ती : सख्या सांग ना रे सांग, कशीं ओळ तुझी जुळे ?
एका मागोनीया एक, शब्द, रस, गंध, मिळे ?
एकतानता मनाचीं, कैसीं लागते करावी ?
चित्रपुढती...तयाची गोड प्रतिमा रेखावी ?
तो : जेथें, निर्मळ मनाचा, भाव अंतरीं साठला ।
जेथें, निरागस मुखांवरीं, तोच उमटला ।
छबी, सामोरीं ठाकली, कुतुहल नक्षत्रांत ।
तेंव्हा ओळ अक्षरांची, येते धावत पुढयांत ।
शब्दकल्लोळ करीती, शांत सोज्वळ रुपां ।
पुढे येती वर्णांयासीं, देखोनीया नंदादीपा ।
चाल जणू, पदन्यांस, ताल देहांतूनही तैसां ।
जलधारा पुष्पांवरीं, फूल थरथरे तैसां ।
बोल...विचारीतां कानीं, ...गीत शब्दांचे नाद ते ।
येतां ओघळून ओष्ठीं, पुष्प - पाकळी लवते ।
ती : कोठें पाहिली शुभांगी, शब्दानांही लागे वेड ?
कल्पनेच्या संभ्रमाचें, हे तो नव्हे काहो कोडं ?
तो : ओळखाया सौजन्याला, हवे मानसीं दर्पण ।
प्रतिबिंब सामोरीचे, त्यांत तळपते जाण ॥