श्री दत्तप्रबोध - अध्याय पंधरावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीसद्‌गुरुदत्तात्रेयाय नमः ॥

जयजय सद्‌गुरु अविनाश उदारा । कृपाघना तूं सर्वेश्वरा । चिद्विलासा जगदुद्धारा । त्रिगुणसुंदरा नमो तुज ॥१॥

जय त्रिगुणात्मका श्यामांगा । जय संगातीता तूं निःसंगा । त्रितापहारका भवभंगा । अभेद अभंगा नमो तुज ॥२॥

जयजय जगपाळका जगन्निवासा । अनंत नामा अनंत वेषा । अज्ञानछेदका परमपुरुषा । सह्याद्रिवासा नमो तुज ॥३॥

तूं केवळ आनंदाचा कंदु । कृपासागर परमानंदु । शरणागताचे तारिसी वृंदु । पुरविसी छंदु अंतरीचा ॥४॥

तुझिया कृपाबळें करुन । चौदा अध्यायें झालें निरुपण । तें श्रोतीं केलें श्रवण । सतसज्जन तोषले ॥५॥

याहुनि विशेष आगळी । पुढील कथेची वदवा नव्हाळी । ऐसी पुरविणें माझी आळी । हृदयकमळी वसोनी ॥६॥

गतकथाध्यायीं सुरऋषी । पुसोन गेले स्वस्थळांसी । मागें अत्रिअनसूयेसी । वृत्त अविनाशी निवेदी ॥७॥

जें जें केलें तीर्थाटण । देवक्षेत्रें केलीं अवलोकन । सिद्ध योगी भेटले पूर्ण । तें महिमान श्रुत करी ॥८॥

गिरीगुव्हा महास्थळें । सानथोर अतिविशाळें । अवलोकिलीं तीं सकळें । तें निरोपिलें उभयांतें ॥९॥

जेथें जैसीं झालीं दर्शनें । भक्तिप्रेमाचीं भाषणें । लाभले प्रसाद अनुक्रमानें । तेंही आवडीनें श्रुत केलें ॥१०॥

जेथें जैसा नेमिला नेम । तोहि निवेदिला सर्व क्रम । जेथें जेथें घेतलें विश्राम । तेहि सप्रेम विवरिले ॥११॥

जंवजंव ऐकती निरोपण । तंवतंव उभय आनंदघन । चित्तीं वाटलें समाधान । सुखसंपन्न अंतरीं ॥१२॥

नित्य सोहोळा मंदिरीं । सिद्ध ऋषि येती घरीं । पाहोनि सुखावती अंतरीं । प्रेमलहरी भेटतां ॥१३॥

अत्रि अनसूया प्रेमें करुन । आदरें पूजिती द्विजगण । अतिथिसत्कारीं परम निपुण । देती भोजन इच्छित ॥१४॥

जे जे इच्छा जया मानसीं । ते पुरविता होय अविनाशी । विन्मुख जाऊं नेदी कवणासी । सुख समस्तांसी देतसें ॥१५॥

जेथें वसे दत्तदिगंबर । तेथें आधिव्याधि नसे अणुमात्र । भय पीडा गेली दूर । रिपु तस्कर कैंचे मग ॥१६॥

जेथ अवधूत सत्पात्र । तो देशचि जाणा पवित्र । दारिद्रय नसे अणुमात्र । पावती सर्वत्र सुख तेथें ॥१७॥

असो सह्याद्रि पर्वतीं । नित्य आनंदचि वर्षती । अत्रिअनसूया सुख पावती । भाग्य भोगिती अनुपम्य ॥१८॥

चंद्र अविनाश आणि दुर्वास । आचरती नित्य उभय सेवेस । पूर्ण करिती इच्छित मानस । किमपि उदास होऊं नेदी ॥१९॥

आपुले पुत्रधर्मातें जाणून । आवडीं पितरांचें करिती सेवन । काया वाचा आणि प्राण । झिजविती पूर्ण स्वहितार्थ ॥२०॥

तीर्थ व्रत तप दान । क्षेत्र देव आणि यज्ञ । अनेक पूजा अनुष्ठान । आगळी याहून पितृसेवा ॥२१॥

पृथ्वीदानादि जरी केलें । अश्वमेधादि यज्ञ भले । पितृसेवेच्या तुलने न आले । गौणचि झाले यापुढें ॥२२॥

महायात्रा केल्या तीन । सुवर्णरत्‍नीं तुळा दान । याहुनी अधिक असे पुण्य । करितां नमन एक माते ॥२३॥

महाक्षेत्रीं पुण्यकाळीं । सहस्त्र गोप्रदानें युक्त केलीं । परि तुलनेसी नाहीं आलीं । उणीं नेमिलीं नमनापुढें ॥२४॥

सर्वां वरिष्ठ पितृसेवा । तेथें इतर पुण्या कोण केवा । हा विचार जाणोनि बरवा । त्रिगुणात्म देवा मानवलें ॥२५॥

तारावया साळेभोळे जन । हें वर्म काढिलें निवडून । रहाणी दावावया लागून । दाविती आचरुन सेवाधर्म ॥२६॥

अनन्य प्रीति धरोनि भाव । मातापिता मानिले देव । सेवा मांडिली अपूर्व । विशेष गौरव नित्य नवा ॥२७॥

सेवितां न मानिती कधीं त्रास । दिवसेंदिवस आवडी उल्हास । वडिलां होऊं न देती उदास । अनन्य दास होवोनि ॥२८॥

जेवीं त्रेतायुगीं श्रावण । करी पितरांचें सेवन । कावडी उभय स्कंधीं वाहून । केलें अर्चन शुद्ध मनें ॥२९॥

यापरी त्रिवर्ग प्रीतीं । दिवा निशीं उभयां सेविती । मुखें वेदचर्चा करिती । प्रेम वाढविती अपार ॥३०॥

पितृआज्ञा वंदोनि शिरीं । काजें करिती नाना परी । कधीं टाकोनि न जाती दूरी । जोडल्या करी तिष्ठती ॥३१॥

यांसीच म्हणावें कुमर । जे पितृसेवेसी सादर । स्वप्नींही नेणंती अनादर । मानिती प्रियकर सेवाधन ॥३२॥

नाहीं तरी ये लोकीं । धनाढय पुत्र असती सुखी । पितरां देखोनीं होय दुःखी । तया लेखी तृणवत ॥३३॥

सुख न वाटे देखतां । तो कैंचा नमी मातापिता । मनीं चिंती त्याचिया घाता । म्हणे वृद्धतां किती हे ॥३४॥

ते बहु ममतेनें बोलती । ऐकोनि कांटाळे बहु चित्तीं । क्वचित कांहीं आज्ञापिती । क्रोध चित्तीं उपजे त्या ॥३५॥

वस्त्र अन्न नेदी पुरतें । मागतां कठोर बोले वचनातें । अणुमात्र नेदी सुखातें । मरण त्यांतें वांछीत ॥३६॥

भार्या आणि धन । पुत्र कलत्र आवडे प्राणाहून । वडिलांचें न करी अर्चन । पापी मलीन दुष्ट मती ॥३७॥

मातेची काया उघडी । वसन मागतां म्हणे रांड वेडी । कांते पाटाऊ दे साडी । अनेक आवडी पुरवीत ॥३८॥

चिंध्या गांठी मातेला । लागतां लज्जा न वाटे त्याला । कौपीन जरीप्राप्त पित्याला । संकोच मनाला नुपजेची ॥३९॥

आपण नेसे रेशीमकांठीं । पित्यांची न सोडवी लंगोटी । केव्हढा सुपुत्र जन्मला पोटीं । दुःख दे कोटी पितरांतें ॥४०॥

कधीं न बोलेची रसाळ । फेकी दुष्ट शब्दांचें इंगळ । दर्प दावोनी चळचळ । कांपवी कळकळ भोगवी ॥४१॥

आपण कांता सुखासनीं । पितरां फाटकें अथवां अवनी । कदापि दया नुपजे मनीं । टाकी दुरखोनी बोलतां ॥४२॥

मोहें जवळी ये जरी माता । तंव आपण सरोनी जाय परता । म्हणे थुंका उडे बोलतां । पुरे चावटता न करा हे ॥४३॥

म्हणे किती हें तुमचें वृद्धपण । मळमूत्रें सुटली घाण । लाळ बेडके करोन । घर थुंकोन नासलें ॥४४॥

कोठोनि आयुष्या आली वृद्धी । किती सोसावी उपाधी । मृत्यु लपला कवणे सादीं । येईल कधीं न कळे तो ॥४५॥

तुम्हीं उभयते आम्हांसी । आणिलें जगीं हीनत्वासी । मरतां सुख निश्चयेंसी । वाटेल जिवासी संतोष ॥४६॥

मेल्याही तुम्ही घालवाल । शेंपन्नासातें नाडाल । तुमचें कर्ज लागतों सबळ । फेडणें जंजाळ मजभोंवतां ॥४७॥

ऐसिया परि नित्य गांजितां । दुःख उपजे त्यांच्या चित्ता । म्हणती देवा मरण आतां । दे अतौता आम्हांतें ॥४८॥

कालें करोनि प्रसंग आला । देह रोगें जर्जर झाला । प्राण कासावीस होऊं लागला । दया पुत्राला नुपजे ॥४९॥

अंतींही न करी सेवन । जवळी न बैसेचि कांता आपण । न देची तया उदक अन्न । लौकिक भिन्न बाह्य दावी ॥५०॥

उगाचि बैसोनि बाहेर । जगीं नेत्रां लावी पदर । म्हणे सोडोनि जाती पितर । दुःख फार जीवासी ॥५१॥

असो दुःखांतें भोगोन । मातापिता पावलीं मरण । लौकिक भाव जाणोन । करी रुदन पुत्र तेव्हां ॥५२॥

लटिकाची आक्रोश केला । जग शांतविती तयाला । मेलिया विधी आरंभिला । बहु आनंदला अंतरी ॥५३॥

खर्च लागतां द्रव्यास । जीवीं होत कासावीस । बोलोनिया दावी जगास । म्हणे अडचणीस वडिल गेले ॥५४॥

मातापितयांच्या कारणा । वेंचावें वाटे बहुत धना । काय करावें दिवसमाना । हौस मना ऊदंडची ॥५५॥

वडिलांची पुण्याई हीन । म्हणोनि प्रसंगीं अडचण । विप्र तुम्ही सर्व सुज्ञ । गोड करुन घेईजे ॥५६॥

ऐसें वदोनि लागे कर्मासी । आनंदें करी पिंडदानासी । दान दक्षिणा उधार द्विजासी सोडी । जीवनासी आदरें ॥५७॥

सर्व प्रसंग संपादोन । सदनीं बैसला आनंदघन । केल्या संकल्पा द्विजगण । घरीं येऊन मागती ॥५८॥

त्यांसी करी चाळाचाळी । म्हणे आज उद्यां सकाळी । ते बापुडे लागती गळीं । आशामेळीं पडियेले ॥५९॥

निग्रह करुनि मागतां । कोप उपजे बहु चित्ता । द्विज म्हणती पुत्रधर्मता । कैसी आचरतां हे तुम्हीं ॥६०॥

त्यांचे उदरीं जन्म घेवोन । कांहीं व्हावें कीं उत्तीर्ण । चाळवितां आम्हांलागून । पितृऋण केंवी फिटे ॥६१॥

शब्द ऐकोनी क्रोधावत । म्हणे काय मी त्यांचे कर्ज लागत । जन्म उदंडासी उदंड देत । यांत काय अघटित कोणतें ॥६२॥

आपुले आपण मरोन गेले । शेवटीं ऋण करोनि ठेविलें । त्यांचे बापाचें काय घेतलें । देणें आलें मज वृथा ॥६३॥

ऐकोनि यजमानाची वाणी । द्विज आश्चर्य करिती मनीं । न करा ऐसियाचे धनीं । धर्मपरायणीं मोजा हे ॥६४॥

हा परम नष्ट दुराचारी । पुनरा न येऊं याचे घरीं । ऐसें बोलोनि ते अवसरीं । उठोनि सत्वरीं जाती ते ॥६५॥

धिक् धिक् जिणें ऐसियांचें । कदा तोंड न पाहावें त्यांचें । हे पाहुणे भानुसुताचे । अघोर नरकाचे सत्कार यां ॥६६॥

यांचें पाहतांचि वदन । तात्काळ करावें सचैलस्नान । होऊं न द्यावें छायापतन । मग भाषण कोठोनी ॥६७॥

पितृद्रोही मातृद्रोही । स्वामिद्रोही गुरुद्रोही । ब्रह्मद्रोही साधुद्रोही । रवरव पाहीं भोग त्यां ॥६८॥

ब्रह्महत्या सुरापान । भक्षाभक्ष गमनागमन । आन दोष थोर सान । घडले संपूर्ण त्या नरा ॥६९॥

शास्त्रपुराणवेदादिकीं । जे दोष प्रतिपादिले अनेकीं । पितृगुरुद्रोही यांचे मस्तकीं । स्थापिले निःशंकीं निवाडे ॥७०॥

या चांडाळाचें अन्न । कदापि न करावें सेवन । करितां सुतकीं न्याय जाण । कळतां वमन यदर्थ कीजे ॥७१॥

हा जरी षड्‌शास्त्री निपुण झाला । वेदवक्ता जगीं म्हणविला । उदंड मान्यतेसी आला । वांया गेला पितृद्रोहें ॥७२॥

येणें तप जरी बहु साधिले । नाना योग आसनें चाळिले । लिंगार्चनें दैवत पूजिले । वायां गेलें पितृद्रोहें ॥७३॥

पितृचरणीं नाही मन । यात्रा केल्या पायीं नग्न । उदंड केलें धर्मदान । वृथा शीण निष्फल तो ॥७४॥

न सेवी जो असोनि पितर । काय जाळावा त्याचा विवेकविचार । दुष्ट कर्मी तो पापी घोर । तया नमस्कार न करावा ॥७५॥

लोकां दावी दांभिकपण । अंतरीं पितरां करी छलन । जळों त्याचें कर्मठपण । भोगील पतन नरककोटी ॥७६॥

अहो हे प्रत्यक्ष मूर्तिमंत । मातापिता गुरु दैवत । यालागी जो त्रासें दुखवित । तो पावे घात पदोपदीं ॥७७॥

त्यासी दारिद्रय संकट अपमान । नाना परी ओढवे विघ्न । अनेक दोषांचें आरोपण । मूर्खत्व गहन वृद्धि पावे ॥७८॥

कार्य करितां पावे अपयश । दग्ध होय समूळ यश । नसतां जगीं वाढें द्वेष । होय नाश सर्वथा ॥७९॥

जे का पितृसेवेसी रत । दासपणें आज्ञा पाळित । शब्द अणुमात्र नुल्लंघित । प्रीतीं वाहात मस्तकीं ॥८०॥

पितृभक्तीची विशेष आवडी । चरणसेवेची सत्य गोडी । उदंड करितां भावी थोडी । वाढवी प्रौढी वडिलांची ॥८१॥

म्हणे हे माझें दैवत । उभय बहुकाळ वांचोत । सेवा करितां माझा अंत । होवो निश्चित पदीं यांच्या ॥८२॥

यांनीं बहु माते छळावें । म्यां वचनची यांचें पाळावें । चित्त कधीं न विटाळावें । सेवेंत मळावें दिनरजनी ॥८३॥

पूजितां या सत्पात्रांस । मज न उपजावा कधीं त्रास । नित्य विनत होवोनि पवित्रास । नाममंत्रास जपावे ॥८४॥

नित्य विनवी देवासी । वृद्धां ठेवीं तूं सुखवासी । दुःख न दावी या जीवांसी । चरण निवासी मज ठेवी ॥८५॥

ऐसी ज्या पुत्रातें वासना । उभयांची प्रीतीं करीं अर्चना । अन्य पदार्थ नावडे मना । याची साधनामाजी रमे ॥८६॥

तों धन्य पुत्र या संसारीं । ऋद्धि सिद्धि तयाचें द्वारीं । तिष्ठताति होवोनि कामारी । होय हरी सखा त्याचा ॥८७॥

यश कीर्ति पावे मान । त्याचें दर्शनें जग पावन । पाप जातसे दग्ध होवोन । जोडे पुण्य आगळे ॥८८॥

दुःख दरिद्र आणि संकट । पळे देखोनि मानी वीट । तया स्तविती सर्व वरिष्ठ । नुपजे अरिष्ट कदा तेथें ॥८९॥

सकळ देव जोडोनि कर । नित्य स्तविती त्या अपार । ऐसा तो अविनाश दिगंबर । दुर्वास चंद्र पितृसेवें ॥९०॥

नित्य नित्य अतिप्रीतीं । अत्रिअनसूयेची सेवा करिती । अर्चनीं बहु आनंद मानिती । हेतु पुरविती वडिलांचे ॥९१॥

ऐसे बहुत काळपर्यंत । सेवेमाजी तिघे रत । अत्रिअनसूया आनंदभरित । आनंदे बोलत परिसा तें ॥९२॥

बा रे तुम्ही करोनि सेवा । सुख दिधलें आमुच्या जीवा । हें सेवा पावो माधवा । तुमचिया भावा पूर्ण करो ॥९३॥

तुमचे मनींची कामना । सफलित फळतील वासना । त्रैलोक्य मानवेल गुणा । जगदुद्धारणा योग्य तुम्ही ॥९४॥

तुमचे प्रताप होतील गहन । कीर्तिप्रभें उजळेल त्रिंभुवन । सकळांमाजी श्रेष्ठ पावन । वंद्य जाण तुम्हीं सर्वां ॥९५॥

सिद्धी ऋद्धि मांडारें । त्रिभुवन संपत्ती असो बा रे । सर्व सत्तायोग बरे । प्राप्त खरे तुम्हां होती ॥९६॥

शांति क्षमा दया विरक्ति । हीं सदैव वसो तुम्हांप्रति । विद्याधन शरीरसंपत्ति । विवेकवृत्तीं ज्ञान बहु ॥९७॥

विद्याकळा सुप्रसन्न । असोत सकळ गुण वर्धमान । त्रिविधताप अज्ञान । जावो निवटोन दर्शनेंची ॥९८॥

बळ पराक्रम असे थोर । इच्छा पूर्णतेचे दातार । वाणी फळो सिद्ध साचार । अनन्योद्धार घडो सदा ॥९९॥

दुःख पीडा दुष्टमति । द्वैतभेद अवगति । पापवासना कल्पांतीं । कदा तुम्हांप्रति न वागो ॥१००॥

आणि जोवरी हे धरणी । ग्रह तारा नक्षत्र तरणी । तोंवरी क्षेम तुम्हांलागोनी । असो वरवाणी फळो हे ॥१॥

उभयतांच्या ऐकोनि वरदा । भावें वंदिती तिघे पदा । म्हणती सरली येथोनि आपदा । सर्व संपदा जोडली ॥२॥

मग उभें राहोनि समोर । त्रिवर्गें जोडोनिया कर । स्तविते झाले प्रियकर । विनय उत्तर लाघवें ॥३॥

अहो जी दीनदयाळा । मायबापा हृदयकोमळा । औदार्यधीरा सुशीला । आप्तपाळा करुणाब्धे ॥४॥

तुम्ही आमुचे जन्मदाते । दीनवत्साचे पाळिते । आम्हां कोण जी तुम्हांपरतें । करील आस्थे दिसेना ॥५॥

तुमचे प्रसादें करुन । झालें या सृष्टीचें दर्शन । तुम्हांपासोनि झालें ज्ञान । वदपठण सर्वही ॥६॥

तुम्हांपासून सर्व प्रकार । कळोनि आला सविस्तर । ब्रह्मत्व दिधलें साचार । कृपा थोर तुमची ॥७॥

तुम्हींच आम्हां वाढविलें । विद्यादान आम्हां दिधलें । सकळांमाजी मान्य केलें । वृत्त करविलें पूर्ण तुम्हीं ॥८॥

तुम्हांविण दाता थोर कोण । संकटें भोगिलीं आम्हांलागुन । जनन होतांची अमृतपान । सागरचि पूर्ण लोटिला ॥९॥

बहु सायासें वाढविलें । नरकमूत्रातें तुम्हीं साहिलें । लळे आवडिचे पुरविले । दुःख निवारिलें सोसोनी ॥११०॥

रागवितां वेंधवितां सुरस । रसनेसी चाटविला अन्नरस । कधीं होऊं न दिलें विरस । वाढविलें सरस चालणीं ॥११॥

बालाकाचे करुन कुमर । घडविले तेथील संस्कार । सुमुहूर्तें करुन द्विजवर । विद्या समग्र पढविली ॥१२॥

विद्येमाजी निपुण केल । ब्रह्मचय मान आज्ञापिलें । तीर्थयात्रे पाठविलें । स्वस्थळा आणिलें आम्हां सुखी ॥१३॥

ऐसे तुम्ही परम सकृप । घटीं उजळिला ज्ञानदीप । सकळ निवारिले तुम्ही ताप । मायबाप धन्य तुम्ही ॥१४॥

तुम्हांऐसा उपकार । कोण करील दुजा पामर । नये सरी बरोबर । त्रिभुवनांतर धुंडितां ॥१५॥

हे उपकार फेडावयासी । युक्ति न दिसे कवणापाशीं । धुंडोनि पाहतां शास्त्रपुराणांसी । आणि वेदासी सुचेना ॥१६॥

फेडावया तुमचें ऋण । कैंची आम्हां अंगवण । आम्ही लडिवाळ तुमचे अज्ञान । मौन चरण धरियेले ॥१७॥

शास्त्रार्थातें धुंडितां । सांपडला एक विचार पाहातां । निर्णय केला ऋणार्था । तोही आतां निवेदूं ॥१८॥

द्रव्यऋण अन्नऋण । वस्त्रऋण धातुऋण । चोरमारजारऋण । उपकारऋण वेगळें ॥१९॥

जळऋण स्थळऋण । काष्ठऋण आणि पाषाणऋण । विद्यावाद भयऋण । तरुऋण काच पाच ॥१२०॥

द्विपद चतुष्पदऋण । दानऋण घर्मऋण । देव आणि सेवाऋण । व्यापारऋण वेगळें ॥२१॥

आप तेज वायुऋण । पृथ्वी आकाशाचें असे ऋण । अग्निद्विजाआप्त ऋण । घातऋण अनेक ॥२२॥

स्त्री ऋ पुत्रऋण । कुळिकऋण गोत्रजऋण । पितृऋण मातृऋण । गुरुऋण जाणिजे ॥२३॥

अनेक ऋणाच्या परी । बहुतची असती निर्धारी । परी निवडिलें सार विचारीं । ग्रंथविस्तारी न वाढवी ॥२४॥

ऋण वैरहत्या त्रिगुण । आणिक पापपुण्य निवडिले दोन । एवं पांच कर्दमी विचार पाहून । कर्म स्थापन पैं केलें ॥२५॥

सकळ सृष्टीचा उभारा । जन्मकर्मराहटी फेरा । येचि आधारें परस्परा । कळसूत्रा नाचविलें ॥२६॥

मूळ इच्छा वासनेचा खेळ । येथोनि कर्तृत्व असे सकळ । त्यागुणें रचिलें हें ढिसाळ । ब्रह्मांडगोळ जीवमात्र ॥२७॥

जीवापासुनी जो घडे धर्म । तेंचि तयाचें जाणा कर्म । मुक्त बद्धाचें वर्म । वासनाक्रम ज्या रीतीं ॥२८॥

जैसी जैसी वासना धावें । फळ तैसें तैसें तया पावे । लय वासने होतां बरवें । मुक्त स्वभावें होय तो ॥२९॥

असो मागे झालें ऋणस्थापन । तें शास्त्रन्यायें करुं मोचन । सावध कीजे आतां श्रवण । स्वस्थ मन करोनी ॥१३०॥

द्रव्यऋण द्रव्य फेडावें । शेष राहतां जन्म घ्यावें । पशुश्वानादि व्हावें । फेडित फेडावे बहुदिवसां ॥३१॥

अन्नऋण त्याचपरी । असल्या फेडावें झडकरी । राहतां तयाचे घरीं । पोटभरी जन्म घ्यावा ॥३२॥

वस्त्रऋण देतां राहिलें । वस्त्रें वाहाणें घरीं त्या आलें । बैल घोडे झाले हेले । वाहतां मेले ओझेंची ॥३३॥

धातुऋण राहिलें देतां । तेथेंही श्रमावें ओझें वाहतां । किंवा तस्करविदेहारिता । धातुक्षीणता जाणिजे ॥३४॥

जारऋणें ग्रंथी असती । पुढें कुंटणे होवोनि फेडिती । अपवाद नाना भोगिती । शिक्षा घेती फुका ते ॥३५॥

उपकारीं उपकार करावा । न फिटतां पोटीं जन्म घ्यावा । सुख देवोनि श्रम सोसावा । आपुलिया जीवा ते ठायीं ॥३६॥

जळऋण जीववावें । तेणेंची तें सत्य फिटावें । स्थळऋणें सर्प व्हावें गुप्त द्यावें धन तया ॥३७॥

काष्टऋणें द्यावें घर । पाषाणऋणें देवागार । विद्याऋणें सेवा थोर । द्रव्यसत्कार बरवा तो ॥३८॥

वादा अर्पावी शांति । ऋण वारोनि अधिक होती । भय कीजे इच्छा पुरती । जीवनें हरती तरुऋणें ॥३९॥

काचपाचाचें ऋण । घेतां चोरितां होय पूर्ण । पालटे देतां जाय फिटोन । न देतां नयन ते जाती ॥१४०॥

द्विपद चतुष्पद होय । उदरपूर्तींनें तें जाय । जीवन जाणतां मुक्त होय । कदा न राहे तें ऋण ॥४१॥

दान धर्म जें घ्यावें । जन्मोनि त्याचें कल्याण करावें । अनेक युक्तीनें फेडावें । नेम बरवे नमिले ॥४२॥

देवऋणें कुळधर्में । करोनि फेडावीं संभ्रमें । सेवाऋण सेवाक्रमें । सत्य धर्में तें फिटे ॥४३॥

व्यापारऋण तें तात्काल देतां । उरलें फिटे जन्म घेतां । ऋणमोचन तीर्थी स्नान करितां । तैं मुक्तता जीवासिया ॥४४॥

आप तेज वायु पृथ्वी आकाश । जन्मार्थ घेणें त्यांचा अंश । शेखीं मरतां ज्याचा त्यास । द्यावा अवश्य लागतो ॥४५॥

अग्नि हवनें तोषवावा । कीं द्विज भोजनीं तोषवावा । तो भाग येणें फिटावा । द्विज फेडावा द्विजार्चनें ॥४६॥

आप्तवर्ग प्रतिपालनें । ऋण हरावें सदयपणें । पाळितां न कांटाळणें । ज्याचें घेणें तो घेतो ॥४७॥

घातऋणें समंध होय । सेवा दानीं तोहि जाय । स्त्रीऋण उपाय । पुत्र होय तरी फिटे ॥४८॥

विवाहें फिटे पुत्रऋण । कुळीं गोत्रजा पिंडदान। क्रियाकर्में उद्धारण । ऐसें प्रमाण या काजीं ॥४९॥

ऐसीं अनेक ऋणें असतीं । वर्म जाणोनि फेडितां फिटती । सर्वांहुनी विशेष असती । त्यांची ख्याती वेगळी ॥१५०॥

मातापिता आणि गुरु । या ऋणासी नाहीं आधारु । नाहीं शास्त्रयुक्ति विचारु । कैसेनि पारु तैं होय ॥५१॥

तथापि शास्त्रीं निर्णय । पितृऋणासी केला उपाय । तदनुसारें केलिया होय । ऋण जाय फिटोनी ॥५२॥

तयाचें ऐका निरोपण । वेदशास्त्री सत्यप्रमाण । कोण कैसें तया आचरण । तेंहि विवरोन दावितो ॥५३॥

उदरीं सतपुत्र जन्मला । आचरण शुद्ध वागों लागला । कीर्ति संपादिता झाला । आनंद पित्याला त्याचि गुणे ॥५४॥

करुं नये आज्ञा उल्लंघन । वर्ते पित्याचा हेतू पाहून । जें जें इच्छी त्याचे मन । तेंचि पूर्ण करावे ॥५५॥

पित्याहुनी आगळें । नाम रुप जेणें वाढविलें । आधिपत्य पित्यासीच दिधलें । मर्यादें रक्षिलें बहुफार ॥५६॥

केल्या वृत्ताचें निवेदन । करणें तेंहि करी श्रुत करुन । नम्रतेचें करोनि भाषण । संतोषवी मन दिवानिशीं ॥५७॥

सेवेमाजी तत्पर होय । त्रिकाळ वंदित प्रेमें पाय । सुरक्षित ठेवी पितृकाय । तेवींच मायसेवित ॥५८॥

ऐसा योगक्षेम करितां । दैवें शांत झाला पिता । त्याचिया कर्माची करी सांगता । आचरे वृत्ता नेम जैसे ॥५९॥

यात्रा क्रमें गयावर्जन । किंवा दे कपारी पिंडदान । शेवटीं घेतां सन्यासग्रहण । तैं तें ऋण मुक्त होय ॥१६०॥

शुद्ध भक्तिभावें साचें । ऐसेंचि सेवन केलें मातेचें । स्वचर्मवहन करितां पदाचें । न फिटे साचें तें ऋण ॥६१॥

जग वाचेनें बोलती । मातृऋणा सन्यस्त घेती । पार हें मिथ्याची जल्पती । आंधळे होती देखोन ॥६२॥

अहो जरी ऐसें असतें । तरी मातेसि संन्यासी कां नमिते । ज्याचें ऋण होय फिटते । कोणत्या सत्ते मानी मग ॥६३॥

जोंवरी असे देणें । तोंवरी म्हणेल तें एकणें । भोगवील तें लागे भोगणें । नम्र वचनें नमोनी ॥६४॥

सत्तेवांचोनि अधिकार । केवीं चालेल कोणावर । हा सकळांसि कळतो विचार । कळोनी अंधःकार कासया ॥६५॥

मातेचा उपकार न फिटे कांहीं । म्हणोनि संन्यासीं वंदिती पाहीं । तेवींच न फिटे गुरुठायीं । अद्‌भुत नवलाई उभयांची ॥६६॥

ऐसें अत्रिअनसूयेप्रती । तिघे विनवोनिया बोलती । तुमचे उपकार न फिटती । आम्हां कल्पांती कदाही ॥६७॥

पित्याचें फेडावें जरी ऋण । तरी तो सद्‌गुरु आम्हांलागोन । तारक उपदेश त्यापासून । आणि आत्मत्वपूर्ण लाधलों ॥६८॥

तो जगद्‌गुरु पूर्ण दातार । छेदितां अज्ञान अंधकार । ज्ञान प्रकाशोनि केला उद्धार । काय उपकार आठवूं ॥६९॥

त्याचिया कृपावलोकनें । लाधलों आम्ही गुह्य गुप्त धनें । जयासि वेद बोले अनुमानें । तें चिद्रूप देखणें दाविलें ॥१७०॥

जेणें मोहमाया सर्व नाशिली । भवभ्रांति समूळ छेदिली । कल्पनातीत वृत्ती केली अवस्था मुरवली स्वरुपांत ॥७१॥

निरिच्छ केलें आमुचें मन । सहजची झालें उन्मन । तेणें केलें आपणासमान । द्वैतपण नाथिलें ॥७२॥

देखणें तें मिथ्या केलें । अदेखणें तेंचि दाविलें । मींतूंपणा नाहीं उरविलें । अभेद दिलें दान मज ॥७३॥

दावोनिया गुह्य गुज । क्षराक्षरातीत केलें मज । ऐसा हा पिता सद्‌गुरुराज । पूर्ण काज केलें यानें ॥७४॥

तेवींच अनसूया तूं माता । सकृप आम्हां उभयदाता । काय आठवूं उदारता । न ये फेडितां निश्चयें ॥७५॥

कैसेनि व्हावें उतराई । हें सर्वस्व तुमचेनि पाही । दीन म्हणोनि वाचे ठायीं । मौन पायीं अर्पीं माथा ॥७६॥

मी होय सेवा करिता । दोष लागे बोलूं जातां । यालागीं स्तब्ध आतां । पायीं माथा ओपिला ॥७७॥

काया वाचा जीव प्राणें । करुं सेवा गौरवपणें । तरी विस्तारले तुमचे गुणें । सर्व धनें तुमची हीं ॥७८॥

तुमचेंचि असे सर्व कांहीं । आमुचें म्हणावया ठाव नाहीं । शून्य होवोनिया देहीं । प्रणम्य पायीं सदृढ ॥७९॥

ऐकोनि लडिवाळांचें उत्तर । सप्रेमें उभय कवळिती सत्वर । जीवीं झाला आनंद थोर । अभयकर दे माथा ॥१८०॥

बा रे तुमच्या निरोपणीं । संतोष झाला अंतःकरणीं । तुम्हां ऐसे लाधले गुणी । पुरली धणी अंतरींची ॥८१॥

ब्रह्मचर्यातें आचरुन । आलां सकळ यात्रा करोन । त्यावरी आमुची सेवा करुन । नाहीं अभिमान वाहिला ॥८२॥

निरभिमानी निरहंकार । सर्वातीतपणें अंगीं विचार । हें पाहोनि रहणीसार । आमुचें अंतर सुखावलें ॥८३॥

पाहोनि तुमच्या गुणांसी । सुखानंद उपजे जीवासी । आतां करुं तुमच्या विवाहासी । मंगलकार्यासी आरंभू ॥८४॥

ब्रह्मचर्यापाठीं उत्तम । अंगीकारावा गृहस्थाश्रम । पूर्ण होतील सकळ धर्म । धर्मार्थकाममोक्ष तेथें ॥८५॥

सकळ आश्रमांचें सार । गृहस्थाश्रम हा अतिसुंदर । याचा कीजे अंगीकार । स्नुषा सुंदर आम्हां येती ॥८६॥

ऐकोन वडिलांचें वचन । स्तब्ध न बोलती तिघेजण । हे पुढील प्रसंगीं निरोपण । रसाळपूर्ण संवाद ॥८७॥

दत्त अविनाश निर्विकार । दुर्वास तपोधन योगेश्वर । चंद्र तेजस्वी पवित्र । करिती विचार मानसीं ॥८८॥

सर्वांत श्रेष्ठ सर्वज्ञता । शोभे स्वामी सद्‌गुरुदत्ता । तोचि सारासार असे जाणता । पूर्ण मनोरथा पुरवील ॥८९॥

शरणागताची जैसी प्रीती । जाणोनि पुरवी तेचि रीती । मनीं उपजो नेदी क्षिती । करवी उपरती निजबोधें ॥१९०॥

बोधवैभवातें देवोन । विवेक शांति लेववून । संत केले आनंदघन । वसे आपण संतमेळीं ॥९१॥

जैसा आपण बाग लाविला । जीवन देवोनी वाढविला । फळीं पुष्पीं जैं शोभला । तैं सुखावला जीव जैसा ॥९२॥

बाग दिसे शोभायमान । पुष्पें दरवळिलीं चहूंकडोन । मग मध्यें बैसोनि आपण । उपभोग पूर्ण घेतसे ॥९३॥

तेविं संतसाधूंचे मेळीं । ज्ञानबोधाचे कल्लोळीं । आत्मस्थितीची नव्हाळी । घे त स्थळीं अविनाश ॥९४॥

संत सेविती ब्रह्मानंद । त्या आनंदाचा दत्तकंद । तो प्राप्‍त व्हावया स्वानंद । संतपदची सेविजे ॥९५॥

संतपदीं करितां निवास । तेणें तुटती भवपाश । करोनि अज्ञानतिमिरनाश । वस्तु अविनाश भेटविती ॥९६॥

म्हणोनिया अनंतसुत । संतचरणीं झाला रत । दीनपणें दारीं तिष्ठत । दान मागत कृपेचें ॥९७॥

संत साधु सदय उदार । शरणागताचे दातार । मज देवोनि अभयकर । ग्रंथविस्तार वाढविती ॥९८॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ यासी नारदपुराणींचें संमत । सदा परिसोत भाविकभक्त । पंचदशोध्यायार्थ गोड हा ॥१९९॥


References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP