१) कोणत्याही व्रताचे उद्यापन हे संकल्प केल्याप्रमाणे तितक्या संख्येतील वारांइतके व्रताचरण झाल्यानंतर पुढील आठवड्यात त्याच वारी करावयाचे असते. या व्रताचे उद्यापनही संकल्पानुसार सोळा शुक्रवारांपर्यंत व्रताचरण करून सतराव्या शुक्रवारी करावे.
२) या दिवशी नेहमीप्रमाणे श्रीसंतोषी मातेची पंचोपचार पूजा करावी, व्रतकथा वाचावी व आरती करावी.
३) या दिवशी सव्वा पटीतील किंमतीचे भाजलेले चणे व गूळ आणून त्याचा प्रसाद करावा.
४) या दिवशी नेहमीप्रमाणे स्वयंपाक करावा. त्यात खीर व पुरी यांचा समावेश असावा. कांदा, लसूण वर्ज्य. आंबट पदार्थांचा वापर करू नये.
५) या दिवशी संतोषी मातेला महानैवेद्य दाखवावा. तिला विडा व दक्षिणा अर्पण करावी. एक पान गायीसाठी काढून ते गायीला खाऊ घालावे. भोजनाच्या वेळी मातेला दाखविलेला महानैवेद्य व्रतकर्त्याने ग्रहण करावा.
६) उद्यापनास १ कुमारिका, आठ लहान मुले व पाच ब्राह्मण यांना घरी भोजनास बोलवावे. त्या सर्वांना आदराने पोटभर जेवू घालावे. भोजनानंतर कुमारिकेला ( संतोषी माता समजून ) हळद - कुंकू लावावे. तिला खण ( अथवा वस्त्र ) व श्रीफळ देऊन नमस्कार करावा. आठ लहना मुलांना गंधाक्षता लावून एकेक फळ द्यावे. ब्राह्मणांना गंधाक्षता लावून वस्त्र व यथाशक्ति दक्षिणा द्यावी. नमस्कार करावा.
७) पाच सुवासिनींना प्रसादासाठी आमंत्रित करून त्यांना हळद-कुंकू लावावे. चणे व गुळाचा प्रसाद द्यावा. त्यांना एक फळ व या व्रताची एकेक पुस्तिका देऊन नमस्कार करावा.
( टिप- उद्यापनाच्या दिवशी श्रीसंतोषी मातेची पूजा करताना या व्रतपुस्तिकांचीही हळदकुंकू, गंधाक्षता व फुले वाहून पूजा करावी व नंतरच ती 'संतोषी मातेच्या भक्तीची प्रचार व प्रसार व्हावा, इतरांनाही तिच्या कृपेचा प्रसाद प्राप्त व्हावा' या सद्भावनेने भेट द्यावीत. )
८) सायंकाळी संतोषी मातेच्या तसबिरीसमोर तुपाचा दिवा व सुगंधी अगरबत्ती लावून हात जोडून पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी-
"हे कल्याणकारिणी संतोषी माते! हे सर्वार्थसाधिके शुभदे अनंते! मी तुला नमस्कार करतो. आज तुझ्याच परम कृपेने तुझे सोळा शुक्रवारचे हे पावन व्रत उद्यापनासहित यथाविधि पूर्ण कृपेने तुझे सोळा शुक्रवारचे हे पावन व्रत उद्यापनासहित यथाविधि पूर्ण झाले आहे. ही सेवा तू गोड मानुन घे. यातील न्यून पुरते करून घे आणि माझे इष्ट मनोरथ पूर्ण करण्याची कृपा कर. माझ्यावर नित्य कृपादृष्टी ठेव."
९) या दिवशी शक्य असल्यास जवळच असलेल्या संतोषी मातेच्या देवळात जाऊन देवीचे दर्शन करून यावे.
१०) रात्री संतोषी मातेचे भजन व नामस्मरण करावे. पुजाविसर्जन दुसर्या दिवशी करावे.
११) विशेष सूचना- सोळा शुक्रवारचें व्रताचरण पूर्ण झाल्यावर सतराव्या शुक्रवारी उद्यापन करण्यास काही अडचण संभवत असल्यास श्रीसंतोषी मातेला आपली अडचणी सांगून उद्यापनाचा संकल्प करून ठेवावा व लवकरात लवकर उद्यापन करावे.