अध्याय ९० वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
प्रियरावपदानि भाषसेऽमृतसंजीविकयाऽनया गिरा । करवाणि किमद्य ते प्रियं वद मे वल्गितकंठ कोकिल ॥२१॥
माधवी म्हणती भो कोकिल । प्रियतम वक्ता श्रीघननीळ । तयाचे मृदु मधुर अतिमंजुळ । शब्द केवळ रमणीय ॥८२॥
तया परी सुन्दर शब्द । बोलसी तूं परम विशद । मृताकारणें जीववी प्रसिद्ध । तैसिये वाणी करूनियां ॥८३॥
प्रेष्ठेंङ्गितस्मरणबाणीं । हृदयें भेदिलीं तेणेंकरूनी । मूर्च्छिता समान वैकल्यभरणी । सर्वां करणीं आमुचिया ॥८४॥
ऐसिया विकळाङ्गा आमुतें । श्रीकृष्णसादृश्यसुशब्दितें । सखिये जीवविलें तां निरुतें । जीवविजे अमृतें जेंवि मृता ॥२८५॥
तरी ऐसा तुझा कृतोपकार । केंवि निस्तरूं हा समग्र । आम्हां न सुचे तो प्रकार । जेणें तवान्तर सुखावे ॥८६॥
यास्तव सांगें आपुल्या मुखें । आम्हां मानसें निःशंकें । तुझें आवडतें जें कां निकें । करावें सखे आजि काय ॥८७॥
कीं तुझा परम रमणीय कंठ । ऐकता मन होय सोत्कंठ । वाटे वदतो कंबुकंठ । वियोगकष्ट परिहरवी ॥८८॥
इतुकें बोलतां कोकिळेप्रती । दृष्टि पडली पर्वता वरुती । मग तयासीच बोलिल्या सती । तें तूं सुमती अवधारीं ॥८९॥
न चलसि न वदस्युदारबुद्धे क्षितिधर चिन्तयसे महान्तमर्थम्
अxx बत वसुदेवनन्दनाङ्घ्रि वयमिवकामयसे स्तनैर्विधर्तुम् ॥२२॥
भो भो क्षितिधरा उदारबुद्धी । अससी केवळ औदार्यनिधी । तृणकाष्ठवल्ली वृक्षाङ्गादि । न वंचिसी कधीं कवणासी ॥२९०॥
योगियां समान आसनबद्ध । मौनें सुस्थित तूं प्रसिद्ध । बैसला आहसी परम बुद्ध । न वदसी शब्द न चळसी ॥९१॥
अतएव दिससी साधनयुक्त । बहुतेक चिन्तिसी महान्त अर्थ । तरी काय आम्हां परी स्वस्थ । इच्छिसी निश्चित मानसीं ॥९२॥
म्हणसी तुम्ही इच्छितां काय । तरी वसुदेवनंदनाचे पाय । स्तनें करूनियां चित्सुखमय । हृदयीं सदैव धरूं इच्छूं ॥९३॥
तेंवि तूं ही स्तनप्राय शृंगीं । श्रीकृष्णचरण सप्रेम वेगीं । धरूं इच्छिसी आस्थाचांगीं । हें आम्हां लागीं कळतसें ॥९४॥
बरें जरी ऐसेंचि मनोगत । तुझें असेल कां संतत । तरी आमुची अवस्था प्राप्त । होईल निश्चित तुजलागीं ॥२९५॥
एवं आर्त्तचित्तें वेधभरें । वदतां नगेसीं अत्यादरें । सरिता देखिल्या निजनेत्रें । त्यांतें स्ववक्रें बोलती ॥९६॥
शुष्यद्ध्रदाः करशिता बत सिन्धुपत्न्यः सम्प्रत्यपास्तकमलश्रिय इष्टभर्तुः ।
यद्वद्वयं मधुपतेः प्रणयावलोकमप्राप्य मुष्टहृदयाः पुरुकर्शिताः स्म ॥२३॥
भो सिन्धुपत्नी सरिता हो । सांप्रत ग्रीष्मीं तुमचा नाहो । मेघद्वारा अमृतवाहो । करूनि तुम्हां वो ना नंदवी ॥९७॥
तेणें कष्ठता तुम्ही फार । आटून गेले ह्रद समग्र । म्हणोनि झालां सूक्ष्मगात्र । गति जवित्र कुण्ठली ॥९८॥
उत्फुल्ल कमलशोभा अवघी । आंगिक गेली पौष्टिक संगीं । दीनता बाणली सर्वांगीं । बह्यतरंगीं संताप ॥९९॥
जेंवि इष्टभर्त्ता जो आमुचा । श्रीकृष्ण मधुपति साचा । प्रणयावलोक पैं तयाचा । अतिसुखाचा नपवूनी ॥३००॥
आम्ही जालों संक्लिष्ठमना । हृदयें दाटलीं विलापें नाना । दिसतों केवळ आर्त्ता दीना । कृशिता विवर्णा वियोगें ॥१॥
तेंवि स्वभर्तृकृपाऽलाभें । ऐशा जाल्यात विरहक्षोभें । पुन्हा दैवें तदिष्टलाभें । सुखस्वयंभें तोषिलां ॥२॥
यावीण आणिक उपाय । सहसा नाहींच हा निश्चय । आम्ही झुरतसों पद्मिनीप्राय । कृष्णचित्सूर्यप्रभेवीण ॥३॥
जैं आमुची दुरदृष्टरजनी । समाप्ति पावेल जीवघेणी । तैं सुखोदयें श्रीकृष्णतरणी । ईक्षणकिरणीं जीववील ॥४॥
इत्यादि शब्दीं सरितांप्रती । बोलिल्या वेधें जंव त्या सती । तंव अकस्मात दैवें निगुती । आला दैवगती मराळ ॥३०५॥
त्यातें कल्पूनि श्रीकृष्णदूत । वितर्कें बोलिल्या विनोदयुक्त । तूं परिसें दत्तचित्त । कुरुकुळमानसमराळा ॥६॥
ह्म्स स्वागतमास्यतां पिब पयो ब्रूह्यङ्गशौरेः कथां दूतं त्वां नु विदाम कच्चिदजितः स्वस्त्यास्त उक्तं पुरा ।
किं वा नश्चलसौहृदः स्मरति तं कस्माद्भजामो वयं क्षौद्रालापय कामदं श्रियमृते सैवैकनिष्ठा स्त्रियाम् ॥२४॥
कोवळामंत्रणें अगा ये हंसा । मच्चित्तार्तिकल्मषध्वंसा । नागर गतिमंता खगाधीशा । सुशब्दीं ऐशा संबोधूनी ॥७॥
बरव्या प्रकारें सुखरूप । म्हणती आलासि कां निष्कंप । स्थिरता पावे सम पादप । मंदसंकल्प करूनियां ॥८॥
निश्चळ बरव्या बैसें सुविश्रान्त । पय प्राशी यावत्तृप्त । कांहीं सांगें गुज निश्चित । केवळ हृद्गत शौरीचें ॥९॥
जरी मी म्हणसी रानींचा पक्षी । अटवी अटूनि स्वभक्ष्य भक्षीं । मज काय कळे तो विश्वसाक्षी । केवळ दक्षीं स्वीकेला ॥३१०॥
तरी न प्रतारीं येणें आमुतें । निश्चयें जाणतों आम्ही तूतें । कीम दूत आहेसि मनःसंमतें । साधक सर्वार्थें कृष्णाचा ॥११॥
यास्तव मोकळ्या अंतःकरणें । सांगें आमुतें कोमळवचनें । कच्चित स्वस्थ असे कीं मुदितपणें । स्वसौख्यगुणें श्रीअजित ॥१२॥
रमणीयरामालावण्यगुणीं । भुलोनि ब्रह्मादि सुरश्रेणी । च्यवल्या केवल मन्मथमथनीं । जय न कोण्ही साधियला ॥१३॥
म्हणोनि कामसमरीं अच्युत । कमनीयवधूकदंबीं स्वस्थ । वशीकृतरमणी मन्मथतात । शोभे अजित नाम जया ॥१४॥
तयाच्या कांहीं गोष्टी मधुरा । सांगें तत्संप्राप्ता चतुरा । त्यांविण जालों केवळ आतुरा । जीववीं सुखकरा वाक्यामृतें ॥३१५॥
पूर्वीं एकान्तीं मनोहर । आमुसीं बोलिला स्नेहप्रौर । तें कांहीं स्मरतो देवकीकुमर । चपलान्तर चपलसौहृदा ॥१६॥
त्याचिया सुहृदत्वाचा नेम । एकरूप नाहींच सप्रेम । एकां सगुणीं वेधूनि रम्य । वेधी सकाम आणिकांसी ॥१७॥
नूतनासी लालसवृत्ति । करी विशेषें एकान्तप्रीति । पूर्विल्या उपेक्षी मधुपति । हे सहजस्थिति ययाची ॥१८॥
यास्तव विसरला पूर्व स्नेह । हें तंव वाटे निःसंदेह । तथापि दैवें किंचित आठव । त्या असेल पूर्व तरी सांगें ॥१९॥
ना जरी म्हणसी मज कारणें । स्मरूनि पाठविलें आतां तेणें । तरी ये विपीं ऐकें श्रवणें । क्षुद्रदूता क्षुद्राच्या ॥३२०॥
सत्य नाहीं ज्याचें वचन । आणि एकरूप नित्याचरण । करी अंगीकृताचें उपेक्षण । विश्वासून मग वंची ॥२१॥
तयाशीच म्हणावें क्षुद्र । ऐसियाचा तूं संदेशहर । जरी पाठविलें येथवर । तर्ही आम्ही किमर्थ तया भजूं ॥२२॥
कामार्थी तो आपुल्या कामा । बोलावीत असेल आम्हां । पुन्हा पावावया विरामा । आम्ही कामा येथ पावें ॥२३॥
यावरी वितर्कें मागुतीं अबळा । मानिती स्वमनीं अवलीळा । हेचि आज्ञा मानूनि वहिला । कीजे गेला तरी काय ॥२४॥
मायिक रुसण्याचें अवतरण । दावूनि पुन्हा मनोधारण । कारक बोलती स्निग्धवचन । तें हें संपूर्ण अवधारा ॥३२५॥
म्हणसी जरी श्रीकृष्णस्नेह । आहे आम्हांवरी तापापह । तरी त्या आणीं सुखावह । निःसंदेह तूं येथें ॥२६॥
तंव कृष्णाकडे चालिल्यावरी । भावूनि हंसातें म्हणती नारी । तया रतिप्रदातें आणीं झडकरी । परि विकल्प माझारी एक असे ॥२७॥
जें आम्हां सर्वांतें वंचून । एकले प्रियेसीं रमे जाण । तये श्रीवेगळे असपत्न । त्यासीच जाण एकले ॥२८॥
जरी म्हणसी ते तदेकनिष्ठा । परमप्रियतमा जिवलगा इष्टा । कें त्यागूं शकेल तीतें कुरठा । जे अति लागटा रंगली ॥२९॥
तरी काय आम्हां स्त्रियांमाजि । तेचि एकनिष्ठा असे सहजीं । त्यागिली आम्हीं भोगराजी । सप्रेमकाजीं त्याविण ॥३३०॥
कीं हा वृथाचि आमुचा प्रेमा । तेचि एक येईल कामा । दूतमिसें ऐसिया रामा । वदल्या विरामा हंसातें ॥३१॥
अथवा पाठान्तरें द्वितीयार्थ । तोही परिसा जो मूळोक्त । मायिक रोषावेषें तदुचित । बोलती समस्त कृष्णाङ्गना ॥३२॥
क्षौद्र म्हणिजे मधुर मधु । तदद्गोष्टी बोले साधु । स्वार्थसाधक केवळ भोंदु । अरतिप्रद साध्वीतें ॥३३॥
जे लाघवी वेधी गुणाभिचारें । तये श्रीवांचूनि चिन्तातुरें । आम्ही कासया कामानुकारें । भजूं अंतरें लागटें ॥३४॥
कीं ते अनादरिली उपेक्षिली । तथापि मागुती झडा घाली । निर्ल्लज्जपणें लागट झाली । ही रहाट भली तिज योग्य ॥३३५॥
आम्हांसारिख्या ज्या मानिनी । सम्मानप्राप्ता स्वसद्गुणीं । एकनिष्ठा सुशीळपणीं । सम्मानरक्षणीं समर्याद ॥३६॥
यास्तव अनादृता असतां पुरती । तेचि भजो कां पुढती पुढती । कृत्रिमवाद आम्हांप्रती । साधकवृत्ती न करीं रे ॥३७॥
इतीदृशेन भावेन कृष्णे योगेश्वरेश्वरे । क्रियमानेन माधव्यो लेभिरे परमां गतिम् ॥२५॥
या प्रकारें ऐशिया भावें । जो योगेश्वरेश्वर प्रभावें । तया श्रीकृष्णीं महद्दैवें । क्रियमाणविभवें माधवी ॥३८॥
मधुवंशोद्भव माधव । तत्पत्नींचें माधवी नांव । तन्मयाचरणें त्या वास्तव । परमगतीतें लाभल्या ॥३९॥
परमगति म्हणिजे कृष्णसायुज्य । सप्रेमवेधें आम्नायपुञ्ज । समुद्रीं सरितान्यायें निज । चित्सुखपुञ्ज पावल्या ॥३४०॥
तरी तयांचें ऐसें प्रेम । श्रीकृष्णाचे ठायीं परम । हें आश्चर्य नव्हे भो नृपोत्तम । जेणें निजधामा पावल्या ॥४१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2017
TOP