भाद्रपद शुद्ध ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
(१) ऋषिवर्यांचे पुण्यस्मरण !
भाद्रपद शु. ५ हा दिवस ऋषिपंचमी म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषत: स्त्रिया या दिवशी ऋषींचे पूजन करीत असतात. या पूजेच्या संबंधी भविष्योत्तर पुराणांत ज्या एकदोन कथा आहेत त्या अगदींच पोरकट आहेत. स्त्रीनें आपल्या पावित्र्यासाठी ऋषिपंचमीस ऋषिपूजन करावें म्हणजे रजस्वला असतांना तिच्या हातून कांही पातक घडल्यास दोषपरिमार्जन होतें, असा संकेत आहे. बंगाल प्रांतांतहि अशीच समजूत आहे. तिकडे आषाढांत तीन दिवस पृथ्वी रजस्वला समजतात. या काळांत जमीन कोणी पेरीत नाहीं की खणीतहि नाहीं. या दिवसाचें खरें महत्व समजावून घेणें आवश्यक आहे. सुमारें सातआठ हजार वर्षापूर्वी भारताच्या वायव्येस राहणारे आर्य लोक पंजाबांत आले. आणि त्यांनी आपणांस साह्य करणार्या इंद्र,रुद्र,विष्णु, इत्यादि प्रसिद्ध शक्तींना देव मानून त्यांचे गुणगान सुरु केलें. या प्रार्थनापर स्तोत्रांसच वेद किंवा श्रुति अशी संज्ञा मिळाली. "वेदांतील सूक्तें ज्या महापुरुषांनीं रचिली व गायिली त्यांस ऋषि ही बहुमानार्थी संज्ञा देण्यांत आली. -" ऋषींनी वेदरक्षण करुन त्यांतील धर्माचा प्रसार केला. त्याच ऋषींचें आपण अनुयायी आहोंत. संध्यावंदनाचे वेळी आपल्या गोत्राचा उच्चार करुन आपला संबंध प्राचीन ऋषींशी आहे याची स्मृती आपण ताजी ठेवीत असतों. या प्राचीन ऋषींपैकीं जे महर्षि विशेष प्रसिद्धीस आले त्यांचीं नांवे चिरस्मरणीय व्हावींत म्हणून उत्तरेकडील ध्रुवाभोंवती प्रदक्षिणा घालीत आहेत अशा भासणार्या नक्षत्रपुंजांतील सात नक्षत्रांना ऋषींची व एकास एका ऋषिपत्नीचें, अशीं नांवें देण्यांत आलीं आहेत. त्यांना सप्तर्षि असें म्हणतात. त्यांची नांवें - कश्यप, भारद्वाजविश्वामित्र, गौतम, जमदग्नि वसिष्ठ व अत्रि हीं असून त्यांपैकी वसिष्ठाच्या पत्नीचें नांव अरुंधती असें आहे. या ऋषींचे पुण्यस्मरण या दिवशीं करावयाचें असतें. अरविंदबाबू घोष यांनीं ऋषींच्याविषयीं म्हटलें आहे - "Rishi is not great by what he was himself; but by what he has expressed !"
-------------
(२) डाँ. भांडारकर यांचें निधन !
शके १८४७ च्या भाद्रपद शु. ५ या दिवशीं जगप्रसिद्ध ’महाराष्ट्रीय संस्कृत पंडित व प्राच्यविद्यासंशोधक डाँ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचें निधन झालें. मालवण, राजापूर व रत्नागिरी येथें प्रारंभीचें शिक्षण झाल्यावर भांडारकर मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मँट्रिक झाले; त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे एम.ए. झाल्यावर हे सिंध, हैद्राबाद येथें एका हायस्कूलचे हेडमास्तर होते. याच वेळी यांनी आपलीं संस्कृतचीं दोन पुस्तके प्रसिद्ध केलीं. नंतर मुंबई येथें एल्फिन्स्टन काँलेजमध्यें भांडारकर संस्कृतचे प्रोफेसर झाले. पुढें डेक्कन काँलेजमधील किलहाँननंतर संस्कृतची जागा यांना मिळाल्यावर हे तेथेंच कायम राहिले. इंडियन अँण्टिक्केरींतून पतंजलीच्या कालासंबंधी वेबरशीं केलेला वादविवाद म्हणजे यांचें प्रारंभीचें संशोधन होय. यानंतर यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे हे मुंबई सरकारच्या हस्तलिखित खात्याचे संपादक असतांना त्यांनी केलेले संशोधन ही होय. प्राचीन वैष्णव पंथ, काश्मिरांतील शैव सांप्रदाय आणि रामानुजांचें तत्वज्ञान यासंबंधींचें यांनीं पुष्कळच संशोधन केलें. मुंबईच्या विल्सन फायलाँलाँजिकल लेक्चर्सची पहिली व्याख्यानमाला यांनींच गुंफिली. ६ जुलै १९१७ रोजीं यांच्या नांवानें स्थापन झालेल्या पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रीसर्च इन्स्टिट्यूटचा उद्घाटनसमारंभ त्या वेळचे मुंबईचे गव्हर्नर लाँर्ड विलिंग्डन यांच्या हस्तें झाला. ओरिएंटल काँन्फरन्सच्या पहिल्या अधिवेशनाचें अध्यक्षस्थान यांनींच विभूषित केलें होतें. भारतासंबंधी पाश्चात्य देशांत जे गैरसमज पसरलेले होते ते दूर होण्यास भांडारकरांचे कार्य मोठ्या प्रमाणावर कारणीभूत झाले. Age of Maharashtra, Allussions to Krishna in Patanjali's Mahabhashya, The Nasik Inscriptions इत्यादि यांचे प्रमुख निबंध आहेत. शैव, वैष्णव पंथांसंबंधींचा सुसंगत इतिहास यांच्याच ग्रंथांवरुन ज्ञात झाला आहे.
- २४ आँगस्ट १९२५
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP