मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|आख्यानें| ६७७० ते ६७७८ आख्यानें ६६६४ ते ६६६७ ६६६८ ते ६६८० ६६८१ ते ६६९० ६६९१ ते ६७०० ६७०१ ते ६७१० ६७११ ते ६७२० ६७२१ ते ६७३० ६७३१ ते ६७४० ६७४१ ते ६७५० ६७५१ ते ६७६० ६७६१ ते ६७६७ ६७६८ ते ६७६९ ६७७० ते ६७७८ ६७७९ ते ६७८० ६७८२ ते ६७८७ ६७८८ ते ६७९८ ६७९९ ते ६८१७ ६८१८ ते ६८२९ ६८३० ते ६८६९ ६८७० ते ६९१४ ६९१५ ते ६९२४ ६९२५ ते ६९३० ६९३१ ते ६९३४ कोडें - ६७७० ते ६७७८ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत कोडें - ६७७० ते ६७७८ Translation - भाषांतर ॥६७७०॥कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनी फार राहे गुंतोनियां थोडें ॥१॥पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झंवे आपुली आई ॥२॥सांगतों हें मूळ कांही न धरावी खंती । झालें जीवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥३॥तुका ह्मणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥४॥॥६७७१॥नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालूनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥१॥आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥२॥कमाईस मोल येथें नका रीस मानूं । निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥३॥तुका ह्मणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥४॥॥६७७२॥हरुष आनंदाचा । घोष करा हरिनामाचा ॥ कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित ॥ होईल करीत । आला अधिकारी तो ॥२॥काय पाहतां हे भाई । हरुषें नाचा धरा घाई ॥ पोटभरीं कांहीं । घेतां उरी न ठेवा ॥३॥जे सुख दृष्टी आहे । तेंच अंतरीं जो लाहे ॥ तुका ह्मणे काय । कळिकाळ तें बापुडें ॥४॥॥६७७३॥अवघे गोपाळ ह्मणती या रे करुं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला ॥नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरेंच बोला । वंची वंचला तोचि रे येथें भोवंडला त्याला ॥१॥घेतल्यांवाचूण झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं ॥ताका सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥२॥एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनी मोटा । एक सोडितिल गाठी रे एक चालती वाटा ॥एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करुनि आराले आतां ऐसेंचि घाटा ॥३॥एकीं स्थिरावल्या गाई रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती ॥एकें चारावोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला ह्मणती एक हुंबरी घेती ॥४॥एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें ॥गांठीचें तें सांडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोडी रे भार वाहतां मेलें ॥५॥एक ते माया गुंतलें घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीच ठावें ॥जैसें होतें शिळें संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचूनी मग पडिलें ठावें ॥६॥एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा ॥एकते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुद्धि रे केला अवघ्यां वाखा ॥७॥तुका ह्मणे आतां कान्होबा आह्मां वांटोनी द्यावें । आहें नाहीं आह्मांपाशीं तें तुअ आवघेंचि ठावें ॥मोकलितां तुह्मी शरण आह्मी कवणासी जावें । कृपावंतें कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥८॥॥६७७४॥बैसवूनी फेरी । गडियां मध्यभागीं हरी ॥ अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥१॥पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥२॥बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचें घ्यावें ॥ एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥३॥तुका ह्मणे देवा । बहु आवडीचा हेवा ॥ कोणाचिया जीवा । वाटों नेदी विषम ॥४॥॥६७७५॥आह्मां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें ॥ नाहीं अनारिसे । कान्होबाचे अंतरीं ॥१॥पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना ॥ कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥२॥खेळ खेळे न पडे डाई । ज्याचा भार त्याच्या ठायीं ॥ कोणी पडतील डाई । कोणी कोडीं उगविती ॥३॥तुका ह्मणे कवळ । हातीं घेऊनी गोपाळ ॥ देत ज्यांचें बळ । त्यांसी तैसा विभाग ॥४॥॥६७७६॥काम सारुनी सकळ । आले अवघे गोपाळ ॥ झाली आतां वेळ । ह्मणती आणा सिदोर्या ॥१॥देती आपुलाला झाडा । माई बैसविल्या वाडां ॥ दोंदिल बोबडा । वांकडयाचा हरि मेळीं ॥२॥आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥३॥भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी ॥ सकळांचे संदीं । ओझीं अवघीं उतरलीं ॥४॥मागे जो तांतडी । त्यासी रागा येती गडी ॥ तुह्मी कांरे कुडी । येथें मिथ्या भावना ॥५॥एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रह्मानंदें ॥ तुका ह्मणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥६॥॥६७७७॥यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्या सकळी । काला करुं आजी ॥अवघें एके ठायीं । करुनी स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हांमाजी देतों ॥१॥ह्मणती बरवे गोपाळ । ह्मणती बरवे गोपाळ । वाहती सकळ । मोहरी पांवें आनंदें ॥खडकीं सोडियेल्या मोटा । आवघा केला एकवटा । काळा वंदूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥२॥एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिकचि वाटे ॥ ह्मणती गोड झालें । ह्मणती गोड झालें । आणिक देई । नाहीं पोठ धालें ॥३॥हात नेतो मुखापासीं । येर अशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ॥देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं ॥ धरुनी काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥४॥ह्मणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा ॥ दुम करितो शाहणा । पाठोवाटीं तयाच्या ॥अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय ॥ सुरवर ह्मणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥५॥एक एका मारी । दुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । ह्मणे पुरे आतां ॥ येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । ह्मणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥६॥आनंदाचे फेरी । माजी घालूनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे ॥वांकडे बोबडे । खडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥७॥करी कवतुक । त्यांचे देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे ॥एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥८॥नाहीं ज्याची गेली भूक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखेंचि हरि ॥ह्मणती भला भला हरी । तुझी संगति रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥९॥गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । झालें यमुनेंचे स्थिर । जळ वाहों ठेलें ॥देव पाहाती सकळ । मुखें घोटुनियां लाळ ॥ धन्य ह्मणती गोपाळ । धिग झालां आह्मी ॥१०॥ह्मणती कैसें करावें । ह्मणती कैसें करावें । यमुनाजळीखं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया ॥सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिकचि होंठ ॥ मटमटां वाजवी ॥११॥आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । ह्मणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी ॥म्हणती जाणें जेवीचें । ह्मणती जाणी जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥१२॥धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझियानि हातें ॥मानवले गडी एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥१३॥तुझासंग बरवा । नित्य आह्मां द्यावा । ऐसें करुनी जीवा । नित्य देवा चालावें ॥ तंव ह्मणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । अता जाऊं खेळीमेळीं । गाई चारावया ॥१४॥तुका ह्मणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसी केली । आपण यांसरी ॥आजी झाला आनंद । आजी झाला आनंद । चाले परमानंद । सवें आह्मांसह्ति ॥१५॥॥६७७८॥या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनिंचा ॥१॥वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त झालें चंचळ ॥२॥उरलें तें सांडा काम नका करुं गोवी । हेचि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥३॥निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाईट ॥४॥कृष्णभेटी आड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन झालें उदास ॥५॥एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका ह्मणे देवें रुपें केल्या तन्मय ॥६॥ N/A References : N/A Last Updated : June 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP