॥ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः ॥
जयजयाजी सद्गुरुद्त्ता । ब्रह्मानंदा अविनाश समर्था । तुझिया चरणी ठेविला माथा । सनाथ अनाथा करी वेगी ॥१॥
तुझी लीला अपरंपार । ते मी काय वदू पामर । तू जरी देशी कृपाकर । तरीच उद्गार निघती ॥२॥
पांगुळा फुटती पाय । मुका बृहस्पतीच होय । अंधपरि अक्षा लाहे जरी होय कृपा तुझी ॥३॥
बधिरा होईल श्रवण । अज्ञानांगी वसे ज्ञान । कुरुप होय लावण्य । तव कृपा पूर्ण झालिया ॥४॥
जरी तुझी होईल कृपा । मग अवघड मार्ग तोचि सोपा । पावेल जावोनि अरुपा । माइक रूपा न मानी ॥५॥
सक्त तोचि विरक्त । विरक्त होईल अनुरक्त । तव ऐक्यासि युक्त । होती मुक्त तव कृपे ॥६॥
तुझी कृपा होता रोकडी । बुद्धि होय सतेज चोखडी । सत् चित् आनंदी गोडी । उपजे आवडी विचारणी ॥७॥
तू जै झालासि कृपाघन । तैच चालिले हे निरूपण । अद्भुत तुझे महिमान । करी पावन दीनरंका ॥८॥
गत कथाध्यायी निरोपिले । जन्मकथेसी संपादिले । पुढील कथेसी भले । श्रवण केले पाहिजे ॥९॥
तुम्हा श्रोतियांचेनी श्रवणे । गोड चालिली निरूपणे । पुढेही अवधान देणे । पान करणे कथामृत ॥१०॥
दत्तकथा परम पावन । भवरोगासी रसायन । आवडीने करितील ग्रहण । तयांसी भवबंधन न बाधी ॥११॥
दत्तकथा हा कल्पतरू । स्वयमेव उभा दातारू । हेतु पूर्ण करावया सविस्तरू । सफलित उदारू ठेलासे ॥१२॥
सकलांचे मनोरथ पुरवावया । अविनाशा उपजली दया । दत्तरूपे प्रगट होवोनिया । करी छाया कृपेची ॥१३॥
रूप धरोनिया सगुण । सिंहाचळी खेळे आपण । बाळलीले कौतुक पूर्ण । स्वये आचरून दाविती ॥१४॥
अनसूया आणि अत्रीसी । पाहता सुख उपजे मानसी । सवे खेळवी ऋषिबाळांसी । सकल तापसी पाहती ॥१५॥
नानापरिचे खेळ खेळती । श्रमता वृक्षतली बैसती । बहु चमत्कारे अनुवादती । जेणे उपरती होय जीवा ॥१६॥
माईक प्रवृत्ती खेळ । ते निवृत्ती करोनि घालिती मेळ । ब्रह्मी ऐक्य सकळ । ऐसे तात्काळ दाविती ॥१७॥
गली खाणोनी गोट्या खेळती । दोहींकडे दोघे असती । एक कच्यावरी गोटी मांडिती । एक भेदिती चमत्कारे ॥१८॥
निःशक्त युक्तिने खेळती खेळ । गली गली भेदिती सकळ । विसावे घेत घालविती मेळ । कचा तात्काळ उडविती ॥१९॥
गल्ली कचा चुकता । पुनरा फिरे तो मागुता । डाव बैसला तया माथा । भोगिती व्यथा बहु फार ॥२०॥
खेळियामाजी दत्त थोर । कची कचा भेदिती पार । टिचोनी गोटी होय वर । येरा आवर न घडे तो ॥२१॥
अभ्यासी बोटे करोनि लवते । संधान द्विदळी साधी पुरते । चुकवोनिया गलीते । लक्षी अलक्षाते टिचीतु ॥२२॥
कोणी रंगणगोटी खेळती । पायता राहोनी नेमिती । आल्लाद टिचणी चुकती । रंगनी पडती गुंतोनी ॥२३॥
गुंतता धरविती काना । चुकता लवविती माना । आपुली काढिता आपणा । दुःख नाना भोगविती ॥२४॥
तोच खेळिया धुरंधर । पायता राहोनी लक्षी सुंदर । गोटीने गोटी सत्वर । भेदोनि पार निराळा ॥२५॥
तेवीच आट्यापाट्या खेळती । घरात जावोनी नातळती । मारा चुकवोनि घरे घेती । लोण शिवती अचूक ॥२६॥
कोणी गल्ली सापडले । अज्ञानभ्रमे भ्रमित झाले । पाटिरक्षके ताडिले । डाव बैसले मस्तकी ॥२७॥
कोणी युक्तिने रिघती । हूल दाखवोनी घरे घेती । नाना हावभावाते दाखविती । परी लक्षिती लोण जीवे ॥२८॥
कोणीएक दोन तीन घरे पावले । रक्षक सर्वां घरी असती ठेले । तेणे आतळतांची फेरी पडले । डाव आले अंगावरी ॥२९॥
तोचि शहाणा चतुर पुरता । खेळी हावभाव दावी फिरता अचूक न लागे कवणाचिया हाता । लोण शिवता मुक्त तो ॥३०॥
आता तिसरा खेळ मांडू । म्हणाल कोणती विटीदांडू । खेळता येरयेरावी भांडू । कवडी ब्रह्मांड फिरवू या ॥३१॥
गडी सम सारिखे एक । द्विविधा दावावया कौतुक। एक कोलक आणि झेलक । उभे साम्यक ठाकले ॥३२॥
विटीदांडू जीवशिव । माया गल्ली हे अनेक ठाव । करविता जो खेळलाघव । व्यापक स्वयमेव वेगळा ॥३३॥
दांडू राहे ठाईंचा ठाई । विटी माथा टोले खाई । येतांची झेली जो लवलाही । तोचि भाई समतुल्य ॥३४॥
विटी न गवे झेलिता । दांडू तरी भेदावा पुरता । तोहि जरी चुकोनी जाता । डाव माथा चढू लागे ॥३५॥
उभयासी समसंधान । डाव खेळता असती जाण । एकमेकांची चुकी लक्षोन । वराधिक्य पण करावे ॥३६॥
न येता हाती चुका । खिलाडी खेळे जरी नेटका । मग करावा लागे लेखा कारण तुका न तुकवे ॥३७॥
मग साताचे आवर्ण । तेही जाणा वगळीच खूण । वकटाचे चरणस्थान । चकता पतन सहज त्या ॥३८॥
लेंड करवी भ्रमणा । चुके जरी वर्मस्थाना । मग खेळी होय स्वस्थापना । नुकपणा डाव आला ॥३९॥
दंडस्थापना बैसे मुंड । चुकता झेलिता मोडे बंड । न चुकत कुभांड । आणिक वितंड वाढवी ॥४०॥
खेळ खिलाडी खेळे नाल । ताडणी तया झेलाल । तईंच सोडोनिया हाल । पुढे कराल उभे तया ॥४१॥
नाल न लागेची हाती । तरी आर झोंबे पुढती । नेत्रासनी उर्ध्वगती । जाणा स्थिती तयाची ॥४२॥
तेथे जरी चुकोनि जाये । मग तो डाव हातासी ये । तोचि ताडिता जरी होये । झेलिता अपाये हार ती ॥४३॥
झेलणी न ये झेलिता । मग बैद धावे पुढता । तो कर्णीच सांगे वार्ता । तया स्वीकारिता उत्तम ॥४४॥
तोही हातींचा जरी गेला । मग झकू उरावरी बैसला । दहा झकूंचा होता मेळा । जुंपी कावडीला सकळांते ॥४५॥
दैवे खेळ येता हातासी । तरी समपाडे करावे फेडीसी । अधीक होता खेळासी । ठाव निश्चयेसी ठाईच ॥४६॥
न फिटे अधिक झाले । तरी भोगणे कावड प्राप्त आले । विटी झेलिता दम पुरले । गडी भागले कितीक पै ॥४७॥
सरता खेळ पडे विटी । मग खिलाडी डावकर्यासी पिटी । कवडी कवडी वेचवी होटी । दमसुटी व्यर्थ गेला ॥४८॥
तेथे दमे जरि धरिल धीर । नाद उठवी एकसूर मुळ स्थानी जावोनी सत्वर । साही प्रखर रेशा करी ॥४९॥
मुळासी गेल्यावाचून । भागा नये मुक्तपण । यासाठी खेळावे जपोन । झकू लावून न घ्यावा ॥५०॥
पुढती खेळ आरंभिती सप्त पर्व लिगुरीसी रचिती । तयावरी ती मोने मांडिती । सम भाग होती गडी तेव्हा ॥५१॥
चेंडू करी बोलती बोल । सावध गड्या चेंडू झेल । लिगोरी उडवोनी सकळ । घेईन दुमाल गड्याचा ॥५२॥
गडिये व्हारे सावधान । डाव घेऊ चेंडू झेलुन । मांडिले चक्रे ही भेदून । डाव आपण जिंकू पै ॥५३॥
संधान साधोनि उडविली गोरी । त्याची पाठलाग वेगी करी । खिलाडे चुकवोनी पहिल्या परी । रची निर्धारी तो धन्य ॥५४॥
भेदोनिया उभा रणे । चेंडू झेलोनि सरसे होणे । टोला पाठीचा चुकविणे । युक्त लक्षणे खेळ हा ॥५५॥
सद्गुरु दत्त खेळे खेळा । वचनचेंडू भलतैसा फेंकिला । तो वरचेवरी जेणे झेलिला । तोचि पावला स्वात्मसुखा ॥५६॥
अहंकार लोभ चेंडू उसळता । तयासि पिटावोनि हाणिजे लाता । कदा राहू नये लाताळिता बसे चुकता पाठीत ॥५७॥
तेणे पाठलाग केला जरी । तो फिरवील गा बहुत फेरी । उसंत नेदीच क्षणभरी । न मिळे निर्धारी विश्रांत ॥५८॥
यासाठी लोभ अहंकार । यांसी लाताळावे वारंवार । विवेके करावा जर्जर । त्याचा भर मोडवा ॥५९॥
दत्त म्हणे ते समयी । आपण खेळू लपंडाई । दुर्वास म्हणे भले भई । लपतो पाही धरी आम्हा ॥६०॥
तव त्या पर्वताचे दरी । लपू ठाव साधिला पोरी । अवधूत व्यापक सर्वांतरी । आणिली सारी धरोनी ॥६१॥
भोग्यासी जव नाही शिवले । तैसियामाजी अवतरिले । डाव सकळांवरी आणिले । काय बोले तयांसी ॥६२॥
आता आली तुमची पाळी । डोळे झांकिजे त्वरे सकळी । मी लपतो कवणिया स्थळी । काढा ये वेळी धुंडोन ॥६३॥
अवश्य म्हणोनी डोळे झांकिती । गुप्त झाली दत्तमूर्ती । सकळ पोरे धुंडो जाती । बहु शोधिती पर्वता ॥६४॥
वृक्ष पाषाण दरी खोरा । गुहा गुहे शोधिले मंदिरा । स्थूल सूक्ष्म स्वापद थारा । शोधिती धरा बहुतची ॥६५॥
ठाव न लगेची तयासी । श्रम पावले मानसी । विचारिते झाले एकमेकांसी । गती कैसी करावी ॥६६॥
अर्भके सकळही अज्ञान । करिते झाले तेव्हा रुदन । अहो गती झाली तरि कवण । आले दूषण सर्वांवरी ॥६७॥
कळता मारील मायबाप । ऐसियासी करावे काय । पडिले संकटी न सुचे उपाय । मोकलिती धाय तेधवा ॥६८॥
जवळीच असता रत्न । न दिसे ते अंधालागून । बधिरालागी कीर्तन । नव्हेची श्रवण कदापि ॥६९॥
तैसा या अज्ञानांसी । केवी सापडे तो अविनाशी । व्यापक असोनी न कळे कोणासी । काय अंधासी म्हणावे ॥७०॥
असो ज्याचा जैसा भक्तिभाव । तैसा त्यापाशी वसे देव । मुलांचा आक्रोश देखोनि धांव । दत्तराव घालीतसे ॥७१॥
एकाएकी प्रगट झाला । मुले म्हणती कोठोनि आला । तू कोठे तरी लपाला । सांग ये वेळा आम्हांसी ॥७२॥
म्हणे मी होतो तुमचेचपाशी । परी तुम्ही नचि पाहा की मजसी । उगेचि पावला श्रमासी । दुःख मानसी भोगिले ॥७३॥
दत्त म्हणे तुम्ही लपावे । आम्ही शोधितो तुम्हा बरवे । तव दुर्वास बोले अवघे । कोणे पावावे तुझिया सरी ॥७४॥
आम्ही जेथे जेथे लपू जाता । तेथे तू अससी दत्ता । तुजवीण ठाव रिता । कोठे पाहता न राहे ॥७५॥
जळी स्थळी काष्ठी पाषाणी । सजीव निर्जीव राहिलासि व्यापोनी । आम्हा लपावयालागोनी । ठाव तुजवाचोनी दिसेना ॥७६॥
ऐसे ऐकता गुज । संतोषला महाराज । नाना खळाचे चोज । दत्तराज दावी मुला ॥७७॥
म्हणे बापहो ऐसे खेळावे । खेळोनि डावी न गुंतावे । हाती कोणाचेही न यावे । असक्त असावे खेळता ॥७८॥
दुर्वास म्हणे दत्तासी । हे अंगवण नोव्हेची जीवासी । तू जरी कृपा करिसी । तरीच युक्तीसी लाहे तो ॥७९॥
तुझी कृपा न होता । केवी चुकऊ शकेल गुंता । शीण पावती खेळता । परि सुटता नयेची ॥८०॥
येरयेरा बाणली खूण । ऐसे खेळ खेळती नूतन । दत्तासवे रंगले पूर्ण । गडी संपूर्ण आनंदले ॥८१॥
अत्री अनसूया पाहती । खेळ देखोनी आनंदती । दिवसेंदिवस वाढती । कौमारवृत्ती प्राप्त दिसे ॥८२॥
मग पाचारोनि ऋषिजन । विचारिते झाले बैसोन । मुलांचे करावे मौजीबंधन । काढा सुदिन लाभक ॥८३॥
शोधोनी तिथीते नेमिले । साहित्य संपूर्ण सिद्ध केले । व्रतबंधाते आरंभिले । दुर्वासा दिधले ब्रह्मचर्य ॥८४॥
गायत्री उपदेश देवोन । वेदारंभ केला पूर्ण । करविते झाले भिक्षाटण । मौनधारण आज्ञापिती ॥८५॥
सवेंचि दिवस लोटता । मौजीलाभ काल समीप दत्ता । हे जाणोनि मातापिता । केली सिद्धता त्वरेने ॥८६॥
पाचारोनिया द्विजगण । तिथी नेमिली शोधून । उरले संस्कार करवोन । विधी शोधून चालविती ॥८७॥
आप्तवर्गादि पाचारिले । देव ऋषी समस्त आले । मंगल तुरे वाजो लागले । चौल सारिले यथाविधी ॥८८॥
बोहोले मंडप सुंदर । शोभायमान तोरणे अपार । सभ्य बैसले द्विजवर । आल्या सत्वर देवकांता ॥८९॥
पुण्याहवाचन देवप्रतिष्ठा । अतिसत्कारे पाचारिले इष्टा । सन्मानोनी सकळ श्रेष्ठा । आणि वरिष्ठ नमियेले ॥९०॥
करवोनी तेव्हा उपनयन । वाद्यघोषे मंगल स्नान । बटुवस्त्र करवोनी परिधान । सुचंदन लेवविला ॥९१॥
पितापुत्र बोहोल्यावरी । पट धरोनि उभयांतरी । कर्मदीक्षा अंगीकारी । सावधोत्तरी सुचविती ॥९२॥
बटुअष्टके अतिरसाळ । द्विज गर्जती सुमंगल । सावधान शब्दकल्लोळ । अक्षता सकळ टाकिती ॥९३॥
सकळ दैवतांचे करोनी स्मरण । प्रार्थिते झाले त्यालागून । बाळा करविले दीक्षाधारण । यासी निर्विघ्न प्रतिपाळा ॥९४॥
हाचि करिती शब्दबोध । व्रतरक्षणी तू सावध । विद्याभ्यसनी जोडो वेध । आचरणी शुद्ध सावधान ॥९५॥
असो यापरी सावध करोनी । यज्ञोपवीत दिधले त्यालागोनी । दंड कौपीन देवोनी । मंत्र कर्णी सांगीतला ॥९६॥
पिता अत्री उपदेशित । मंत्र गायत्री निवेदित । ह्रदययंत्री आकर्षित । गोत्री स्थापित प्रवराते ॥९७॥
करवोनिया दीक्षाधारण । आरंभोनी संपविले हवन । अनसूयेलागी पाचारून । भिक्षादान दीधले ॥९८॥
उपोषण दत्ता करविती । अस्तमानी हवन आहुती । द्विज बैसवोनी पंक्ती । भोजन करविती भिक्षान्ने ॥९९॥
दिवा भोजने सकळांसी । रात्रौ मिरविती भिकाळीसी । बोहोली बैसवोनी दत्तासी । वस्त्रअलंकारांसी अर्पिले ॥१००॥
सकळ ललनामिळोन । भिक्षा वोपिती आणोन । भवति भिक्षां देहि म्हणोन । स्वीकारी पूर्ण आदरे ॥१॥
रमा उमा सावित्री । सरस्वती आणि गायत्री । सतेज भिक्षा घेवोनी पात्री । देती सत्पात्री दान ते ॥२॥
पूर्व संपादिले आन्हिक । रजनी सारोनि उठले लोक । स्नानसंध्यादि कर्मे सकळिक । आले आवश्यक मंडपा ॥३॥
मंगल तुरे घोष होती । बटूसी स्नानसंध्या करविती । अग्नीमुखी देवोनि आहुती । आसनी प्रीती बैसविला ॥४॥
समीप येवोनी नरनारी । चरणतीर्थ घेती सत्वरी । दक्षणा देती तया करी । भिक्षा वरी मुक्तरत्ने ॥५॥
एवं दिवस संपादिला । आहेर सर्वत्री अर्पिला । पुढे आरंभोनी पळसोला । समाप्त केला तो यज्ञ ॥६॥
महा आरंभोनि समाधान । सकळा दिधले दिव्य भोजन । दक्षणा अर्पूनी द्विजगण । संतोषमान पै केला ॥७॥
परतवणी आहेर । यथायोग्य पाहोनि विचार । ज्याचा त्या ऐसा करोनि सत्कार । स्वस्थळा समग्र बोळविले ॥८॥
दुर्वास आणिद दत्तासी । नित्य लाविले वेदाभ्यासी । अतितीव्र बुद्धि उभयांसी । न देती श्रमासी पठतांते ॥९॥
अतिसुख वाटे जनका । तैशीच तोषे जननी अंबिका । म्हणती विद्याभ्यास निका । करिती अचुका दक्ष हे ॥१०॥
हे जव करिती अभ्यास । तो चंद्रहि आला मौजीस । साहित्य करोनी विशेष । वेगी तिथिस नेमीले ॥११॥
सकळ समुदाय मेळवून । मंडप उभारिले त्वरे करून । यथासांग मौजीबंधन । विधिविधान क्रमोक्त ॥१२॥
ब्राह्मणभोजन सांगोपांग । करोनि साधिला उत्तम प्रसंग । आहेर देवोनी सवेग । तोषविले सांग सर्वांसी ॥१३॥
देवोनिया लुगडी लेणी । माने सोयरे बोळवोनी । इतर कामिका पेटवणी । लाविले देवोनी संतोषे ॥१४॥
आपुलालिया स्वस्थाना । ऋषीसहित गेल्या अंगना । वर्णीत अत्रीच्या भाग्यगुणा । सुखसमाधाना पावती ॥१५॥
इकडे अत्रि आपुले कुमरांसी । वेदाभ्यास करवी नेमेसी । पार नाही तया मतीसी । अतिवेगेसी स्वीकारीत ॥१६॥
चंबुकासन्मुख लोहो येता । तो उचली जेवी क्षण लागता । तेवी चपळत्व अत्रिसुता । वेद स्वीकारिता पै होय ॥१७॥
अर्थसहित चारी वेद । नाना उपग्रंथ प्रसिद्ध । जाणते झाले शास्त्रभेद । वादसंवाद सर्वही ॥१८॥
श्रुतीचे गर्भ जाणीतले । उपनिषदे सर्व पाहिले । वेदांतज्ञानी निमग्न झाले । काव्यही पढले अनेक ॥१९॥
कर्मकांड उपासना । सर्व सिद्धांत आणिले मना । परीक्षा देवोनी विज्ञापना । अत्रिचरणा करिताती ॥२०॥
जी स्वामी कृपासागरा । विनंती दासाची अवधारा । आज्ञा द्यावी जी दातारा । पाहू धारातीर्थक्षेत्रे ॥२१॥
वेदाआज्ञा ही आहे ऐसी । ब्रह्मचर्ये जावे तीर्थाटणासी । नित्य भिक्षा शुद्ध भोजनासी । एक ठायासी नसावे ॥२२॥
नित्य असावे व्रतस्थ । वेदाचरणी असावे रत । दंडकमंडलुसंयुक्त । सदा एकांत निरामय ॥२३॥
चित्ती असावे उदास । न धरावी विषयलोभी आस । सत्संगी रंगावे मानस । भोग विलास त्यजावे ॥२४॥
न करावे कदा दुर्भाषण । न द्यावा कवणाशी शीण । समदृष्टी समसमान । भूते संपूर्ण पाहावी ॥२५॥
पादरक्षा तांबूल शय्या । अभ्यंग वर्ज ब्रह्मचर्या । मातृवत लेखाव्या स्त्रिया । तपसी काया झिजवावी ॥२६॥
नीचाची छाया पतन । रजस्वलाशब्द दर्शन । सत्कार सेवा मिष्टान्न । अग्राह्य जाण ये ठायी ॥२७॥
त्रिकाळ स्नानसंध्या करावी । शांती दृढ ह्रदयी असावी । इंद्रिये अवकर्मी रोधावी । वृत्ति शिरवावी ज्ञानगर्भी ॥२८॥
स्वल्प निवडोनि काढिले । स्वामीचरणी निवेदिले । आता पाहिजे आज्ञापिले । आनंदमेळे सेवू ऐसे ॥२९॥
ऐकोनि पुत्रांचे भाषण । मोहे सजळ झाले लोचन । सद्गद ह्रदयी होउन । काय वचन बोलती ॥३०॥
बोल बोलता तुम्ही साचे । प्रमाण जाणोनि वेदांचे । विहितकर्म ब्रह्मचर्याचे । आम्ही असाचे न म्हणू की ॥३१॥
परी तुम्ही सकुमार राजस । कोमल वय सान बाळस । केवी आज्ञा द्यावी तुम्हास । दुःख आम्हास वाटते ॥३२॥
तुम्हालागी आज्ञा देता । उदासत्व येईल चित्ता । आणि तुम्हांसही दुःखदाता । आम्हीच आता झालो की ॥३३॥
दृष्टीहुनी जावे परते । हे तो न वाटेचि आमुते । केवी आज्ञा द्यावी तुम्हाते । तीर्थपंथे जावया ॥३४॥
केवळ तुम्ही आमुचे प्राण । सोडोनि जाता आलेचि मरण । आम्हा तोषविता कोण । तुम्हांवाचून बाळका ॥३५॥
तंव दुर्वास वदे जी ताता । तुम्ही सर्व शास्त्र जाणता । जाणोनि मोही का गुंतता । आज्ञा आता देईजे ॥३६॥
जे वेदशास्त्रीचे भाषण । त्यासी समर्थे नाणिजे दूषण । करोनी दावावे आचरण । तरिच प्रमाण सर्वांसी ॥३७॥
आपण जरी नाचरावे । तरी इतरा केवी निरोपावे । जे ज्या आश्रमासी बरवे । तेचि आचरावे स्वामिया ॥३८॥
प्रथम ब्रह्मचर्य उत्तम । वेदाज्ञे ऐसे आचरावे कर्म । तेथे करू नये अधर्म । हे तो वर्म जाणता की ॥३९॥
तयास ही मर्यादा नेमिली । ती पाहिजे पूर्ण झाली । तरीच सार्थकता भली । फळा आली पुढलिया ॥१४०॥
पुढे सवेंची गृहस्थाश्रम । सकळ आश्रमामाजी उत्तम । तो तुम्ही आचरता धरोनि नेम । जाणोनि क्रम सकळही ॥४१॥
तुम्हा जैसी कर्मे घडती । ते अन्य आश्रमी न होते । अधिकाधिक त्यागवृत्ति । पुढिल्या असती दयाळ ॥४२॥
तिहीं आश्रमींची सेवा । अनेक फळसमुदावा । तुम्ही आचरता हा योग बरवा । करुणार्णवा उत्तम ॥४३॥
येथेंचि सर्व कर्मे घडती । अलभ्यलाभ हातासी येती । परि या आश्रमाची युक्ती गती । जाणोनि वर्तति ते धन्य ॥४४॥
गृहस्थाश्रमी पक्व होता । येथील त्यजोनि लाभस्वार्था । विषय भोगी वैराग्यता । असक्तता सर्वार्थी ॥४५॥
अन्नी वासना सांडावी । फली मुळी गोडी धरावी । मुदु आसने त्यजावी । आणि स्वीकारावी तृणासने ॥४६॥
देही होवोनि उदास । करावी सर्वस्वाची निरास । आप्त पुत्र गणगोतास । तिळमात्र मोहास न गुंतावे ॥४७॥
अंतर्बाह्य त्याग करून । उभयता निघावे उदास होवोन । सेविजे प्रीती वनोपवन । दंड धारण असावे ॥४८॥
नित्य पंचमहायज्ञ करावे । आलिया अभ्यागता पूजावे । वनफळेची अर्पावे । त्यावीण नसावे यज्ञादिक ॥४९॥
वेदचर्चा जपध्यान । उर्वरित काळ नामस्मरण । सक्त असावे इंद्रियदमन । हेचि अनुष्ठान तेथींचे ॥१५०॥
काही करावा योगाभ्यास । आसने चाळावी विशेष । आहारी आणावे वायूस । काही समाधीस शोधावे ॥५१॥
रजनी घालिता शय्यासन । मध्यस्थ दंडाते ठेवोन । दंड न करिता उल्लंघन । परम सावधान निजावे ॥५२॥
येरयेरा स्पर्श न व्हावा । विषय उद्गार उठो न द्यावा । विवेके करोनी काळ सारावा । हाचि बरवा वानप्रस्थ ॥५३॥
यासी जे नेमिले प्रमाण । तितुके न्यावे शेवटालागून । शेवटी कांतेसी करोनि नमन । आज्ञा मागून घेइजे ॥५४॥
आज्ञा होतांचि वेगेसी । ग्राह्य कीजे चतुर्थाश्रमासी । वेदआज्ञे विधिविधानेसी । उरकोनि संन्यासी होईजे ॥५५॥
सहांचा करावा नाश । तरीच नाव तो संन्यास । आत्मज्ञान म्हणती ज्यास । तोच अभ्यास करावा ॥५६॥
वेषे झाला नारायण । मुखी ही वदतो नारायण । तैसा अंतरी शोधी नारायण । ब्रह्मपरायण तो खरा ॥५७॥
जरी संन्यासा घेतले । वेदआज्ञे पाहिजे कर्म केले । न आचरता व्यर्थ गेले । भगवे नासिले लेवोनी ॥५८॥
तेथे असावे शुद्ध आचरण । प्रणवरूपी परायण । आत्मतत्त्वाचे विवरण । क्रम पूर्ण साधावा ॥५९॥
न करावे धातुस्पर्शन । अनिर्वाच्य न वदावे भाषण । स्त्रियादिकांपासून । कदा सेवन न घ्यावे ॥१६०॥
दुर्व्यसनासी नातळावे । रजस्वले गृही न जावे । अशौच सदन त्यजावे । आसक्त वागावे सर्वांत ॥६१॥
नीच यातीपासूनि दूर । असावे त्यजावा कारभार । राहू नये दिवस फार । व्यवहार अविचार नसावा ॥६२॥
वासना सांडावी कुडी । द्विजाश्रमी घ्यावी पुडी । पदार्थी नसावी गोडी । जगी प्रोढी न दाविजे ॥६३॥
कदा कवणा न स्पर्शावे । तीर्थाटणी सदा फिरावे । तीन रात्री न राहावे । मन करावे एकाग्र ॥६४॥
ऐसिया साधनी जो राहे । तोचि जाणा संन्यस्त होय । त्याचेची वंदावे पाय । नारायण होय या रीती ॥६५॥
हे चौथे आश्रमाचे योग । तुम्ही सर्वज्ञ जाणता चांग । यात उणे पडतां अंग । प्रायश्चित्त प्रसंग तोहि जाणा ॥६६॥
आम्ही तरी लडिवाळ अज्ञान । अधिकार नसे करावया भाषण । परि तुमच्या कृपेची शिकवण । तेचि निवेदून अर्पिली ॥६७॥
वैद्यराजे औषध दिधले । पथ्य न करिता वाया गेले । तेवी ब्रह्मचर्य आम्हां दिधले । कृती का पडले मनलोभा ॥६८॥
लोभ हेचि पापाचे मूळ । तुम्ही जाणता की सकळ । तरी होवोनिया दयाळ । आज्ञा निर्मळ देईजे ॥६९॥
अनसूया वदे लडिवाळा । आम्हां सांडोनि नवजे बाळा । तप आचरा येचि अचळा । पाहीन डोळा क्षणक्षणी ॥१७०॥
मातापित्यांहोवोनि परते । आगळी नसती क्षेत्रदैवते । आम्हांसन्निध राहोनि तपाते । सुखी आचरते होईजे ॥७१॥
आमुची आज्ञा तुम्हा प्रमाण । याहोनि थोर कोण आचरण । जाता दुःख आम्हांलागून । तेचि दूषण तुम्हांसी ॥७२॥
माता सद्गदित होऊन । मोहे पुत्र ह्रदयी धरोन । म्हणे बा रे नवजावे टाकोन । करी रुदन आक्रोशे ॥७३॥
हे देखोनि दत्तराये । दृढ धरिले मातेचे पाय । म्हणे बोलसी ते सत्य होय । विनवणी माय ऐक माझी ॥७४॥
तुम्ही सुज्ञ संपन्न जाणते । कर्मधर्माचे स्थापिते । मार्ग अज्ञाना दाविते । स्वये आचरते योग्य की ॥७५॥
तुम्ही वेदमार्गाचे रक्षक । तुम्ही शास्त्रवचनांचे पालक । नीतीकर्म प्रतिबोधक । तुम्ही साधक साधविते ॥७६॥
सारासार विचारा । जाणा तुम्ही जन्मदातारा । केवी ज्ञान आम्हा पामरा । विनंती अवधारा म्हणोनी ॥७७॥
तुम्हीच अज्ञानाचे चेतविले । वेदशास्त्रदीप प्रज्वालिले । के अंधःकार तेथे उरले । सांगा वहिले मायबापा ॥७८॥
आम्ही शुद्धबुद्ध होतो अजाती । तुम्हीच लाविली कर्मगती । त्याहीवरी बोध स्थिती । बाणविली चित्ती आमुच्या ॥७९॥
जै दीक्षा दीधली आम्हांसी । तैच आज्ञा केली निश्चयेसी । पुसता खिन्न होता मानसी । केवी तुम्हास प्रार्थावे ॥१८०॥
तुम्हांसी मान्य वेदशास्त्रवचन । आम्हांसी आपुली आज्ञा प्रमाण । देव आणि आपण । आम्हांसि भिन्न नसती की ॥८१॥
सर्वासन्निध आज्ञा केली । अवश्य आम्हांपासोनि वदविली । तै आनंदवृत्ति तुमची झाली । भिक्षा घातली माये त्वा ॥८२॥
साक्षत्वे वचन उभया झाले । वेदाभ्यासास्तव तै राहिले । आता आज्ञा मागता ये वेळे । मोही गुंतले मन तुझे ॥८३॥
श्लोक ॥ क्षणं वित्तं क्षणं चित्तं क्षणं मानवजीवितं । यमस्य करुणा नास्ति धर्मस्य त्वरिता गतिः ॥
ओवी ॥ येच विषयी विज्ञापना ॥। करितो द्यावी अवधारणा । प्रारब्धे पावलिया भाग्यधना । अचल सदना न राहे ॥८४॥
आहे जोवरी भर । तोवरीच भोगउपभोग सत्कार । दानधर्मी कीर्तीपर । लावित विचार बरा की ॥८५॥
तेवी वंचोनि संचिले । प्रारब्धयोगे नष्ट झाले । अहा म्हणे काहि न केले । व्यर्थ गेले हातीचे ॥८६॥
तेवीच हे चित्त जाणा । क्षणभरी न राहे एक भावना । किंचित होता सद्वासना । अवधी गुणा पालटे ॥८७॥
या दोही अंग चंचलपण । कधी न राहती दृढत्वे करून । संकल्पी विकल्प आणवून । दोषी गहन घालिती ॥८८॥
करुणाहीन असे यम । सदा जीवाचे लक्षी दोषवर्म । अघोर भोग भोगवी परम । नेदी विश्राम घेऊ तो ॥८९॥
यासाठी ये जीवे । सत्यमार्गेची आचरावे । उद्गारतांचि साधावे । संकल्प न्यावे शेवटा ॥१९०॥
अवधी करिता नाही प्रमाण । हानी मृत्यु विघ्न त्रय दारुण । यासाठी त्वरा करून । कार्य साधून घेइजे ॥९१॥
यातही असे विचार । सद्वासनेसी त्वरा फार । दुष्ट वासनेसी धरावा धीर । अवधी फार चुकवावे ॥९२॥
म्हणे माते परियेसी । सद्वासना झाली आम्हासी । वडिली साह्य होवोनि यासी । सिद्ध संकल्पासी नेइजे ॥९३॥
अनसूया म्हणे सुजाणा । युक्तीने ठकेच बोलसी वचना । ऐकोनि आनंद होतो मना । परी मोहबंधना काय करू ॥९४॥
हा मोहचि बाधी अनिवार । काय करू यासी मी विचार । शब्देचि न धरवे धीर । जाता प्रकार न बोलवे ॥९५॥
कधीच न गेला मजपासून । आता करू पाहता तीर्थाटण । द्वादश वर्षे भरल्यावीण । कैसे आगमन तुम्हांसी ॥९६॥
पळ युगापरी जाईल । तोवरी कैचे कंठवेल । चिंताग्नि झोंबेल प्रबल । कैचे उतरतील प्राण माझे ॥९७॥
बाळके ह्रदयी धरोन । अनसूया विव्हळ खेदे करून । अत्रीचे डळमळिले नयन । कंठ दाटोन पै आला ॥९८॥
तिघे विचारिती मनांत । हे मोहे झाले अतिग्रस्त । आपणांसी तो जाणे नेमस्त । कोण अर्थ करावा ॥९९॥
अविनाश बोले बंधूंसी । कोण युक्ति योजावी यासी । विरहसागरी बुडवोनि दोघांसी । जाता आपणांसी बरवे हो ॥२००॥
दुर्वास म्हणे न जावे । तरी वेदाज्ञे दूषण आणावे । पितृआज्ञे मिथ्या करावे । पाप भोगावे लागे की ॥१॥
यालागी तू दत्तमुर्ति । ऐसी काढी काही युक्ती । जेणे पिता माय संतोषति । आपुले होती योग पूर्ण ॥२॥
हे तूची जरी करिसी । तरीच हा योग जाईल सिद्धीसी । हे कळा इतरांपाशी । नाही मानसी पाहे तू ॥३॥
करोनि उभयांचे समाधान । आज्ञा घ्यावी आता मागेन । ऐकोनि दुर्वासाचे वचन । दत्तास मान्य झाले ते ॥४॥
मग अविनाश जोडोनि कर । दोघांसी विनवी प्रीतीकर । सदये आज्ञा द्यावी सत्वर । चिंता दूर दवडोनि ॥५॥
तुम्ही केवळ विवेकसागर । तापसवृत्तीचे सौदागर । ज्ञानकर्मांचे आगर । उदार धीर पावन ॥६॥
तुम्ही अज्ञानतिमराचे छेदक । केवळ अनन्याचे तारक । हे जाणोनि आवश्यक । चरणी मस्तक ठेविले ॥७॥
बाळा होवोनी सुप्रसन्न । आनंदे अभयाचे द्यावे दान । आवडीचे भातुके देऊन । हेतु पूर्ण करावे ॥८॥
अनसूया म्हणे तुमचे हेत । पुर्ण होतील गा सुफलित । परी माझे जेणे आनंदे चित्त । तैसा अर्थ साधावा ॥९॥
आम्हा न ठेवावे उदासीन । दुःखी न पाडावे आमुचे मन । न वाटावे गेले आपणापासून । सुखे कारण साधा मग ॥१०॥
अत्रि म्हणे हे उत्तम । याचियोगे साधा क्रम । आम्हा न दाविता विषम । मग सुफलित काम तुमचे ॥११॥
दत्त म्हणे जी करुणाकरा । जी आज्ञा केली तुम्ही दातारा । ती स्वीकारली जी योगेश्वरा । जन्मोद्धारा गुरुराया ॥१२॥
आज्ञा घ्यावी आम्हांसी । मज न विसरावे मानसी । मी नित्य येईन सेवेसी । दर्शनासी आपुलिया ॥१३॥
तयाचे परिसा प्रमाण । जन्मवेळे पावेन येवोन । आवडी घेईन दर्शन । वंदीन चरण नित्यनेमे ॥१४॥
तुम्हां उभयतांचे चरण । हेचि माझे दैवत पूर्ण । तप तीर्थ व्रत दान । सकळ येथून जाणिजे ॥१५॥
भाग्य अभाग्य चमत्कार । नाना वस्तूंचे प्रकार । विद्या गुण चातुर्य व्यवहार । तुम्हीच दातार या काजी ॥१६॥
अज्ञान ज्ञान विज्ञान भक्ति । वैराग्य आणी स्वरूपस्थिती । वैभव औदार्य चारी मुक्ती । कदा न पावती तुम्हांवीण ॥१७॥
तुम्ही जन्माचे अधिष्ठान । तुम्ही कर्ते लालनपालन । नाना वस्तु हे अलंकार भूषण । तुम्हांपासून प्राप्त की ॥१८॥
तुम्हांवाचोनि कोण थोर । मज तो न दिसेची निर्धार । तुम्हांपासोनि सर्व विस्तार । आकार विकार मात्रादि ॥१९॥
असो मातापित्यांहोनि आगळे । दैवत म्हणती ते आंधळे । जयापासोनि ब्रह्मांड झाले । तया विसरले मुर्ख ते ॥२०॥
मातापितयांची सेवा । न करितां पूजिती देवा । काय म्हणावे त्या गाढवा । प्रत्यक्ष देवा विसरले ॥२१॥
सकळ दैवतांमाजी श्रेष्ठ । मातापिता असती वरिष्ठ । त्यांचे सेवेचे मानी कष्ट । अति पापिष्ट अघोरी ते ॥२२॥
मातापितयांच्यावचना । अव्हेरोनी करि तीर्थाटना । अथवा करी जपअनुष्ठाना । व्यर्थ जाणा ते होय ॥२३॥
मातापितयांचा राखी संतोष । तेथेचि किर्ती आणि यश । सर्व फळे फळती त्यास । मान्य सकळांस होय तो ॥२४॥
येचिविषयी जननिये । आम्हांसी तारक तुमचे पाय । हेचि नासितील अपाय । करितील उपाय निष्ठाबळे ॥२५॥
तुमचिया दर्शनावांचून । कधीही मी न राहे जाण । यासाठी वेळ नेमून । तुम्हांलागुन निवेदिली ॥२६॥
आता करावे स्वस्थ चित्त । माझे वचन हे पादांकित । कदा न होयची असत्य । भेटी नित्य घेऊ आम्ही ॥२७॥
श्रोती ऐकिजे सावधान । ते अद्यापि चालविती नेमिले वचन । यात्रा करोनि घ्यावया दर्शन । नित्य आगमन असे तया ॥२८॥
ऐकोनि बाळकाचे वचन । अत्रिअनसूया आनंदघन । तिघांसी देती आलिंगन । ह्रदयी धरून चुंबितो ॥२९॥
वारे तुम्ही कुलोद्धारक । जन्मलांती तिमिरछेदक । पापदग्धा पावक । सुखदायक आम्हांसी ॥३०॥
तुम्ही अंशधारी ईश्वर । तिघा देवांचे अवतार । भावभक्ती योगेश्वर । झाला निर्धार आमुचे ॥३१॥
तुमचेनि योग्यता आम्हांसी । धन्य जन्मोनि केले जगतीसी । लीला दावोनि सकळांसी । देवमानवांसी तोषविले ॥३२॥
तरी आता तीर्थमिषे करून । करा अनन्यासी पावन । जगतीचे करावया उद्धरण अवतार पूर्ण तुमचे ॥३३॥
तव अत्रि म्हणे गा सुकुमारा । तुमचेनी होय धन्य धरा । आनंदयुक्ते विचरा । ध्वज उभारा कीर्तीचा ॥३४॥
परिसोनि वडिलांचे वचन । तात्काळ वंदिले उभयांचे चरण । येरु देती आशीर्वचन । चिरंजीव कल्याण म्हणोनि ॥३५॥
ही कल्याणात्मक किर्ती । ज्याचा तोचि वदवी निश्चित्ती । आवडी अवधारिले संती । परम प्रीती करोनिया ॥३६॥
पुढील कथा अत्यंत पावन । तिघे जातील यात्रेलागून । ते आदरे श्रोते कीजे श्रवण । पापमोचन होय पै ॥३७॥
दत्त कथा हे विशाल तारू । करावया सिद्ध भव पारू । चला बैसा न करा अवसरू । अति सत्वरू लाग वेगे ॥३८॥
भवसागरीचा नावाडा । दत्तदिगंबर चोखडा । नेल उतरोनी पैलथडा । आवडी जोडा पाय त्याच ॥३९॥
दत्त सदय उदार । उद्धरणार्थ धरिला अवतार । भाविक मुमुक्षू जे नर । कृपाकर त्या देतो ॥२४०॥
दत्त व्यापक सवा ठायीं । संतसमाजी वसतो पाही । संतची जाणती लवलाही । दत्तपायी वास त्याचा ॥४१॥
म्हणोनिया संतसेवनी । अनंतसुत राते अनुदिनी । संतपादुका मस्तकी वाहोनी । रुळे चरणी रज सेवी ॥४२॥
इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । श्रीनारदपुराणींचे संमत । परिसोत भाविक संतमहंत । एकादशोऽध्यायार्थ गोड हा ॥२४३॥
॥इति एकादशोध्यायः समाप्त ॥