भाद्रपद शुद्ध १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


नारायणराव पेशवे यांची हत्या !

भाद्रपद शु. १३ या दिवशी पुण्याच्या शनवारवाड्यांत नारायणराव पेशवे यांचा अमानुष खून झाला ! रघूजी आंग्रे यांना भेटून नारायणराव पेशवे भोजनासाठीं पर्वतीवर गेले होते. जेवण झाल्याबरोबर दोन प्रहरीं श्रीमंत, हरिपंत फडके यांचेसह शनिवारवाड्यांत परत आले. आंत गारद्यांची कांही गडबड चालली होती; तिकडे लक्ष न देतां पेशवे वामकुक्षीसाठीं वाड्यांत आले. या हालचालीवर तुळ्या पवाराची दृष्टि होतीच; त्यानें तयार असणार्‍या गारद्यांना सूचना दिली. सुमेरसिंग व महंमद इसफ सातआठशें गारदी घेऊन वाड्यांत दाखल झाले. वाटेंत अडविणार्‍या बुधसिंग जामदाराला त्यांनी ठार केलें. आबाजीपंत दरवाजा लावीत होता. तोहि ठार झाला. गाईमागे लपणार्‍या इच्छाराम कारकुनास गाईसह मुकावे लागलें. नारायणराव भयभीत होऊन दिवाणखान्यांत काका-राघोबादा-होते त्यांचेकडे जाऊन ‘कांका मला वांचवा’ म्हणून दादांच्या गळांमिठी पडले. सुमेरसिंग हजर झाला. "रावास सोडा, नाहीं तर दोघांचेही जीव जातील" असें त्यानें म्हटल्यावर काकांनीं पुतण्यास लोटून दिलें. तुळ्या पवारानें नारायणरावांचा पाय धरुन ओढलें, आणि सुमेरसिंगानें वार टाकिला. हुजर्‍या चापाजी टिळेकर व गवई नारोबा फाटक सोडविण्यास गेले त्यांच्यासह श्रीमंतांस कापून काढण्यांत आलें ! मराठ्यांच्या राजाचा असा भीषण वध झाला ! मराठ्यांचें भाग्य संपून त्यांच्या नांवास काळिमा लागला. मुसलमान राजकर्त्यांची या कामांतील प्रवीणता मराठ्यांत क्वचितच दिसून येते. नारायणरावांचा खून ही एक भीषण राज्यक्रांतिच होय. येथून पुढें मराठी राज्यावर अनेक आपत्ति आल्या. अनेक संकटें आलीं. त्यांतून मराठी राज्य टिकूं शकलें नाहीं ! राघोबादादांचे नांवास मोठाच कलंक लागला. आम्हीं ‘ध’ चा ‘मा’ केला नाहीं असें आनंदीबाई वरचेवर म्हणत असली तरी सत्य गोष्ट सर्व महाराष्ट्रास विदित होती. राघोबादादाची सर्व करणी मराठी राज्यास भोगावी लागली.
- ३० आँगस्ट १७७३

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP