भाद्रपद वद्य ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"मुलुक -इ-मैदान"
शके १५५४ च्या भाद्रपद व. ३ रोजीं मुरार जगदेव यानें मोगलांचा पराभव करुन परिंडा किल्ल्यावरील मुलुक-इ-मैदान तोफ विजापूर येथें आणली. मुरार जगदेव हा विजापूरच्या आदिलशाहींत मुख्य वजिराचा कारभारी होते. याचे वेळीं मोंगली फौज दक्षिण देशचा एक एक प्रांत जिंकीत चालली होती. तिचें लक्ष विजापूरवर गेलें. शहाजहान बादशहानें परिंडा किल्ल्यावर स्वारी केली. त्या वेळीं मुरार जगदेव यासच सरलस्कर करुन पाठवण्यांत आलें. त्यानें मोठाच पराक्रम करुन परिंडा सोडवला. याच किल्ल्यावर विख्यात अशी मुल्क-इ-मैदान (रणभूमीचा राजा) या नांवाची तोफ होती. " - पूर्वी हा किल्ला निजामशहाचे ताब्यांत असतांना ही तोफ चलीबीरुमीखांने निजामशहाचे सांगण्यावरुन अहंमदनगरपासून एक कोसावर ओतली होती. तालीकोटच्या लढाईत रामरायावर चाल करण्याचे प्रसंगीं निजामशहानें हिला बरोबर घेतली होती. ही तोफ अष्टधातूंची ओतली असून तिचें वजन साठ खंडी आहे. लांबी चौदा फूट व परिघ तितकाच आहे. तोंडाच्या पोकळीचा व्यास बरोबर दोन फूट चार इंच आणि जाडी एक फूट आहे. हिच्या तोंडास सिंहाच्या जबड्याचा आकार आहे; आणि त्यानें तोंडांत हत्ती धरला आहे असें दृश्य आहे. भाविक लोक हिची अजून पूजा करतात. लोकांनी वारंवार हात फिरविल्यामुळें ती साफ चकचकीत झाली आहे. महंमदशहानें सांगितल्यावरुन मुरार जगदेवाकडून ही तोफ परिंड्याहून विजापूरला आणली. दुसरी एक कडक बिजली म्हणून तोफ होती, ती आणण्यासहि यास हुकूम झाला होता, पण आणीत असतां ती कृष्णा नदींत बुडाली. ती अद्यापि तेथें दिसते." या पराक्रमी मुरार जगदेवाचा अंत मोठ्या हृदयद्रावक रीतीनें झाला. महंमदशहानें वजीर दौलतखान ऊर्फ खवासखान यास सिद्दी रेहानकरवीं ठार मारलें व मुरार जगदेवास पकडून कैद केलें. निराशेच्या भरांत हा अद्वातद्वा बोलूं लागला, तेव्हां याची जीभ कापून, गाढवावरुन धिंड काढण्यांत आली आणि याचे तुकडे करुन यास ठार करण्यांत आलें.
-२२ आँगस्ट १६३२
N/A
References : N/A
Last Updated : September 26, 2018
TOP