स्कंध ६ वा - अध्याय १९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


८९
राव म्हणे मुने, कथा तें पुत्रद - । पुंसवनव्रत सविधि मज ॥१॥
निवेदिती मुनि मार्गशिर्ष शुद्ध । आरंभावें व्रत पतिपदेसी ॥२॥
निजपतिआज्ञा घेऊनि मरुतांचें । जन्माख्यान साचें श्रवण होवो ॥३॥
विप्रद्वारा विधि ऐकावा व्रताचा । दंतधावनाचा विधि करा ॥४॥
पुढती सुस्नात होऊनियां शुभ्र - । वस्त्र अलंकार परिधानूनि ॥५॥
लक्ष्मीसवें व्हावी नारायणपूजा । प्रेमें अधोक्षजा प्रार्थूनियां ॥६॥
वासुदेव म्हणे प्रार्थना ते ऐसी । निवेदिली ग्रंथीं श्रवण करा ॥७॥

९०
पूर्णकामा ईशा, सदा तूं निरपेक्ष । अष्टसिद्धिनाथ लक्ष्मीपती ॥१॥
नमस्कार माझा असो हे ईश्वरा । देवा, सर्वाधारा जगत्पते ॥२॥
कृपा, श्री, ऐश्वर्य, महत्त्व तैं वीर्य । सत्य तुझे सर्व संकल्पही ॥३॥
यास्तव सर्वांचा प्रभु तूंचि एक । घेईं हे अनंत नमस्कार ॥४॥
विष्णुपत्नी महामाये परमेश्वरी । कृपा मजवरी करीं माते ॥५॥
महाभागे होईं प्रसन्न तूं मज । अनंत हे तुज नमस्कार ॥६॥
वासुदेव म्हणे यापरी प्रार्थना । लक्ष्मीनारायणा तुष्ट करी ॥७॥

९१
‘नमो भगवते महा पुरुषायेति’ । मंत्रें या सविधि पूजा व्हावी ॥१॥
द्वादश आहुति नैवेद्यशेषाच्या । त्याचि मंत्रें साच्या समर्पाव्या ॥२॥
लक्ष्मी नारायण भोगोद्रम स्थान । जाणूनि, सप्रेम दशधा जप - ॥३॥
करुनि, स्तवन करावें पुढती । व्यापिलें विश्वासी उभयांनीं ॥४॥
मायबाप तुम्हीं सकळ विश्वाचे । यज्ञक्रिया ऐसें तुमचें रुप ॥५॥
यज्ञफलभोक्ता तूंचि नारायणा । व्यक्तता त्रिगुणा तेचि माया ॥६॥
व्यंजक तियेचा भूतात्माही तूंचि । शरीरेंद्रियादि लक्ष्मीरुप ॥७॥
त्रैलोक्यकामनापूरक तुम्हींचि । अर्पावे मजसी चिरभोग ॥८॥
वासुदेव म्हणे पुढती आचमन । अर्पूनियां पूर्ण व्हावी पूजा ॥९॥

९२
हुंगूनियां यज्ञशेष । तेणें पूजावा परेश ॥१॥
स्तवूनियां ईश्वरासी । तोषवावा निजपति ॥२॥
प्रिय पदार्थ अर्पूनि । तोचि ईश्वर मानूनि ॥३॥
पतीनेंही पत्नीप्रति । साह्य व्हावें या सुव्रतीं ॥४॥
पत्नी असतां असमर्थ । पतीनेंही घ्यावें व्रत ॥५॥
विप्र सुवासिनी प्रेमें । नित्य पूजावीं नियमें ॥६॥
विसर्जूनियां देवीतें । स्वीकारावें प्रसादातें ॥७॥
चित्तशुद्धि हेतुपूर्ति । प्रसादें या घ्यावें चित्तीं ॥८॥
वासुदेव म्हणे व्रत । संवत्सर ऐसें एक ॥९॥

९३
कार्तिकी अमेतें व्हावें उपोषित । पूजावा भगवंत अन्य दिनीं ॥१॥
दुग्धसिद्ध चरु, सुघृतसंयुक्त । आहुति द्वादश द्याव्या त्याच्या ॥२॥
वस्त्रालंकारांनीं तोषवावे विप्र । भावें नमस्कार करावा त्यां ॥३॥
घेऊनियां आशीर्वाद भोजनासी । प्रथम आचार्यांसी बैसवावें ॥४॥
आप्तैष्टांसवें पुढती आपण । करावें भोजन मौनव्रतें ॥५॥
वासुदेव म्हणे चरु अवशिष्ट । अर्पावा पत्नीस कथिती मुनि ॥६॥

९४
संतति संपत्ति लाभे त्या प्रसादें । इच्छित नराचे पुरती हेतु ॥१॥
गृह, धन, कीर्ति, सौभाग्यसंपत्ति । पति दीर्घायुषी लाभे स्त्रीतें ॥२॥
सद्‍गुणसंपन्न पति कुमारीसी । लाभे या व्रतेंसी निश्चयानें ॥३॥
गतधवा पापमुक्त ते होऊन । सद्गति पावून धन्य होई ॥४॥
तात्पर्य, या व्रतें कामना सकळ । पुरवी घननीळ कृपालेशें ॥५॥
मरुतांची कथा, दितीचें हें व्रत । ऐकतां समस्त पुरती काम ॥६॥
वासुदेव म्हणे षष्ठस्कंधगान । जाहलें संपूर्ण अर्पूं ईशा ॥७॥

इतिश्रीवासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंध ६ वा समाप्त.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥


N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP