पूजनाला बसण्यापूर्वी आपल्या इष्टदेवांना हळदकुंकू वाहून देवांपुढे एक विडा ( विड्याची दोन पाने, एक नाणे व एक सुपारी ) ठेवावा व नमस्कार करावा. घरातील वडीलधार्यांना वंदन करून आसनावर बसावे व पूजेस सुरुवात करावी. प्रथम
'वक्रतुण्ड महाकाय कोटीसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥'
असे म्हणून श्रीगणपतीला नमस्कार करावा. त्यानंतर
'ॐ नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः । नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥'
हा देवी - मंत्र म्हणून श्रीसंतोषी मातेला नमस्कार करावा. मग पूजेचा संकल्प करून एक फूल गंधाक्षतांसहित सुपारीरूप गणपतीवर वाहावे. नमस्कार करावा. त्यानंतर श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीची पुढील प्रमाणे पंचोपचारांनी पूजा करावी.