लावणी - चक्रव्युह

गो.रं.आंबेकरांचा जन्म कर्नाटकातील कुनगोळ गावचा.


सुडौल बांधा, रंग केतकी, सरल नासिका, अभिमानी ।
गोलावरि खेळतो रक्तिमा, खळी पडतसे हास्यानीं ॥
सहज शब्द बोलतां वाटते, संगीताचीं बरसात ।
स्वरमाला भासते, अवखळें शब्दांच्या आकारात ॥
ओष्ट-कमलदल, जणू शिंपले, संपुटांत मौक्तिकमाला ।
हास्य नसे ते, अस्त्र, जिंकिण्यां सोडित शरसंधानाला ॥
वायू संगे भुरभुरती, कच कलाप काळे अन् कुरळे ।
भक्ष शोधण्यां, जणूं टाकिले, कोळ्यानें अपुले जाळे ॥
कुरंग नयना, कटाक्ष निर्मळ, दृष्टिक्षेपें स्नान घडे ।
कधीं बोलके इतुके होती, अस्तित्वाची स्मृती झडे ॥
दो हाताचे मृदुतर विळखे, कळ्यांभोवती पडतील ।
स्पर्श मुलायम, त्यांचा होता, वज्र देह ना राहील ॥
पदन्यास चालतां भासतो, पवन लहर कीं, लतेवरीं ।
चाल नसे हो...भाव तरलते, तिच्या पाउलीं, ताल धरी ॥
शस्त्रांचा संभार घेवुनी, मदालसा आव्हान करीं ।
सामोरे व्हा, पहा तियेच्या, तुम्हां जीवाची तमा जरीं ॥
चक्रव्युह हा असा मांडिला, इथें क्षेपणांस्त्रे सगळी ।
स्वयंचलित शस्त्रास्त्रे येथें, खड्डा, संगिनी तिजजवळीं ॥
स्फोटक दारु कुठे ? न तो सेनेचा ताफा खडा करीं ।
शरिरावरि ना घाव दिसें, परि वीर होत घायाळ तरी ॥
रचुनि ठेविला भूल-भुलय्या, जवळीं सावज जरि फिरके ।
अस्त्रा मागुनि अस्त्रे सुटती, वीर जिवाला व्यर्थ मुके ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP