जगत्जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे असा पुराणात उल्लेख आहे. समस्त विश्वाला संतोष देणारी आणि भक्तांची श्रद्धाभक्ती पाहून त्यांच्या अल्पसेवेने संतुष्ट होणारी म्हणूनच तिला संतोषी माता असे म्हणतात. ती भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहे. ती परम मंगल करणारी, सर्व प्रकारचे सौभाग्य देणारी, कल्याण करणारी, संकटात रक्षण करणारी, सद्बुद्धी देणारी व जीवांना भवसागरातून तारून नेणारी आहे. आपल्या भक्तांची सर्वतोपरी काळजी घेणारी व सर्वार्थाने साह्यकर्ती अशी तिची महत्कीर्ती आहे.
संतोषी मातेची दृढ श्रद्धेने व शुद्ध अंतःकरणाने सेवा, भक्ती व उपासना केल्याने दुःख व दारिद्र्य नष्ट होते, सर्व प्रकारचा क्लेशांचे व संकटांचे निवारण होते, ऐश्वर्य लाभते, वैभव मिळते, लक्ष्मी स्थिर होते, प्रपंचात सौख्य लाभते, समृद्धी येते, यश व कीर्ती वाढते, मानसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त होते, विद्याभ्यासात प्रगती होते, गृहकलह नाहीसे होतात, घरात आनंदी, प्रसन्न व खेळकर वातावरण निर्माण होते, कुटुंबीयांमधील परस्पर प्रेम, स्नेह व विश्वास वृद्धिंगत होतो, चिंता दूर होऊन मनःस्वास्थ्य लाभते, धंदाव्यवसायात प्रगती होते, संतोषी माता ही, भक्ताच्यां इष्टकामना पुरवून त्यांचे कल्याण करणारी, शाश्वत कामधेनूच आहे. तिची व्रतोपासना केल्याने आपले इष्टकार्य लवकर सिद्ध होते.