स्कंध ६ वा - अध्याय १४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


६३
राव म्हणे मुने, तमोगुणी दैत्य । केंवी मोक्षासक्त ऐसा झाला ॥१॥
देव मानवही विषयीं रंगती । कैसी ईशप्रीति जडली दैत्या ॥२॥
शुक निवेदिती रायासी वृत्तान्त । कथिती व्यासादिक तयांसी जो ॥३॥
शूरसेनदेशीं चित्रकेतु राजा । पुरवी तयाचा हेतु पृथ्वी ॥४॥
कोटि कांतांसीही संतान न तया । व्यथा ते हृदया सर्वकाळ ॥५॥
एकदां अंगिरा मुनि प्राप्त झाले । प्रेमें सत्कारिलें नृपाळें त्यां ॥६॥
विनम्र नृपाळ बैसे भूमीवरी । दयाळु अंतरीं मुनिश्रेष्ठ ॥७॥
वासुदेव म्हणे कुशल तयातें । पुशिती मुखातें अवलोकूनि ॥८॥

६४
चित्रकेतु तदा बोलला मुनींसी । पुत्रास्तव चित्तीं करितों चिंता ॥१॥
तदा मुनिश्रेष्ठ अंगिरा त्वष्टयातें । प्रार्थूनि राणीतें चरु देती ॥२॥
कृतद्युतीप्रति बोलले आनंद । जन्में, ज्याच्या खेद मरणें होई ॥३॥
ऐसा पुत्र तुज लाभेल निश्चयें । बोलूनियां स्वयें निघूनि जाती ॥४॥
योग्य वेळीं राणी प्रसवली पुत्रा । ऐकूनि ते वार्ता सकलां हर्ष ॥५॥
शृंगारिलें पुर केलें जातकर्म । केला दानधर्म । अपरिमित ॥६॥
हर्षित नृपाळ राणीसवें होई । आनंदासी नाहीं पारावार ॥७॥
वासुदेव म्हणे उत्कर्षशिखर । अपकर्षा मूळ तेंचि होई ॥८॥

६५
श्रेष्ठपदीं कृतद्युतीतें पाहूनि । सवतीच्या मनीं द्वेष वाढे ॥१॥
पुत्र न आपणा अवमानी नृप । सवतीचा उत्कर्ष, कारणें हीं ॥२॥
कारण दु:खासी मानूनि तो पुत्र । घालिती त्या विष परम द्वेषें ॥३॥
निद्रावश पुत्र पाहूनियां राणी । म्हणे, तदा झणीं दासींप्रति ॥४॥
पाहती जों दासी शुभ्र त्याचे नेत्र । अंग थंडगार बर्फासम ॥५॥
पाहूनि दासीचें कांपलें काळीज । राणीसी वृत्तान्त कथिला दु:खें ॥६॥
धांवूनियां राणी जाऊनी जवळी । पाहूनि पडली भूमीवरी ॥७॥
ऐकूनि वृत्तान्त मूर्छना रायासी । दु:खसागरासी भरती येई ॥८॥
वासुदेव म्हणे हर्ष तोचि शोक । शोक तोचि हर्ष समजे ज्ञाता ॥९॥

६६
कृतद्युति होई व्याकुळ शोकानें । म्हणे मूढ कर्मे विधात्याचीं ॥१॥
वृद्धांच्या समक्ष वधी हा युवकां । शत्रूचि हा लोकां वाटे मज ॥२॥
यद्यपि न जनीं जन्ममृत्युक्रम । फळ कर्मासम जरी लाभे ॥३॥
तरी कासयासी जगीं या विधाता । स्वयेंचि लंघिता स्वनियमांसी ॥४॥
स्नेहपाशेंचि या वृद्धि पावे सृष्टि । स्नेहपाश तोचि तोडितो हा ॥५॥
विधात्या, तूं कांरे कठोर झालासी । ओढूनि नेलासी पुत्र माझा ॥६॥
वासुदेव म्हणे मोकलूनि धाय । करीतसे माय शोक बहु ॥७॥

६७
बालकाच्या वदनीं हात । फिरवूनि म्हणे ऊठ ॥१॥
सोडूनि ही दीन गाय । जासी त्यागूनि हें काय ॥२॥
उघडीं एकदां नयन । पाहें आम्हां शोकमग्न ॥३॥
जाऊं नको यमासवें । बाळा, आम्हां उद्धरावें ॥४॥
ऊठ दावीं हास्यमुख । मज एकदां सुरेख ॥५॥
सवंगडी पाचारिती । ऊठ सौख्य दे तयांसी ॥६॥
येईं मज फुटला पान्हा । कां रे अद्यापि उठसी ना ॥७॥
गेलासि रे परलोकीं । ऐसें म्हणूनि अंग टाकी ॥८॥
समजावी कोण कोणा । मंदिरांत ऐसी दैना ॥९॥
वासुदेव म्हणे तेथ । आले अंगिरा नारद ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP