काला चेंडूफळी - ६७६८ ते ६७६९

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७६८॥

झेला रे झेला वरचेवर झेला । हातिंचे गमावी तो पाठी साहे टोला ॥१॥
त्रिगुणांचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥२॥
आगळा होऊनि धरि वरिचिया वरी । चपळ तो जिंके गांढया ठके येरझारीं ॥३॥
हातीं सांपडलें उभें बैसो नेदी कोणी । सोरी मागें सोरी घेती ओणवें करुनी ॥४॥
डाई पडिलिया सोसी दु:खाचे डोंगर । पाठीवरी भार भोंवताही उभा फेर ॥५॥
तुका ह्मणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकितो हरीसी कोणी एका तरी काळें ॥६॥

॥६७६९॥
अझुनि कां थीर पोरा न ह्मणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥१॥
मोकळा होतासी कां रे पडिलासी डाई । वरिलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥२॥
मेळवूनी मेळा एकाएकीं दिली मिठी । कवळिलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥३॥
तळी तें वरीं वरील तें येतें तळा । न सुटे तोंवरी येथें गुंतलिया खेळा ॥४॥
सांडितां ठाव पुढें सईल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥५॥
तुका ह्मणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरें वरी न ये डाय ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP