श्री दत्तप्रबोध - अध्याय दहावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.


श्रीसद्गुरुदत्तात्रेयाय नमः

आजि आनंदसुखाची लहरी । या भाग्योदया आली उजरी । दारिद्र्यदुःखा झाली बोहोरी । चिंता उरी नसे आता ॥१॥

उगवता सतेज भास्करू । कोठोनि उरे अंधःकारू । की उगवता अंबुधरू । न वसती तस्करू पुरात ॥२॥

दिव्य पावता रसायन । तात्काळ रोग जाय शरिरातून । की पंचाक्षरी प्रगटता पूर्ण । पिशाच्च पळून जातसे ॥३॥

तेवी त्रिगुणात्मक मूर्ती प्रगटता । नुरेचि दुःखशोकाची वार्ता । आनंद संतोष झाला भर्ता । ठाव दुरिता कोठोनी ॥४॥

पाप ताप दैन्य गेले । दारिद्र्यभय अवघे उडाले । कामक्रोध तस्कर पळाले । सद्भाग्य आले उदयाते ॥५॥

आता होवोनि सावधान । स्वहिती जागा अवघे जण । सकळांचे करिता कल्याण । अविनाश पूर्ण हा विभो ॥६॥

सकळ आनंदाचा कंद । सिंहाचळी प्रगटला परमानंद । याचिया कृपे ब्रह्मानंद । येईल पद हातासी ॥७॥

गत कथाध्यायी जन्मकथन । श्रोती परिसिले सावधान । सुरवर पावले स्वस्थान । पुढील निरूपण अवधारा ॥८॥

अत्रीअनसूयेचे मंदिरी । तिष्ठति येवोनिया कामारी । हेल वाहती अनेक नारी । आनंदभरी सप्रेमे ॥९॥

अवघे मिळोनिया ऋषिगण । शोधिती तेव्हा जन्मलग्न । उत्तम ग्रहाते पाहून । शुद्ध विचारून ठेविती ॥१०॥

रजनीमाजी ऋषि येती । नित्य पाठ आदरे करिती । ऐस चार दिवस लोटती । पाचवी पुजिती कामिनी ॥११॥

यथाक्रमे करोनि सत्कार । रात्रौ कामिनी करिती जागर । उदय होतांची सत्वर । आनंद थोर सकळांते ॥१२॥

अनसूयेसहित बाळासी । न्हाणोनि निजविती सेजेसी । पथ्याचे प्रकार वेगसी । करोनि भोजनासी देताती ॥१३॥

जन्मसुतक दहा दिवस । आनंदेचि क्रमिले विशेष । शुद्ध स्नाने अकराव्यास । करोनि कर्मास आचरती ॥१४॥

सकळ ऋषिवर्याते मेळवून । अत्रि पाहे पुत्रवदन । स्वकरे करोनिया मधुपान । आनंदघन मानसी ॥१५॥

बारावे दिवशी बारा वळी । पूजोनिया उतावेळी । सकळ पाचारोनि ऋषिमंडळी । आनंदमेळी मेळविली ॥१६॥

षड्रस रांधिले पक्वान्न । रंगवल्ली सुंदर घालोन । गंध अक्षती पूजिले ब्राह्मण । सर्वांसि आसन दीधले ॥१७॥

सर्वांसि घालोनि सुमनहार । धूप दीप अर्पिले समग्र । संकल्प सोडोनि सत्वर । भोजनी द्विजवर बैसविले ॥१८॥

भोजन देता यथा रुची । प्रार्थना आरंभिली द्विजांची । तृप्ती होता सर्वांची । उच्छिष्टे त्यांची काढिली ॥१९॥

कर प्रक्षालोनी द्विज येता । अत्री होय तांबूल अर्पिता । दक्षणा देवोनी अतौता । नमस्कारिता पै होय ॥२०॥

द्विज देती आशीर्वचन । सदैव असो तुमचे कल्याण । संतति संपत्ति ऐश्वर्य धन । कीर्तीवधन यशायु ॥२१॥

द्विज जाती स्वस्थळासी । पुनः पात्रे मांडिली वेगेसी । पाचारोनि ऋषिपत्‍न्यांसी । त्वरे भोजनासी बैसविल्या ॥२२॥

अनसूया करी प्रार्थना । स्वस्थ मने कीजे भोजना । आवडे तोचि पदार्थ घ्या ना । काही अनुमाना न करिता ॥२३॥

परमानंदे भोजने सारिती । तृप्त झालिया कर प्रक्षालिती । तांबूल देवोनि सकळांप्रती । आसनी बैसविती स्थिरपणे ॥२४॥

सकळांचि आज्ञा घेवोन । अनसूयेने सारिले भोजन । हळदी कुंकुम वेगी आणून । लेववी पूर्ण सकळांते ॥२५॥

मग ऋषिपत्‍न्या उठोनि प्रौढा बाळा । अनसूयेसी चर्चिती तये वेळा । नूतन वस्त्रे देवोनि परिमळा । वरी तांबूल अर्पिती ॥२६॥

बैसोनिया चौकासनी । ओसंगा बाळाते देवोनी । नारी करिताती अक्षवणी । बाळा निरखोनी पाहाती ॥२७॥

समस्तांसि सन्माने गौरविले । परमानंदे बारसे केले । पुढिले कार्याते योजिले । स्मरता झाले सिद्धची ॥२८॥

रजनी गेली सुखशयनी । नित्यकर्म प्रभाते सारोनी । ऋषिपत्‍न्या पाचारोनि । बैसकासनी बैसल्या ॥२९॥

छते आणि झालरी । देवोनि पालख बांधिला कुसरी । डोल्हारे खेळणे वरी । नानापरी बांधले ॥३०॥

वस्त्रालंकार लेणी । बाळका लेववी अनसूयाराणी । हरिद्रा कुंकुमे करोनि । ताटे भरोनि सिद्ध पुढे ॥३१॥

शर्करे भरिल्या पराता । केली तांबुलाची सिद्धता । सुंठवडे आणि क्षिरापता । घुगर्‍या अवश्यता करविती ॥३२॥

तेरावे दिवसाते लक्षून । विमानी बैसोनि आले सुरगण । देवललना बाणे घेऊन । आनंदे करून पावल्या ॥३३॥

ब्रह्मा विष्णु महेश्वर । अष्टदिग्पाळा सहित अमरेंद्र । वाद्यनादे कोंदले अम्बर । गंधर्व सुंदर गाताती ॥३४॥

रमा उमा सावित्री । सरस्वती आणि गायत्री । सवे सख्या कुरंगनेत्री । हास्य वक्त्री सतेजा ॥३५॥

पेहेरणी कुंचडी नग । कुंच्चा तडित्प्राय सुरंग । अनसूयेलागी उपभोग । दिव्य चांग आणिले ॥३६॥

ऐसिया समारंभेसी । आनंदे ललना स्वर्गवासी । अनसूयेच्या आश्रमासी । अतिवेगेसी पावल्या ॥३७॥

गजबजिला अवघा पर्वत । अत्रिअनसूया आनंदभरित । ऋषिभार मिळाले बहुत । नामसंकेत ऐकावया ॥३८॥

महावैष्णव नारदमुनी । तेही तात्काळ पावले येवोनी । अत्रिअनसूयेसी भेटोनी । स्थिरासनी राहिले ॥३९॥

तव देवललना पुढे येती । अनसूया वंदी तयांप्रती । येरी सकळा क्षेम देती । मग गौरविती सतीते ॥४०॥

हरिद्रा कुंकुम देवोन । नेत्री सूदविती अंजन । दंती लेवविती दांतवण । अलंकारेण शोभविती ॥४१॥

अंगडी आणि टोपडी । बाळका लेवविती तेचि घडी । माठलें बिम्दले लवडसवडी । चरणकडी पैंजणे ॥४२॥

जडित गाटले कंठी सुंदर । बिजवरे लाविले भाळावर । क्षुद्र घंटेचे कटिसूत्र । मनगट्या विचित्र अमोल्य ॥४३॥

पदकरिठे दृष्ठमणी । वाघनखे ताईत सतेज पणी । नाना परिची बाळलेणी । लेववी वरोनी कुंचीते ॥४४॥

स्वर्ग उपभोग जे आणिले । अनसूयेलागी समर्पिले । सकळ नितिंबिनींनी आपुले । वाणे पुढे ठेविली ॥४५॥

ऋषि म्हणती तये वेळा । सुमुहूर्त उत्तम पावला । पालखी घाला वेगी बाळा । उरला सोहळा पुढे करा ॥४६॥

ऐसे ऐकोने वचनासी । सावित्री होय तेव्हा सरसी । वेगी उचलोनी बाळासी । घाली पालखासी नेवोनी ॥४७॥

रमा येवोनी पुढती । पालखदोर धरी हाती । उमा म्हणे गावोनि गीती । बाळाप्रती हालवावे ॥४८॥

तव गायत्री सरस्वती येऊन । सुरललना सांगाते घेऊन । म्हणती सांगा याचे नाम कोण । गाऊ गुण तैसेची ॥४९॥

तव सकळांत चातुर्यमराळी । शिवलतिका हिमनगबाळी । काय बोलतसे तये वेळी । सर्वा आगळी होवोनी ॥५०॥

पिता याचा मुनी अत्रय । आणि हेही जन्मले गणत्रय । तरी नाम ठेविजे दत्तात्रेय । सुहास्यत्रेय वदनी हा ॥५१॥

अनसूया म्हणे होते मनी । तेचि तुम्ही काढिले शोधोनी । आता याची नामेकरूनी । गीत गावोनी हालवावे ॥५२॥

सावित्री म्हणे नेटके ॥ धुंडोनी नाम काढिले अंबिके । येचि नामे कौतुके । गीत अलोलिके गाईजे ॥५३॥

सकळ म्हणती आम्हा मानले । नाम युक्तचि शोधिले । पालख गाता आळविले । पाहिजे भले सकळांनी ॥५४॥

रमा म्हणे सकळा चित्ती । वागले तरी गावे गीती । आता भाषणे सारा परती । गीत चित्ती आठवा ॥५५॥

पाळणा । तामस तापसा । तपराशी । करिता श्रमी गा होसी । तारक उपदेशा । अविनाशी प्रगट तू झालासी ॥१॥

जोजोजोजो रे । अवधूता । अत्रिअनसूयासुता । निद्रा करि सखया । श्रीदत्ता । त्रिगुणरूपा आता । जो० ।धृ०।

राजस तू बाळा सकुमारा । होसी सुज्ञ चतुरा । सृष्टि उद्भविता । श्रम घोरा । पावसि निज घे ब्रा ॥ जो० २ ॥

सत्त्वधीरा तू । सात्त्वीका । त्रिभुवन जीवपालका । मायातीता गा । चालका । निजजन सुखदायका ॥जो०३॥

रजोगुणा तू । उद्भविता । कर्मासी स्थापिता । पालक सत्वा तू । जीवदाता । तमरूपे करिसी शांता ॥जो० ४॥

रज तम सत्त्व हे । त्रिगुण । मुसी मुसाबोन । षड्‌भुज प्रगटला । पावन । त्रिमुख षण्‌नयन ॥जो०५॥

पालख लांबविला । नगशिखरी । बाळा निज भीतरी । खेळणे अनंत । सुतदोरी । हिंदोळा घे बरी ॥जो० ६॥

जो जो तामसा तपःप्रिया । गिरिनिवासा करुणालया । कर्पूरगौरा दत्तात्रेया । निज गा सखया हालविते ॥५६॥

चतुर सुजाणा सृष्टिकारका । वेदरूपा कर्मस्थापका । श्रमलासी तू बालका । देते झोका निज जो जो ॥५७॥

सत्त्वगुणा तू सुंदरा । नवमेघरंगा सकुमारा । ब्रह्मांडपालका उदारा । दिगंबरा निज जो जो ॥५८॥

अगा रजो गुणा तू सृष्टिकर्ता । सत्त्वगुणे तूची पालिता । तमोगुणे संहारिता । बहुश्रम चित्ता निज जो जो ॥५९॥

त्रिगुणे युक्त समरस । मुसावलासी मुसी सुरस । बालका दृष्टि लागेल रूपास । निज पालखास उगला ॥६०॥

त्रिगुणात्मका त्रिवक्त्रा । हे षड्‌भुजा तत्समनेत्रा । सतेज भव्य पवित्रा । लावण्यविचित्रा निज बाळा ॥६१॥

हे अत्रिसुता कुलभूषणा । अनसूयागर्भमांदुसरत्ना । हे दुर्वासबांधवा सुलक्षणा । तपोधना प्रिय जो जो ॥६२॥

सर्वमान्य तू देववृंदा । सर्वात्मक परमानंदा । सिद्धयोगिया आनंदकंदा । अद्वय अभेदा निज जो जो ॥६३॥

मनमोहना मानसरंगा । सर्वातीता तू अभंगा । अगा जीवींच्या जिवलगा । उगाच निज गा हालविते ॥६४॥

यापरी सर्व नितंबिनी । पालख नाना युक्ती गावोनी । दत्तात्रेयनाम प्रगट जनी । सकळालागोनी झाले पै ॥६५॥

ऐकतांची नामगजर । देव वाद्ये वाजविती अपार । पुष्पवृष्टी वज्रधर । अनिवार करितसे ॥६६॥

अद्बुत वाद्ये वाजती । जयजयकारे शब्द होती । साखरपाने सकळा वाटिती । सुंठवडे देती घुगरिया ॥६७॥

हरिद्रा कुंकुम चंदन । वस्त्रे वाटिती सकळालागुन । तृप्त केले याचकजन । करिती सन्मान योग्यायोग्य ॥६८॥

श्रोते कल्पितील मानसी । वनी राहणार जे तापसी । इतुके भाग्य कोठोनि तयांसी । वृथा यांसी श्रृंगारिता ॥६९॥

येचिविषयी विज्ञापना । करितो आदरे श्रोतेजना । सादर होवोनिया श्रवणा । अवधारणा देइजे ॥७०॥

अत्रि विधातियाचा नंदन । त्याहीवरी ब्रह्मनिष्ठ तपोधन । अनसूया सती पतिव्रता जाण । साध्वी पूर्ण लक्ष्मी ॥७१॥

त्या अनुष्ठानाचेनि बळे । देव तिघेही जिंकिले । तेणे प्रसन होवोनि दिले । वरदान आगळे अलोट ॥७२॥

त्या वरदानाचे फळ । पृथक त्रिगुणात्मक झाले बाळ । त्यामाजी त्रिगुणात्मक मेळ । दत्त सुशील जन्मला ॥७३॥

जेथे वसे दत्तराणा । तेथे सिद्धी वोळंगती जाणा । पदार्थ केवी पडे उणा । सकळ कामना पूर्ण होती ॥७४॥

कल्पतरू अंगणी उगवता । केवी न पुरे चिंतिल्या अर्था । चिंतामणी हातासी येता । कैची चिंता उरेल ती ॥७५॥

गृहा पावली कामधेनू । इच्छितप्राप्ती कवण अनुमान । परिस मिळता कांचनू । घेईल कवणू मोले पै ॥७६॥

तेवी हा प्रगट होतांची दत्त । फलद्रूप कामना समस्त । न्यून न पडेचि किंचित । सर्व साहित्य सिद्धची ॥७७॥

जे पाहिजे ज्या प्रसंगासी । पुढे ठेविलीच असे वस्तू तैसी । करावया कल्पनेसी । योग मानसी न लगे तो ॥७८॥

इच्छिल्याविण केवी प्राप्त । हेही कल्पना वागेल मनात । येचविषयी दृष्टांत । पुनरा योजीत परसा तो ॥७९॥

भ्रमण करीतसे भानुमंडळ । त्याची किरणे सवे सकळ । परस्थळा जाता भूपाळ । सर्वमेळ सांगाती ॥८०॥

तेवीच जाणावा प्रकार । दत्त योगेंद्र हा सर्वेश्वर । तयासवे अनंत भांडार । न्यून अणुमात्र नसेचि ॥८१॥

सकळांचे पुरवावया हेत । धरी अवतार हा स्वामी दत्त । इच्छामात्रे अघटित । दावील कृत्य करोनिया ॥८२॥

असो तृप्त करिता सकळांसी । कितीक गेली न कळे निसी । तहान भूक नाठवे कवणासी ॥ आनंदे मानसी निर्भर ॥८३॥

देणे घेणे मानसन्मान । स्वतः सावित्रीच पाहे आपण । उमा रमा करोनि आठवण ॥ परत वाण करवीती ॥८४॥

देता घेता सरली राती । आनंद झाला सकळांप्रती । वोसंगा बाळकालागी घेती । आवडी चुंबिती मुखकमळ ॥८५॥

बाळ त्वरे तो उचलिला । देवऋषीमाजी नेला । अत्रीचे वोसंग घातला । सकळी पाहिला डोळेभरी ॥८६॥

मूर्ति पाहता आनंदघन । कदापि तृप्त न होती लोचन । निरखिता मन झाले उन्मत्त । नोव्हे आठवण द्यावया ॥८७॥

असो नारदे घेवोनि बाळासी । चुंबोनि दे अनसूयेपासी । देव पुसती अत्रीसी येतो सुखवासी असावे ॥८८॥

येरे मस्तक ठेविला चरणी । लोभ असावा अनुदिनी । तुमचिया कृपेकरोनी पावलो धणी धरणीवरी ॥८९॥

देव सुर बोलती वचन । या दत्तात्रेयाचे घ्यावया दर्शना । सन्निध येता अस्तमान । नित्य येणे आम्हाते ॥९०॥

श्रोते परिसिजे सादर । अद्यापि येती सुरवर । ज्यासी पाहणे चमत्कार । तेणे निर्धार जाइजे ॥९१॥

मागील चार घटि उरता दिन । पर्वती शोभा शोभायमान । वृक्ष पाषाण तरु तृण । आनंदघन दिसती ॥९२॥

गजबजिला दिसे पर्वत । दिशा आनंदे दिसती भरित । पुण्यश्लोक गजराते ऐकत । हे नेमस्त नित्य पै ॥९३॥

इतर वेळे जावोनि पाहता । भय वाटे बहुचित्ता । क्षणही न गमे उदासता । तेथे राहता राहवेना ॥९४॥

असो देवललना अनसूयेसी । पुसोनी निघता वेगेसी । सती वंदित चरणांसी । प्रेमभावेंसी आदरे ॥९५॥

म्हणे लोभ असो द्या निरंतर । न पडावा आमुचा विसर । येरी म्हणती वारंवार । येणे निर्धार दर्शना ॥९६॥

मग देव विमानी बैसले । जयघोष करिते झाले । प्रदक्षिणा करोनी वेघले । आपुल्या पावले स्वस्थाना ॥९७॥

तेवीच ऋषिसहित अंगना । जाती पुसोनी स्वस्थाना । येरीकडे अत्रिराणा । प्रभातस्नाना पै गेला ॥९८॥

दोघे कुमर आणि कांता । सहित अत्री होय संतोषता । परमानंदे सुखवार्ता । प्रपंच परमार्था साधित ॥९९॥

ऐसे रमता आनंदघन । कित्येक संवत्सर लोटले जाण । विशेष भाग्याचा उदय पूर्ण । अनसूया गर्भित तिसर्‍याने ॥१००॥

दिवसमासे गर्भ वाढला । सतेज प्रकाश पडता झाला । सप्तम मासी अनसूयेला । पुसे स्वलीला अत्री तो ॥१॥

काय आवडे उपजे मनी । तेचो सांगे वो निवडोनी । पुरवावया आपुले सदनी । पदार्थ कोणी न्यून नसे ॥२॥

परिसोनि स्वामीचिया बोला । सदृढ चरणी माथा ठेविला । पाणी जोडोनी तये वेळा । इच्छा स्वलीला निवेदी ॥३॥

अहो जी स्वामी दयाघना । हेचि आवड माझिया मना । नेटका प्रपंचाची रचना । करवी भ्रमणा वाटती ॥४॥

स्वआचारी उपजे उल्हास । अंधःकारी उपजे त्रास । दुष्टाचरणी नावडे संगास । ताप कवणास न द्यावे ॥५॥

सकळांलागी सुख द्यावे । स्वगुने तया तोषवावे । उल्हासयुक्त असावे । तप साधावे दिव्य पै ॥६॥

बहुतां करावे उपकार । नाना उपभोग आवडे मधुर । विस्तार भाग्यवृद्धी कलत्र । पूजा सत्कार दानधर्म ॥७॥

रस सेवून सेववावे । भोग भोगोनी भोगवावे । सुखी राहोनी सुख द्यावे । जीउनी जीववावे येरांते ॥८॥

याहुनी परती आवडी । स्वामी नुपजे मज कुडी । सद्वासनी उपजे गोडी । मुख्य जोडी चरण तुझे ॥९॥

ऐकोनी मधुर मिष्ट भाषण । अत्री झाला संतोषमान । पुनरा वदे उल्हासे करून । होतील पूर्ण हेतु तुझे ॥११०॥

मग अत्रीने मागिल्या ऐसी । सिद्धता करोनी वेगेसी । ऋषिपत्‍न्या पाचारोनि प्रेमेसी । डोहोळियांसी पुरवीत ॥११॥

परम आनंदे करून । सत्कारविले अनसूयेलागून । नवमास भरता पूर्ण । प्रसूतिचिन्ह पावले ॥१२॥

नित्य ऋषिपत्‍न्या येती । अनसूयेलागी बहु जपती । नव दिवसांची होता भरती । पूर्वस्थिति प्रगटले ते ॥१३॥

अतिलावण्य सतेज कुमार । दुजा पाहतांची भास्कर । परि तो तीव्र अपार । आणि हा शीतकर शांत पै ॥१४॥

यापरि तो जन्म होता । स्नेहेभरित केला माथा । ऋषिपत्‍न्या न्हाणिती उभयता । क्षुधित व्यथा ओळखिली ॥१५॥

मधु मुखाते लाविले । माते वोसंगी बाळ घातले । स्तनी लावोनि तृप्त केले । सकळी पाहिले स्त्रियांनी ॥१६॥

पांचवे दिवशी पांचवी पूजोन । केली देवता संतोषमान । स्त्रिया नित्य उपभोग करवून । पथ्य जपोन घालिती ॥१७॥

ऐसे सरता दिवस दहा । अत्रीसी म्हणता मुख पाहा । आनंदे उचंबळोनी मोहा । ऋषिसंमोहा मेळविले ॥१८॥

शुद्ध स्नानाते सारोन । वेगी केले पुण्याहवाचन । बाळक वोसंगा घेवोन । मधुसेवन पुनराते ॥१९॥

मुख अवलोकिता बाळाचे । आनंदले भार ऋषींचे । जातक वर्णिती तयाचे । रजोगुणाचे बाळ हे ॥१२०॥

प्रथम झाला तो तमोगुण । त्याचे वेगळेची असे मान । हा पाहता शांत पूर्ण । रजोगुण विस्तारक ॥२१॥

मध्यस्थ सत्त्वगुणी सर्वागळा । तयामाजी या दोघांच्या कळा । मिश्र असोनी निराळा । दिसे सकला पाहा नेत्री ॥२२॥

हे तेज आपुलेची दाविती । परि तयाऐसी नोव्हे शक्ती । तयांची अद्भुत लीला कीर्ती । सर्वागत स्थिती अतर्क्य ॥२३॥

अत्रिबाळाते अवलोकिता । संतोष वाटला तयांच्या चित्ता । मग तोषवोनिया समस्ता । दाने देता पै होय ॥२४॥

ऐसा विधी तो संपादोन । द्वादशदिनी बारसे करून । सकळा देवोनि सन्मान । पुढील कारण योजिती ॥२५॥

विशेष शृंगारिले मंदिर । पालख लांबविला अतिसुंदर । खेळणी डोल्हारे बांधोनि वर । तोरणे नागर बहु ठायी ॥२६॥

ऋषिपत्‍न्यांचे भार आले । तेणे मंदिर अत्यंत शोभले । वाद्यनादे दुमदुमिले । गजबजिले पर्वत ॥२७॥

मानव देवांच्या ललना । पाहू येती अत्रिनंदना । पालखी घालोनिया तान्हा । गीत सगुणा गाताती ॥२८॥

बहुनामे करिताती विचार । परि सिद्धांत नव्हेची निर्धार । अनसूया नेमोनि वदे चंद्र । जयजयकार ऐकता ॥२९॥

त्याची नामे करून । वाटिती तेव्हा शर्करापान । हरिद्रा कुंकुमे देवोन । लाविती तोषवोन नारीनरा ॥१३०॥

सूख संतोष आनंद । मानिती तेव्हा ब्रह्मवृंद । कुलोद्धारक प्रसिद्ध । आनंदकंद जन्मले ॥३१॥

अत्रिअनसूयेचे भाग्य गहन । सुखे खेळविती तिघे नंदन । सिद्धी उभ्या कर जोडोन । जाणोनि कारण वर्तती ॥३२॥

त्रिगुणात्मक जेथे दत्तात्रेय । तेथे कैचे तापत्रय । ऋषि नांदती निर्भय । सभाग्य सदय त्यायोगे ॥३३॥

अविनाश ही दत्तमूर्ति । पाहता आनंद उपजे चित्ती । दिवसेंदिवस वाढती । अद्भुत खेळती लाघवे ॥३४॥

लीलालाघवी विश्वंभर । अवतार धरोनी दावी चरित्र । एकाहुनी एक नागर । अंत पार न कळे त्याचा ॥३५॥

अनंत अवतार अनंत गुण । अनंत कीर्ती पवाडे पूर्ण । अनंत ब्रह्मांडे जयापासून । तोचि सद्गुण दत्तात्रेय ॥३६॥

दत्तात्रेय अक्षरे चार । हे तुम्हा संतांचे माहेर । या नामाचा विचार । तुम्हीच प्रकार जाणते ॥३७॥

तुम्ही संत सद्गुरु कृपाघन । ज्ञानसिंधु परम पावन । सदय उदार संपन्न । कोणा महिमा न वर्णवे ॥३८॥

तुमचे सरोजचरण कोमळ । ते अत्यंत सर्वावरिष्ठ निर्मळ । पुनीत करावया तीर्थे सकळ । हे पदकमळ असती ॥३९॥

त्या कमळीचे जे वहन । ते आमुचे कुळभूषण । त्या तळीचा हरि ज कण । बोलता दूषण वाटते ॥१४०॥

सर्व अनाथाहोनी अनाथ । दीन रंक अनंतसुत । संतचरणांचा अंकित । पोसणा म्हणवीत तयांचा ॥४१॥

धन्य धन्य ती संतमाऊली । करोनी कृपेची साऊली । कथा रसाळ चालविली । मनी आवडली तेचि पै ॥४२॥

मागील संपादिली चांग । पुढेही वदवतील बरवा प्रसंग । तो श्रवणद्वारी साठवा भाग । कथारंग दत्ताचा ॥४३॥

दत्तात्रेय दाता उदार । शरणागता देतो अभयकर । नाम स्मरतांची सत्वर । उभा समोर दासाच्या ॥४४॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । यासी नारदपुराणींचे संमत । परिसोत भाविक संतमहंत । दशमोध्याय गोड हा ॥१४५॥

॥ इति दशमोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP