भाद्रपद वद्य १

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


बाजीराव पेशव्यांचा जन्म !

शके १६२२ भाद्रपद व. १ ह्या दिवशी ‘हिंदुपदपातशाही’ स्थापन करणारे प्रतापी पेशवे श्रीमंत बाजीरावसाहेब यांचा जन्म झाला ! पहिले बाजीराव म्हणजे पराक्रमाचा मूर्तिमंत पुतळाच. त्याचें संबंध जीवितच मराठी राज्याचा विस्तार करण्यांत गेलें. ‘निजाम, नवाब, इत्यादि लहान लहान सत्ताधीशांशी भांडत बसण्यांत अर्थ नाहीं. एकदम दिल्लीचाच रोख धरिला पाहिजे. कारण मूळ उपटलें कीं फांद्या खालीं येतील.’ अशी बाजीरावाची धमक होती. आणि म्हणूनच उत्तरेच्या राज्यकारभाराकडे त्यांनीं अधिक लक्ष पुरविलें. भोपाळ, पालखेड साखरखेडले, मंगीशेगांव, इत्यादि अनेक ठिकाणांवर बाजीरावानें वेळोवेळीं निजामाचा पराभव केला आहे आणि उत्तर हिंदचे राजकारणहि त्यानें सांभाळलें होतें. बाजीराव जर उत्तरेत घुसला नसता तर ? - " पुनश्चा एखादा अल्लाउद्दीन खिलजी, अकबर किंवा औरंगजेब उत्तरेकडची प्रचंड सेना घेऊन दक्षिणेत उतरला असता. बाजीरावानें आपल्या अद्भुत पराक्रमाने ही आपत्ति दूर केली. बाजीरावानें आपल्या अद्भुत पराक्रमानें ही आपत्ति दूर केली. बाजीरावानें भीमथडीची तट्टें नर्मदापार नेल्यापासून उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेंत यावयाचे कायमचे बंद झाले. - " निजामाला बाजीरावाचा दरारा फारच वाटे. रजपूत वकील दीपसिंह निजामाच्या भेटीस गेला होता. तो नुकताच पेशव्यांना भेटून आल्यामुळें निजामानें विचारलें, " - पेशव्यांच्या दरबारांत मातबर असें कोण आहे ? "त्यावर दीपसिंगजींनीं उत्तर दिल्हे जे सिवाथे बाजीराउजी आणिक कोन्ही सत्यवचनी अगर प्रामाणिक अगर पोख्तकारी अगर चलनसाहेब फौज (मोठी फौज उभी करुं शकेल असा) दुसरा दिसत नाहीं. - " अशा ह्या सैनिक पेशव्याचें निधन त्याला साजेल असेंच लष्करी छावणींत रावेर येथें झालें. बाजीरावाच्याच पराक्रमामुळें हिंदुपदपातशाहीची स्थापना झाली. नंतरच्या काळांत मराठ्यांचा भगवा झेंडा सर्व उत्तर हिंदुस्थानांत फडकला आणि मराठेशाहीचा प्रभाव सर्व भारतांत पडूं लागला याचें बरेंचसे श्रेय पहिले बाजीराव यांनाच द्यावें लागेल.
- १८ आँगस्ट १७००

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP