स्कंध ६ वा - अध्याय १ ला
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१
व्यास शुकादीतें वंदूनियां षष्ठ । आरंभूं हा स्कंध आनंदानें ॥१॥
ईशकृपा तेणें लाभेल आपणा । येऊनि नरजन्मा धन्य होऊं ॥२॥
परीक्षिति म्हणे प्रवृत्ति निवृत्ति । मार्ग मजप्रति कथिले तुम्हीं ॥३॥
मन्वंतरें, वंश, भूगोल, खगोल । तैसेचि पाताल कथिले सर्व ॥४॥
कर्ममार्गी यदा अधर्माचरण । घडे भिन्न भिन्न नरक तदा ॥५॥
कथिले ते जेणें चुकतील ऐसी । निवेदावी युक्ति दयावंता ॥६॥
वासुदेव म्हणे रायालागीं शुक । करिती दिव्य बोध तोचि ऐका ॥७॥
२
मुनि बोलती नृपाळा । कर्मभोगें जो मोकळा ॥१॥
न करितां प्रायश्चित्त । नरक भोगणेंचि प्राप्त ॥२॥
यास्तव न जडे व्याधि । सावधान व्हावें तोंचि ॥३॥
राव म्हणे प्रायश्चित्त । घेऊनिही जो उन्मत्त ॥४॥
लाभ काय तयाप्रति । मुने, निवेदा मजसी ॥५॥
मुनि बोलले दयाळ । पापनाशार्थ समूळ ॥६॥
मार्ग अज्ञाननिवृत्ति । स्वस्वधर्म मार्ग त्यासी ॥७॥
वासुदेव म्हणे मुनि । बोध करिती घ्या ऐकूनि ॥८॥
३
स्वधर्मे पात्रता येतसे ज्ञानाची । पथ्यानें रोगाचीं गळती मुळें ॥१॥
सद्धर्मपालनें अधर्म न होई । स्वाधीन असावीं मन, बुद्धि ॥२॥
ब्रह्मचर्य सत्य निर्मळ अंतर । आदरावे थोर शम दम ॥३॥
अहिंसा तैं दान, शौच, जप, तप । आचरितां पाप नष्ट होई ॥४॥
वंशस्तंब जेंवी नष्ट करी अग्नि । धर्मे तैं जळूनि जाती पापें ॥५॥
आचरावीं कर्मे परी ईश्वरार्थ । साधन हें श्रेष्ठ पापनाशा ॥६॥
हाचि मार्ग ज्ञाते दाविताती नित्य । व्यर्थ प्रायश्चित्त भक्तीविण ॥७॥
मद्यपात्रशुद्धि न होई सरितांनीं । तैसेंचि या कामी प्रायश्चित्त ॥८॥
ईशपादपद्मीं मिलिंदायमान । निर्भय तो जाण पापमुक्त ॥९॥
वासुदेव म्हणे मुनिश्रेष्ठ आतां । निवेदिती कथा तेचि ऐका ॥१०॥
४
कान्यकुब्जदेशीं परस्त्रीलंपट । नामें एक विप्र अजामिळ ॥१॥
चौर्य, बलात्कार वंचनादि मार्गे । करी कुलटेचें संरक्षण ॥२॥
विंशति न्य़ून तीं शत वर्षे ऐसीं । लोटती तयाचीं दुष्कर्मानें ॥३॥
दासीपासूनि त्या पुत्र झाले दश । नारायण अंत्य पुत्रा नाम ॥४॥
लाडका तो त्यासी दिसे ध्यानीं मनीं । मृत्यूचेंही जनीं भान न त्या ॥५॥
व्याधिग्रस्त लागे मृत्यूच्या पंथासी । परी नित्य चिंती नारायण ॥६॥
शुद्धबुद्ध त्याची जातांही संबोधी । नारायणाप्रति सर्वकाळ ॥७॥
वासुदेव म्हणे नामाचें सामर्थ्य । कथिती रायास मुनि ऐका ॥८॥
५
अंतीं यमदूत घेऊनियां पाश । येती न्यावयास विप्रासी त्या ॥१॥
परी नारायणा विप्र मारी हांका । वृत्त विष्णुदूतां कळतां येती ॥२॥
निवारितां यमदूत म्हणती तयां । कोण कां लंघितां यमआज्ञा ॥३॥
चतुर्भुज तुम्ही कोण देव सांगा । क्रमितां स्वमार्गा प्रतिबंध कां ॥४॥
हांसूनि तैं विष्णुदूत तयांप्रति । धर्माचें म्हणती तत्त्व सांगा ॥५॥
धर्माचें लक्षण शिक्षापात्र कोण । निवेदा संपूर्ण नियम आम्हां ॥६॥
वासुदेव म्हणे विष्णुदूतांप्रति । धर्म निरुपिती यमदूत ॥७॥
६
कथिला जो वेदें म्हणावा तो धर्म । विपरीत कर्म अधर्म तो ॥१॥
स्वयंभू तो वेद साक्षात् नारायण । गुण-क्रमें जन स्वरुपीं निर्मी ॥२॥
सूर्य, चंद्र, अग्नि, आकाश तैं भूमि । हृदय यम जनीं दिवस-रात्र ॥३॥
संध्यासमय तैं धर्म हे जीवासी । पाप-पुण्य साक्षी सर्वकाळ ॥४॥
साक्षीनें तयांच्या अधर्माचें ज्ञान । फल कर्मासम योग्य जीवा ॥५॥
कर्मेचि न होतां टळे पापपुण्य । परी गुनावीण जीव नसे ॥६॥
यावत्काल गुण कर्मेही तोंवरी । चुके केंवी तरी कर्मफल ॥७॥
गुणवैचित्र्यानें स्वभाववैचित्र्य । इह तैं परत्र सहज होई ॥८॥
वासुदेव म्हणे निवेदिती धर्म । ऐका यमधर्मदूतश्रेष्ठ ॥९॥
७
वसंता पाहूनि शिशिराचें ज्ञान । पूर्वोत्तरजन्म कळती तेंवी ॥१॥
कर्मासम जन्म योजी तो ईश्वर । मानीतसे नर देहचि मी ॥२॥
तेणें पूर्वोत्तर जन्म न कळती । देहादि उपाधि बंधन त्या ॥३॥
पराधीनतेनें जीव करी कर्मे । स्वकीय तंतूनें कीट बद्ध ॥४॥
वासनावशेषें पुनर्जन्म पावे । ऐसें हें जाणावें भ्रमतें चक्र ॥५॥
ईश्वरभजन हाचि त्या उपाय । पूर्वी अजामिळ सदाचारी ॥६॥
पितृआज्ञेनें तो एकदां वनांत । आणावया दर्भ समिधा जाई ॥७॥
वासुदेव म्हणे दिसे कामचेष्टा । विप्रा त्या वरिष्ठा दैवयोगें ॥८॥
८
दर्भ-समिधादि घेऊनियां येतां । अवलोकी कामांधा एका शूद्रा ॥१॥
मद्यधुंद शूद्रीसवें होई रत । विकार तैं विप्र पावे मनीं ॥२॥
आंवरितांही त्या आंवरे न मन । उन्मत्त मोहून झाला बहु ॥३॥
दुराचारिणी ते मोही तयाप्रति । प्रपंचभारही सोशी तिचा ॥४॥
अंतीं स्वपत्नीचा करुनि अव्हेर । जाहला किंकर दासीचा त्या ॥५॥
तियेस्तव धन वेंचिलें पित्याचें । पुरवी दासीचे कोड बहु ॥६॥
अंतीं क्रूरकर्मे संपादूनि धन । रक्षी तिजलागून सपरिवार ॥७॥
पश्चात्तापदग्ध जाहलाचि नाहीं । प्रायश्चित्त कांहीं घेतलें न ॥८॥
यमसदनीं या नेतों याचिसाठीं । वासुदेव कथी पुढती ऐका ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 08, 2019
TOP