दुसर्या दिवशी आंघोळ केल्यावर श्रीसंतोषी मातेच्या तसबिरीला गंधाक्षता व हळद-कुंकू वाहावे, अगरबत्तीने ओवाळावे व नमस्कार करावा. या उत्तरपूजेनंतर देवीच्या तसबिरीवर व गणपतीच्या प्रतीकस्वरूप सुपारीवर तुलसीपत्राने पाणी शिंपडून 'पुनरागमनायच' । असे म्हणून ती तिथल्या तिथे हलवावी. हे विसर्जन होय. त्यानंतर सर्व वस्तु नीट उचलून, स्वच्छ करून त्यांच्या जागी ठेवाव्यात. गणपती म्हणून पुजलेली सुपारी देव्हार्यात ठेवावी व तीच सुपारी पुढील प्रत्येक शुक्रवारी पूजेसाठी घ्यावी. व्रतोद्यापन झाल्यावर ती दक्षिणेसह ब्राह्मणास दान द्यावी. श्रीसंतोषी मातेला दक्षिणा म्हणून ठेवलेली नाणी काळजीपूर्वक एकत्र जमवून ठेवावीत. उद्यापनानंतर ती सर्व दक्षिणा संतोषीमातेच्या वा देवीच्या मंदिरातील दानपेटीत टाकावी. पूजेचे निर्माल्य वेळेवर विसर्जित करावे. ते साठवून ठेवू नये.