षष्ठ स्कंधाचा सारांश
या स्कंधांत अध्याय १९, मूळ श्लोक ८५१, त्यांवरील अभंग ९४
या स्कंधांत परीक्षितीच्या प्रश्नावरुन शुकमुनींनीं नरकयातना चुकविण्याचा उत्तम उपाय म्हणून ईश्वरभक्तीचा अवलंब करावा, असें सांगून दृष्टान्तासाठीं अजामिळाची कथा सांगितली आहे. अजामिळ हा मुळांत सत्प्रवृत्त ब्राह्मण होता. परंतु एका कामांध शूद्रीच्या कामचेष्टा पाहून तो विकारवश झाला व शेवटीं त्याच शूद्रीच्या अंकित झाला. तिच्या सहवासामुळें त्याला दुराचाराची चटक लागली व त्यामुळें तो धर्मभ्रष्ट झाला. तिच्या सहवासामुळें त्याला दुराचाराची चटक लागली व त्यामुळें तो धर्मभ्रष्ट झाला. पण त्याच्या धाकट्या व लाडक्या मुलांचें नांव भाग्यानें ‘नारायण’ असें असल्यामुळें मरतांना त्यानें नारायणाला प्रेमानें हाक मारिली. नारायणस्मरणामुळें यमदूतांस दटावून विष्णुदूतांनीं त्यांना परतविलें. तेव्हां अजामिळ शुद्धीवर आला. नंतर त्याला ईश्वराचा ध्यास लागून शेवटीं त्याचा उद्धार झाला. या कथेंत विष्णुदूत व यमदूतांचा संवाद व यमानें आपल्या दूतांचा केलेला संशयनिरास मोठा बोधप्रद आहे. पुढें दक्षाचा जन्म, हंसगुह्यस्तोत्र, दक्षाच्या हर्यश्च व शबलाश्व या नांवाच्या सहस्त्रावधि पुत्रांना नारदांनीं प्रपंचपराड्मुख केलें त्याचा इतिहास, तेव्हां दक्षानें नारदास दिलेला शाप या कथा सांगून पुढें दक्षकन्यांचे विवाह व त्यांच्या वंशांचें वर्णन केलें आहे. नंतर इन्द्रसभेंत देवगुरुंचा झालेला अपमान, दैत्यांची देवांवर स्वारी, विश्वरुपाचें देवपौरोहित्य व इन्द्रास नारायणकवचाचा लाभ व विश्वरुपाचा इंद्रहस्तें झालेला वध, अशा रम्यकथा सांगितल्या आहेत. नंतर ब्रह्महतेच्या पापाची वांटणी व वृत्रासुराचें संपूर्ण चरित्र कथन केलें आहे. वृत्रासुर हा जरी दैत्य असला तरी तो मोठा ज्ञानी होता. व शेवटीं दधीचि मुनींच्या अस्थींपासून तयार केलेल्या वज्रानें इंद्राकडून तो मारला गेला खरा, पण त्याला मोक्ष प्राप्त झाला. कारण तो पूर्वजन्मींचा एक परमभक्त गंधर्व असल्याची रम्य कथा येथें सांगितली आहे. या कथेंतील वृत्राचें व चित्रकेतूचें भाषण अभ्यसनीय आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 08, 2019
TOP