मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
उठिं उठिं बा पुरुषोत्तमा ...

भूपाळी संतांची - उठिं उठिं बा पुरुषोत्तमा ...

देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे.

Poems that can be sung early morning while remembering God.


उठिं उठिं बा पुरुषोत्तमा । भक्तकामकल्पद्रुमा ।

आत्मारामा निजसुखधामा । मेघश्यामा श्रीकृष्णा ॥ध्रु०॥

भक्तमंडळी महाद्वारीं । उभे निष्ठत श्रीहरी ।

जोडोनियां दोन्ही करीं । तुज मुरारी पाहावया ॥१॥

संतसनकादिक नारद । व्यास वाल्मीकि ध्रुवपह्लाद ।

पार्थ पराशर रुक्मांगद । हनुमान अंगद बळिराजा ॥२॥

झाला प्रातःकाळ पूर्ण । करीं पंचांग श्रवण ।

आला मुद्‌गलभट ब्राह्मण । आशीर्वचन घे त्याचें ॥३॥

तुझा नामदेव शिंपी । घेउनि आला आंगी-टोपी ।

आतां जाऊं नको बा झोंपीं । दर्शन देई निजभक्‍तां ॥४॥

नानापरिचे अलंकार । घेऊनि आला नरहरि सोनार ।

आला रोहिदास चांभार । जोडा घेऊनि तुजलागीं ॥५॥

सुगंध सुमनें पुष्पांजुळी । घेऊनि आला सांवता माळी ।

म्हणे श्रीरंगा पदकमळीं । अनन्यभावें समर्पू ॥६॥

कान्हुपात्रा नृत्य करी । टाळछंदे साक्षात्कारीं ।

सेना न्हावी दर्पण करीं । घेउनि उभा राहिला ॥७॥

लिंबुर हुरडा घेउनि आला । तो हा माणकोजी बोधला ।

दर्शन द्यावें बा ! त्याजला । भक्त भोळा म्हणऊनी ॥८॥

मिराबाई तुझेसाठीं । दूध-तुपें भरुनी वाटी ।

तुझे लावावया ओठीं । लक्ष लावुनी बैसली ॥९॥

नामदेवाची जनी दासी । घेऊनि आली तेल-तुपासीं ।

तुज न्हाऊं धालावयासी । उभी ठेली महाद्वारीं ॥१०॥

गूळ-खोबरें भरुनी गोणी । घेउनि आला तुकया वाणी ।

वह्या राखिल्या कोरडया पाणीं । भिजों दिल्या नाहीं त्वां ॥११॥

आला चोखामेळा महार । स्वामी करीतसे जोहार ।

त्याचा करोनियां उद्धार । संतमेळीं स्थापिला ॥१२॥

हरिभजनाविण वाया गेले । ते नरदेहीं बैल झाले ।

गोर्‍याकुंभारें आणिलें । खेळावया तुजलागीं ॥१३॥

गरुडपारीं हरिरंगणीं । टाळमृदुंगाचा ध्वनी ।

महाद्वारीं हरिकीर्तनीं । तल्लिन कान्हा हरिदास ॥१४॥

निजानंदें रंगे पूर्ण । सर्वही कर्में कृष्णार्पण ।

श्रीरंगानुजतनुज शरण । चरणसेवा करीतसे ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP