भाद्रपद शुद्ध १५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


गोवध-बंदीचे फर्मान !

शके १७११ च्या भाद्रपद शु. १५ रोजीं मराठेशाहींतील प्रसिद्ध शूर, मुत्सद्दी महादजी शिंदे यांनी समग्र हिंदुस्थानांत गोवध मनाई करण्यासंबंधीचें फर्मान बादशहापासून मिळविलें. मराठी साम्राज्याचा विस्तार धर्म व संस्कृति यांच्या रक्षणासाठींच होता. यावनी आक्रमणांत भ्रष्ट झालेलीं देवस्थानें सोडविणें हें एक कर्तव्यकर्म मराठ्यांना होऊन बसलें होतें. काशी, प्रयाग, मथुरा, अयोध्या हीं पवित्र स्थानें स्वत:च्या ताब्यांत असावींत, इस्लामी शत्रूचा उपद्रव यांना मुळींच होऊं नये यासाठीं मराठे नेहमीं दक्ष असत. मथुरा, शहरीं महादजी शिद्यांचा सात वर्षांचा काळ गेल्यामुळें त्यांचें तें आवडतें शहर झालें होतें. खुद्द महादजी हेहि धार्मिक मनोवृत्तीचे होते. त्यामुळें मथुरा आपल्या ताब्यांत असावी अशी खटपट त्यांची होतीच.     ‘मथुरा-वृदांवन’ हीं दोनहि स्थळें सरकारचें नांवे पातशहाकडून करुन घ्यावींत असा आग्रह दक्षिणेंतून नान फडणीसहि धरीत होते. पुढें महादजींनीं मोठा प्रयत्न करुन शके १७१२ मध्यें बादशहापासून मथुरा-वृंदावनच्या सनदा मिळविल्या. त्यापूर्वीच शिंदे यांनीं गोवधबंदीचें फर्मानहि बादशहापासून भाद्रपद शु. १५ ला मिळविलें होतें. गोवधाविरुद्ध शिवाजीमहाराज किती कष्ट करीत होते हें प्रसिद्धच आहे. गाय हा हिंदूंचा मानबिंदु समजला जातो. पैगंबरानेंसुद्धां चार पापकर्मांत गोवध हें प्रमुख पापकर्म म्हणून सांगितलें आहे. महादजींच्या आग्रहावरुन बादशहानें गोवधबंदींचा हुकूम काढला. त्याचा सारांश याप्रमाणे आहे : "पशु सुद्धां विधात्याच्या सृष्टीतील जीव असून ते निरुपयोगी होत असें समजूं नये. त्यांतहि विशेषत: बैल व गाय हे प्राणी अगणित लाभ देणारे आहेत ................ जनतेचा संसार व निर्वाह चालण्यास गाईची अत्यंत जरुरी आहे आणि गाईवरच मनुष्यांचे व पशूंचें जीवन अवलंबून आहे ......... म्हणून आम्ही आपल्या उदार अंत:करणानें व हर्षपूर्ण दृष्टीनें आमच्या समस्त राज्यभूमीमध्यें गोकुशाचा म्हणजे गोहत्येचा परिपाठ सर्वथैव मना करीत आहोंत."
- सप्टेंबर १७८९

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP