पंचवगत्रा जो जो घे ॥२४॥

पद्मोद्‌भवा चतुरानना । वेदस्थापका ब्राह्मना । सत्यलोकवासी सगुणा । कमलासना जो जो रे ॥२५॥

कमललोचन कमलावरा । नवमेघरंगा जगदांतरा । शेषशयना गदाधरा । निज गा उदारा घे जो जो ॥२६॥

गंगाधरा गौरिप्रिया । पन्नगभूषणा करुणालया । पशुपते तूं कंठनीलया । हर भवभया जो जो रे ॥२७॥

नीज रजोगुणा पाकशासना । झोप घे तामसा मदनदहना । डोळा लागो या सत्त्वगुणा । मधुसूदना जो जोरे ॥२८॥

यापरिस प्रेमें गीत । गावोनि पालख हालवीत । सती अनसूया आनंदभरित । वदनें विलोकित तिघांचीं ॥२९॥

नित्य उठोनीयां सती । बाळां खेळवी परमप्रीती । स्नानपूजा त्वरितगती । पाकनिष्पत्ती स्वकरेंची ॥३०॥

आल्या अतिता सत्कारोन । प्रेमें देतसे त्यां भोजन । बोलोनियां नम्र वचन । संतोषमान बोलवी ॥३१॥

एवं नित्यानंदें अनसूया । अतिथी पुजोनी सारी गृहक्रिया । रिक्तकाळीं हाल्लरतया । लागे गाया बाळका ॥३२॥

तंव अकस्मात ऋषिवर्य । सारोनि जपतपादि कार्य । उदयाचळीं उगवे सूर्य । तैसा विधितनय प्रगटला ॥३३॥

तंव ती मंगळ गीतध्वनी । प्रेम आल्हादें ऐके कानीं । म्हणे आजी आमुची राणी । कवणालागुनी हालवीती ॥३४॥

मग मंदिरामाजीं केला प्रवेश । येतां जाणवले अनसूयेस । उठोनि लागली चरणास । आसनीं स्वामीस बैसवी ॥३५॥

अर्घ्यपाद्यादि द्रव्य आणिलें । स्वामीचरणातें पूजिलें । प्रदक्षणोनिया नेमिलें । प्रीती स्तविलें नम्रत्वें ॥३६॥

तव तो अत्रि तपोधन । कांतेसी बोले काय वचन । आजी तुझें बहुत मन । आनंदघन दीसतें ॥३७॥

काय लाभ आला हाता । कीं सांग भेटलीस रमाकांता । कोण कारणें मंगलगाथा । गाइलासी स्वतः स्वमुखें ॥३८॥

तव निर्दोष गंगा लावण्यखाणी । पतिपुढें जोडोनि पाणी । जी महाराज एके दिनीं । नवलकरणी झालीसे ॥३९॥

आपण तपासी जातां । तिघे द्विज आले अवचितां । द्वारीं उभें राहोनि कृपावंता । ध्वनी गर्जतां ऐकिलें ॥४०॥

मग तयांतें पाचारिलें । आसनीं यथोक्त पूजिलें । तंव ते मज बोंलते झाले । सांग तें ऐकलें पाहिजे ॥४१॥

आम्ही मार्ग चालतां पावलों शीण । दूर पंथ आलोंत क्रमोन । क्षुधानळें पीडिलों जाण । पुरें पूजन तुमचें ॥४२॥

तुमची कीर्ति दिगंतरीं । सदय ऐंकिलें कर्णद्वारीं । जे हेतू याचक अंतरीं । पुरवितां निर्धारीं म्हणोनिया ॥४३॥

औदार्य कृपाळू तपोधन । शांत दांत विरक्त-पूर्ण । सद्भक्तीं करितां पूजन । याचक जन तोषवितां ॥४४॥

ऐसिया कीर्तीचे पवाडे । आम्ही एकोनि वाडें । इच्छा धरोनि द्वारापुढें । वाडेंकोडें पावलों ॥४५॥

तुम्हीं दयाळू कोमळ मानसीं । नग्नभिक्षा द्यावी आम्हांसी । ऐकोनि तया उत्तरासी । विचार मानसीं मांडिला ॥४६॥

स्वामीं तुमचे दयेंकरुन । विचारें जाणितलें त्यांचें चिन्ह । होती विप्रवेष करुन । सत्त्वहरण करुं आले ॥४७॥

कोण युक्ति करावी यासी । म्हणोनि योजीत जंव मानसीं । पुनरपि तिघे ते-जोराशी । बोलती मजसी तमोक्त ॥४८॥

माते झाला बहुत वेळ । आम्हांसि पीडी क्षुधानळ । शांतवी आतां न लावी वेळ । प्राण व्याकुळ पैं होती ॥४९॥

द्यावया आम्हां नग्नभिक्षेसी । अंगवण नसे जरी तुम्हांसी । तरी उत्तर द्या अतिवेगेंसी । जाऊं उपवासी स्वधामा ॥५०॥

हें ऐकोनि स्वामिराया । मागुती वंदिलें त्यांच्या पायां । गौरव केला विनवोनिया । कीं क्षण एक दया मज कीजे ॥५१॥

ओळखोनि सत्त्वाची हानी । तात्काळ प्रवेशलें सदनीं । वेगीं पालखा सज्ज करोनी । मंडित भूषणीं युक्त तो ॥५२॥

त्वरें येवोनि बाहेरी । आपुलें पदध्यान केलें अंतरीं । तीर्थोदक घेवोनिया करीं । तयांवरी सिंचिलें ॥५३॥

तंव ते तिघे झाले बाळक । क्षुधें टाहो करिती हांक । मग वस्त्र त्यागोनि आवश्यक । विलोकीं मुख तयांचें ॥५४॥

त्या तिघांसी अवलोकितां । मोहो पान्हा झाला देता । मग निर्भय होवोनि चित्ता । धालें उचलितां बाल एक ॥५५॥

आडवा घेऊन लाविला स्तनीं । शांतविला तेव्हां पयःपानीं । एवं तिघां तृप्‍त करोनी । वस्त्रासनीं ठेविलें ॥५६॥

वस्त्र केलें परिधान । मग तिघां अभ्यंग करुन । उष्णोदकें घालोनि स्नान । पालखीं शयन करविलें ॥५७॥

त्यांतें मंगल गीत गाइलें । जो जो म्हणोनि हालविलें । तों अकस्मात पाउलें । नेत्रीं देखिलीं स्वामीचीं ॥५८॥

दयाळें मातें प्रश्न केला । तो झाल्यापरी निवेदिला । आपण विलोकावें बाळां । आतां डोळा लागला त्यां ॥५९॥

आश्चर्य वाटलें अत्रीसी । म्हणे ही अद्‌भुतकरणी कैसी । मग उठोनिया वेगेंसी । पालखापाशीं पावला ॥६०॥

बाळकांचीं पहातां मुखें । ऋषि आनंदला परम सुखें । म्हणे धन्य ईश्वराचीं कौतुकें । अलोलिकें दावितो ॥६१॥

न्याहाळोनि पूर्ण बाळांसी । ज्ञानद्दष्टीं शोधीत मानसीं । ध्यानीं आणोनि वेगेंसी । काय कांतेसी बोलत ॥६२॥

धन्य भाग्य तुझें सबळ । ईश्वरें पुरविली तुझी आळ । भक्ति पाहोनि हे कृपाळ । झाले बाळ तव सदनीं ॥६३॥

गौर तो हा कमळासन । कर्पूरगौर तो उमारमण । श्यामांगी तो नारायण । पृथक्‌ त्रिगुण बाळ झाले ॥६४॥

तुझे हेतु पुरवावया । त्रिमूर्तीस आली दया । बाळरुप धरोनिया । केली छाया कृपेची ॥६५॥

परी पुढील भविष्यार्थ । तुज सांगतों मी यथार्थ । हे जातील येथोनि त्वरित । सावध कार्यार्थ साधावा ॥६६॥

यांचें करीं प्रीतीं पालन । दिनरात्रीं करी संरक्षण । विसरुं नको एकक्षण । जीवींची खूण सांगितली ॥६७॥

अनसूया वदे जी महाराजा । म्यांही ओळखिलें यांसि वोजा । तव कृपें साधिलें काजा । तुम्हीही गुजा निवेंदिलें ॥६८॥

आपुलें वचन मज वंद्य शिरीं । रक्षी तयांतें बहुतपरी । ऐसें वदोनि ते अवसरीं । पाक करी अतिवेगें ॥६९॥

पंचमहायज्ञ करुन । उभयतां सारिलें भोजन । पुढतां स्वामीचें करी सेवन । स्वयें आपण अनसूया ॥७०॥

तंव तो महाराज योगेश्वर । परम साधु वैष्णववीर । स्कंदीं वीणा वाहोनि सुंदर । निरंतर भजनीं जो ॥७१॥

तो विधिसुत नारदमुनी । येता झाला आनंदें भुवनीं । प्रीति धरोनिया दर्शनीं । सन्मुख येवोनिया ठाकला ॥७२॥

तंव अत्रिमुनी असे पौढला । अनसूयेनें पालखदोर धरिला । जो जो म्हणोनि हालवी तये वेळां । ऐकोनि प्रगटला नारद ॥७३॥

प्रेमळ हाल्लर ऐकतां । अनसूयेसि म्हणे कोणा हालवितां । मंगल गीत वाखाणितां । आनंद चित्ता फार तो ॥७४॥

अनसूया उठोनी आसना । देवोनि गौरवी पद्मोद्भवनंदना । म्हणे महापुरुष दयाघना । बाळें पाळण्या निजविलीं ॥७५॥

परिसोनी उभयतांच्या बोला । मुनी अत्रि जागृत झाला । नारदासी देखोनिया डोळां । आनंद झाला बहु थोर ॥७६॥

एकमेकांतें आलिंगिती । सप्रेमें संवाद करिती । परस्परें धन्य म्हणती । अंतरी निवती दरुषणें ॥७७॥

उभय बंधु । एकासनीं । कुशल पुसती आवडी करोनी । तैसियांत बाळकें घेवोनी । मृगलोचनी पावली ॥७८॥

नारदासन्निध तिघे ठेविले । नारदें पूर्ण तयां अवलोकिलें । उभय मुखांकडे पाहिलें । भिन्न देखिलें तयांसी ॥७९॥

परम विस्मित झाला मानसीं । तंव तें जाणवलें अनसूयेसी । पतिसन्निध सांगे व्रतासी । अति सावकासी सुचित्तें ॥८०॥

घरीं नसतां मम स्वामी । तिघे द्विज पावले आश्रमीं । म्हणती माते क्षुधित आम्ही । झालों श्रमी चालतां ॥८१॥

मग ते म्यां पुजीले द्विजगण । ते नग्नभिक्षा मागती दान । तैं आठवोनि पतिचरण । तीर्थोदक सिंचन त्यां केलें ॥८२॥

तंव ते तिघेही झाले बाळ । क्षुधानळें केला कोल्हाळ । मग वसन टाकोनि तात्काळ । तिघे लडिवाळ पाजिले ॥८३॥

करविलें अभ्यंगस्नानासी । पालखीं निजविलें बाळकांसी । तें वृत्त निवेदिलें स्वामीसी । तैसें तुम्हांसी येधवां ॥८४॥

गद्गदा हसे तेव्हां नारद । म्हणे हा बरवाचि झाला विनोद । स्त्रीबुद्धीं पावले बाद । नसतां बंद भोगणें ॥८५॥

स्त्री अनर्थाचें घर । स्त्री हें पापाचें माहेर । स्त्री डंखिणी निर्धार । जीता नर खातसे ॥८६॥

जे स्त्रियेतें विश्वासलें । जे स्त्री वचनासि गुंतले । जे स्त्री बुद्धीनें वर्तले । जिता मेले ते नर ॥८७॥

धिक् धिक् जिणें त्या पुरुषाचें । बाइले आधीन वर्तती साचे । काय डिंगर वाटोनि सांबरीचें । कीं अजागळीचे स्तन जेवी ॥८८॥

धिक् धिक् संसारी ते कामिनी । जी पुरुषासि पाडी व्यसनी । अमर्याद कुष्ट नष्ट भाषणीं । पाडी पतनी उभय कुळां ॥८९॥

अहा हे सर्वोत्तम । स्त्रीबुद्धीं आचरलां कर्म । उचित नोव्हे तुम्हां धर्म । दुःख परम मज वाटे ॥९०॥

तंव अत्रि अनसूया बोलती । का गा श्रम पावतां चित्तीं । कोण वार्ता ते आम्हांप्रति । कृपामूर्ती निवेदा ॥९१॥

नारद म्हणे मागें येऊन । आपुलें घेतलें दर्शन । स्थिति रीती अवलोकून । समाधान वाटलें ॥९२॥

माते तूं करिसी पतिसेवा । तें पाहोनि आनंद जीवा । सुखसंतोष बरवा । माझा विसावा ये ठाईं ॥९३॥

येथे पावोनी समाधान । स्वर्गीं केलें म्यां गमन । प्रथम पाहिलें कैलासभुवन । झालें दर्शन शिवाचें ॥९४॥

शिवगौरी एक स्थळी । उभय असतां सुखमेळीं । मज देखोनी चंद्रमौळी । हृदयकमळीं आनंदे ॥९५॥

सन्मानें देवोनि अभ्युत्थान । म्हणे कांहीं अद्‌भुतनिरुपण । मीं तुमचें चरित्रवर्णन । अद्‌भुत महिमान कथियेलें ॥९६॥

ऐकोनिया गौरीसी । रोष आला बहु मानसी । म्हणे अनसूयाच काय अवनींसी । बहु वाणिसी पतिव्रता ॥९७॥

आम्हांहुनी काय थोर । तंव मी म्हणे हाच निर्धार । शापशस्त्र उचलिलें सत्वर । जवळी शंकर बैसला ॥९८॥

उमा म्हणेअ कसनी कसिता । सोनें कळे सुलाखितां । हिरा आहेरणी ठेवितां । घण मारितां कळतसें ॥९९॥

तोंवरीच तुमची गर्जना । जोंवरी नाणिलें अनुमाना । नुतरतांचि शापबंधना । पावसी मोचना न घडे मग ॥२००॥

अपर्णेचें ऐकोनि उत्तर । मीही बोलिलों तैं समोर । असत्य कथिलें कराल जर । बाधी निर्धार शाप मज ॥१॥

हें श्रुत असों तुज पार्वती । ज्या भुवनयत्रीं पतिव्रता असती । त्या दासी अनसूयेसि शोभती । सकळा निश्चिति माता ते ॥२॥

ऐसी गर्जोनी वाणी । मग गेलों सत्यलोकभुवनी । पिता आज्ञापितां मजलागोनी । हेंची निरुपणीं निरोपिलें ॥३॥

तेथें ही गति हेची झाली । माता मजवरी बहुत कोपली । श्राप देतां तये वेळीं । सम फळीं फोडिली ॥४॥

तेथेंही मना तें विटलों । वेगीं वैकुंठपुरी पावलों । रमारमणातें भेटलों । शरण झालों तयासी ॥५॥

तेणें देवोनि अलिंगन । म्हणे करी कांहीं अद्‌भुत कीर्तन । तंव लक्ष्मी देखोनि सन्निधान । केलें निरुपण हेंचि पै ॥६॥

तेथेंही रमा क्रोधावली । गति मागीलचि दिसोनि आली । माझीही चित्तवृत्ति क्षोभली । आज्ञा घेतली हरीची ॥७॥

त्या दिवसापासोन । तिन्ही स्थळें सोडिलीं पूर्ण । नित्य करितों दर्शन । दूरी राहोन त्या ठायां ॥८॥

तेव्हां मजसी गमतें । स्त्रियांनीं बोधिलें यांतें । हीनत्व देवोनि वचनातें । गुंतवोनि येथें धाडिलें ॥९॥

करावें सत्त्वाचें हरण । स्वकीर्तीनेंचि भरावें त्रिभुवन । हेंच मनीं इच्छा धरोन । दिले पाठवून छळावया ॥१०॥

हें माते तुवां ओळखिलें । कृपें करोनि केलीं बाळें । श्राप देवोनि नाहीं भस्मिलें । उपकार केले आम्हावरी ॥११॥

मातें तव कीर्तीच्या वर्णनें । उद्धरतील हीं त्रिभुवनें । ऐसें न घडतें दान पुण्यें । अघटित महिमानें तुझीं देवी ॥१२॥

आतां एक मागणें मागतों तुम्हा । हाची अभय कर द्यावा आम्हा । या तिघांवरी करोनी प्रेमा । देवोनि क्षेमा रक्षावें ॥१३॥

ऐकोनि नारदाचे बोल । दोघां नेत्रीं चालिलें जळ । अघटित झाला केंवी खेळ । मशकें मंडळ धरियेलें ॥१४॥

आमुचें आम्हां आश्चर्य वाटलें । ग्रामसिंहे सिंहा कवळिलें । मासोळीनें आटिलें । पोटीं साठविलें सागरा ॥१५॥

कीं तृण पुतळे जाऊन । समूळ अग्नि टाकिला बांधोन । मक्षिकेच्या पक्षवाते करुन । मेरु उलथोन पाडिला ॥१६॥

वारा वागुरेंत सांपडला । तो हा प्रसंग आजि घडला । थोर अपराध झाला । कैसें याजला करावें ॥१७॥

नारद म्हणे न करा खेद । हा ज्यांचा त्यांनींच केला भेद । व्हावा अभिमानाचा छेद । म्हणोनि अगाध स्वीकारिलें ॥१८॥

येर्‍हवीं आपुलें हें उत्पत्तिस्थान । तेची असती कर्ते कारण । सत्ताधारी तिघे जण । मशक आपण त्यापुढें ॥१९॥

सन्मार्गातें रक्षावें । दुष्कृत पापी तें दंडावें । अहं कृती तें खंडावें । अवतार धरावे यासाठीं ॥२०॥

हें वर्म तेचि जाणिती । जाणोनि तैसे विचरती । अनन्य स्थळीं करोनि प्रीती । लळे पुरविती तयांचे ॥२१॥

हा जगदात्मा जगदानी । पुरवीत अनन्याची आनी । तेंवी हा शिवशूळ पाणी । उदार मनीं सर्वस्वें ॥२२॥

याच परी हा विधाता । तुझा श्वशुर आमुचा पिता । परम सदय सृष्टिकर्ता । पुरवील हेता तुझ्या हा ॥२३॥

गर्व पत्‍नीचे हरावे । तुमचे मनोरथ पुरवावे । कीर्तीनें ब्रह्मांड भरावें । म्हणोनि लाघवे हीं केलीं ॥२४॥

अनसूया म्हणे मुनीश्वरा । कां वाढविला हा पसारा । वृथा खेद त्यांचिया अंतरा । कां पितरा शिणविलें ॥२५॥

काय करावें हें थोरपण । जें सकळासी देतसें शीण । नको घातक हा अभिमान । भोगवी पतन नरकवासा ॥२६॥

शहाणपण योग्य आम्हासी । पदीं लीन व्हावें सकळांसी । हेंची आवातें मानसीं । नारदऋषी सत्य पैं ॥२७॥

पहा थोरपणाची व्यथा । अंकुश पडती गजमाथा । उंच वृक्षातें झोडिता । आंसडोनि पाडिता वायु तो ॥२८॥

थोर पर्वतांचीं उंच शिखरें । वीज ढासळी एकसरें । थोरपणाचेनि प्रकारें । नासती घरें बहुतांचीं ॥२९॥

आणी पिपीलिकेसी विचारा । मिळे रवा तंदूल शर्करा । नरम लव्हाळे दातारा । नुखडती निरा अणुमात्र ॥३०॥

पैल मक्षिका ती असे सान । तया मधुचें पावे भोजन । सकळ रस करीत गृहण । करिती भक्षण उंट कांटे ॥३१॥

तुम्ही जाणते सुज्ञ साधू । लहानपणासी नाहीं बाधू । थोरपणाचा कां गा शब्द । लावूनी भेदू वाढविला ॥३२॥

नारद म्हणे ऐक माते । खेद न वाढवी मनातें । पूर्ववत् होईल जेथिचें तेथें । तुम्हां आम्हाते दोष नाहीं ॥३३॥

इतुकें मात्र तुम्ही करा । या बाळांसी हृदयीं धरा । स्वहीत मनीं विचारा । पालख खरा होय जेणें ॥३४॥

उभयतांचें करोनि समाधान । गुप्‍त दिधलें आशीर्वचन । संकेते सांगोनि खुण । बाळ निरखोन पाहिले ॥३५॥

प्रदक्षिणा करोनि बाळासी । प्रेमें वंदिलें चरणांसी । म्हणे तोषवा अनसूयेसी । कृपाराशी पूर्णत्वें ॥३६॥

मग अत्रिं आलिंगोनि । सव्य उभयतां घेवोनी । निघता झाला तेथोनी । पाताळभुवनीं जावया ॥३७॥

अत्रि अनसूया दोघेजण । नारदाचे आठविती गुण । बाळकांचे करिती पालन । आनंदघन नांदती ॥३८॥

येथोनि कथेचा नवलाव । पुढील प्रसंगीं अति अपूर्व । तो वदवील कृपें सद्‌गुरुराव । लीलालाघव अद्‌भुत ॥३९॥

श्रीमत्सद‌गुरु अनंत । तेणेंचि चालविला हा ग्रंथ । त्याचे कृपेनेंचि हा श्रीदत्त । प्रबोधीत कथा मज ॥४०॥

पतिताची अनन्यता पाहोनी । भावप्रीती वोळखोनी । दीनार्थ हा मोक्षदानी । संकटीं येवोनी सुचविलें ॥४१॥

बाळकालागीं आवडी पिता । जेवीं होंय शिकविता । तेवीं मजलागीं अनाथा । झाला प्रबोधिता गुरुदत्त ॥४२॥

शेंडयाकडोन इक्षु खाता । अधिकाधिक मिष्ट मधुरता । तेवीच हे दत्तकथा । श्रवणीं स्वीकारितां गोड पुढें ॥४३॥

हे संत श्रोते भाविकांचें धन । ज्यांचे त्यांनींच घ्यावें निरखोन । हें अभाग्यालागून । प्राप्‍त कोठोन संसारी ॥४४॥

तुम्हीं साधुसंत भाग्यवंत । तुम्हाविण थोर कोण समर्थ । नसेचिया भूमंडळांत । तुम्ही श्रीअनंत वश केला ॥४५॥

धन्य तुम्ही हो भाग्यनिधी । केवळ कृपारसाचे उदधी । जाणोनि अनंतसुत जडला पदीं । आधिव्याधि तोडावी ॥४६॥

करोनिया पूर्णदया । पावन कीजे पतिता या । पुढील कथार्थ वदावया । गुण गाया लाविजे ॥४७॥

इति श्रीदत्तप्रबोध ग्रंथ । श्रीनारदोक्तीचें संमत । श्रोते परिसोत संतमहंत । चतुर्थोध्याय गोड हा ॥२४८॥

॥ इति चतुर्थोध्यायः समाप्‍तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP