सर्वप्रथम मातेचे थोडा वेळ ध्यान करावे. पूजा करताना आधी ' श्रीसंतोषी मातार्यै नमः ।' हा मंत्र म्हणून मगच उपचार अर्पण करावेत.
१) श्रीसंतोषी मातार्यै नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
(श्रीसंतोषी मातेचे चरण व मस्तकास आधी गंध वा अष्टगंध लावून त्यावर कुंकुम तिलक लावावा.)
२) श्रीसंतोषी मातायै नमः । पूजार्थे पुष्पं समर्ययामि ।
( श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीला फुलांची माळ घालावी, वेणी अर्पण करावी व तिच्या चरणांशी एक फूल ठेवावे.)
३) श्रीसंतोषी मातायै नमः । सुवासार्थे धूपं समर्पयामि ।
( श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीसमोर उदबत्ती पेटवून किंवा धुपाटण्यात धूप पेटवून उजव्या हाताने देवीला ओवाळून ती उदबत्ती वा धुपाटणे चौरंगावर ठेवावे. या वेळी डाव्या हातात घंटा घेऊन ती वाजवावी व पुन्हा चौरंगावर आपल्या डाव्या बाजूस ठेवावी. )
४) श्रीसंतोषी मातायै नमः । दीपार्थे नीरांजनदीपं समर्पयामि ।
( नीरांजनात तूप व फुलवात घातलेली असावी. ते प्रदीप्त करून व डाव्या हातात घंटा घेऊन घंटानाद करीत श्रीसंतोषी मातेला ओवाळावे. चौरंगावर घंटा आपल्या डाव्या बाजूस तर निरांजन उजव्या बाजूस ठेवावे.)
५) श्रीसंतोषी मातायै नमः । नैवेद्यार्थे मिष्टान्न - नैवेद्यं समर्पयामि ।
(चौरंगावर मातेच्या समोर आधी पाण्याने चौकोनी मंडल करावे. त्यावर भाजलेले चणे व गुळाचे पात्र व फळे ठेवावीत. त्या नैवेद्याभोवती डावीकडून उजवीकडे पाणी हातात घेऊन परिसिंचन करावे ( फिरवावे.)
( टीप- मातेला दाखविलेला हा गूळ - चण्यांचा नैवेद्य नंतर ताम्हनातील गूळ - चण्यांमध्ये मिसळून सर्वाना प्रसाद म्हणून वाटावा. ) त्यानंतर
' श्रीसंतोषी मातायै नमः । यथाशक्ति द्रव्यात्मकां दक्षिणां समर्पयामि।'
असे म्हणुन मातेसमोर एक वा दोन रुपयांचे एक नाणे ठेवून त्यावर उजव्या हातावरुन पळीभर पाणी सोडावे व नमस्कार करावा.
त्यानंतर मातेसमोर ठेवलेल्या नारळास कुंकू लावावे. मातेच्या पोथीवर गंधाक्षता व फुले वाहून तिला नमस्कार करावा. मग 'श्रीसंतोषी माता नमनाष्टक' म्हणून 'श्रीसंतोषी माता माहात्म्य ' अर्थात सोळा शुक्रवार व्रताची कथा वाचावी. त्यानंतर मातेची मनोभावे आरती करावी, मंत्रपुष्पांजली म्हणून पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी-"माते! तुझे माहात्म्य अत्यंत श्रेष्ठ असून ते तुझी कृपा, तुझे आशीर्वाद व तुझे सामिप्य प्राप्त करून देणारे आहे. तुझे परमपावन असे माहात्म्य श्रवण केल्यानेही भाविकांचे कल्याण होते. मी तुझी हळद-कुंकू, गंधाक्षता, फुले, पुष्पमाला, धूप, दीप, नैवेद्य व दक्षिणा या पंचोपचारांसह जी मनोभावे पूजा केली आहे त्या पूजेचा तू स्वीकार कर. मी केलेल्या आरतीचा स्वीकार कर. माझे सर्व अपराध पोटात घालून मी, ही जी तुझी पूजनरूपी अल्प सेवा केली आहे तिचा स्वीकार कर. या पूजेत काही न्यून राहिले असेल वा माझे काही चुकले असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा कर. माते! तू सर्वसमर्थ असून आपल्या भक्तांना इष्टफल देणारी आहेस. तू मज बालकावर प्रसन्न हो! मला सुखी ठेव, मला दीर्घायुषी कर, माझे सर्व मनोरथ पूर्ण कर आणि माझ्यावर नित्य कृपादृष्टी ठेव. माझ्या हृदयरूपी मंदिरात तुझा नित्य वास राहो, माझ्या मुखात सतत तुझेच नाम राहो, मी तुझ्या परमपावन चरणांना मनोभावे नम्र नमस्कार करतो"
त्यानंतर ताम्हनातील चणे आणि गूळ प्रसाद म्हणून सर्वांना वाटावेत. तांब्याच्या कलशातील पाणी घरात सर्वत्र शिंपडून उरलेले पाणी तुळशीस घालावे.