॥श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ॥
नमो सद्गुरु शिव सनातना । प्रणवरुपा सच्चिद्घना । मायातीता निरंजना । आनंदघना अविनाशा ॥१॥
नमो आदि अनादि विश्वंभरा । नमो निर्विकारा परात्परा । सर्वसाक्षी जगदुद्धारा । ज्ञानसागरा अद्वया ॥२॥
नमो पंचवदना सर्वोत्तमा । अनन्यावरी करी क्षमा । वर्णावया दत्तमहिमा । बुद्धि प्रेमा देईजे ॥३॥
गत कथाध्यायीं निरोपिलें । त्र्यंबक अविनाश भेटले । नानापरी गौरविलें । आनंदकल्लोळें तन्मय ॥४॥
दत्त त्र्यंबकासी प्रार्थिती । आज्ञा द्यावी आम्हांप्रती । अवश्य म्हणे उमापती । भेटी प्रीतीं देत जा ॥५॥
वंदोनिया चरणकमळ । निघते झाले तात्काळ । गिरिप्रदक्षिणा उतावेळ । करोनि सुशीळ नमी पुन्हा ॥६॥
गंगाद्वाराप्रति आले । गंगातीर्थ वंदन केलें । चक्रतीर्थही पाहिलें । नावेकीं देखिलें गंगातट ॥७॥
पाहतां गंगेची तटरचना । आनंद वाटला बहु मना । गंगा साक्षात् लागोनि चरणा । कृपाघना स्तवियेलें ॥८॥
प्रार्थोनि वदे अविनाशा । मत्पापा छेदी सर्वेशा । तुजवांचोनि सर्वाधीशा । पावन परेशा करील कोण ॥९॥
नित्य मातें स्पर्शोन । कृपायोगें करावें पावन । तंव अविनाशें दिधलें अभयदान । न करीं मन उदास ॥१०॥
द्वितीय अन्हीं येथें । अवश्य पावेन माते । मनोरथ होतील पुरते । पापहर्ते श्रीगंगे ॥११॥
क्षेत्रें करोनि अवलोकन । पंचवटीसी केलें गमन । श्रीदत्त ऋषींचें दर्शन । घेतां समाधान पावले ॥१२॥
तेथोनिया पश्चिमेसी । जाता झाला अविनाशी । तीर्थक्षेत्र दैवतांसी । निरखोनी प्रेमेसी वंदिती ॥१३॥
मार्ग चालतां तांतडी । पावले नर्मदेची थडी । तेथील दैवते आवडीं । निरखोनि निवाडी चालिले ॥१४॥
भीमनाथाप्रति । जावोन । आनंदे पावले दर्शन । तुळशीश्याम विलोकून । आनंदघन मानसीं ॥१५॥
रुदगया ब्रह्मगया । आवडीं विलोकिलें तया । प्रभासातें पाहोनिया । विसाविया बैसले ॥१६॥
पुढें चालतां अपूर्व । दृष्टीं देखिला मूळमाधव । पिंड तारकाचें लाघव । कौतुकभाव पाहिला ॥१७॥
रैवतपर्वत विशाळ । तोही पाहिला सकळ । तयामाजी शृंगें सरळ । तीन प्रबळ असती ॥१८॥
एक शृंगावरी गोरक्षनाथ । दुसरे शृंगीं हिंगळाजदेवी वसत । तिसरे शृंगीं स्वयें अवधूत । पावले विश्रांत हिंडता ॥१९॥
तें महासिद्धांचें स्थान । बैसलए तापसी योगीजन । द्रुम लागले अतिगहन । फळपुष्पीं सघन डोलती ॥२०॥
नाना सतेज वनस्पती । पर्वत वेष्टित डोलती । उदकस्थळें बहु असती । आनंद चित्तीं पाहतां ॥२१॥
अवधूत पावतां तये स्थळा । प्रगट झाला सिद्धमेळा । आलिंगनीं आनंद सकळां । त्रिगुणात्मकलीला देखोनी ॥२२॥
श्रीअविनाशरुप पाहोन । सकळ सिद्ध वंदिती चरण । म्हणती दीजे कृपादान । संग पूर्ण आपुला ॥२३॥
देखोनि सिद्धांचें मनोगत । आणि आवडीचे ओळखिले अर्थ । वदता झाला स्वामी दत्त । तुमचे संकेत पूर्ण होती ॥२४॥
आम्हां नित्य असे भ्रमण । स्वइच्छें रमतों जाण । तरी विश्रांतीसि हें स्थान । अनादि पूर्ण आम्हां हें ॥२५॥
नित्य येथें तुम्हांसी । भेटूं आम्ही निश्चयेंसी । सुख होईल जीवासी । येतील दर्शनासी तयांच्या ॥२६॥
तुम्ही योगी आमुचे प्राण । माझा विसावा तुम्हीच पूर्ण । तुम्हांविण जाणें कोण । गुजखूण आमुची ॥२७॥
ऐकोनि अभयाचें उत्तर । सिद्ध करिती जयजयकार । आम्हां योगियांचे माहेर । दत्त सत्पात्र पावला ॥२८॥
करिती दत्तासी विनंती । सप्त योजनें सिद्धव्याप्ती । सप्त कोष शिखरावरुती । येथें विश्रांती दत्ता तुझी ॥२९॥
तुझे कृपेची छाया सघन । त्या तळीं आमुचें सिद्धांचें स्थान । येथोनि तुझें अवलोकन । तेणें पावन सर्व आम्ही ॥३०॥
नवनाथ चौर्यांशीं सिद्ध । येथें बसतो गा प्रसिद्ध । दत्त अविनाश तूं स्वतः सिद्ध । अद्वय अभेद्य सर्वातीत ॥३१॥
जैसा प्रजेसी भूपती । तारामंडळीं इंदुगती । कीं रवि जेवीं दिशापती । तेवीं आम्हांप्रती तूं सत्य ॥३२॥
तीर्थीं श्रेष्ठ प्रयागराज । दैवतांमाजी त्र्यंबकभुज । तेवीं तूं गा महाराज । आम्हां सतेज श्रेष्ठत्वें ॥३३॥
असो ऐशा गौरववचनीं । तोषविला दत्त सिद्धांनीं । अवधूतें सकळां सन्मानोनी । निघाले तेथोनी पुढती ॥३४॥
गुप्त प्रगट असती स्थानें । दाविलीं सकळीक सिद्धानें । अविनाशें निरखोनि सावधानें । संतोष मनें चालिले ॥३५॥
पश्चिम समुद्रा अवलोकिलें । गोमती तीर्थातें वंदिलें । नारायणसरोवर आगळें । मन रंगलें ते ठायीं ॥३६॥
अनादि क्षेत्र हें द्वारका । जेथें वास वैकुंठनायका । स्वस्थळा देखोनिंया सुखा । पावला हरिखा अविनाश ॥३७॥
सकळ पाहोनी स्थान । कच्छभुज देशा केलें गमन । तयापुढें मच्छिंद्र पावन । केलें दर्शन तयासी ॥३८॥
उत्तरपंथातें क्रमितां । नाना क्षेत्र पाहती देवता । तंव हिमाचली अवचिता । झाला पावता अवधूत ॥३९॥
बद्रीकेदार नारायण । घेवोनी तयाचें दर्शन । स्वर्गद्वारातें पाहून । पावले येवोन हरिद्वारा ॥४०॥
रम्य स्थानें तापसांचीं । घेतलीं दर्शनें तयांचीं । स्नानें करोनि तीर्थांची । महिमा सकळांची पाहिली ॥४१॥
तेथोनि ज्वालामुखीसि आले । ज्योतीलागी अवलोकिले । रेवाळेश्वरा पावले । पर्वत देखिले उदकावरी ॥४२॥
पुष्करतीर्थ अत्यंत पावन । तेथें सकळ तीर्थां वास्तव्य पूर्ण । तंव श्रोते म्हणती महिमान । आम्हा निवेदन करावें ॥४३॥
देखोनि श्रोतियांच्या प्रश्नासी । वक्ता म्हणे सावध मानसीं । तुमचेनियोगें ग्रंथासी । पावणें वृद्धीसी रसाळ ॥४४॥
पूर्वीं कुंभोद्भवनंदन । अगस्ती ज्याचें नामाभिधान । वेदवक्ता तपोधन । ज्ञानसंपन्न धनुर्धर ॥४५॥
महातापसी योगेश्वर । शांत औदार्य दयासागर । प्रतिमे वाटे उणा भास्कर । महाधुरंधर प्रतापी ॥४६॥
तो महाराज अगस्ती । तपोधनांमाजी गभस्ती । तेणें इच्छा धरिली चित्तीं । यात्रापंथी निघावें ॥४७॥
सप्तद्वीप नव खंड । येथें तीर्थें असती उदंड । ते पाहूं आतां निवाड । पुरवूं कोड अंतरीचे ॥४८॥
म्हणोनिया अगस्तिमुनी । निघता झाला तत्क्षणीं । पंचाऐशीं शतकोट मेदिनीं । तीर्थें शोधुनी पाहातसे ॥४९॥
लोकालोक पर्वत । उदय अस्ताचळासहित । शोधोनि तीर्थीं स्नान करीत । महिमा आकर्षित आदरें ॥५०॥
जेथें जेथें तीर्थासी जावें । तें तीर्थ कमंडलूंत घ्यावें । जीवेंभावें त्या रक्षावें । तया जपावें बहुफार ॥५१॥
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर । मध्य गर्भादि सविस्तर । चुकों न देतां अणुमात्र । स्वीकारी सार सकळाचें ॥५२॥
सकळ तीर्थांचें अंश आणिले । ते स्वकमंडलूंत रक्षिलें । शेवटीं पुष्कराप्रती आले । आश्चर्य वाटलें देवसुरवरां ॥५३॥
देव झाले चिंतातुर । येणें तीर्यमाहात्म्य आणिलें समग्र । ऐसा कोणी न देखिला साचार । पराक्रमी थोर आगळा हा ॥५४॥
दीन पापी दुराचारी । यांसी कोण आतां उद्धरी । कोण होईल तयाची परी । म्हणोनि विचारी पडियेलें ॥५५॥
कोण करावा यासी उपाव । होऊं पाहे हा तीर्थराव । कैसेनी तरतील हे जीव । करणी अभिनव केली येणें ॥५६॥
सुरपति रमापति उमापति । सकळ देव प्रजापति । गणगंधर्व गणपति । इंदु दिनपति ऋषि तारा ॥५७॥
सकळही तेव्हां मिळोन । विचारी पाहती शोधून । पुष्करअंश जातां घेऊन । मग तो यत्न चालेना ॥५८॥
मगं अवघे मिळोनि देवांसहित । पुष्करासी झालें वेगीं प्राप्त । अंतरिक्ष राहोनि गुप्त । आरंभिली युक्त कैसी पहा ॥५९॥
अगस्ती स्नानासी प्रवेशतां । कमंडलु झाले लवंडिता । तो पुष्करि संचरतां । आनंद चित्ता सकळांच्या ॥६०॥
तंव अगस्ती स्नान करोनी । तीरा आला जंव परतोनी । पालथा कमंडलु देखोनी । क्षोभला मनीं नावरे ॥६१॥
जसा पटला प्रळयानळ । नेत्र आरक्त झाले इंगळ । तंव तिन्ही देवतां तात्काळ । करकमळ जोडिती ॥६२॥
स्तुतिस्तवनातें आरंभिती । दीनपणें करिती ग्लांती । दया कीजे कृपामूर्ती । क्षमा प्रीतीं करावीं ॥६३॥
तूं होसी दयासागर । सकळांमाजीं तूंचि थोर । करावया जीवमात्रांचा उद्धार । केला उपकार समर्था ॥६४॥
तुजऐसा परोपकारी । न देखो या त्रिभुवनांतरी । तुझी कीर्ती चराचरीं । ब्रह्मांडभरी हे झाली ॥६५॥
या जीवउद्धरणासाठीं । जीवीं सोसोनि आटाटी । तीर्थे आणोनि दिधली भेटी । होसी पोटीं दयाळू ॥६६॥
अगा अगस्तीमुनी समर्था । तुवां तारिलें जीवजंतु अनाथा । तुझी कृपा हे पूर्ण होतां । मोक्षपंथा पावती ॥६७॥
होईल जीवाचा उद्धार । हा मुनी तुझाचि कीं उपकार । सावरी कोप होई उदार । न करी अव्हेर शब्दाचा ॥६८॥
एसे ऐकोनिया स्तवन । अगस्ती करी हास्यवदन । म्हणे बरवें साधिलें कारण । ठेविलें महिमान येथेंची ॥६९॥
तरी सकळीं द्यावें वरप्रदान । जो या तीर्थी करील स्नान । न घडो तया जन्ममरण भवबंधन न बाधो ॥७०॥
मुनिवचन ऐकोनि देव । आनंदते झाले तेव्हां सर्व । जयजयकारें वरद अपूर्व । देती गौरव तीर्थातें ॥७१॥
पुष्कराद्यानि तीर्थानि । संकल्पीं नेमिलें तपासोनी । तै सकळ सुस्नात होवोनी । भावें मुनी वंदिला ॥७२॥
अगस्तीं लिंग तेथें स्थापिलें । विष्णु रुद्र पुष्कर नेमिलें । तिसरें ब्रह्म पुष्कर योजिल । निवास केलें ते ठायीं ॥७३॥
गायत्री सावित्री सरस्वती जाण । त्यांसहित ब्रह्मदेव आपण । तेथेंचि त्या पूज्यमान । करिती जन अद्यापी ॥७४॥
प्रसन्न करोनि अगस्तीसी । तीर्थे स्थापोनि पुष्करासी । स्वस्थाना पावले देवऋषी । परिसोनि श्रोतियांसी आनंद ॥७५॥
मागील कथेचे अनुसंधान । पुष्करीं पावला दत्त येवोन । त्रिपुष्करीं करोनि स्नान । घेत दर्शन अगस्तीचें ॥७६॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । त्रिगुणात्मका भटले सत्वर । मस्तकीं ठेवोनि अभयकर । देती वर सदयत्वें ॥७७॥
ते दत्तमूर्ति करिती अवलोकन । त्रिगुणात्मक दिसे घवघवित पूर्ण । शंख चक्र त्रिशूल धारण । डमरु वादन दिव्य पैं ॥७८॥
झोळीपात्र मेखळा । मस्तकीं मुगुट तेजागळां । कुंडलांची फांकते कळा । मुखमृगांकीं कळा अनुपम्य ॥७९॥
हा जगदुद्धारार्थ अवतार । स्वयें त्रिगुणात्मक नटला सर्वेश्वर । आसनीं बैसवोनि प्रियकर । पूजासत्कार समर्पिती ॥८०॥
रमेसहित आपण । करिती दत्ताचें अर्चन । पीतांबर करवोनि परिधान । वनमाला भूषण अर्पिलें ॥८१॥
उमा आणि शिव । तेही करिती गौरव । शार्दूलचर्म मुद्रा अपूर्व । दे स्वयमेव जाणोनी ॥८२॥
गायत्री सावित्री सरस्वती । सहित सरसावे प्रजापती । पूजाविधि सारोनि निगुती । आणिक अर्पिती प्रियकर ॥८३॥
दंडकमडलु माला । आवडी दे त्या कामधेनूला । ऐशा गौरवें दत्ताला । देता झाला संतोषें ॥८४॥
नाना भूषणीं मंडित । संतोषिला अविनाश दत्त । नाना गौरवें कैसें भूषवित । ते श्रोते संत अवधारा ॥८५॥
महामुनी वीतरागी । दिगंबर तूं निःसंगी । सर्वाध्यक्ष उदारत्व भोगी । म्हणोनी योगी तुज नाम ॥८६॥
मुख्य योगियाचें लक्षण । तें तूं जाणसी संपूर्ण । करुं जाणसी योगयज्ञ । योगी सुज्ञ तूंचि पै ॥८७॥
जे योगाची हातवटी । ते तूं जाणसी गा कसवटीं । योगयुक्त तुझी दृष्टी । मुरडली पृष्ठीं योगी तू ॥८८॥
अंतर्बाह्य तुझा योग । हा प्रगटोनि उद्धरिसी जग । सर्व योगांचे प्रसंग । जाणसी सांग योगी तूं ॥८९॥
सर्वात्मक तूं व्यापक । तुजपासोनि हे अनेक । भूतमात्रा पालक । सुखदायक तूं प्रभु ॥९०॥
सत्ताधारी तूं होसी । सूत्रें पुतळ्या नाचविसी । कर्तृत्वकारणें करविसी । कृपें पाळिसी म्हणोनि प्रभु ॥९१॥
तव आज्ञा सकळां प्रमाण । आज्ञेबाहेर वर्तेल कोण । तूं सकळांचें अधिष्ठान । तुज हे अभिधान साजे प्रभु ॥९२॥
सत्त्वगुणाचा उद्भव । हा तुजपासोनि असे सर्व । अनंत ब्रह्मांडांचा प्रसव । एवं जीवन जीव तूं प्रभु ॥९३॥
रज तम विभक्त दाविलें । मूळ सत्त्व असे वेगळें । त्या सत्वाचेहीमुळें । करितां गाळे दिसे जें ॥९४॥
शुद्ध सत्त्व जया म्हणती । तोचि तूं गा दत्तमूर्ति । त्रिगुणात्मक धरोनि स्थिती । दाविसी गति त्रिगुणत्वें ॥९५॥
त्रिगुणात्मकेंचि अवतार । त्रिकांडीं वेद वर्णी विचार । त्रिभुवनें दाविला प्रकार । अवघा विस्तार त्रिभाग ॥९६॥
सएव जो त्रिभाग । तो तूं त्रिगुणात्म्क सांग । पृथक दाविलेंसि त्रिअंग । प्रत्यक्ष अभंग एकत्वें ॥९७॥
जे जे निर्मिलेसि गुण । चातुर्य कलायुक्तीपूर्ण । नाना रसकस विविध कारण । वर्णावर्ण जाणसी ॥९८॥
नाद भेदादि गति । शब्दाशब्द प्रवृत्तीनिवृत्ति । कालअकालाची व्याप्ति । ह्याही युक्ति जाणसी ॥९९॥
विद्या अविद्या खेळ । गुप्त प्रगटादि सकळ । यंत्र मंत्र तंत्रें प्रबळ । अनेक करस्थळ गुह्यार्थ ॥१००॥
एवं सर्व जाणता । तूंचि होंसी सत्य दत्ता । म्हणोनि साजे ही नामता । ज्ञानसागरता योग्य हे ॥१॥
सर्व प्रकारातें जाणसी । रसज्ञ पणें रस घेसी । सेवोनि असक्त राहसी । एवं होसी विज्ञान ॥२॥
आब्रह्मस्तंबपर्यंत । पिंडब्रह्मांडतत्त्वयुक्त । असोनि माजी अलिप्त । एवं सिद्ध स्वतः विज्ञान तूं ॥३॥
गुणाअवगुणातें जाणणें । अज्ञानज्ञाना गवसणें । सकळ जाणोनि हारपणें । सएव विज्ञानें पूर्ण तू ॥४॥
क्षरा अक्षराचे भेद । वेदांतज्ञान जें प्रसिद्ध । जाणोनि होसि तूं अभेद । विज्ञानपद तंव साजे ॥५॥
जीव जे अनन्येसी । शरण येती गा तुम्हांसी । कृपाळूपणें तयां पावसी । हेतु पुरविसी मंगल ॥६॥
याति कुळ तयांचे । न निरखिसी पर्वत दोषांचे । मूळ न शोधितां अधिकाराचें । दान कृपेचे सुमंगल दे ॥७॥
उंचनीचाचें न धरी कारण । भाव अनन्यता शुद्ध देखोन । तया अंगीकारोनि आपण । मंगल दान त्या करा ॥८॥
दर्शनें हरितां अमंगल । अणुमात्र नुरवा तेथें मळ । अर्थ पुरवितां मनींचे सकळ । म्हणोनि सुमंगल नाम तुम्हां ॥९॥
आकर्ण पद्माकार । सतेज निर्मळ निर्विकार । ढळढळीत मनोहर । ऐसे सुंदर नेत्र ज्यातें ॥११०॥
ते षट् शोभायमान । विशाळ आकृति प्रभा गहन । पुंडरीकाक्ष नामाभिधान । ठेविलें पाहून या योगें ॥११॥
ब्रह्मा विष्णू महेश्वर । इंद्र वरुण इंदु भास्कर । यक्ष गंधर्व नळ कुबेर । यांतें अवतार आवडता हा ॥१२॥
देवं बृहस्पति आदि करुन । सनत्कुमार सनकसनंदन । नारदादि वैष्णव जन । यातें पूर्ण प्रियकर ॥१३॥
देव मानव सकळांसी । देवी देवतां सिद्धांसी । प्रियकर वाटे अविनाशी । वल्लभ नामासी म्हणोनी ॥१४॥
सुरा मानवा ऋषीतें । ज्ञानी अज्ञानी मूढातें । चार्वाक सुज्ञ प्रौढातें । आनंददातें हें रुप ॥१५॥
ब्राह्मण क्षत्रिय शूद्रवाणी गर्भविस्तारें अनेक खाणीं । आनंद दाता सर्वालागुनी । नंद अभिधानी या नांवें ॥१६॥
मुमुक्षु शरणागत येती जीव । अनन्यपणें धरोनि भाव । तया आनंदाचें वैभव । योगीराव देतसे ॥१७॥
असती अनेक आनंद । परी त्यांत मुख्य पंचानंद । त्या आनंदाचा जो कंद तें दे पद आत्मत्त्वें ॥१८॥
तन धन संपत्ति पुत्र । देतील स्त्री आणि कलत्र । यश कीर्ति आयुरा पवित्र । यंत्र तंत्र मंत्र देती ॥१९॥
अनेक प्रकारची संपत्ती । मोहमायिक सर्व देती । परि जेणें फिटे भवभ्रांती । ऐंसे न अर्पिती कोण्हीच ॥१२०॥
त्रिविध तापातें हरावें । जन्ममरणा चुकवावें । अजरामरपद द्यावें । हें न घडावें आणिकातें ॥२१॥
तो एक दाता हा अवधूत । या भवबंधा निवारित । वृत्ति करी कामनातीत । तापा वारीत क्षणमात्रें ॥२२॥
धन्यधन्य हा अविनाशी । स्वात्मसुख दे शरणागतासी । ब्रह्मानंद सुखवासी । जीवीं जीवासी स्थापित ॥२३॥
म्हणवोनी आनंददायिनी । नामें पाचारिलि महानी । ते योग्य युक्त पाहोनी । आनंद मनीं ऐकतां ॥२४॥
अनेक रुद्रअवतार । वर्णन केले ग्रंथीं अपार । परि त्रिअंशीं सर्वसंपन्न धीर । महारुद्र दत्त हा ॥२५॥
एक एक ऐसे करोन । अवतार झाले भिन्नभिन्न । शक्ति पराक्रम ज्ञानधन । सबळ पूर्ण पराक्रमी ॥२६॥
सर्वज्ञ सर्वातीत सर्वागत । सर्वाधीश सर्वोत्तम सर्वश्रुत । सर्वोपम आणि सर्वभूत । महारुद्र विख्यात या नांवें ॥२७॥
मागें तैसेंचि त्या द्यावें । अधिकारातें कांहीं न शोधावें । पर्जन्या ऐसें सदयें । उगें वर्षावें भलस्थळीं ॥२८॥
कोमळता बहु अंतरीं । कृपालुत्वें जीवा तारी । परा दुःख नेदी तिळभरी । दुखवितां परी तळमळे ॥२९॥
सुख द्यावें सकळांसी । दुःख जीवाचें नुरवावें । मागतां आवडीचें पुरवावें । सकळ उद्धरावेअ जीवमात्र ॥३१॥
ऐसीं वृत्ती दत्तासी । द्वैतभेद नसे मानसीं । म्हणवोनि योग्य अविनाशी । नामानिश्चयेंसी करुणानिधे ॥३२॥
ब्रह्मा विष्णु हरें । दश नामाचेनि गजरें । शृंगारोनि प्रिति आदरें । पुरस्करें वर्णिलें ॥३३॥
याची नामें करवून । परमहंस आचार्यस्तवन । तोची श्लोकार्थ विस्तारानें । केलें लेखन संयुक्त ॥३४॥
संशय येईंल जीवा । तेणें परमहंसस्तव शोधावा । दत्तचि वर्णविता बरवा । माझा केवा काय येथें ॥३५॥
असो पुष्करतीर्थीं दत्तासी । अर्चनी गौरविलें प्रेमेंसी । तिघे आज्ञा घेवोनि वेगेसि । मथुराप्रदेशी पावलें ॥३६॥
निरखोनिया मथुरापट्टण । यमुनातीर्थीं केलें स्नान । कांहींक दिवस बसोन । जपअनुष्ठान सारिलें ॥३७॥
अगस्ती ध्रुव नारद । तेथे तप ऋषिवृंद । योगी साधु महासिद्ध । आणिक प्रसिद्ध विधिहर ॥३८॥
हें वर्म जाणोनि मानसीं । दुर्बास चंद्र अविनाशी । तपोनि निघाले वेगेसी । धवळपुरासी पावल ॥३९॥
तेथें गुहा अत्यंत गहन । मुचकुंदाचें वास्तव्यस्थान । मुचकुंदसरोवर पाहून । गालव स्थान देखिलें ॥१४०॥
तेथें गुहा पर्वतोदरीं । गालव वसे ऋषि भारी । तेणें अविनाश देखोनि सत्वरीं । आदरें सत्कारी प्रेमभावें ॥४१॥
होतां दत्ताचें दर्शन । आनंद पावले ऋषिगण । परम महोत्सव करुन । देवोनि सन्मान बोळविले ॥४२॥
पुनरा पूर्वे चालिलें । यमुनातीरा ओलांडलें । क्षेत्र ब्रह्मावर्त देखिलें । तीरीं शोभलें गंगेच्या ॥४३॥
यज्ञ केले विधीनें । तप साधिलें वाल्मीकानें । भागीरथीओघ भगीरथानें । सत्वगुणें आणिला ॥४४॥
तया ब्रह्मघाटीं केलें स्नान पाहिलें वाल्मिकऋषीचें स्थान । सकळ ऋषींचें दर्शन । परम पावन घेतलें ॥४५॥
उल्लंघोनिया भागीरथी । पुढें नैमिषारण्य अवलोकिती । नंद्रिग्रामीं जावोनि शीघ्रगती । अयोध्या पुढती शरयूतें ॥४६॥
शरयूतीर्थीं केलें मार्जन । निरखिलें आयोध्यापूरपट्टण । रघुगणांचे दर्शन । होतां मन उल्हासलें ॥४७॥
नेपाळमार्गातें लागले । बिकट स्थळ उल्लंघिलें । गंडिकेश्वरीं पावले । चित्तीं उल्हासले बहुफार ॥४८॥
तीर्थीं विष्णूच्या मूर्तीं । विलोकिते झाले नाना आकृती । सचिन्ह सुलक्षण असती । यथामती निवेदूं त्या ॥४९॥
मत्स्य कच्छ तरती वर । नारसिंह उग्र फार । वामनमूर्ती तीन चक्र । दामोदर तो द्विचक्री ॥१५०॥
वराह मुखलंबित । फरश त्रिकोण सत्य । राम तो षड्चक्री विख्यात । चौदा अनंत जाणिज ॥५१॥
नाभीतुल्य पद्मनाभ । संकर्षण तो स्वयंभ । हिरण्यगर्भ सुप्रभ । लक्ष्मीवल्लभ दैवागळा ॥५२॥
हरिहरमूर्त द्विवर्ण । नानाविध संकर्षण । शिलामूर्ति विराजमान । सप्तांकी प्रमाण नवांकी ॥५३॥
ऐसिया अनेक प्रकारें । मूर्ती असती बहुविस्तारें । एवं विष्णुचि निर्धारें । प्रेमादर पूजावें ॥५४॥
तया तीर्थामाजी तुळसी अर्पितां बुडती निश्चयेंसी । हे साक्ष सर्वांसी । यात्रेकर्यांसी विदित ॥५५॥
हिरण्यगर्भ तो पर्वत । हेम वेंचिती भाग्यवंत । शालिग्राममूर्ती नित्य प्रसवत । भाविका प्राप्त प्रसाद ता ॥५६॥
असो अविनाश वंदोनि तीर्थासी । पुढें पावले गौडदेशीं । विलोकोनि कामाक्षादेवीसी । अनेक सिद्धांसी भेटले ॥५७॥
पुढें नाना परीचे देश । पाहे सहस्त्र मुखसंगमास । झाड खंडी वैजनाथास । पाहोनि गयेस पावले ॥५८॥
वंदोनिया विष्णुपदासी । भेटले तया गदाधरासी । गायत्री सावित्री सरस्वतीसी । संध्यावंदनासी पै केलें ॥५९॥
करोनिया फल्गुवंदन । पथ क्रमिते झाले तेथून । पावले विंध्याचल येवोन । घेतलें दर्शन देवीचें ॥१६०॥
दैवतें प्रत्यक्ष भेटती । अवधूतातें तोषविती । आनंदे करोनि बोलविती । महामूर्ती म्हणोनिया ॥६१॥
चित्रकूटपर्वता । येणें झालें स्वामी दत्ता । माय तपस्थाना होय पाहता । आनंद चित्ता न समाये ॥६२॥
तेथोनि नैऋत्यपंथे चालिले । नर्मदेलागीं वोलांडिलें । क्षेव रामटेक पाहिलें । मन आनंदलें सरोवरी ॥६३॥
श्रीगंगातीर्थ आंबाळे । भोंवते पर्वताचे पाळे । बिल्ववृक्ष सधन लागल । गगनीं गेलें चुंबीत ॥६४॥
गुप्त प्रगट ऋषींचे आश्रम । तेथे अद्यापि असती उत्तम । ते ज्याचे त्यासीच सुगम । येरा दुर्गम असती ॥६५॥
बिल्व तुळसी आणि फुलें । यावीण वृक्षची नाढळे । पर्वती नरहरीचीं स्यळें । तीथ चांगलें वराहाचें ॥६६॥
प्रातःकाळीं सर्व ऋषी । स्नान करिती आंबाळ्यासी । सायान्ही वराहतीर्थासी । रामदर्शनासी जाती सर्व ॥६७॥
राम सीता लक्ष्मण । विशाळ मारुती दैदीप्यमान । रमणीक स्थळ अतिपावन । मार्गी पटांगण सुंदर पैं ॥६८॥
ते स्थळीं पावताचि त्रिमूर्ती । परमानंदे स्नानें करिती । ऋषिभार देखोनी धांवती । चरण वंदिती सप्रेम ॥६९॥
धन्य म्हणती आजी सुदिन । झालें अवधूताचें दर्शन । दीन जनां करावया पावन । पावले येऊन या ठाया ॥१७०॥
हा त्रिगुणांत्मक अवतार । प्रगट करावया जगदुद्धार । गंगा वोळली आळशावर । आम्हां माहेर भेटलें ॥७१॥
जन्मोजन्मींच तपाचरण । तें फळ आजी आलें संपूर्ण । झालें स्वामिपदाचें दर्शन । पुनरागमन चुकलें ॥७२॥
आधिव्याधी गेला ताप । जळाल दर्शनें सर्व पाप । तुटलें बंधन सुटला व्याप । दत्त सकृप भेटतां ॥७३॥
एसिया आनंदाचे मेळी । अविनाशा स्तविते मंडळी । दिगंबरकृपें न्याहाळी । हृदयकमळीं तोषोनी ॥७४॥
ऐसा बहुधा तये स्थानीं । येतां दत्ता पाहिला ऋषींनीं । तंव चमत्कार अधिकोत्तर देखोनी । एके दिनीं काय करी ॥७५॥
सवें घेवोनि ऋषिभार । रामभेटीं चालिले सत्वर । स्थळ पाहतां आनंद थोर । श्रीरघुवीर पाहिला ॥७६॥
साष्टांग करोनी नमन । रामासि दिधलें आलिंगन । जानकी आणि लक्ष्मण । चौथा हनुमान वंदिला ॥७७॥
रुद्रमहारुद्रा झाली भेटी । प्रेमांबुधा राहो वृष्टी । आनंद न समायेची पोटीं । गुह्य गोष्टी बोलती ॥७८॥
अविनाश म्हणे रामेश्वरीं । भेटी दिधली दक्षिणसागरीं । येथें झाली असे दुसरी । केधवां तरी आलां येथें ॥७९॥
बोलतां झाला रुद्र अवतार । जे जे स्थळीं स्वामी रघुवीर । ते ते स्थळीं उभा समोर । जोडोनि कर सेवेसीं ॥१८०॥
हें आपण सर्वही जाणतां । दोहीं ठायीं तुमचीच सत्ता । तुम्हांवांचोनि ठाव आतां । मज तो रिता दिसेना ॥८१॥
स्वामी आणि सेवक । दिसे द्वैत परी एक । प्रीति वाढावया अलोकिक । तुम्ही कौतुक दावितां ॥८२॥
स्वयं ब्रह्म तूं संत्तांधारी । भूतें नाचविसी धरोनि । अनंतब्रह्मांडीं नानापरी । कौतुक हरी तुझें कीं ॥८३॥
चोवीस नेम दाविला अवतार । तरी तूंचि होसि गा सर्वेश्वर । सर्वेश्वराचा पाहतां विचार । सर्वांतर तूं होसी ॥८४॥
दृश्य अदृश्य पदार्थ जाण । सर्वात्मक तुजवीण कोण । ओतप्रोत भरलासि पूर्ण । न कळे महिमान कवणातें ॥८५॥
वेदा न कळेची अंत । वर्णितां शिणलीं शास्त्रें बहुत । श्रुती नेति नेति बोलत । म्हणोनि अनंत नाम साजे ॥८६॥
जया म्हणती श्रीअनंत । तोचि स्वामी हा रघुनाथ । रघुनाथ तोचि तूं दत्त । त्रिगुण मंडित अविनाश ॥८७॥
ऐकोनि मारुतीचें भाषण । अविनाशी झाला आनंदपूर्ण । म्हणे केउता उरलासि भिन्न । गार जीवन ओळखे ॥८८॥
कनक आणि अलंकार । लवण आणि सागर । सूत कार्पासपर । भिन्न विचार असेना ॥८९॥
तेवींच देवभक्तपण । समरसता एकची जाण । परी आनंद नुपजे द्वैतावांचोन । प्रेम गहन ये ठायीं ॥१९०॥
एकत्व ऐक्यासि आणावें अवलोकनीं एकत्व जाणावें । प्रेम वृद्धयर्थ सेवावें । विनयभावें करोनी ॥९१॥
ऐसें अविनाश बोलतां । प्रेम नावरे हनुमंता । चरणीं ठेविला दृढ माथा । दत्त आलंगिता पैं होय ॥९२॥
ऋषी सर्व विलोकिती । आनंद करोनि डोलती । दिगंबराचे चरणीं लागतीं । तेवींच नमिती हनुमंता ॥९३॥
तोषवुनी सकळांतें । आज्ञा मागितली देवदत्तें । पुनरा वंदोनि रामातें । चालिले पंथ त्रिवर्ग ॥९४॥
तया स्थानापासून । वायव्यदिसे केलें गमन । नर्मदातट ओलांडोन । महांकालस्थान पाहिलें ॥९५॥
क्षेत्र अवंतिका देखिली । क्षिंप्रांतीर्थी स्नानें सारिलीं । महांकालेश्वरा तये वेळीं । अर्चा केली आदरें ॥९६॥
क्षेत्रें दैवतें सर्व पाहून । आनंदयुक्त झालें मन । क्षिप्रापैलतिरीं वास करुन । योगासन साधिलें ॥९७॥
चौर्याशीं आसनांच्या गति । प्रणवभेदाच्या योगयुक्ति । मुद्रामार्ग अनुभूति । स्वयें अभ्यासिती एकाग्र ॥९८॥
असो क्रमोनि कांहीं दिवस । तारिते झाले अनन्यास । योगभक्तीं लाविले मार्गास । गुप्त अविनाश निघाले ॥९९॥
श्रीॐकारमहाबळेश्वरीं । येतां भेटली कावेरी । संगमीं स्नान करोनि सत्वरीं । जाती झडकरी दर्शना ॥२००॥
ॐकाररुपें तो पर्वत । ममलेश्वर अधिष्ठान लिंग सत्य । नर्मदा कावेरी तीर्थ विख्यात । नवल अद्भुत ते ठायीं ॥१॥
नर्मदेमाजी कंकर । ते अवघेचि जाणा शंकर । आणिक तेथें चमत्कार । तोही सादर परिसावा ॥२॥
हस्तीं आणी पाषाण । तेथें सचिन्ह होती बाण । ते सहस्त्र धारेमाजी जाण । घ्यावे निवडून अपेक्षित ॥३॥
तेवींच कावेरीतीर्थीं । निर्माण होती गणपती । त आरक्तवर्ण असती । सकळ अवलोकिती अद्यापि ॥४॥
अद्भुत विश्वेश्वराचें लाघव । ठायीं ठायीं महिमा अपूर्व । पंचायतनीं जे देव । विभक्त ठाव नेमिले त्यां ॥५॥
विष्णुमूर्ति गंडिकेश्वरीं । शिवमूर्ति सहस्त्रधारीं । गणपतिस्थान कावेरी । धातुमिश्रित शक्तिरुप ॥६॥
सूर्यकांत आणि सोमकांत । यांचे तों विभक्तचि पर्वत । गोमतीतीर्थी चक्रांकित शंख निर्मीत सागरीं ॥७॥
एवं सर्वंगत आपण । रुपें धरिली भिन्न भिन्न । जीव करावया पावन । पंचायतन प्रगट हें ॥८॥
असो अविनाशें तये वेळें । ओंकारममलेश्वर पाहिलें । अर्चोनिया निघते झाले । आनंदमेळें चालती ॥९॥
क्षेत्र वेरुळासी पावती । ग्रीष्मेश्वरासी पूजिती । तीर्थ वंदोनि पुढें चालती । प्रतिष्ठानाप्रती देखिलें ॥२१०॥
गोदातटीचें समस्त । अवलोकिती क्षेत्रदैवत । भीमाशंकर सोमनाथ । वैजनाथ परळीसी ॥११॥
आवंढिया नागनाथ महादेव अनेक पुण्यक्षेत्रें महा ठाव । तीर्थक्षेत्रें दैवतें अपूर्व । पाहिलीं सर्व अविनाशें ॥१२॥
सप्तपुर्या अतिपावन । द्वादश लिंगांचें दर्शन । सरितासागरीं केलें स्नान । पर्वणी पाहोन क्षेत्रवास ॥१३॥
शिवविष्णुस्थानें सुंदर । शक्तिदैवते अपार । सिद्ध साधु ऋषीश्वर । गिरिगव्हार नानापरी ॥१४॥
सानथोर सकळ दैवता । वांपी कूप कुंडे सागर सरिता । प्रगट गुप्त देवतीर्था । सिद्ध मुनी समस्तां पाहिलें ॥१५॥
हिंडता कल्पयुगे लोटलीं अपार । यात्रा करोनि परतले समग्र । स्वआश्रमालागीं जाती सत्वर । उल्हास थोर अंतरी ॥१६॥
अविनाश नित्य यात्रा करी । केल्या संकल्पा न चुके अणुभरी । हा सर्वव्यापक सर्वांतरी । पूर्ण करी संकल्पा ॥१७॥
स्मरगामी देवदत्त । भावार्थ देखोनी प्रगटत । भरला असे ओतप्रोत । लीला समर्थ जयाची ॥१८॥
तो कोठे गेला न आला । अवघा परिपूर्ण असे भरला । आब्रह्मस्तंब व्यापोनि उरला । तोचि पाहिला पाहिजे ॥१९॥
तया वेदशास्त्रें धुंडिती । साचोले श्रुती वाखाणिती । सिद्धांत उपनिषदे करिती । थोरीव गाती पुराणें ॥२२०॥
महावाक्यादि सिद्धांत । बोलिलें वर्म परी गुप्त । शोधिती विचक्षण शास्त्री पंडित । परि तो गुह्यार्थ न कळे त्यां ॥२१॥
तें जें का गुह्य गुज । असे संत साधुसिद्धांचे निज । ते कृपा करितील जरी सहज । तरीच काज कांहीं साधे ॥२२॥
अहा हे संत साधु दयाघन । करोनि राहावें यांचे सेवन । ते सकृपे अंगीकारितां कारण । देतील साधून निजगुज ॥२३॥
संत सद्गुरु मायबाप । शरणागताचे वारिती संताप । दूर करोनि त्रिविधताप होती सकृप अनन्याते ॥२४॥
तोषविती कृपादानीं । अज्ञान निवटिती ज्ञानांजनीं । विवेक शांति बाणवोनी । आनंद लेणी लेवविती ॥२५॥
स्वात्मबोधे बोधविंती । ज्ञानदृष्टि प्रज्वालिती । अविनाश वस्तू भेटविती । अद्भुत कीर्ती संतांची ॥२६॥
संत शांतीचे सागर । संत ज्ञानाचें आगर । शरणागताचे माहेर । दाते उदार सदयत्वें ॥२७॥
ऐसिया संतांचे अंगणी । अनंतसूत लोटांगणी । इच्छा चरणरजकणीं । राहिलों धरोनी आस पोटीं ॥२८॥
हाचि ध्यास रात्रंदिवस । संत पुरवि माझी आस । म्हणोनिया धरिली कास । न करा निरास दीनाची ॥२९॥
दिवसें दिवस अधिक । लळे पुरवितील अलोलिक । दत्तकथा ही सुखदायक । कृपेनें ठक बोलवितां ॥२३०॥
पुढील प्रंसंगीं निरोपण । स्वआश्रमी पावतील तिघेजण । ते कथा रसाळ पूर्ण । वर्षतील घन आनंदाचे ॥३१॥
तो अवधूतची बोलविता । त्यावीण मज कैंची सत्ता । मूर्ख उभें केलें निमित्ता । करणें सांगता ज्याचीं त्या ॥३२॥
इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । यासी नारदपुराणीचें संमत । सदा परिसोत संतमहंत । त्रयोदशोध्यायार्थ गोड हा ॥२३३॥
॥ इति त्रयोदशोध्यायः समाप्त ॥