दिनशुद्धी पाहून कोणत्याही शुक्रवारपासून हे व्रत सुरू करावे.
हे व्रत क्रमाने सोळा शुक्रवार करावयाचे आहे.
'व्रतसंकल्प' पहिल्या शुक्रवारी करावा. ( टीप- व्रतसंकल्प कसा कारावा ते याच पुस्तिकेत अन्यत्र दिले आहे.)
संकल्पित व्रत पूर्ण झाल्यावर सतराव्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन करावे. ( टिप- उद्यापनाची माहिती याच पुस्तिकेत अन्यत्र दिली आहे.)
हे व्रत बारा वर्षावरील कोणतीही व्यक्ति, कुमार, कुमारी, प्रौढ स्त्रिया व पुरुष, पतिपत्नी उभयतांनी वा दोघांपैकी कोणीही एकाने, तसेच वृद्ध माणसे यांनी करावे.
या दिवशी दिवसंभर उपवास करून सायंकाळी भोजन करावे.( टीप-या दिवशी व्रतस्थ भक्त पाणीसुद्धा पीत नाहीत. उपवास सोडल्यावर पुढेही पाणी पीत नाहीत. यालाच निर्जल उपवास म्हणतात. ज्यांना शक्य आहे त्यांनीच असे करावे. इतरांनी असे करू नये, आपल्या शरीरसामर्थ्यानुसार व्रताचरण करणे शास्त्रसंमत आहे.)
या दिवशी संतोषी मातेची पंचोपचार पूजा करावी. पूजेनंतर संतोषी मातेचे माहात्म्य सांगणारी व्रतकथा वाचावी. ती घरातील मंडळींनी श्रद्धेने श्रवण करावी. पूजेनंतर प्रसाद म्हणून भाजलेले चणे व गूळ वाटावेत. सायंकाळी मातेसन्मुख दिवा लावून नमस्कार करावा.
भाजलेले चणे व गूळ एका केळीच्या पानावर घेऊन ते या दिवशी गायीला खाऊ घालावे.
व्रतकालावधीत क्रमाने तीन शुक्रवार झाल्यावर येणार्या प्रत्येक चवथ्या शुक्रवारी एका ब्राह्मणाला घरी बोलावून प्रेमपूर्वक भोजन घालून संतुष्ट करावे आणि आशीर्वाद घ्यावेत.
या दिवशी घर स्वच्छ व पवित्र ठेवावे. घरातील वातावरण प्रसन्न आनंदी व मंगलमय असावे. भांडणतंटा वा वादविवाद करू नयेत. घरातील मंडळींनी व्रतकर्त्यास सर्वतोपरी साह्य करावे.
या दिवशी व्रतकर्त्याने व त्याच्या घरातील मंडळीपैकी कोणीही दही, ताक, लिंबू, कोकम, चिंच अशा कोणत्याही आंबट पदार्थाचे सेवन अजिबात करू नये. घरातील जेवणात त्याचा वापर करू नये व बाहेरही खाऊं नये. ( टीप-उपासनेने देवतांची प्रसन्नता लाभुन त्यांचे कृपशीर्वाद उपासकाला साह्य करणार्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांनाही मिळत असतात हे लक्षात घ्यावे. )
इतर व्रतांप्रमाणे या व्रतातही व्रतदिनी परनिंदा करणे, खोटे बोलणे व्यर्थ वादविदाद करणे, भांडणतंटा करणे, अधर्माने वागणे आदी गोष्टी वर्ज्य कोणतेही व्यसन करू नये. मांसाहारही करू नये.
हे व्रताचरण करण्यामागील आपला संकल्प शुभ व कल्याणकारी असावा. ( टीप- दुसर्याच्या कार्यात अडथळे निर्माण व्हावेत, दुसर्याचे आहित व्हावे अशा कोणत्याही दुष्ट हेतूने हे व्रत करू नये.)
स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना मासिक अडचण आल्यास नियमानुसार उपवास व सायंकाळी भोजन करावे. अन्य नियमांचेही पालन करावे. पण तो शुक्रवार गृहीत धरू नये. जेवढे शुक्रवार आड येतील तेवढे शुक्रवार अधिक करून १६ ही संख्या पूर्ण करावी. व्रतोद्यापन त्यानंतरच्या शुक्रवारी करावे.
शहरांतील घरांमध्ये देवांसाठी स्वतंत्र खोली नसते. तसेच स्त्रियांच्या मासिक अडचणीच्या काळात शिवाशिवही पाळले जात नाही अशा वेळी घरातील कर्त्या स्त्रीस अडचण आल्यास पुरुष व्रतकर्त्यानेही तो शुक्रवार गृहीत धरू नये. अशा प्रकारे जेवढे शुक्रवार आड येतील तेवढे अधिक करून १६ ही संख्या पूर्ण करावी.
शुक्रवारचे उपवास जे नित्य करताता त्यांनी या सोळा शुक्रवारच्या व्रताबद्दल इष्ट कामनेचा उच्चार करून सकाम उपासना म्हणून त्या उपवासांचा विनियोग कराव. १७ व्या शुक्रवारी उद्यापन करून नेहमीचे शुक्रवाराचे उपवास चालू ठेवावेत.