भाद्रपद वद्य १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
क्रांतिवीर नानासाहेब यांचें निधन !
शके १७८० च्या भाद्रपद व. १४ रोजीं सत्तावनच्या स्वातंत्र्ययुद्धांत चमकणारे ‘बंडवाले’ नानासाहेब यांचा मृत्यु झाला. सन १८५७ च्या डिसेंबरांत कानपूरची लढाई होऊन बंडवाल्यांचा पराभव झाला. आणि नानासाहेबांस लखनौच्या बेगमेच्या आश्रयानें रहावें लागलें. नंतर तेथूनहि पेशवे मंडळींना नेपाळांत जाण्याचा प्रसंग आला. या कष्टदायक प्रवासांत त्यांचे फारच हाल झाले. इंग्रजांना शरण जाण्यास नाना तयार नव्हते. - "पुणे व सातारा ही जहगिरी परत मिळाल्याशिवाय शस्त्रें खालीं ठेवणार नाहीं. हिंदुस्थानचें राज्य गिळंकृत करुन उलट मलाच बंडखोर ठरविण्याचा नाहीं. हिंदुस्थानचें राज्य गिळंकृत करुन उलट मलाच बंडखोर ठरविण्याचा अधिकार इंग्रजांना काय आहे ? -" अशी धमक अजूनहि त्यांच्या अंगीं होती. पण नानासाहेब प्रकृतीनें फार हैराण झाले होते. एके दिवशीं मनास अति वाईट वाटून त्यांनीं कालीमातेला आपल्या करांगुलीचा होम केला; आणि अभीष्टसिद्धर्थ प्रार्थना केली. जंगलांतील हवेमुळें नानासाहेबांस दोषी ताप येऊं लागला; व अखेर भाद्रपद व. १४ रोजीं वनवास भोगीत असतांच देवखरी येथील रानांत एका निर्झराच्या कांठी नानासाहेब हिवतापानें मृत्यु पावले ! नानासाहेबासंबंधीं स्वातंत्र्यवीर सावरकरांनीं लिहिलें आहे : "नाना म्हणजे हिंदभूचा साक्षात् क्रोधच. नाना म्हणजे या भूमीचा नरसिंहमंत्रच. जणुं कांहीं या एका गुणामुळेंच, ज्याचे बल भीमासारखें आहे, ज्याच्या डोक्यावर मुकुट शोभतो आहे, ज्याचे तेजस्वी नी तल्लख डोळे, दुखावलेल्या स्वाभिमानामुळें आरक्त झाले आहेत, ज्याच्या कमरेला तीन लाख रुपये किंमतीची म्यानांतूण बाहेर पडण्यास आसुसलेली तरवार लटकत आहे आणि ज्याचा सबंध देह क्रोधानें, आणि स्वराज्य नि स्वधर्म यांचा सूड घेण्याच्या तीव्र आकांक्षेनें खदिरांगार झाला आहे, त्या नानाची भव्य नि आकर्षक मूर्ति आपल्या डोळ्यांपुढें उभी राहते." नानासाहेब पेशव्यांनीं क्रांतिकारकांना मिळून बरीच मोठी कामगिरी केली, परंतु दुर्दैवानें त्यांना यश आलें नाहीं.
- ६ आँक्टोबर १८५८
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2018
TOP