भाद्रपद वद्य ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
धोंडोजी वाघाचा मृत्यु !
शके १७२२ च्या भाद्रपद व. ७ रोजीं प्रसिद्ध पुरुष धोंडोजी वाघ हा इंग्रजांकडून ठार झाला. मराठेशाहीच्या पडत्या काळांत दक्षिणेंत धोंडोजी वाघाचें मोठेंच प्रस्थ होतें. याचें मूळचें आडनांव पवार असें असून सिधोजी व बहिरजी पवार हे दोघे बंधु आदिलशाहीच्या नोकरीस होते. अनागोंदीजवळ कृष्णाकांठच्या रानांतून बंधु आदिलशाहीच्या नोकरीस होते. अनागोंदीजवळ कृष्णाकांठच्या रानांतून यांनी वाघिणीचें दूध आणून दिल्याबद्दल सुलतानानें त्यांस ‘वाघ’ हा किताब दिला. धोंडोजी वाघ हा प्रथम कांही दिवस पटवर्धन व करवीरकर यांच्या फौजेत चाकरीस होता. टिपू व मराठे यांच्या मुलखांत धोंडोजीनें अनेक प्रसंगी दंगेधोपे करुन लुटालूट केली. शेवटीं टिपूणें याला कैदेंत ठेविलें. टिपू मेल्यानंतर त्याचें राज्य इंग्रजांकडे आलें. त्या वेळीं सर्व कैद्यांना मुक्त करण्यांत आलें. त्यांत धोंडोजी वाघहि सुटला; लागलीच जमवाजमव करुन इंग्रजांनाहि उपद्रव देण्यास यानें सुरुवात केली. जनरल आर्थर वेलस्ली हा टिपूच्या राज्याच्या बंदोबस्त पाहत होता. तुंगभद्रेच्या दक्षिणेस पुंडाई करणार्या धोंडोंजीचें पारिपत्य करण्याचें इंग्रजांनीं ठरविलें. पटवर्धन, इंग्रज व धोंडोपंत गोखले यांच्या फौजा एकत्र झाल्या. परंतु वाघानें मोठ्या धोरणानिशीं गोखल्यांच्या फौजेचा पराभव केला धोंडोजीची प्रतिष्ठा फारच वाढली. वाघाचें शिर आणून देणारास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झालें ! इंग्रज आणि पटवर्धन यांनीं मोठी योजना आंखून चोहों बाजूंनीं वाघास कोंडण्याचा विचार केला. हे वृत्त धोंडोजीस समजलेंच. लागलीच तो मलप्रभेचा कांठ सोडून पूर्व दिशेस कृष्णा-तुंगभद्रा यांच्या दरम्यान रायचूरच्या दुआबांत शिरला. मागून त्याचा पाठलाग होत होता. शेवटीं कोठेंहि जाण्यास अवकाश राहिला नाहीं तेव्हां भाद्रपद व. ७ रोजीं धोंडोजी वाघ ठार झाला. " वाघ रात्रीसच पळून जातो कीं काय या धसक्यामुळें इंग्रजांना चैन नव्हतें .... पहांटेस कूच करुन वस्लीनें सूर्योदयास भन्नूर येथें वाघास गांठलें. तो लगेच तयार होऊन लढाईस उभा राहिला. लढाईत तीन गोळ्या लागून वाघ ठार झाला. फौज उधळून गेली."
- १० सप्टेंबर १८००
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP