स्कंध ६ वा - अध्याय १८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


८०
राया, सवित्याच्या पृश्नि कांतेप्रती । सावित्री, व्याहृति, त्रयी तेंवी ॥१॥
अग्नि भर्गपत्नी सिद्धि अपत्यें तियेचीं । महिमा, प्रभु, आशि तेंवी विभु ॥२॥
सुव्रता सुरुप कन्या तिजप्रति । भार्या त्या धात्यासी होत्या चार ॥३॥
कुहू, सिनिवाली, राका, अनुमति । नामें तयांप्रति होतीं ऐसीं ॥५॥
सायं, दर्श, प्रात:, पूर्णमास ऐसे । पुत्रही तयांचे अनुक्रमें ॥६॥
विधातापत्नी ते क्रिया, पुरीष्यासी । प्रसवली अग्नि ‘पंचचित’ ॥७॥
वरुण-चर्षणी पुत्र होई भृगु । ब्रह्म्याचा तो चांगु पुत्र पुरा ॥८॥
वरूणाचा अन्य पुत्र जो पुढती । जाहला वाल्मीकि वारूळांत ॥९॥
वासुदेव म्हणे अगस्ति वसिष्ठ । मित्रावरुणांस घटीं होती ॥१०॥

८१
मित्र-रेवतींसी उत्सर्ग, अरिष्ट । पिप्पल हे पुत्र तीन होती ॥१॥
इंद्र-पौलोमीतें जयंत, ऋषभ । मीढुष हे पुत्र तैशापरी ॥२॥
मायेनें वामन तोचि उरुक्रम । तत्कांतेसी नाम कीर्ति ऐसें ॥३॥
बृहछ्‍लोक तया पुत्र एक झाला । बहु पुत्र ज्याला सौभगादि ॥४॥
दितिपुत्र आतां निवेदितों तुज । वंशीं ज्या प्रल्हाद, बळी भक्त ॥५॥
हिरण्यकशिपु, हिरण्याक्ष दोन । बलाढय हे जाण पुत्र तिचे ॥६॥
जंभकन्या कयाधु ते प्रथमासे । पुत्र संर्‍हादादि तियेप्रति ॥७॥
वासुदेव म्हणे कयाधुभगिनी । सिंहिका ते जनीं राहुमाता ॥८॥

८२
संर्‍हाद-कृतींतें ‘पंचजन’ पुत्र । ‘वातापि-इल्वल’ धमनी-र्‍हादां ॥१॥
अनुर्‍हाद-सूर्यां बाष्कल, महिष । विरोचन पुत्र प्रल्हादासी ॥२॥
विरोचन-देवालागीं बळीपुत्र । तया शत पुत्र मरुद्‍गण ॥४॥
संतती तयांसी जाहलीचि नाहीं । निजरुप देई इंद्र तयां ॥५॥
वासुदेव म्हणे असूनियां दैत्य । इंद्राचें कां रुप कथिती मुनि ॥६॥

८३
सवतीमत्सरें दितीलागीं क्रोध । वधिलें दैत्यांस अदितिपुत्रें ॥१॥
सूडभावनेनें वश कश्यपांसी । करुनि तयांसी वर मागे ॥२॥
स्त्रियांप्रति वश न होईल कोण । अर्धांगें त्यां जन्म विरंचीच्या ॥३॥
सेवासंतुष्ट ते दितीसी कश्यप । म्हणती मनोरथ निवेदावे ॥४॥
दिति म्हणे देईं अमर जो पुत्र । वधील इंद्रास ऐसा बळी ॥५॥
ऐकूनि कश्यप खिन्न होई मनीं । म्हणे जाहलों मी दीन कैसा ॥६॥
इंद्रियाधीन मी विसरलों धर्म । निश्चयें पतन आतां मज ॥७॥
वासुदेव म्हणे कश्यपासी खेद । करी पश्चात्ताप निजांतरीं ॥८॥

८४
पद्मदलासम वदन स्त्रियांचें । अमृतचि भासे वचन त्यांचें ॥१॥
क्षुरधारेसम हृदय तयांचें । न कळे कोणातें स्त्रीचरित्र ॥२॥
वरि वरि प्रेम दाविती कार्यार्थ । हरिताती चित्त चातुर्यानें ॥३॥
स्वार्थास्तव पति पुत्रही वधिती । धिक्कार मजसी स्त्रीलंपटा ॥४॥
असो, आतां कांहीं युक्ति केल्यावीण । न होई वचन पूर्ण माझें ॥५॥
वासुदेव म्हणे सक्रोध कश्यप । वदले कांतेस ऐका काय ॥६॥

८५
प्रिये, व्रत कथितों तुजसी । जरी आचरिसी निर्दोष तें ॥१॥
तरीच त्वत्पुत्र वधील इंद्रासी । चुकतां सख्यासी जोडील त्या ॥२॥
दिति म्हणे देवा, कथावें सुव्रत । आचरीन सत्य यथासांग ॥३॥
निवेदिती मुनि प्राणिपीडा वर्ज्य । कदाही आक्रोश करुं नये ॥४॥
नख-रोमच्छेद अमंगल स्पर्श । तैसेंचि असत्य वर्ज्य व्हावें ॥५॥
जलावगाहन दुष्टसंभाषण । वस्त्रही मलिन त्याज्य सदा ॥६॥
धारितधारण करुं नये माला । उच्छिष्टान्न कदा सेवूं नये ॥७॥
पिपीलिकायुक्त कीं मांससंयुक्त । भद्रकालीदत्त अन्न वर्ज्य ॥८॥
वासुदेव म्हणे रजस्वला - शूद्र - । अन्न दृष्ट, स्पृष्ट भक्षूं नये ॥९॥

८६
अंजलीनें कदा प्राशूं नये जल । त्यजूनि अलंकार मौनहीन ॥१॥
अथवा कंचुकीरहित, उच्छिष्ट । त्यजूं नये गृह सायंकाळीं ॥२॥
मलिन, आर्द्रपाद तेंवी अपवित्र । तैसेंचि विवस्त्र शयन वर्ज्य ॥३॥
उत्तर पश्चिम दिशेप्रति उसें । करुनि निद्रेतें घेऊं नये ॥४॥
स्वच्छ शुभ्रवस्त्र नित्य सालंकार । शुचि सर्वकाळ असणें योग्य ॥५॥
प्रात:काळीं धेनु त्यापरी ब्राह्मण । लक्ष्मी नारायण आराधावे ॥६॥
गंध पुष्प माला वस्त्र उपायनें । सुवासिनी प्रेमें सन्मानावी ॥७॥
पतिध्यान पूजा व्हावी प्रतिदिनीं । रमावें या कर्मी एक वर्ष ॥८॥
पुरतील हेतु सत्कर्मानें ऐशा । वासुदेव वाचा मुनिची कथी ॥९॥

८७
परीक्षिती राया, निग्रहें दितीनें । व्रत आचरिलें यथाविधि ॥१॥
स्वीकारितां व्रत कळलें इंद्रासी । राहिला सेवेसी दितीच्या तैं ॥२॥
संमिधा दर्भ तैं पुष्पें फळें आणी । चिंती ध्यानीं मनीं अल्प न्यून ॥३॥
श्रांत एकदां ती सायंसमयासी । भोजन करितांचि झोंपीं गेली ॥४॥
पादप्रक्षालन नव्हतेंचि केलें । न्यून तें जाणिलें देवेंद्रानें ॥५॥
दिवस दितीसी गेले होते तदा । संधि ते देवेंद्रा दैवें लाभे ॥६॥
उदरीं दितीच्या शिरला देवेंद्र । केले सप्त खंड दितिगर्भाचे ॥७॥
वासुदेव म्हणे आक्रंदतां गर्भ । रडूं नको बाळ म्हणे इंद्र ॥८॥

८८
जिवंत ते खंड पाहूनियां इंद्र । सप्त सप्त खंड फिरुनि करी ॥१॥
प्रार्थिती तैं गर्भ जोडूनियां कर । देतसे अभय इंद्र तयां ॥२॥
न्यून एक अर्धशत ते अर्भक । राहिले जिवंत ईशेच्छेनें ॥३॥
इंद्रासवें सर्वां प्रसवली दिति । पाहूनियां त्यांसी विस्मित ते ॥४॥
पाहूनियां इंद्रा कथीं म्हणे वृत्त । इंद्र म्हणे मज क्षमा करीं ॥५॥
सदय दितीनें क्षमिलें तयासी । वंदूनि तिजसी गेला इंद्र ॥६॥
सख्यभावें इंद्ररुप ते पावले । स्वर्गामाजी नेलें इंद्रें तयां ॥७॥
वासुदेव म्हणे मरुद्गणवृत्त । कथिती समस्त शुक ऐसें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP