अध्याय ९० वा - श्लोक १०६ ते १०७
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते । तथा कुरुष्व योगेश नाथस्त्वं मे यतः प्रभो ॥१०६॥
म्हणे जी जी सद्गुरुनाथ । जरि तूं माझा स्वामी समर्थ । तरि इतुकें देईं मज यथार्थ । पुरवीं मनोरथा अंतरींच्या ॥११॥
तव पदकमळीं अनन्यभक्ती । जन्मोजन्मीं मज ज्या रीती । होय तैसें करीं मजप्रती । योगाधिपती गुरुवर्या ॥१२॥
मी जन्मान्तरा न भियें सहसा । परि वांछी तव पदभक्तिकुवासा । तव भक्तिवंत जो देहठसा । तोचि सहसा सुखरूप ॥१३॥
इतुकें मागूनि श्रीगुरूतें । परमनिष्ठेनें सप्रेमचित्तें । आतां ग्रंठसमाप्तिवेळे आर्तें । श्रीहरीतें अभिवंदी ॥१४॥
नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् । प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परम् ॥१०७॥
सर्वपापाचें नाशकर्तें । ज्याचें नामसंकीर्तन निरुतें । आणि दुःखशामक निश्चितें । प्रणाम केवळ जयाचा ॥१०१५॥
एक वेळ नमितां ज्यासी । निरसती संपूर्ण दुःखराशी । सुख अक्षय जोडे पासीं । जें अविनाशी अविरत ॥१६॥
तया सर्वोत्कृष्ट हरीप्रती । मी नमितों अनन्यप्रीती । सकळ मंगळें मज साधती । यावत्सद्गती तन्नमनें ॥१७॥
एवं गुरुपरंपरा आदि करून । सूतें नमिला श्रीनारायण । ग्रंथसमाप्तिमंगळाचरण । करूनि मौनें राहिला ॥१८॥
शौनकादि ऋषि समर्थ । तेहि जाले परमनिर्वृत । पुरला अभीष्टमनोरथ । पावले निश्चित स्वानुभव ॥१९॥
म्हणाल दशम स्कंध पूर्ण । वाखाणितां मूळाहून । द्वादशस्कंधींचें निरूपण । केलें ग्रथन किमर्थ हें ॥१०२०॥
तरी आरंभीं कथानुक्रम । कळावया स्कंध प्रथम । कथिला संक्षेपसा सुगम । शुकनृपसंगम जेंवि जाला ॥२१॥
तोचि वक्तृत्वाचा शेवट । आणि भागवताचें तात्पर्य स्पष्ट । जाणावया परमोत्कृष्ट । कथिलें इष्ट हें अंतीं ॥२२॥
जैसें उपक्रमाचें उद्घाटन । तैसेंचि करितां उपसंहरण । शोभे यथार्थ ग्रंथायतन । हें वर्म सुज्ञ जाणती ॥२३॥
यास्तव द्वादशस्कंधींचें प्रमेय । येथ योजिलें यथान्वय । जाणोनियां पूर्वील सोय । युक्त वाङ्मय प्रकाशिलें ॥२४॥
प्रथमद्वादशांचें कथानक । मुकुळ आद्यंतीं निष्टंक । अळंकारार्थ कथिलें सम्यक । दशम सटीक माझारी ॥१०२५॥
एवं रीतीनें दशमस्कंध । वोवीप्रबंधें परमागाध । यथामूळ वर्णिला शुद्ध । सर्वां विशद कळावया ॥२६॥
बद्धमुक्तमुमुक्षुजनां । प्रिय श्रीकृष्णचरित जाणा । कळिकाळीं तो जगदुद्धरणा । न तत्सेवनाविण अन्य ॥२७॥
याकारणें श्रीगुरुनाथें । ग्रंथ रचिला करुणाबंतें । येथ पुरती समस्तांचीं आर्तें । मनोवांछितें जैसजैसीं ॥२८॥
कीं हा ग्रंथ केवळ कल्पतरु । कीं चिन्तारत्नमय सुवर्णमेरु । येथ कल्पनेचा दैन्यकरु । न उरे नर कदापिही ॥२९॥
कीं हा ग्रंथ इत्थंभूत । श्रीकृष्णदयार्णवोत्थित । जीव संसारग्रस्त श्रान्त । पीयूष प्रशस्त भूलोकीं ॥१०३०॥
ना हा ग्रंथ प्रत्यक्ष कृष्णमूर्ती । एकादशिनी अष्ट ज्या असती । तींचि अष्टांगें विलसती । चित्सुखकृतिप्रदर्शकें ॥३१॥
नव्यायशीव्याची श्लोकथाटी । तेचि कुन्तळांची रम्य दाटी । नव्वदाव्याची अर्थगुंठी । ते वीरगुंठी मूर्धजांची ॥३२॥
तरी द्वादशाचें जें निरूपण । जेथ परीक्षिति ब्रह्मसंपन्न । ऋषिगण जाले हरिगुणनिपुण । तो शोभायमान मुकुट शिरीं ॥३३॥
माजि साहित्याची पुरवणी । तेचि अळंकारभरणी । शब्दलालित्य सुवर्णपणीं । अंबरमिरवणी अंगावरी ॥३४॥
पूर्वपीठिका तें सिंहासन । वरी मोक्षश्रियेसीं विराजमान । एवं केवळ श्रीभगवान । ऐश्वर्यदानकारक पैं ॥१०३५॥
येथ काया वाचा आणि मनें । सेवक मान होईल अनन्यपणें । तया संसारभयनिस्तरणें । दुर्घट होणें न कदापि ॥३६॥
अर्थावबोधें स्वनिदेवन । करो अथवा भारती करून । पठनें विवरोत कीर्तन । कीं संग्रहून पूजोचि कां ॥३७॥
तो अक्षय सुख संतत । सफळ लाभे मनेप्सित । अधिकारकडसणी नाहीं येथ । वस्तुसामर्थ्य गुणास्तव ॥३८॥
असो आतां हें वर्णन । अमृताचे आंगींचे गुण । कोठवरी कथावे सुलक्षण । सेवितां पूर्ण अनुभवती ॥३९॥
परी मज हेंचि वाटे नवल । कीं मी मूढमतीची शेल । आणि मम मुखें हे काव्यबोल । शुद्ध सखोल प्रकटिले ॥१०४०॥
तरि हें आश्चर्य ही येथ न सजे । कीं एकें शेषस्थानीं सहजें । धराधारणीं दंड ओजें । केला स्वकाजें शक्तिमान् ॥४१॥
किंवा सर्वदुर्गंधिराशी । एका सुगंधा पैजे नशी । केलीं स्वसामर्थ्यें जैशीं । उपमावयासी नसे दुजें ॥४२॥
कीं प्रस्तुत पढविला वेद । महिषाकरवीं एकें प्रसिद्ध । योगेश्वरांचा महिमा अगाध । हा जाणती शुद्ध सर्वज्ञ ॥४३॥
तेंवि ये ग्रंथसमाप्तिकाजीं । मज समर्थें योजिलें सहजीं । हा सामर्थ्याचा सृष्टीमाजी । ध्वज हो कां जी उभारिला ॥४४॥
आणि आपुलियाचेन स्नेहें । पिता कुमारा सज्जूनि बौहे । आस्थेनें रूधविता होये । सभे निश्चयें श्रेष्ठांचे ॥१०४५॥
तेंवि स्वजवळीकें संतीं । बाहूनि करावी प्रीति पुरती । येणें काजें मज ये अर्थीं । योजिलें समर्थें गुरुरायें ॥४६॥
एवं योगसंपत्ति आपुली विपुळ । श्रीगुरुवर्यें परम विमळ । ग्रंथोद्यमें प्रकटिली सकळ । व्हावया केवळ विश्व सुखी ॥४७॥
हे ज्ञानसंपदा पुरातन । अक्षय अक्षर सनातन । अजें आत्मजा अर्पिली पूर्ण । कृपेंकरून पद्मालयीं ॥४८॥
तेणें विधीनें देवर्षीतें । गौरविलें करुणावंतें । नारदें दत्तात्रेया निरुतें । ते योगश्रियेतें निवेदिलें ॥४९॥
तेथूनि कळिकाळीं आर्तभूत । सुरगिरिस्थ जनार्दनपंत । दर्शन पावूनि सम्यक मूर्तिमंत । जाला कृतकृत्य तद्बोधें ॥१०५०॥
आदि अंतीं एकला एक । तो श्रीएकनाथ निष्टंक । तेणें जनार्दन सेवूनि सम्यक । घेतला विवेक परंपरोक्त ॥५१॥
मग गुर्वाज्ञेनें प्रतिष्ठानीं । राहूनि गृहस्थाश्रमोक्त करणीं । शुद्ध आचरतां जीवश्रेणी । निजज्ञानगुणीं उद्धरिली ॥५२॥
त्यावरी बहुतां दिवसान्तरीं । श्रीमद्येकादशमस्कंधावरी । टीका लिहितांचि माझारी । जालें शिवपुरीप्रति जाणें ॥५३॥
तंव ते वाराणसी माजारी । श्रीमच्चिदानंद ब्रह्मचारी । अष्टाङ्गयोगसाधना पुरी । करूनि अंतरीं निराकुल ॥५४॥
दुग्धमात्राचा स्वल्पाहार । सेवूनि त्यज्ले धान्यप्रकार । वैराग्ययुक्तचि निरंतर । स्वज्ञानमात्रविरहित ॥१०५५॥
तेथ प्रसंगें दर्शन होतां । वेधली वृत्ति स्थिति पाहतां । शरण होऊनि श्रीएकनाथा । स्वसुख तत्वता लाभिन्नला ॥५६॥
त्यावरी क्रमूनि बहुत वर्षें । रामेश्वरादियात्रोद्देशें । काशीहूनियां दक्षिणादिशे । क्रमिलें योगीशें चिदानंदें ॥५७॥
प्रतिष्ठानीं वृन्दावनीं । पूजनें वंदनें संपादूनी । ज्ञानेश्वरीची समाधि नयनीं । पुढें पाहूनी भू क्रमिली ॥५८॥
तंव कृष्णाप्रदेशीं चिमणगांव । तेथ रम्यालयीं महादेव । चित्ता मानला बहु तो ठाव । एकान्त सर्वसुखावह ॥५९॥
विशेष ग्रामस्थ प्रेमळ व्याजें । स्थिर केलें आपणा सहजें । तत्रस्थ लेखकवृत्तिकतनुजें । भक्तिभोजें नाचविलें ॥१०६०॥
ज्या वय पाहतां वर्षें बार । परि पूर्वसाधनसिद्धचि सारा । तो श्रीचिदानंदपद्माकरा । लाभला बरा स्वमस्तकीं ॥६१॥
उपदेशमात्रें बोधैश्वर्य । पावला पक्क अवस्था तुरीय । यास्तव स्वानंद अभिधा वर्य । ज्ञापिली अक्षय गुरुरायें ॥६२॥
पुढें देशिकें यात्रावलंब । केलिया नंतरें काळीं सुभ । स्वानंदें सेविलें वन स्वयंभ । दैहिक लोभ विसर्जूनी ॥६३॥
स्वसुखसुरवाडें भार्येसह । चिरकाळ क्रमिला सुखावह । सुरसिद्ध दर्शना अहरह । येती स्वयमेव जयाचिया ॥६४॥
त्या श्रीस्वानंदाची महिमा । अपार वर्णितां अनुपमा । अमानित्वादिगुणीं गरिमा । जेथ उत्तमा संपादिली ॥१०६५॥
तया आपुलिया कल्याणकामें । शिवभूपतीनें प्रार्थूनि प्रेमें । रायदुर्गीं स्थापिलें नेमें । सेवानुक्रमें तोषविलें ॥६६॥
ये स्थानीं गोविन्दराव । शिबिकारूढ सवैभव । उदया आलें योगदैव । तयाचें पूर्व ते ठायीं ॥६७॥
तेणें सेवितां स्वानंदस्वामी । निवृत्त जाला सर्व कामीं । टाकिली संपत्ति नाशगामी । आत्मारामीं सुरवाडला ॥६८॥
लौकेषणाह्रियादि वृत्ति । अवघी सोडूनियां प्रवृत्ति । गुरुपरिचर्या केली निगुती । जिया ज्ञानसंपत्ति झड घाली ॥६९॥
पुढें गुर्वाज्ञेनें श्रीगोविन्दें । जायेसहित सप्रेमच्छंदें । विठ्ठलमूर्ति पाहूनि मोदें । अंबापुरीतें अधिष्ठिलें ॥१०७०॥
भक्ति ज्ञान आणि वैराग्य । सेवूनि जयाचें पवित्र आंग । वृद्धि पावलीं विशेष साङ । फिटला पाङ्ग सर्वांचा ॥७१॥
दैवीसंपत्ति करणगृहीं । विश्रामली सर्वदा ही । सिद्धि इच्छिती इच्छो कांहीं । परि जो नाहीं द्वैतावरी ॥७२॥
तथापि इच्छा जरि उद्भवली । तरी करुणेचीच समूळ वेली । जे प्रबोधफळीं सदा फळली । जीचेन धाली प्रणतावळी ॥७३॥
ऐसा समर्थ श्रीगोविन्द । ज्या विठ्ठलनामा पूर्णच्छंद । यास्तव लौकिकीं अनुवाद । असे प्रसिद्ध या नामें ॥७४॥
जयाचे पूर्णतेचें लक्षण । मज वर्णितां नये निक्षुण्ण । आकाशाचें पवाडपण । मशका कोठून अवगमे ॥१०७५॥
तया देशिकेन्द्राचा संगम । बहुतांसि जाला अत्युत्तम । परी श्रीकृष्णदयार्णवीं परम । वयुनद्रुम निरूढला ॥७६॥
तयाचिये छाये तळीं । मादृश निवाले कळिदुष्काळीं । संतृप्त झाले चित्सुखफळीं । नाहींच उरली भवचिन्ता ॥७७॥
एवं हें परंपरोदित । बोधसंपदा यथास्थित । संचरलीसे अनाकळित । कल्याणकृत स्वजनाची ॥७८॥
तिया आवडतेन संपन्न । व्हावया निमित्त संपूर्ण । हरिवरदटीकेचें संग्रथन । केलें आपण गुरुरायें ॥७९॥
हें विश्वमंगळाचें आयतन । समाप्ति पावलें लेखन । तया काळाचें परिज्ञान । ऐकिजे पूर्ण सर्वज्ञीं ॥१०८०॥
जैं शालिवाहनशकातें समें । सोळा शते पांसष्टी नेमें । क्रमिलिया यथानुक्रमें । षट्षष्टितमे माझारी ॥८१॥
रुधिरोद्गारी संवत्सरीं । मार्गशीर्षीं शंतमकरीं । शुक्लपंचमी गुरुवासरीं । तृतीयप्रहरीं पुण्योत्सवीं ॥८२॥
प्रतिष्ठानीं गोदातटीं । वृन्दावनीं विश्रान्तिमठीं । श्रीमत्पूज्यपादुकानिकटीं । लेखनसृष्टि अलंकारिली ॥८३॥
आतां श्रोतयां वक्तयां कल्याण । जयाचेन भजनें करून । त्या सद्गुरुपरमात्मया पूर्ण । असो नमन अखंडित ॥८४॥
सर्वही सुखरूप होत । सकळ निरामय असोत । समस्त कल्याणें पावोत । अखिल नांदोत आनंदें ॥१०८५॥
स्वस्ति श्रीमंगलानि भवन्तु । विश्वपटीं श्रीकृष्णतंतु । नसे सर्वथा द्वैतहेतु । रहितमीतूं अद्वितीय ॥१०८६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां द्शमस्कन्धे श्रीशुकपरीक्षित्संवादे श्रीहरिवरदाटीकायां श्रीमत्कृष्णदयार्णवानुचरविरचितायां श्रीकृष्णलीलाचरितकथा नाम नवतितमोऽध्यायः ॥९०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५१॥ अन्य संमति - श्लोक ॥५६॥ ओव्या ॥१०८६॥ एवं संख्या ॥११९३॥ ( नव्वदावा अध्याय मिळून ओवी संख्या ४२४८७ )
[ श्लोक ५२ ते १०७ दशमाच्या नव्वदाव्या अध्यायांतील नसून अन्य संमति - श्लोक आहेत. ]
नव्वदावा अध्याय समाप्त.
समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2017
TOP