१) व्रतकर्त्याने प्रत्येक शुक्रवारी सकाळी लवकर उठावे आणि सर्वप्रथम श्रीसंतोषी मातेचे भक्तिपूर्वक स्मरण करावे. तिला नमस्कार करावा.
२) प्रातर्विधी आटोपून स्नान करावे. शुद्ध वस्त्रे नेसावी. कपाळास अष्टगंध वा कुंकुमतिलक लावावा. पिवळ्या रंगाचा एक हातरूमाल आपल्या उजव्या हाताच्या मनगटात बांधावा.
( टीप- श्रीसंतोषी मातेची पूजा, आरती, महानैवेद्य झाल्यावर तो काढून ठेवावा. )
३) श्रीगणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता व श्रीगुरुदेवांचे स्मरण करून घरातील वडीलधार्यांना नमस्कार करावा.
४) घरातील देवांची नित्यपूजा करावी.
५) त्यानंतर श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीची पंचोपचार पूजा करावी.
( टिप- या पूजेचा विधी याच पुस्तिकेत अन्यत्र दिला आहे. त्याप्रमाणे पूजा करावी. पहाटेपासुन सूर्योदयानंतरचा एक प्रहर हा कालावधी प्रातःपूजनासाठी, उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो.) संतोषी मातेचे पूजन करताना ती आपल्या सन्मुख साक्षात बसलेली आहे भाव असावा.
६) त्यानंतर व्रतकर्त्याने आपल्या उद्योगास लागावे. त्या दिवशी जमल्यास जवळपास असलेल्या संतोषी मातेच्या ( वा देवीच्या ) देवळात जाऊन तिचे दर्शन करून यावे.
७) सायंकाळी घरी परतल्यावर स्नान करून श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीची गंधाक्षता, पुष्पादिकांनी पूजा करावी. मातेल नैवेद्य
( पूर्णान्नाचा ) दाखवावा. मातेला दाखविलेले हे भोजनाचे ताट व्रतकर्त्याने स्वतः ग्रहण करावे. आधी गोग्रास द्यावा व मगच भोजन करावे.
(टीप - या भोजनात चण्याची डाळ घातलेला एखादा पदार्थ असावा. गूळ किंवा गूळ घातलेला एखादा पदार्थ असावा.)