फुगडया - ६७७९ ते ६७८०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७७९॥
फुगडी फू फुगडी घालितां उघटी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥
फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥२॥
मागें जें शिकली होतीस पोटीं । तेचि विचारुनी आतां उच्चारी ओठीं ॥३॥
त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरुनी धरी घाली मूळबंदीं गांठी ॥४॥
आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥५॥
तुका ह्मणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥६॥

॥६७८०॥
फुगडी फू सवती माझे तूं । हागुनी भरले धू तुझ्या ढुंगा तोंडावरी थू ॥१॥
फुगडी घेतां आली हरी । उठ जावो जगनोवरी ॥२॥
हात पाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती ॥३॥
सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥४॥
सरला दम पांगले पाय । अझुनी वरी घोळसी काय ॥५॥
तुका ह्मणे अझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP