१) कोणतेही काम्यव्रत संकल्पाशिवाय करू नये असा संकेत आहे. संकल्पामध्ये आपण आपले नाव, संपूर्ण तिथी व ज्या उद्दिष्टपूर्तीसाठी उपासनारूपाने ज्या व्रतदेवतेची ज्या प्रकारे सेवा करणार आहोत त्याचे उच्चारण करून ती व्रतोपासना निर्विघ्न पार पाडावी व इष्ट मनोरथपूर्ती व्हावी म्हणून त्या देवतेची प्रार्थना करावयाची असते. संकल्पाने व्रतात दृढपणा येतो व उपासना निर्विघ्न पार पडून त्या देवतेच्या कृपाशीर्वादाने इच्छित कार्य लवकर सफल होते. श्रीसंतोषी मातेचे ' सोळा शुक्रवारचे व्रत ' करतानाही त्या व्रताचा संकल्प पहिल्या शुक्रवारी करावयाचा आहे.
२) या दिवशी स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून कपाळास अष्टगंध वा कुंकुमतिलक लावावा.
३) श्रीगणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, श्रीगुरुदेव ( दत्तात्रेय ) व संतोषी मातेचे स्मरण करावे, घरातील वडीलधार्यांना नमस्कार करावा.
४) त्यानंतर घरातील देवांची नित्यपूजा करावी.
५) पूजा झाल्यावर देव्हार्यासन्मुख उभे राहून देव्हार्यातील सर्व देवांना हात जोडून नमस्कार करावा. उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यावे. श्रीगणपतीचे व श्रीसंतोषीमातेचे स्मरण करून पुढीलप्रमाणे संकल्प करावा- 'श्रीगणेशाय नमः । हे गणपती, गजानना आणि हे संतोषी माते ! तुम्ही भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहात. भाविकांचे रक्षणकर्ते व प्रतिपालक आहात. संतसज्जनांचे साहाय्यकर्ते व दीनाअर्तांचे दुःख निवारण करणारे आहात. तुम्ही करूणासागर व कृपासिंधू आहात. तुम्हांला शरण आलेल्यांची तुम्ही कधीही उपेक्षा करीत नाही. म्हणूनच मी.... ( आपले संपूर्ण नाव घ्यावे.).... आज शके एकोणीसशे.... त, ... मासात, ... पक्षातील'.... या तिथीस शुक्रवारी....( येथे आपली मनःकामना सांगावी.)....हे कार्य सिद्धीस जावे म्हणून 'सोळा शुक्रवाराचे व्रत' करण्याचा संकल्प करीत आहे. या व्रताचे नियमानुसार आचरण करून मी श्रीसंतोषी मातेप्रीत्यर्थ पूजन, माहात्म्य वाचन, नमनाष्टकादी स्तोत्रवाचन, उपोषण व शुद्धाचरणादिकांनी यथाशक्ति सेवा करणार आहे. व्रतसाङ्गतेप्रीत्यर्थ यथाविधि उद्यापनही करणार आहे. हे व्रताचरण आपल्या कृपेने निर्विघ्न पार पडो. तसेच या व्रतसेवेने प्रसन्न होऊन आपण माझी मनःकामना पूर्ण करा अशी मी आपणांस नम्र विनंती करतो.
श्रीगणेशाय नमः । श्रीसंतोषी मातायै नमः । मम कार्यं निर्विघ्नमस्तु।'
असे म्हणून तळहातावरील संकल्पयुक्त जल ताम्हनात सोडावे. गणपतीला व देव्हार्यातील देवीच्या मूर्तीला वा तसबिरीला एकेक फूल वाहून नमस्कार करावा.
६) त्यानंतर ताम्हनातील जल तुळशीस घालावे. अशा प्रकारे विधिवतं संकल्प केल्यावरच या पुस्तिकेत सांगितल्याप्रमाणे व्रताचरणास प्रारंभ करावा. श्रीसंतोषी मातेची पूजाअर्चा करावी.