बाळक्रीडा - ६७०१ ते ६७१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६७०१॥
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनी ॥१॥
खेळ मांडियेला यमुनें पाबळीं । या रे चेंडूफळी खेळूं आतां ॥२॥
आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनियां वांटी गडिया गडी ॥३॥
गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण ह्मणे दुजा ॥४॥
जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसी उपाव तोचि सांगे ॥५॥
सांगे सकळांसी व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुह्मी माझा ॥६॥
मज हा नलगे आणीक सांगाती । राखावी३ बहुतीं हाक माझी ॥७॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेका ॥८॥
एका समतुकें अवघेचि राहा । जाईल तो पाहा धरा चेंडू ॥९॥
चेंडू धरा ऐसें सांगतों सकळां । आपण निराळा एकलाचि ॥१०॥
चिंतुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळीक पाहातचि ॥११॥
पाहातचि ठेलीं न चलतां कांहीं । येरु लवलाहीं ह्मणे धरा ॥१२॥
धरावा तयानें त्याचें बळ ज्यासी । येरा आणिकांसी लाग नव्हे ॥१३॥
नव्हे काम बळ बुद्धि नाहीं त्याचें । न धरवे निचे उंचाविण ॥१४॥
विचारीं पडिले देखोनी गोपाळ । या ह्मणे सकळ मजमागें ॥१५॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥१७॥
यामागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥१८॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तयामागें त्यांचे तेचि हाल ॥१९॥
हाल दोघां एक मोहरा मागिलां । चालतां चुकला वाट पंथ ॥२०॥
पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥२१॥
वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥२२॥
सिकविलें हित नाइके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥२३॥
नये तेंचि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तोचि खरा ॥२४॥
रानभरी झाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥
लाज सांडुनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठीच्या ॥२६॥
चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती । तया अति प्रीति गोपाळांची ॥२७॥
गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें ॥२८॥
सोयी धरुनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभाळिलें ॥२९॥
सांभाळिलें तुका ह्मणे सकळांहि । सुखी झाले तेही हरिमुखें ॥३०॥

॥६७०२॥
मुखें सांगे त्यांसी पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥१॥
माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥२॥
जळांत पाहातां हाडति या दृष्टि । ह्मणे जगजेठी ऐसें नव्हे ॥३॥
नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥४॥
वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । ह्मणती गोपाळा आतां कैसें ॥५॥
कैसें करुनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥६॥
डोहो बहु खोल काळ्या भीतर । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥७॥
जयाचें कारण तयासीच ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥८॥
त्यासी नारायण ह्मणे रहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥९॥
वरी जातां हरि पाहाती गोपाळ । ह्मणती सकळ आह्मी नेणों ॥१०॥
नेणों ह्मणती हें करितोसी कायी । आह्मां तुझी आई देईल सिव्या ॥११॥
आपुलिया कानां ठेवूनियां हात । सकळीं निमित्य टाळियेलें ॥१२॥
निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥१३॥
खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडु तळीं ॥१४॥
तळील नेणती तुका ह्मणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥१५॥

॥६७०३॥
नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥
न पुरेसा हात घाली चेंडुकडे । ह्मणीतलें गडे सांभाळावें ॥२॥
सांभाळ करिता सकळां जीवांचा । गोपाळांसी वाचा ह्मणे बरें ॥३॥
बरें विचारुनी करावें कारण । ह्मणे नारायण बर्‍या बरें ॥४॥
बरें म्हणऊनी तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडु तळा ॥५॥
तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडत येती घरा ॥६॥
येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥७॥
पुसती ते मात आप आपल्यासी । हरिदु:खे त्यांसी न बोलवे ॥८॥
न बोलवे हरि बुडालासे मुखें । कुटितील दु:खे उर माथे ॥९॥
मायबापें तुका म्हणे न देखती । ऐसें दु:ख चित्तीं गोपाळांच्या ॥१०॥

॥६७०४॥
गोपाळां उभडु नावरे दु:खाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥
झालें काय ऐसें न कळे कोणासी । ह्मणती तुह्मांपासीं देव होता ॥२॥
देवासवें दु:ख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥३॥
आजी दिसे हरि फांकला यांपाशी । ह्मणऊनी ऐशी परी झाली ॥४॥
जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि । शहाणे तयांसी कळों आलें ॥५॥
कळों आलें तिहीं फुंद शांत केला । ठायींचाच त्यांला थोडा होता ॥६॥
होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥७॥
सांगे आतां हरि तुह्मां आम्हां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥८॥
यासी अवकाश नव्हेचि पुसतां । झालिया अनंता कोण परी ॥९॥
परी त्या दु:खाची काय सांगो आतां । तुका ह्मणे माता लोकपाळा ॥१०॥

॥६७०५॥
पाषाण फुटती तें दु:ख देखोनी । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥
काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥
एकांचिये डोळां असूं बाह्यात्कारीं । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥३॥
जळतील एकें अंतर्बाह्यात्कारे । टाकिली लेंकुरें कडियेहूनी ॥४॥
निवांत चि एकें राहिलीं निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥५॥
त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥६॥
वांचणें ते आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरीसवें ॥७॥
सवें घेऊनियां चाललीं गोपाळां । अवघींच बाळा नर नारी ॥८॥
नर नारी नाहीं मनुष्याचें नांव । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥९॥
सांडियेली अन्ने संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरुनी जाती ॥१०॥
तिरीं माना घालुनियां उभ्या गाई । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥११॥
यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली । दु:खें कोमाइलीं कृष्णाचिया ॥१२॥
यांचें त्यांचे दु:ख एक झालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥१३॥
मायबाप तुका ह्मणे सदोदर । तोंवरीच तीर न पवतां ॥१४॥

॥६७०६॥
तीर देखोनियां यमुनेचें जळ । काठींच कोल्हाळ करिताती ॥१॥
कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासी ओढी भय मागें ॥२॥
मागें सरे माय पाउलापाउलीं । आपलेंच घाली धाकें अंग ॥३॥
अंग राखोनियां माय खेद करी । अंतरींचें हरी जाणवलें ॥४॥
जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका ह्मणे कुडी भावना हे ॥५॥

॥६७०७॥
भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥१॥
पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥२॥
न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥३॥
अंतरला बहु बोलतां वाउगे । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥४॥
गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडतीं तीं ॥५॥
तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥६॥
मायाबापांची तों ऐसी झाली गति । तुका ह्मणे अंतीं कळों आलें ॥७॥

॥६७०८॥
आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणासाठीं होता ॥१॥
होता भाव त्यांचा पाहोनी निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥
आधीं पाठीमोरीं झालीं ती सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥३॥
दिली हाक त्याणें जाऊनी पाताळा । जागविलें काळा भुजंगासी ॥४॥
भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥५॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करुन चेंडुवाचें ॥६॥
चेंडुवाचे मिसें काळ्या नाथावा । तुका म्हणे देवा कारण हें ॥७॥

॥६७०९॥
काळ्याचे मागे चेंडू पत्नीपाशीं । तेज:पुंज राशी देखियेला ॥१॥
लावण्यपुतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥
उगवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥३॥
पाहिला सकळ तिनें न्याहाळूनी । कोण या जननी विसरली ॥४॥
विसरु ही तीस कैसा याचा झाला । जीवाहूनी वाला दिसतसे ॥५॥
दिसतसे रुप गोजिरें लहान । पाहतां लोचन सुखावले ॥६॥
पाहिलें पर्तोनी काळा दुष्टाकडे । मग ह्मणे कुडें झालें आतां ॥७॥
आतां हा उठोनी खाईल या बाळा । देईल वेल्हाळा माय जीव ॥८॥
जीव याचा कैसा वांचे ह्मणे नारी । मोहिली अंतरीं हरीरुपें ॥९॥
रुपें अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥

॥६७१०॥
ह्मणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥१॥
त्याचें आइकोन निष्ठुर वचन । भयाभीत मन झालें तिचें ॥२॥
तिची चित्तवृत्ति होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥
वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आह्मांवरी ॥४॥
वरी उदकास अंत नाहीं पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥
संचारकरुनी कोण्या वाटे आला । ठायींच देखिला अवचिता ॥६॥
अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥
मोठयानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥
जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥
यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळ्याकृतांतधुधुकारें ॥१०॥
कारणें ज्या येथें आला नारायण । झालें दरुषण दोघांमध्यें ॥११॥
दोघांमध्यें झाले बोल परस्परें प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥
चिंतावला चित्तीं तोंडें बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥
झाला सावकाश झेंप घाली वरी । तंव हाणे हरि मुष्टिघातें ॥१४॥
तेणें काळें त्यासी दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव आला ॥१५॥
आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुत नागकुळें ॥१६॥
कल्हारीं संधानीं वेष्टियेला हरि । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥
यांस तुका ह्मण नाहीं भक्ताविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥


N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP