स्कंध ६ वा - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३७
निवेदिती शुक राया, परीक्षिता । स्वर्गांत एकदां येतां गुरु ॥१॥
उत्थापन नाहीं दिधलें इंद्रानें । सोडूनि सभेतें गुरु जाई ॥२॥
पश्चात्ताप तदा होई इंद्राप्रति । म्हणे माझी मति भ्रष्ट झाली ॥३॥
इंद्रानें गुरुसी मानूं नये ऐसे । कथील जो त्यातें न कळे धर्म ॥४॥
शरण मी आतां जाईन गुरुतें । कळतां गुप्तरुपें जाती गुरु ॥५॥
इंद्र येतां गुरुभेट नच होतां । करी बहु चिंता देवराज ॥६॥
वासुदेव म्हणे दैत्यांसी हें वृत्त । कळतांचि ते सिद्ध युद्धा होती ॥७॥

३८
दैत्याघातें देव घायाळ होऊनि । प्रार्थिती जाऊनि ब्रह्मदेवा ॥१॥
ब्रह्मा म्हणे विप्रअवमान ऐसा । दैत्यही करितां फंसले होते ॥२॥
शुक्रांचें रक्षण, मंत्र ज्यांचा गुप्त । माझेंही न त्यांस भय आतां ॥३॥
गोब्राह्मण तैं विष्णुकृपा जया । तोचि संकटीं या धीर तुम्हां ॥४॥
विश्वरुप त्वष्टापुत्र आत्मज्ञानी । प्रेम जरी मनीं दैत्यांचें त्या ॥५॥
शुश्रुषा तयाची करितां कार्यसिद्धी । ब्रह्मावच कथी वासुदेव ॥६॥

३९
विरंचीवचनें विश्वरुपाप्रति । जाऊनि भेटती देव हर्षे ॥१॥
अतिथि पातलों म्हणती तयांतें । पुरवीं इच्छेतें पितरांच्या ॥२॥
वेदचि आचार्य ब्रह्मदेव पिता । बांधव देवांचा राव इंद्र ॥३॥
माता ते धरणी दयाचि भगिनी । अतिथीसी ज्ञानी म्हणती धर्म ॥४॥
अभ्यागतमूर्ति अग्नीचि ते जाणा । भूतमात्रीं गणा आत्मरुप ॥५॥
शत्रुपराभवें पीडा त्वत्पित्यासी । यास्तव विनंती तुजसी एक ॥६॥
योजितों तुजसी उपाध्याय आम्हीं । सानही या जनीं वंद्य गुणें ॥७॥
वासुदेव म्हणे मंत्रज्ञ जो विप्र । सानही तो थोर म्हणती देव ॥८॥

४०
विश्वरुप बोले होऊनि प्रसन्न । देवांचे वचन ऐकूनियां ॥१॥
शिलोंछवृत्तीनें निर्वाह करुनि । राहतसों आम्हीं आनंदानें ॥२॥
सोडूनि तो मार्ग ब्रह्मतेजहानि । जेणें तया कर्मी प्रेम नसे ॥३॥
निंद्य पौरोहित्य परी तुम्हांस्तव । स्वीकारुनि कार्य करीन मी ॥४॥
लोकपाल तुम्हीं मागतां येऊनि । नकार देऊं मी कैसा तरी ॥५॥
यास्तव सर्वस्व लावूनि पणातें । करीन देवांचें सकळ कार्य ॥६॥
देवहेतु ऐसे पूरवूनि देई । विद्या ती वैष्णवी इंद्राप्रति ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसे उदारात्में । निरपेक्षपणें करिती कार्य ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP