श्री दत्तप्रबोध - अध्याय सहावा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.


॥श्रीगणेशाय नमः ॥ ॐनमो सद्‌गुरुदत्ताय नमः ॥ सद्‌गुरुअनंताय नमः ॥

जयजय चित्घनविलासिया । अविनाशरुपा दत्तात्रया । गुणातीत गुणवर्या । तव पायां प्रणम्य ॥१॥

तूं निर्विकार निरंजन । तूं अखिल ब्रह्मसनातन । व्याप्त अव्याप्ता होवोनि भिन्न । चित्तचैतन्य चालक तूं ॥२॥

मायातीता सर्वव्यापका । त्रिगुणरुपा सुखदायका । भवभ्रांतिताप छेदका । अज्ञाननाशका दयाळा ॥३॥

तूं निर्गुण निराकार । सदय कृपाळू उदार । शरणांगतासाठीं साकार । होवोनि अवतार धरिता तूं ॥४॥

होसी या जीवाचें जीवन । देखोनि त्याची गति अनन्य । भावनेऐसा होऊन । धरिसी सगुण रुप तूं ॥५॥

अर्थाऐसा होसी । मनोरथाते पुरविसी । आवडीचे भातुके देसी । कृपें पाळिसी निजदासा ॥६॥

तुम्ही होवोनि कृपावंत । प्रीती बोधिला अनंतसुत । म्हणोनि हा दत्तप्रबोधग्रंथ । नाम विख्यात चालविसी ॥७॥

तुझिया कृपेचें महिमान । कोण तें करुं शके वर्णन । जीव मूढमति अज्ञान । कैचें ज्ञान तयासी ॥८॥

परि तूं जरी हृदयीं प्रगटसी । आभकरु माथा देसी । रसना बुद्धी चेतविसी । पाटव्य देसी सर्वांगा ॥९॥

तरीच सुरस होईल कीर्तन । श्रवण करतील सज्जन । श्रोतियांचें उल्हासेल मन । कृपा कारण मुख्य तुझी ॥१०॥

पांगुळ गिरी ओलंगति । आंधळे रत्‍न परीक्षिति । मुके गिरवाण बोलती । कृपें निश्चिती तूंझिया ॥११॥

प्रत्यक्ष सकळ मज जाणती । अज्ञान हीन मलीन मती । बोलता नयेची धड गती । कैचा ग्रंथीं विचार या ॥१२॥

सत्यच मी अनाथ असतां । जाणपणा कांहीं नसतां । सदयत्वें त्वां करीं धरोनि श्रीदत्ता । वर्णविसी कथा तुझा तूंचि ॥१३॥

गतकथाध्यायीं निरुपिलें अंतीं । वंदोनि अत्रि अनसूयासती । नारद पुसोनी स्वर्गा जाती । हे संत श्रोते अवधारिलें ॥१४॥

आतां होऊनि सावधान । ग्रंथश्रवणीं दीजे मन । वंदोनिया श्रोते सज्जन । ग्रंथ निरुपण करीतसे ॥१५॥

नारद स्वर्गाप्रती गेला । जावोनी मातेसी भेटला । वृत्तांत निवेदिता झाला । तोचि परिसिला पाहिजे ॥१६॥

रमा उमा सावित्री वेगेसी । सादर बैसल्या श्रवणासी । नारद करी निरुपणासी । उल्लास मानसीं तिघींच्या ॥१७॥

नारद म्हणे ऐका माते । तुम्हीं पाठविलें आम्हांतें । आज्ञा वंदोनि शिरसा चलातें । जावोनि त्यातें नमियेलें ॥१८॥

उभयतां देखोनि आनंदघन । मीं नम्रत्वें चि करी भाषण । जेणें न दुखवे तयांचें मन । तेंची कारण अवलंबिलें ॥१९॥

ते उभयतां पुण्यराशी । आदरें करिती मग अर्चनासी । विनय होऊनि अमृताऐसी । सप्रेम वचनासी बोलती ॥२०॥

म्हणती बहुत दिवसां मागुता आला । आजवरी कोठें काळ क्रमिला । काय नवलावो देखिला । निवेदी कुशल सकळही ॥२१॥

शांत देखोनि उभयतां । पाताळभुवनींची निवेदी वार्तां । मग म्हणे गेलों स्वर्गपंथा । पदें विलोकितां पै जालो ॥२२॥

तंव अनसूया म्हणे मुनी । स्वर्गवार्तां सांग मजलागुनी । कवण कैसे वर्तती कवणे स्थानीं । सांगे निवडुनी ऋषिवर्या ॥२३॥

तिचा देखोनि प्रश्नादर । मीं निरुपणी झालों सादर । निवडोनिया सारासार । कथितों साग्र ऐकाते ॥२४॥

इंद्रपद अमरावती । तेथें रत्‍नखचित मंदिरें असतीं । सकळ देवलोकींची वस्ती । पान करिती अमृत ॥२५॥

तेथें वसती देवांगना । तिलोत्तमादि अप्सरा नाना । स्वरुपें लावण्यचतुर सुजाणा । विमानें वाहनें सकळांसी ॥२६॥

मुख्य अधिपती सहस्त्रनयन । राणी इंद्रायणी शोभायमान । सेवे तिष्ठती बंदीजन । भाट गुण वाखाणिती ॥२७॥

मणीमय सभा विराजित । इंद्र सिंहासनीं मिरवत । छत्र चामरें लखलखीत पुढें नाचत अप्सरा ॥२८॥

सव्य सिंहासनावरुती । देवगुरु तो बृहस्पती । गणगंधर्व सभे असती । किन्नर गाती अप्सरा ॥२९॥

तेथे चौंदंती शुभ्र ऐरावत । वनें उपवनें विख्यात । नंदनवन अत्याद्‌भुत । सदा वसंत वास करी ॥३०॥

नळ कुबेर यक्ष । आपुलाले काजीं दक्ष । इंद्रपदीं ठेवूंनि लक्ष । आज्ञा दक्ष राहती ॥३१॥

मंगल तुरांचा गजर । रात्रंदिन होतो अपार । परमानंद मोहोत्सव थोर । अजरामर नांदती ॥३२॥

प्रांची हें इंद्राचें स्थान । अग्नि वास्तव्व अन्गिकोन । दक्षिण दिशेस यमस्थान । शोभायमान तेही असे ॥३३॥

महा विशाळ ती यमपुरी । ती पातकीं लोकांची दंडदरी । नर्ककूप बहुतापरी । जीव अघोरीं टाकिती ॥३४॥

कुंभीपाक असिपत्र । तप्त स्तंभ नग्नशस्त्र । सांडस घाणा काग विचित्र । दंड स्वतंत्र यमकरीं ॥३५॥

जे अविवेकी पातकी दुर्जन । असत्यवादी कुटिल मलीन । जारकर्मी हिंसक पूर्ण । तयासी पतन ते ठायीं ॥३६॥

मात्रागमनी सुरापानीं । भक्षाभक्ष भोजनीं । नाना हत्यारीं दूषणीं । पडे पतनीं ते ठायीं ॥३७॥

पीडक दाहक वाटपाडे । कुबुद्धी जे कुडे पावडे । निंदक कपटी विघडे । तोचि पडे ते ठायीं ॥३८॥

ऐसा तो यमधर्मराज । न्यायनीति करी नेमिलें काज । परि या जीवासी नाहीं लाज । आपुलें गुज नोळखती ॥३९॥

दोष नाहीं यमपदा । जीवची आचरती अपराधा । कर्मे करोनि पावती बाधा । होतो चेंदा दंडयोगें ॥४०॥

यम आपुले स्वस्थानीं । नांदतो माते आनंदभुवनीं । जे रहाणार नैऋत्यकोनीं । ते सुखें सदनीं नांदती ॥४१॥

प्रतीच्यदिशे तो वरुण । सभाग्य सुशील नांदे पूर्ण । वायव्यकोनीं वायू दारुण । प्रभंजन तो नांदे ॥४२॥

उत्तरे वसती सोम । तेही कल्याण क्षेम । ईशान्य सर्वांत उत्तम । उरला क्रम सांगतों ॥४३॥

सत्य वैकुंठ कैलास । हे तो सर्वांहून विशेष । येथील रचनुका सुरस । तेही तुम्हांस निवेदितों ॥४४॥

हिरे स्फटिक पुष्कर । रजत कोणी धवलागर । परम रमणीय शिखर । अति सुंदर पताका ॥४५॥

शुभ्र आंगण काचबंदी । ऐरावतातुल्य शुभ्र नंदी । तेथें आधी आणि व्याधी । कांहीं उपाधी नसेची ॥४६॥

शुभ्र सिंहासनीं कर्पूरगौर । शुभ्र अंगीं जडिले फणिवर । शुभ्र भस्म चर्चीत सुंदर । दिगांबर बैसला ॥४७॥

रुंडमाळा रुद्राक्ष धारण । शंख डमरुचें वादन । शृंगी पुंगी नादपूर्ण । व्याघ्रासन बैसावया ॥४८॥

त्रिशूल पाशुपत कपोल । करीं व्याळ कर्णीं देती डोल । जटाजुटीं गंगा निर्मळ । चंद्र शीतळ भाळीं तो ॥४९॥

दशभुज पंचवदन । गजांबराचें प्रावर्ण । हिमनगजा वामांकीं धारण । शोभायमान लावण्य तें ॥५०॥

धगधगींत तृतीय नेत्रीं ज्वाला । सभोंवतीं भुतांचा मेळा । साठीं सहस्त्र गणमेळा । कैलास ढवळा घवघवीत ॥५१॥

गणपति षडानन वीरभद्र । हे शिवाचे मुख्य कुमर । कात्यायनीच्या-मुंडाचे भार । जोडिती कर उमेसी ॥५२॥

अष्ट भैरंव पुढें नाचती । ध्वज त्रिशुळेसी मिरवती । ऐसे या संभारें उमापती । राज्य करती कैलासीं ॥५३॥

कैलासाभोंवतीं वनें । अमृतफळाचीं दाट सघणें । नाना वनस्पति बिल्वसुमनें । उदकस्थानें अनुपम्य ॥५४॥

देव अमर दानव । ऋषि तुंबरगण गंधर्व । यक्ष चारणादि सर्व । नित्य नेम दर्शना येती ॥५५॥

सकळ जयजयकारें गर्जती । कोणी स्तविती कोणी ध्याती । कोणी गायनें तोषविती । पुष्पें वर्षिती सुरवर ॥५६॥

दिव्य सुंदर हें कैलासभुवन । येथें शिवगौरी वसती आपण । आतां सत्यलोकीचें निरोपण । तेंही सावधान परिसावें ॥५७॥

काय म्हणोनि म्हणती सत्यलोक । असत्य क्रिया नाहींच देख । सत्य भाषण कर्म चोख । आचार पाक वर्तती ॥५८॥

म्हणोनि सत्यलोक त्यातें म्हणती । तेथें चतुरानन । अधिपति । वेदरुप ब्रह्म जाणति । सावित्री सती अंगना ॥५९॥

प्रजा उत्पत्तीस कारण । मुख्यत्वें हा चतुरानन । हे ब्रह्मांडरचना संपूर्ण । कर्त्ती जाण तो एक ॥६०॥

तया सत्यलोक परी । रचनाजडीत मणीमयपुरीं । रत्‍नकोंदणीं नाना परी । पाच धवलारी नीलबंद ॥६१॥

जडित मणिकाच्या चवर्‍या झळकती । कनक कळस झल्लाळती । चित्रें रेखिलीं नानाकृती । पताका तळपती अपार ॥६२॥

होती वाद्यांचे घोष । उद्यानें शोभलीं विशेष । घमघमीत उठती सुवास । आसपास कोंदाटे ॥६३॥

अमृतकुंडें भरलीं अपार । कामधेनु स्त्रवती निरंतर । दुःख आणि दारिद्रय । नसे अणुमात्र ते ठायीं ॥६४॥

रंभा उर्वशी येती । नृत्यकला नाना दाविती । भाट बंदीजन गाती । यश वर्णिती विधातियाचें ॥६५॥

आतां वैकुंठीचें वर्णन । जें अनुपम्य सर्वांहून । पाहतां तेथींचें तेज गहन । वर्णिता मौन वेद श्रुति ॥६६॥

परि कांहीं तये वेळे । पाहिजे तूंतें निवेदिलें । यदर्थीं त्वाही श्रवण दिले । पाहिजे भले श्रवणार्थी ॥६७॥

शुद्ध तगटवर्ण अंगण । माजी पांच हिरे नीलजडित कोंदण । पुष्करस्तंभ विराज गहन । उथाले पूर्ण हरियाची ॥६८॥

माणिकांचीं तुळवटें । पाच दांडे अत्यंत चोखटे । कीलचा जडल्या तेज गोमटे । रत्‍नीं बरवंटे झल्लाळ ॥६९॥

शुद्ध हिरियाच्या भिंती । वरी चित्रें जडित विराजती । पाच लताफळें डोलती । पक्षी बोलती चित्रींचे ॥७०॥

अति विशाल तीं दालनें । मदलसा शोभती विराजमाने । उंच गोपुरें सतेजपणें । सप्तावर्णें वेष्टित ॥७१॥

चिंतामणीचीं धवलारे । कामधेनूचीं खिल्लारें । वनें कल्पतरुचीं अपारें । शोभतीं साजिरें मनोरम ॥७२॥

कोटी विद्युल्लता झळकती । ऐसे ध्वज तेथें तळपती । कोटी सूर्याचे अंशुमाले लोपती । अधिक दीप्ती तेथींची ॥७३॥

मुख्य प्रभूचें वास्तव्यस्थान । तेथें हेममय सभासिंहासन । नाना रत्‍नीं जडीत सधन । विराजमान सहस्त्र दलें ॥७४॥

वरीं शोभें श्यामसुंदर मनोहर । रमा चरणसेवेसीं सादर । मस्तकीं शोभे फणीवर । छत्रें अपार विराजती ॥७५॥

जय विजय द्वारपाळ । उभें तिष्ठती जोडोनि कमळ । येती दर्शना लोकपाळ । दुरोनी सकळ तिष्ठती ॥७६॥

हरिवेष्टित वैष्णव वीर । गायन करिती विद्याधर । सनक सनंदन सनत्कुमार । नारद तुंबर यश गाती ॥७७॥

मूर्तिमंत वेदश्रुती । पवाडे हरीचे गर्जती । शास्त्रें कुंठित राहती । पुराणें करिती भाटीव ॥७८॥

तेथील चतुर्भुज अवघे नर । नारी पद्मिणी नागर । हरिभजनीं सदा तत्पर । जयजयकार करिताती ॥७९॥

सिद्धी रिद्धी बुद्धि कामारी । सेवें तिष्ठती महाद्वारीं । धनकोश अगणित भांडारीं । मुक्ती चारी वोळंगती ॥८०॥

दश वाद्यांचें गजर । दहस्थानीं होती निरंतर । एकादशाचा विचार । तो घोष थोर वेगळा ॥८१॥

तेची न पवेची इतरा स्थान । चतुर पविती सुजाण । भोळे भाविक अनन्य । तेची लीन ते ठाईं ॥८२॥

तेथें क्षुधा तृषा आणि आळस । अणुमात्र नाहीं तया वास । नाहींच तेथें द्वंद्व दोष । आशापाशरहित ते ॥८३॥

ज्ञान विज्ञान अज्ञान । तिहीं रहीत वेगळें लक्षण । रज तम सत्त्व जाण । त्याहूनि भिन्न तें स्थळ ॥८४॥

कैचे पांच कैचे पंचवीस । कैचे तीस कैचे पस्तीस । विरोनि गेले छत्तीस । ते तो अविनाश वेगळेची ॥८५॥

पांच पांच दहा । आणिकही पृथक दहा । इतुक्यांचाही समुदाहा । तो एक पहा एकत्वें ॥८६॥

एकापासोनि अनेक झाले । अनेक एकींच ते संपले । अनंत गुणे व्यापिले । पूर्ण दाटले पूर्णत्वें ॥८७॥

या अनंतब्रह्मांडीचें वैभव । तो हा वैकुंठीं रमाधव । नाना चरित्रें लाघव । अति अपूर्व तयाचीं ॥८८॥

स्वर्ग मृत्यु पाताळ । इत्यादिकांचें हाचि मूळ । नाना विचित्र कौतुक खेळ । दाविता प्रबळ हाचि पैं ॥८९॥

वैकुंठ सत्य कैलास । तिन्ही समसाम्य असती कळस । नित्य दर्शनीं उल्हास । होतो आम्हांस अनसूये ॥९०॥

परी प्रस्तुत गेलों दर्शना । तों उदास देखिलें तया स्थाना । कैलासीं केली विचारणा । शून्य स्थाना पाहोनी ॥९१॥

तव वदे नंदिकेश्वर । बहुत दिवस गेला ईश्वर । शोध न लागेच निर्धार । चिंतातुर जगदंबा ॥९२॥

ऐसिया परिकथोनि युक्ति । तोषविली अनसूयासतीं । तंव ती पुसे मागुती । आले कीं नसती ईश्वर ॥९३॥

ऐकोनि अनसूयेच्या प्रश्नासी । विचार केला निजमानसीं । जेणें कार्य साधे निश्चयेसी । दया सतीसी उपजे ॥९४॥

ऐशा युक्तीचें निरोपण । लाघवयुक्त केलें भाषण । जितकें कृत्य झालें पूर्ण । तें म्यां कथन पैं केलें ॥९५॥

म्यां तुम्हातें शासिलें । म्हणे जें का दुःख भोगिलें । शोध करावया मज धाडिलें । ग्लांति गाइलें सदयार्थ ॥९६॥

करुणावचन ऐकोनिया । कृपें द्रवली अनसूया । तात्काळ बाळे आणोनिया । ठेविली ठाया मजपुढें ॥९७॥

मग मी पाहें बाळकांसी । आश्चर्य करिता झालों मानसीं । परि न येति ओळखिसी । आणि अनसूयेसि जावळे ॥९८॥

म्हणे धन्य धन्य तुमची कुशी । हीं बाळें झालीं तेजोराशी । ऐकोनि हास्य आलें अनसूयेसी । म्हणे नारदा तुम्हांसि काय झालें ॥९९॥

माते म्यां तों चिन्ह ओळखिलें । परी तिजमुखीं पाहिजे वदविलें । यदर्थीं तंये वेळें । भाव बोले वेगळा ॥१००॥

मग अनसूया बोले वचन । ज्यांचें आपण केलें कथन । तेचि हे बाळ ठेविले करोन । ऐका कारण सांगतें ॥१॥

तिघेही विप्रवेषा धरिती । येऊनि नग्नदान मातें मागती । मंदिरीं आणोनि तयांप्रति । तयां निगुतीं पुसिलें ॥२॥

ते म्हणती कीर्ती ऐकोन । आलो माते धावत दुरोन । क्षुधानळें पीडलों जाण । करवीं भोजन इच्छित ॥३॥

आंगवण द्यावया नसतां । नकार वचनें तरी बोलेन आतां । करोनिया सत्वघाता । आणिका पंथा पैं जाऊं ॥४॥

जैं अत्री नसतां मंदिरीं । मज गांठिलें एकांत अवसरीं । विपरीत देखोनि झडकरी । पादोदक करीं घेतलें ॥५॥

अन्य मार्गातें नातळता । भोजनार्थ दया उपजली चित्ता । जीवीं आठवोनि प्राणनाथा । तीर्थ माथां सिंचिलें ॥६॥

तीं बाळकें झालीं तात्काळ । क्षुधेनें करिती हळकल्लोळ । मग नग्न भिक्षा उतावेळ । देवोनि शीतळ पैं केलें ॥७॥

न्हाणोनि घातलें पालखी । पहुडते झाले यथासुखीं । कुरळ सावरोनि विलोकीं । मुख मृगांकी वेळोवेळां ॥८॥

तंव स्वामी येतां आश्रमासी । निवेदिलें वृत्त पायांपासीं । मग ते जावोनि पालखापासीं । ओळखोनि मजसी सांगती ॥९॥

हे स्वर्गींचे मुख्याधिपती । दैवयोगें आले हातीं । रक्षी जागोनि दिनरातीं । परम प्रीतीं पाळावे ॥११०॥

नारदा हे तुम्हांसी । कैसे न आले ओळखीसी । असो त्यांचिया कांतेसी । सांगा वेगेंसी जाऊन ॥११॥

सामर्थ्य असेल तयां अंगीं । तरी दिव्य करोनि नेतील वेगीं । तुम्ही ग्लांति निवेदिली प्रसंगीं । कीं त्या कुरंगी विव्हळ ॥१२॥

तो ऐकोनि जिव्हाळा । मज अत्यंत उपजला कळवळा । तरी जावोनि याच वेळा । निवेदी सकळां वृत्त ऐसें ॥१३॥

ऐसें निघतांचि अभयदान । प्रेमें अनसूयेस केलें वंदन । निघता झालों आज्ञा घेऊन । मागुती वचन बोले सती ॥१४॥

तिघीजणींसी हें कळवावें । येत असतां धाडोनि द्यावें । आपुलाले ओळखून घ्यावे । हेंही स्वभावें निरोपी ॥१५॥

अवश्य म्हणोनि येथें आलों । तुम्हांलागीं निवेदिता झालों । अनसूये कवेंतूनि वांचलों । म्हणोनि भेटलों तयांसी ॥१६॥

तुमचे सत्य तेथें पती । ते बाळरुपें असती । आतां आपण त्वरितगती । सिंहाचळपर्वतीं जाईजे ॥१७॥

ऐकोनि नारदाचें वचन । तिघी झाल्या आनंदघन । परि जावयालागून । भयाभीत मन होतसे ॥१८॥

कवणियायोगें कैसें जावें । काय तियेतें म्हणावें । कोण कर्तृत्व दावावें । पति आणावे कवणे रीतीं ॥१९॥

नारद म्हणे काय पुसतां । म्यां तव आणिली शुद्धिवार्ता । वागेल तुमचिया चित्ता । तैसें आतां करावें ॥१२०॥

जैसी तुम्हां असेल अंगवण । तैसेंच करा पुढील कारण । अनसूयेचें महिमान । तुम्हां श्रवण झालें कीं ॥२१॥

तृप्त तुमचे श्रवण झाले । परि नेत्र असती भुकेले । यातें स्थळ पाहिजे दाविलें । आणि ती बोले अनसूया ॥२२॥

आतां न लावा जी उशीर । पति जावोनि आणावे सत्वर । त्यांसी झाले दिवस फार । मिथ्या विचार न करावा ॥२३॥

या परी नारदें सांगोन । वंदिले मातेचे चरण । आज्ञा द्या म्हणे मजलागोन । करी भ्रमण स्वइच्छें ॥२४॥

तिघी म्लानवदनें बोलती । नारदा हे कोण तुझी रीती । आम्हांसवें घेवोनि त्वरित गती । सिंहाचळाप्रती चलावें ॥२५॥

मध्यंतरीं सोडोनि देणें । हीं काय उत्तमाचीं लक्षणें । पैलतीरा नौका लावणें । तारुपणें तो धन्य ॥२६॥

नारदा तूं धन्वंतरी । दुरी केलीसे चिंतालहरी । रसायन घालोनि कर्णरंध्रीं । सजीव निर्धारीं । आम्हां केळें ॥२७॥

संकटकाळींचा सारथी । नारदा होसी आम्हां प्रती । नको टाकूं गा मध्यपंथीं । काकुलती आलों कीं ॥२८॥

ऐकोनिया मातेचिया बोला । नारद म्हणे बरें चला । सेवोनिया शेषाचला । तया आश्रमाला दावीन ॥२९॥

असो सवें घेऊनि तिघींसी । नारद चालिला वेगेंसी । दुरोनि दावी सिंहाचलासी । म्हणे आश्रमासी पाहा बरें ॥१३०॥

पैल दिसती शिखरें । अत्यंत वृक्षीं निबिड मनोहरें । त्यांत दक्षिणेचें विलाकोनि बरें । माते संचरे त्यामाजीं ॥३१॥

तंव त्या तिघी संवादती । नारदा आम्हांसी वाटती भीती । तुवां सवें येवोनि निश्चिती । करवी प्रीती तिज आम्हां ॥३२॥

नारद म्हणे मजलागून । यावया तेथें नाहीं कारण । आतां त्वरें जाइजे आपण । घेइजे दर्शन अनसूयेचें ॥३३॥

मी गुप्त राहोनि येथें । विलोकीन जावें तुम्हांतें । प्रसन्न करोनि अनसूयेतें । साधा कार्यातें आपुल्या ॥३४॥

ऐकोनि नारदाच्या उत्तरा । तिघी पडल्या तेव्हां विचारा । कोण युक्ति योजावी सुंदरा । प्राणेश्वरा आणावया ॥३५॥

सावित्री म्हणे ऐका बाई । आपण जावोनि तये ठाईं । वस्तु मागूं लवलाही । भय काय तियेचें ॥३६॥

आपुलें आपण मागूं घेतां । केवीं अनसूया करील सत्ता । धरोनी मनीं निर्भयता । चला आतां लवकरी ॥३७॥

तंव अंबा बोले वचन । बरवे निवेदिलें शहाणपण । उद्धटपणें मागतां पूर्ण । कोपायमान होईल कीं ॥३८॥

तिचे मनीं रोश येतां । पतिऐसी भोगवील व्यथा । मागुतीं जावया स्वपदपंथा । ठाव उरता दिसेना ॥३९॥

रमा म्हणे हें तो खरें । तरी काय जावें माघारें । कार्य न साधतां पाहावीं घरें । हें तो बरें दिसेना ॥१४०॥

कांहीं सबळ योजावी युक्ती । जेणें प्राप्त होतील पती । तरीच सार्थक निश्चिती । यश कीर्ति जोडितां ॥४१॥

सावित्री म्हणे वृथाची कल्पना । आपुले ठाईं करितां नाना । आपुला अधिकार आपणा । नये ध्यानां अद्यापी ॥४२॥

पैल अत्री आपुला कुमर । अनसूया प्रत्यक्ष स्नुषा सुंदर । आपणां श्वसेचा अधिकार । कासया विचार या काजीं ॥४३॥

आपुली आज्ञा प्रमाण त्यांसी । सत्ता करुं पाहिजे ऐसी । चला गे आणूं भ्रतारांसी । वृथाचि तिशीं काय भीतां ॥४४॥

ऐकोनि अपर्णा गद्गदा हासे । सावित्री तूतें लागलें पिसें । विचार काढोनि भलतेसे । बोल कैसे बोलसि ॥४५॥

जैं नारदें केलें वर्णन । विशेष स्थापिलें अनसूयेलागून । इतर लेखिल्या सर्व हीन । वाटला शीण कां तेव्हां ॥४६॥

तैं अनसूया स्नुषाच होती । हर्ष व्हावा ऐकोनि कीर्ती । तेथें आपणा उपजला क्रोध चित्तीं । सत्त्वघातीं प्रवर्तलों ॥४७॥

आपण केवढें विरुद्ध केलें । व्रतनाशना कपट रचिलें । पती बोधोनि धाडिलें । व्यसनीं पाडिले आपण कीं ॥४८॥

ते लडिवाळ मानतों आपण । तरी कां लागतें एवढे दूषण । अपराधावरी शिरजोरपण । कोण लक्षण म्हणावें हें ॥४९॥

श्रेष्ठपण येथें उरलें नाहीं । करुं नका भलतेंचि कांहीं । पति ऐसे अपाईं । गुंताल बाई यायोगें ॥१५०॥

रमा म्हणे होसी कुशळ । उमे तुझे हे सत्यबोल । ही रजोगुणाची कोकिळ । काढी कळ अधिकची ॥५१॥

तुझी चातुर्यगति विशेष । बोलसी तरी अमृतरस । ऐकतां आनंदे मम मानस । अती उल्लास जीवातें ॥५२॥

तरी हिमनगकन्यके हरप्रिये । प्रौढ युक्ती काढी सये । जेंणें पतिप्राप्‍ती होय । अनसूया सदये देईल ॥५३॥

गुंती न पडे आपणासी । पावूं जेणें पतिचरणांसी । आनंदें जाऊं स्वपदासीं । चतुर गतीसी योजी ऐसें ॥५४॥

तंव शिवांका सनवासिनी । बोलती झाली ते भवानी । बाई विधी निर्माण झाला जेथूनी । त्या मूळ्स्थानीं पुसावें ॥५५॥

रमा म्हणे उत्तम । आपुला मुग्धची असों द्या भ्रम । जेथोनि प्रगटला उत्तम । त्या बुद्धीक्रम साधावा ॥५६॥

आतां अभिमानातें सांडावें । अनन्य नारदासी स्तवावें । तरीच कार्य साधेल बरवें । येर्‍हवीं नागवे आपणातें ॥५७॥

हें नारद ऐकोनि वचन । म्हणे होऊं पाहती मर्यादा उल्लंघन । मातेहातीं करवितां स्तनपान । पावे पतन पुत्र कीं ॥५८॥

मग आपणचि पुढतीं जाला । म्हणे कां हो अद्यापि वेळ लाविला । कोणता तुम्हां विचार पडिला । तोचि मजला निवेदा ॥५९॥

अपर्णा म्हणे सर्व जाणसी । खेळ खेळोनि वेगळा राहसी । पुरे लीला साधवी कार्यासी । युक्ति वेगेसीं सांगोनी ॥१६०॥

नारद म्हणे गेले पती । तुम्हीं जावें तेचि पंथीं । यावीण दुसरी युक्ती । येथें कल्पांती साधेना ॥६१॥

उगेंच धरोनिया दीनपण । जावें तेथें मौंन धरोन । प्रथम न करा भाषण । करा अवलोकन अनसूया ॥६२॥

ती तुम्हाते पाहतां नयनीं । कैसी आचरेल पहा रहणी । जैं म्हणेल कोण इच्छा मनीं । ते मजलागूनी सांगिजे ॥६३॥

तैं बोलावें तुम्ही उतर । दे आमुचे आम्हांसी भ्रतार । सर्व पावले यांत सत्कार । होसी उदार तूं देवी ॥६४॥

पुढें चमत्कार काय होती । तेही तुमचे दृष्टीस येती । लाभ होईल बरवे रीतीं । प्रगटेन पुढतीं मी तेथें ॥६५॥

आतां आपण करोनि त्वरा । जावें अनसूयेचिया मंदिरा । अवश्य म्हणोनि त्या सुंदरा । वेष दुसरा धरियेला ॥६६॥

दीनवेष धरोनि ब्राह्मणी । गेल्या तेव्हां अत्रीसदनीं । अनसूया सनिद्ध लक्षूनी । उभ्या जावोनी ठाकल्या ॥६७॥

देखोनिया सुवासनींसी । अनसूया धावोनि लागे चरणांसी । येरी देती आशीर्वादासी । अखंड सौभाग्यासी भोगी तूं ॥६८॥

येरी पूजाद्रव्यातें आणून । परम आदरें केलें पूजन । प्रार्थोनि बोले मधुर वचन । येणें कोठोन तुमचें ॥६९॥

काय इच्छा धरोनि मानसीं । श्रमोंनि आलेंति या ठायासीं । कांहीं आज्ञा करा वेगेसी । सेवेसी दासी उभी असें ॥१७०॥

धन्य आमुचा भाग्योदय । तुमचे देखिले आम्हीं पाय । दर्शनेंचि निवटले अपाय । सेवे काय सादरुं ॥७१॥

कोण पुण्य फळासि आलें । तेणेंचि देखिलीं पाउलें । पाहिजे कांहीं आज्ञापिलें । केंवी उगलें राहतां ॥७२॥

तुम्ही केवळ जगदंबा ईश्वरी । सुप्रसन्न कृपा केली आम्हांवरी । आमुच्या भाग्या झाली उजरी । दर्शनें अंतरीं निवविलें ॥७३॥

म्हणोनि विनविते कर जोडून । आम्हां अनाथा करा पावन । वेगीं सांडोनिया मौन । आज्ञापून सेवा घ्यावी ॥७४॥

ऐकोनि बोलाची मधुरता । परीक्षोनि शब्दाची चतुरता । सेवाभाव ओळखोनि पुरता । म्हणे हे पतिव्रता सत्य ॥७५॥

सत्यचि नारदें कथिलें । त्याहूनि येथें असे आगळें । व्यर्थचि अभिमान आम्हीं केले । शेवटा गेले नाहीं कीं ॥७६॥

नम्रता सर्वांहुनी थोर । सकळ शास्त्राहुनी अधिक मार । त्याची योग्यता सर्वांवर । मोही अंतर सकळांचें ॥७७॥

असो आतां येच वेळीं । मागोनि घ्यावें हतोफळी । तिघी वदती झाल्या तात्काळीं । धन्य वेल्हाळी अनसूया तूं ॥७८॥

तुझा सेवाआदर पाहोन । आनंदयुक्त झालें आमुचें मन । तूं मागसी सेवादान । तरी वचन ऐक आतां ॥७९॥

आमुचे जे प्राणपती । ते तुझे आश्रमीं असती । तेचि देवोनि सत्वरगती । स्वपदाप्रती लाविजे ॥१८०॥

हें ऐकतांचि मानसीं । कळलें तेव्हां अनसूयेसी । मी बोललें होतें नारदासी । त्वरें तिघींसी पाठवावें ॥८१॥

त्याची ह्या तिघीजणी । या तिघांच्या सत्य कामिनी । आपुल्या स्वसा श्रेष्ठ मानी । आल्या धांवोनि निजकार्या ॥८२॥

मग जोडोनि दोन्ही कर । भाळ ठेविला पायांवर । म्हणे स्वरुप प्रगटवावें सत्वर । लीला चमत्कार कासया ॥८३॥

ओळखिलें हें जाणोन । स्वरुप प्रगट करिती आपण । तंव अत्रीनें ध्यान विसर्जून । उघडोनि नयन पहातसे ॥८४॥

आसनातें परतें सांडिलें । सप्रेमें तिघींसी वंदिलें । आनंद आलिंगनीं मिसळे । गहींवर दाटले अनिवार ॥८५॥

ढळढळं अश्रू वाहती । बोलावया शब्द न फुटती । नारद देखोनि विव्हळ गती । त्वरें पावती येवोनी ॥८६॥

अत्रि आणि नारद । भेटतां झाला आनंद । निवारिले भेदाभेद । नारद खेद शांतवी ॥८७॥

मुनि म्हणे अनसूयेसी । आमुच्या माता आल्या तव आश्रमासी । तरी तोषवावें यांसी । इच्छा मानसीं ते पुरवा ॥८८॥

अत्री म्हणे जाय आतां । भेटवी आणोनि यांच्या कांता । वचन वदोनि पतिव्रता । क्षण न लगतां आणिले ॥८९॥

तिघेही स्वर्गींचे सकुमार । पुढें आणोनि ठेविले सत्वर । तो पाहावया चमत्कार । विमानीं सुरवर दाटले ॥१९०॥

विमानीं कुसुमें भरोनी । अमरेंद्र पाहे विलोकोनी । हे स्वर्गाधिपती मुक्त होवोनी । येतां सघन वृष्टी करुं ॥९१॥

यक्ष किन्नर गण गंधर्व । तेही पाहूं पातले अपूर्व । अप्सरा देवांगना सर्व । म्हणती पर्व धन्य आजी ॥९२॥

आपुलाले वहनीं सायुध सिद्ध । म्हणती गाऊं प्रसंगीं गीतप्रबंध । ऋषीमंडळी द्यावया आशीर्वाद । हृदयीं आल्हाद सकळांसी ॥९३॥

असो इकडे तिन्ही बाळक । पुढें ठेवुनी अनसूया पाहे कौतुक । उमा रमा सावित्री टकमक । पाहती मुख तयांचें ॥९४॥

पाहती बरवें निरखून । परी ओळखीस न ये कोणालागून । दिसतें ठकावयाचें चिन्ह । न करी स्पर्श कोण्ही तयां ॥९५॥

उमा म्हणे सावित्रीसी । तुझा तूं उचली वेगेसीं । येरी म्हणे एकसरसी । रुपें मजसी दिसती ॥९६॥

रमा वदे अहो पार्वती । तूं आपुलाचि रमण धरीं हातीं । तंव ती म्हणे मजप्रती । खूण निश्चिती बाणेना ॥९७॥

पार्वती आम्हा न कळे । तिघेही दिसती जावळे । तुझा तूं तरी घेई ये वेळें । उगेचि डोळे न मोडी ॥९८॥

सभोंवते पाहती ऋषिभार । गद्गदा हासति ऐकोनि उत्तर । अनसूया मुखा लावोनिया पदर । विलोकी दूर राहोनी ॥९९॥

कित्येक विस्मय करिती चित्तीं । कितीएक बोलोनियां दाविती । अहो ज्यांचे तयांप्रती । ओळखों न येती आश्चर्य ॥२००॥

एक म्हणती झाले बहु दिवस । म्हणोनि अंतर पडिलें ओळखीस । एक म्हणती बाळकांस । पाहोनि भ्रांतीस पडियेल्या ॥१॥

तंव बोलतसे नारद । पुरे आतां झाला विनोद । जी माते होऊनि सावध । पाहोनि भेद उचलावे ॥२॥

तंव उमा बोले धीट होऊन । यांनीं हा वेष धरिला पूर्ण । कैसे घ्यावे ओळखून । देईंल उचलून अनसूया ॥३॥

अत्री वदे कांतेतें । जाय ओळखोनि देई त्यातें । जगाऐसें विनोदातें । न करी नातें तें नाहीं ॥४॥

मग अनसूया येवोनि पुढें । म्हणे ओळखा निवाडे । काय आपुले आपणा न कळती जोडे । जगीं वेडे कां होतां ॥५॥

सावित्री बोले तूं सुजाण । देई आमुचे आम्हांस उचलोंन । न पाहे आमुचें शाहाणपण तोषवी मन आमुचे ॥६॥

अनसूयेनें तये वेळे । न्याहाळूनि उचललीं बाळें । ज्याचें त्यासी वोपिलें । अंकीं घेतलें तयांसी ॥७॥

तीं बहुवेळ होतीं क्षुधित । अंकीं देतां शोक करीत । पयोधरीं हस्त घालित । नेत्रीं वाहत जळधारा ॥८॥

तंव त्या चळचळा अंग चोरिती । म्हणती जनांत कां मांडिली फजीती । सकळ गद्‌गदा हासती । विपरीत गती देखोनी ॥९॥

जंव जंव तोडिती तीं मुलें । तंव तंव हांसती जन लोकपाळे । नारदातें हास्य दाटलें । उठोनि पळे वेगळा ॥२१०॥

जंव जंव लोक पाहोनी हासती । तंव त्या अधोवदन सलज्ज होती । मरणप्राय झाली गती । कदा पाहती कोणीकडे ॥११॥

तंव नारद मनीं करी विचार । होईल गती हे अनिवार । माता होतां क्रोधातुर । मग तो आवर न घडे कीं ॥१२॥

मग हास्य सांठवोनि पोटीं । आला सन्निध उठाउठीं । म्हणे शांतवा मराळे हाटीं । सांगोनि गोष्टी रसाळ ॥१३॥

उमा म्हणे देतां आम्हांसी । टाही कां भरले विशेषीं । नारद म्हणे बहुतां दिवशीं । भेटी तुम्हांसी म्हणोनिया ॥१४॥

मागुतीं विनवी जोडोनी कर । बाळे झालीं तीं क्षुधातुर । मग अनसूयेसि पाचारोनि सत्वर । तृप्त सकुमार पैं केलें ॥१५॥

मातेसि बोले नारदमुनी । तुमचे तुम्हा पावले धनी । त्वरें चला आतां पुसोनी । आपुले स्वस्थानीं जाऊं आतां ॥१६॥

उमा बोले प्रत्युत्तर । नारद हे सान सकुमार । यांचा तृप्‍तीचा विचार । वृद्धिप्रकार कैसा तो ॥१७॥

आमुचा अधिकार कैसा जाण । केंवि तें करावें कैसें पालन । अलंकार पालखादी भूषण । करितां दूषण लागतें ॥१८॥

नारद विनवी तिघींसीं । श्रेष्ठत्व अधिकार विशेष तुम्हांसी । तुम्ही पतिव्रता तपोराशी । तुम्ही सकळांसी वंद्य कीं ॥१९॥

ही सृष्टी उभारिली तुमच्या कृपें । जीवजंतू तुम्हांपासोनि रुपें । दग्ध होती तुमच्या कोपें । सदयरो पें उगवती ॥२२०॥

अद्‌भुत तुमचें महिमान । वर्णूं शकेल तरी कोण । शेषकवी पावले शीण । अबाधित गुण तुमचे ॥२१॥

अधिकार पाहतां अवघे । उत्पति स्थिति प्रळय बरवे । हे तुमचेच सर्व वैभवें । कोण्हा न करवे तुमची सरी ॥२२॥

ऐसी असतां हतवटी । कासया पडावें संकटीं । पतिदिव्य करोनि उठाउठी । आपुले पटीं जाइजे ॥२३॥

एकोनि नारदाचें भाषण । उत्तर द्यावया नसे आंगवण । सलज्ज पाहती अधोवदन । मौन वचन बोलती ॥२४॥

तंव झाल्या घटीका चार । कोणी न देती उत्तर । नारदें ओळखिलें अंतर । नसे अधिकार या काजीं ॥२५॥

मग गुज सांगे तयांचे कानीं । तुम्हीं प्रार्था स्नुषेलागोनि । तिशी दया जरी उपजली मनीं । पूर्ववत्‌पणीं करील त्यां ॥२६॥

न मिळतां अमृत । केवी सावध होईल मृत । धन्वंतरीवांचोनि नेमस्त । केंवि उतरत विखार ॥२७॥

जरी न वर्षे तरी घन । तरी केवी वाढती तरुतृण । प्राप्त नसतां वसंतमान । पुष्प वटवून न येती ॥२८॥

तेवीं प्रसन्न न होतां अनसूया । कदा न पालटे यांची काया । युक्ती निवेदिली उपाया । आळस प्रार्थाया न किजे ॥२९॥

अधिकारपरत्वें गढुले मन । यासी निवेदितां तों दृष्टांतवचन । निरोगी जरी व्हावें आपण । कटु सेवन करावें ॥२३०॥

न सेवावे ठेऊनि दोष । तरी पालट न पडे रोगास । सेवितां साहोनि कुसमुस । सतेज वपुस पाविजे ॥३१॥

अधिकाराचा अभिमान । ठेविजे माते गुंडाळोन । आपुले कारणें लक्ष देऊन । करा मान मम शब्दा ॥३२॥

येर्‍हवीं विचारें पाहतां । मिथ्याच वाढवाया द्वैता । आपुलीया बाळा शृंगारितां । कोण दूषिता ते ठाईं ॥३३॥

प्रत्यक्ष हे तुमचे स्नेहाळ । येथें दोष नाणिजे अनुमाळ । अंतरी होवोनिया प्रेमेळ । चोजवा रसाळ शब्द आतां ॥३४॥

नारदवचनाची देखोनि चातुरी । परम सुखावल्या अंतरी । लोंभें उकळ्या शरीरीं । फुटों बाहेरी पाहती ॥३५॥

गुह्यबीज होतां रोपणीं । मोहो कोंभ निघाले आंतुनि । ते विस्तारती कवणे गुणीं । श्रोतेजनीं परिसिजे ॥३६॥

ऋषि अत्री अनसूया नारद स्तंभ । चतुर्गुण हा मंडप सुप्रभ । रमा सावित्री वेली अंब । सदय सलंब प्रसरे वरी ॥३७॥

सद्‌बुद्धीपर्णें हरित । चातुर्य शब्दपुष्पें विराजित । दया लोभ गौरव डोलत । सुफळें लोंबत हेचि तया ॥३८॥

अंबा वेली सरसावली । नारदस्तंभे प्रथम वेधली । केऊं तेती वृद्धिपावली । श्रवण केली पाहिजे ॥३९॥

देवी म्हणे हो नारदमुनी । धन्य अनसूया हे मेदिनी । इची देखोनि अद्‌भुतकरणी । आनंद मनीं न समाय ॥२४०॥

इचें वय असोनि सान । दिव्य पाहतां दिसे आचरण । अत्री पाहतां तोही तपोधन । सदय सज्ञान उभयतां ॥४१॥

रमा म्हणे उभयतांसी । पाहतां सुख वाटे जीवासी । धन्य रत्‍नें जन्मलीं कुसीं । सकळ कुळासी तारक ॥४२॥

आम्हीं देव स्वर्गभुवनीं । काय केलें तेथें राहोनी । आम्हांहुनि अधिक करणी । राहिले साधुनी भूलोंकीं ॥४३॥

धन्य माउली हे अनसूया । जीवप्राणें उलटली पतिपाया । येर अवनीं कां नसती जाया । वृथा वायां जन्मोनी ॥४४॥

ही निर्दोष गंगा भावतारिणी । ही दारिद्रमोचक शुभाननी । ही अज्ञाननाशक ज्ञानखाणी । जगपावनी जगदंबा ॥४५॥

सावित्री म्हणे ऐका बाई । आमुचे संततीस पार नाहीं । परि या उभयतांची नवलाई । अद्‌भुत पाही त्रिभुवनीं ॥४६॥

आम्हांहूनि विशेषगुणें । दिव्य सुंदर हीं उभयरत्‍नें । त्रिभुवन भरलें कीर्तीनें । फिटलें पारणें डोळियांचें ॥४७॥

आतां या उभयांवरोनी । सांडावे प्राणसखे ओवाळोनी । आम्हां मिरविलें धन्यपाणीं । यांचे भूषणीं भूषण आम्हां ॥४८॥

नारद म्हणे काय म्हणावें । तुम्ही सत्यचि वर्णितां आघवें । पापी तरती यांचिया नांवें । आवडीं गावे गुण यांचे ॥४९॥

हे जयातें अवलोकिती । त्याचे मनोरथ सहज पुरती । धन्य अत्री अनसूयासती । वाचे किती अनुवादूं ॥२५०॥

ऋषी म्हणती सत्य माते । उपमा नसेचि या उभयतांतें । कोण तुकी या सामर्थ्यातें । हें तों आम्हांतें न दिसे ॥५१॥

सावित्री तुमचें तप थोर । म्हणोनि ऐशीं फलें पावला निर्धार । पवित्राचे हे पवित्र । उदार धीर सदाचरणीं ॥५२॥

ऐसा स्तुतिसंवाद जंव होत । तों अत्री अनसूया आलीं धावत । साष्टांग करोनि प्रणिपात । उभय विनवीत प्रेमभावें ॥५३॥

जी जी वडील तुम्ही आम्हां । आम्हीं स्तवावें तुमच्या पादपद्मां । तें न होतां वर्णितां अधमा । कां रिकामा श्रम वायां ॥५४॥

आम्ही अत्यंतसे चोर । धरोनि बैसलों गिरिकंदर । अपराधीया दंड थोर । तुम्ही निर्धार करावा ॥५५॥

प्रत्यक्ष आम्ही अपराध केले । हे तुम्हां सर्वांते कळले । दंड न करितां आपंगिले । गौरविलें बाळांतें ॥५६॥

धन्य धन्य तुमची सदयता । आपुली लोपवोनि योग्यता । आम्हां दीनांसि थोरवितां । कीर्ति वाढवितां आत्मजाची ॥५७॥

आम्ही दीन हीन अर्भक बाळ । करित बैसलों वनीं खेळ । शीणला भाग तों जाणे स्नेहाळ । पोटीं कळकळ म्हणोनि ॥५८॥

हृदयीं तान्हियाची चिंता । म्हणोनि आला येथें पिता । बाळ खेळ पाहोनि गुंततां । वेळ येतां लागला ॥५९॥

हें जाणवतां मायेसी । कळ न साहेची मानसीं । मोहें धावोनि वेगेसीं । वत्सापासीं पावली ॥२६०॥

वत्स पाहतां अनिवार । भलतैसे फिरे रानभर । परि गाउली घालीत हुंबर । कृपा पाखर घालावया ॥६१॥

असो मातापित्याहूनि परते । आम्हां गौण सकळ दैवतें । म्हणोनि वंदितों चरणातें । कृपादानातें मागतों ॥६२॥

सकळ अपराधांची क्षमा करोन । सेवेसी सांगा आज्ञा प्रमाण । कदानुलंघूं आपुलें वचन । अनन्य शरण तुम्हांसी ॥६३॥

तंव सावित्री उमा कमळा । आनंदोनी बोलती ते वेळां । पूर्ववत् दावी या सुशीळा । आम्हां सकळां पाहों दे ॥६४॥

मातृवचनातें वंदोनि शिरीं । अनसूयेकडे पाहे ते अवसरीं । खूण मुद्रा जाणोनि झडकरी । तीर्थ सत्वरीं आणिलें ॥६५॥

सव्य प्रदक्षिणा घालोन । वंदी प्रेमें स्वामीचरण । तैसेंचि सर्वांप्रती नमोन । करी सिंचन बाळकें ॥६६॥

उदक करोनि सिंचितां । पूर्वंवत् प्रगटले अवचितां । हें देखोनि समस्तां । आनंद चित्ता न समाये ॥६७॥

विमानीं पाहती सुखर । तवं देखिले ब्रह्मा विष्णु हर । कुसुमे वर्षता झाला अमर । वाद्यें किन्नर वाजविती ॥६८॥

देवांगना आरत्या करिती । अप्सरा गंधर्व आनंदें गाती । वाद्यें नानाविध विमानीं वाजती । ऋषी गर्जती वेदवाणी ॥६९॥

सकळ करिती जयजयकार । ऋषी आशीर्वचनें बोलती उदार । तया आनंदासी नसे पार । विमानें सत्वर पातलीं ॥७०॥

आनंदे भरलें भूमंडळ । आनंदते झाले लोकपाळ । धन्य अनसूया वेल्हाळ । वर्णिती सकळ नारीनर ॥७१॥

जिकडे तिकडे अवघा आनंद । प्रगटला तेथें आनंदकंद । उडाला सकळ भेदाभेद । गेला खेद अत्रीचा ॥७२॥

पुढिले प्रसंगीं निरुपण । समस्तां घडेल आलिंगन । उभयतां तें प्रसाद देऊन । स्वपदस्थान पावतील ॥७३॥

श्रीसद्‌गुरु अनंत । तोचि या ग्रंथा वदवीत । शरणागताचे मनोरथ । तो पुरवीत गुरुराव ॥७४॥

तेणेंचि कृपा करोनि पाही । बुद्धि प्रेरली या हृदयीं । पूर्ण अध्याय वदविले साही । नेणवे नवलाई तयांची ॥७५॥

वंशयंत्र छिद्राकार । वाजवितां वाजे अतिसुंदर । परी तया जैसा वाजविणार । तेवींच प्रकार येथींचा ॥७६॥

येर्‍हवी पावा केउता वाजे । काय सुंदरपणा तया साजे । वाजविल्यापासोनि नाद निपजे । सुंदर गाजे नामें पोवा ॥७७॥

तेवी मी अत्यंत पामर । बोलाव गुरुकृपेचा आधार । मी कर्ता हा मिथ्या प्रकार । सूत्रधार वेगळाची ॥७८॥

निमित्तमात्रें अनंतसुत । प्रसिद्ध संतांचा अंकित । त्याचे द्वारीं भिक्षा मागत । करा पारंगत मज दीना ॥७९॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ ॥ श्रीनारदपुराणाचें संमत ॥ श्रोते परिसोत संतमहंत ॥ षष्ठाध्याय अद्‌भुत गोड हा ॥२८०॥

॥ श्रीदत्तदिगंबरार्पणमस्तु ॥

॥ इति षष्ठाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP