बाळक्रीडा - ६७६१ ते ६७६७

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७६१॥
धरियेलें रुप कृष्ण नाम बुंथी । परब्रह्म क्षिती उतरलें ॥१॥
उत्तम हें नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागीं भवनदी ॥२॥
दीनानाथ ब्रिदें रुळती चरणीं । वंदितील मुनि देव ऋषि ॥३॥
ऋषीं मुनीं भेटी दिली नायायणें । आणिक कारणें बहु केलीं ॥४॥
बहु कासावीस झाला भक्तांसाठीं । तुका ह्मणे आटी सोसियेली ॥५॥

॥६७६२॥
सोसियेली आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥
वाहोनी सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥
नेदी काळाचिये हातीं सेवकांसी । तुका ह्मणे ऐसी ब्रीदावळी ॥३॥

॥६७६३॥
ब्रीदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥१॥
सुखावे मेदिनी कृष्णाचिये चाली । कुंकुमें शोभलींख होय रेखा ॥२॥
होऊनी भ्रमर पाउलांचें सूख । घेती भक्त मुख लावूनियां ॥३॥
याचसाठीं धरियला अवतार । सुख दिलें फार निज दासां ॥४॥
निजसुख तुका ह्मणे भक्तां ठावें तिहींच जाणावें भोगूं त्यासी ॥५॥

॥६७६४॥
भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणि गोपाळां गाईवत्सां ॥१॥
गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरी ॥२॥
भक्ति नवविधा तयांसी घडली । अवघींच केली कृष्णरुप ॥३॥
रुप दाखविलें होतां भिन्न भाव । भक्त आणि देव भिन्न नाहीं ॥४॥
नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका ह्मणे आह्मांसहित गेला ॥५॥

॥६७६५॥
गेला कोठें होता कोठूनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥
आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥
कोठें नाहीं ऐसा नाहीं रिताठाव । अनुभवी देव स्वयें झाले ॥३॥
जातों येतों आह्मी देवाचे सांगात । तुका ह्मणे गात देवनाम ॥४॥

॥६७६६॥
मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धीटपणें सलगी देवा ॥१॥
वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भक्ति नेणें भाव नाहीं मनीं ॥२॥
नाहीं झालें ज्ञान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरीं नाहीं ॥३॥
नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसी ॥४॥
चतुरांच्या राया मी तुझें अंकित । झालों शरणागत देवदेवा ॥५॥
देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥६॥
तुझें देणें तुझ्या समर्पूनीं पायीं । झालों उतरायी पांडुरंगा ॥७॥
रंकाहुनी रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥८॥
बोलावया पुरे वाचा माझी कायी । तुका ह्मणे पायीं ठाव द्यावा ॥९॥

॥६७६७॥
चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूर्ति विठोबाची ॥१॥
चहुं युगांचे हें साधन साधिलें । अनुभवा आलें आपुलिया ॥२॥
एवढें करुनी आपण निराळा । प्रत्यक्ष हें डोळां दाखविलें ॥३॥
दावूनि सकळ प्रमाणाच्या युक्ति । जयजयकार करिती अवघे भक्त ॥४॥
भक्ति नवविधा पावली मुळची । जनार्दननामाची संख्या झाली ॥५॥
नवसें ओंव्या आदरें वाचितां । त्याच्या मनोरथा कार्यासिद्धि ॥६॥
सीमा न करवे आणीक ही सुखा । तुका ह्मणे देखा पांडुरंगा ॥७॥


N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP