अध्याय ९० वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
नेत्रे निमीलयसि नक्तमदृष्टबध्नुस्त्वं रोरवीषि करुणं बत चक्रवाकि ॥
दास्य गता वयमिवाच्युतपादजुष्टां किंवा स्रजं स्पृहयसे कबरेण वोढुम् ॥१६॥
खेदें म्हणती वो चक्रवाकी । नेत्र लाविसी होऊनि दुःखी । पर तुज निद्रा न येचि निकी । हे आम्हां ओळखी पुरतसे ॥२३॥
तेचि कैसी म्हणसी जरी । तरी तूं रुदसी व्यसनें भारी । त्याचें निमित्तही अंतरीं । आम्हां निर्द्धारीं जाणों ये ॥२४॥
कीं दुरदृष्टें रात्रींच्या ठायीं । कीं दृग्हीन झालीसि ये समयीं । यास्तव चुकोनियां दिग्वलयीं । वदसी कहीं प्राणनाथा ॥२२५॥
तया प्राणनाथाच्या वियोगें । अत्यंत करुण विरहवेगें । येतुली विलपसी मनोभंगें । दैवमोधें कीं काय ॥२६॥
ना तरी श्रीकृष्णदास्यप्राप्ता । आम्ही केवळ तद्वेधयुक्ता । त्या अच्युताची माला तत्वता । जे चरणीं प्रशस्ता रुळतसे ॥२७॥
ते कबरें मस्तकीं वाहों । इच्छितसों करूनि लाहो । तूं ही आम्हांपरी कीं हो । इच्छिसी लाहो अंतरीं ॥२८॥
म्हणोनि ऐसिया दीन स्वरें । परम काकुलती आर्तिभरें । घडि घडी वर्डसी खिन्नान्तरें । विराहातुरे भो सखिये ॥२९॥
चक्रवाकीसी इत्यादि वचनें । अनुवादती जंव आर्तमनें । तंव अकूपार उच्च स्वनें । गर्जता श्रवणें परिसिला ॥२३०॥
भो भोः सदा निष्टनसे उदन्वन्नलब्धनिद्रोऽधिगतप्रजागरः ।
किं वा मुकुन्दापहृतात्मलाञ्छन प्राप्तां त्वं च गतो दुरत्ययाम् ॥१७॥
मग त्या जलधीतें संपूर्ण । भो उदन्वन् ऐसें म्हणोन । संबोधूनि वनितागण । बोले वचन कौतुकें ॥३१॥
आदरें आम्रेडितें कृष्णदयिता । म्हणती अरे रे जलवंता । तुज निद्रा न लागेत्ति तत्वता । जाला सर्वथा प्रजागर ॥३२॥
ऐसा अलब्धनिद्रा सशोक । अधिगतप्रजागर निष्टंक । निरंतर क्रोशसी निःशंक । कां तूं नावेक वद आम्हां ॥३३॥
बहुतेक चिंतातुर जे प्राणी । जयां स्वार्थहानीची आहळणी । तयांतें सुखसुषुप्ति सदनीं । नये दिनरजनी माजिवडी ॥३४॥
तरी काय आम्ही पावलों दशा । परम दुरत्यया जे सहसा । तेचि तूं ही गा जलाधीशा । पावलासि बहुशा वाटतसे ॥२३५॥
कोण ते दशा कैसी म्हणसी । तरी ते ऐकें वर्तली जैसी । आमुच्या सौभाग्यलांछनासी । हरिलें मुकुंदें संभोगें ॥३६॥
आलिङ्गनें कुचकुंकुम । आरक्तरक्तिमा चुंबनें रम्य । सुखाश्रुमार्जनें अंजनोत्तम । कस्तूरेचंदन करलालनें ॥३७॥
क्रीडाभिनिवेशें पुष्पजाळी । वसनें भूषणें अतितेजाळी । अस्तोव्यस्त संपूर्ण केलीं । एवं हरिलीं सुचिन्हें ॥३८॥
ऐशा इत्यादिलक्षणीं खिन्ना । जालों मुकुंदापहृतचिह्ना । तेंवि कौस्तुभादि रत्ना । करूनि मथना अपहरिलें ॥३९॥
म्हणोनि मुकुंदापहृतलांछन । क्लेशायमान अतिनिर्विण्ण । अहो आक्रोशसी बा क्षीण । दिससी परिच्छिन्न आम्हांसी ॥२४०॥
ऐशा रससूनि जलधीप्रति । बोलती जैं कृष्णैकमति । तंव गगनीं देखोनि निशामति । संबोधिती तें परिसा ॥४१॥
त्वं यक्ष्मणा बलवताऽसि गृहीत इन्दो क्षीणस्तमो न निजदीधितिभिः क्षिणोषि ।
कच्चिन्मुकुन्दगदितानि यथा वयं त्वं विस्मृत्य भोः स्थगितगीरुपलक्ष्यसे नः ॥१८॥
भो इन्दो म्हणोनि आर्तवेगें । पुसती पाहूनि स्नेहापाङ्गें । तूं घेतलासि सबळरोगें । तव रूपावलोकें कळतसे ॥४२॥
पाण्डुरवर्ण जाली काया । माजि दिसतसे कृष्णच्छाया । शैत्यें धरिलें तवाङ्गठाया । दुःखें वायां वज जातें ॥४३॥
अतएव जाला आहेसी क्षीण । म्हणोनि मंदावली तव भा जाण । तरीच निजदीक्षितींहीं पूर्ण । तमनिरसन न करिसी ॥४४॥
किंवा क्कचित मुकुन्दाचीं । रहस्यें अनुभविलीं जीं साचीं । तीं तदेकचिन्तनें अवघींची । विसरूनि शुचि निजचित्तें ॥२४५॥
आम्हां परि मंदवाक् केवळ । जालासि विशेषें सम विह्वळ । शब्द पांगुळला कीं प्राञ्जळ । प्राण मांदुळले आवघे ॥४६॥
म्हणसी विसराचा हेतु कोण । तरी प्रेष्ठगदितें समान बाण । अंतरीं रुततां परम तीक्ष्ण । जालों दीन मूर्च्छिता ॥४७॥
ऐसा हृद्रोगें परम क्षीण । आमुतें लक्षिजसी गा दीन । समव्यसनें आम्हां लागून । येतसे कारुण्य अंतरीं ॥४८॥
किं त्वाचरितमस्माभिर्मलयानिल तेऽप्रियम् । गोविन्दापाङ्गनिर्भिन्ने हृदीरयसि नः स्मरम् ॥१९॥
सुरभियुक्त जे मलयभूमी । समीरण जो तत्पृष्ठगामी । मळयानिळ तो प्रसिद्ध नामीं । सुगंधें व्योमीं प्रवाहे ॥४९॥
तो सहज वाहतां अळुमाळ । आंगीं स्पर्शला सुगंधशीळ । त्या संबोधिती महिषी सकळ । भो मलयानिळ म्हणोनी ॥२५०॥
अगा ये मलयानिळा सुशीळा । तुझें अप्रियाचरण ये वेळा । काय आचरलों आम्ही अबळा । जेणें जालासि निर्घृण ॥५१॥
तुजकारणें विद्वेपकर । कैं वर्तलों सौजन्यहर । कीं आम्हांसि करिसी शरमार । दुःखित जिव्हार विन्धिसी ॥५२॥
जरी म्हणसी कवण्या योगें । तरी सविलास कृष्णापाङ्गें । हृदयें आमुचीं भोगानुरागें । भेदलीं संगें क्रीडतां ॥५३॥
तया निर्भिन्नहृदयामाजि । तूं निजाभिगमनें आजि । मार मारक प्रेरिसी सहजीं । विशेषें करिसी संक्लिष्ट ॥५४॥
तरी वृथापराधेंविण । विह्वळातें व्यथाजनन । स्मरक्षोभें करणें जाण । तुजलागून उचित नसे ॥२५५॥
घायाळाचें क्षत टोचणें । सदोषा कुटीचें बोलणें । भयभीतातें भेडसावणें । कीम नागवणें अनुत्पन्ना ॥५६॥
दुःखितातें दुःख देणें । कीम मुमूर्षूतेंचि मारणें । शोकाकुळिता विष पाजणें । कीं बुडविणें बुडतया ॥५७॥
जेंवि हें अर्ह नव्हे अर्होत्तमा । यास्तव पुण्यशीळा सोरभ्यधामा । विकळा आम्हां वैकल्यगरिमा । तुज देणें बहुधा अनुचित ॥५८॥
अपकारियातें ही अनिष्ट । न करणें हें सच्छील श्रेष्ठ । अपकारिया अपकार दुष्ट । करणें प्रकट लौकिक हें ॥५९॥
अनुपकारिया अपकार । करणें हा अधम प्रकार । परि सुशीळाहूनि निन्द्यतर । हें लक्षण दूर असावें ॥२६०॥
एवं अंतरींचेन औत्कंठ्यें । स्मरोद्रेकें वनिता ओंठें । मळयानिळा अन्योपदिष्टें । वेधोत्कृष्टें बोलियल्या ॥६१॥
तंव अकस्मात अवलोकितां । पयोधरीं पयोधर तत्वता । देखिला त्यातें जाहल्या वदत्या । आर्त्तभूता संबोधनें ॥६२॥
मेघ श्रीमंस्त्वमसि दयितो यादवेन्द्रस्य नूनं श्रीवत्साङ्कं वयमिव भवान्ध्यायति प्रेमबद्धः ।
अत्युत्कण्ठः शबलहृदयोऽस्मद्विधो बाष्पधारा स्मृत्वा स्मृत्वा विसृजसि मुहुर्दुःखदस्तत्प्रसङ्गः ॥२०॥
अगा ये मेघा श्रीमंता । हरिभक्तिरूपा श्रीतत्वता । तुज प्राप्त जाली ऐसें स्वता । कळलें चित्ता आमुचिया ॥६३॥
म्हणसी भक्ति असती नवविध । मज कोणती लाधली प्रसिद्ध । तरी आठवी सख्यनामका शुद्ध । तूं यथाविध पावलासी ॥६४॥
जरी पुससी तुम्हां कैसेन । कळलें यथार्थ हे संपूर्ण । तरी जाणों येतसे लक्षण । जेणें मित्रपण घडतसे ॥२६५॥
समान गुण शीळ रूप ज्याचें । त्यासींच सख्य घडे साचें । तेथेंचि प्रीतीचे भोज नाचे । अतिशयें साचे प्रेमरसें ॥६६॥
सहजें श्रीकृष्ण श्यामवर्ण । तूंही स्वरूपें तैसाचि जाण । तापत्रयखिन्न प्राणिगण । होती शरण जे कोण्ही ॥६७॥
त्यांची अधमोत्तमकडसणी । न करूनियां चक्रपाणी । निवारी तापत्रय आहळणी । स्वसुखपूर्णीं विश्रामवी ॥६८॥
तेंवि ग्रीष्मातपनिदाघें । जीव श्रमती जे गृहवियोगें । त्यांसि निजच्छाया अमोघें । देसी आंगें महत्सुख ॥६९॥
वर्षूनियां करुणादृष्टि । जनाकारणें स्वानंदपुष्टि । श्रीकृष्ण देतसे करूनि तुष्टि । तेंवि तूंही सृष्टि प्रतिपाळिसी ॥२७०॥
परमसदयत्वें अंबुकण । वर्षूनि जलमय भू संपूर्ण । करूनि स्थिरचरप्राणिगण । तर्पिसी अन्योन्य उपयोगें ॥७१॥
इत्यादिलक्षणीं साम्यत्व । परस्परें तुमचें सर्व । तरी यादवेन्द्राचा सदैव । निश्चयें स्वयमेव तूं दयित ॥७२॥
यास्तव तूं तयासि ध्यासी । अंतरीं सप्रेमें चिन्तीसी । तव चिह्नांवरूनि आम्हांसी । कळे मानसीं स्वप्रत्ययें ॥७३॥
आम्ही तदेकचित्ता वनिता । प्रेमें विनटलों आर्तभूता । तैसाचि तूंही जलवंता । चिन्तिसी तत्वता सद्भावें ॥७४॥
तींचि ध्यानाचीं चिह्नें कैसीं । उमटलीं तवाङ्गीं निश्चयेंसीं । तुज कथितों स्वप्रत्ययेंसीं । लक्षिलीं जैसीं पृथक्त्वें ॥२७५॥
अत्यंत जालासि उत्कंठित । हृदय दाटलें द्रवीभूत । अंतर कालवत उत्सुक्त । मौनें आर्त रुदतोसी ॥७६॥
श्रीवत्सांका प्रति घडि घडी । आठवूं आठवूं आवडी । वियोगें आम्हां पडिपाडी । टाकिसी भूतटीं अश्रुधारा ॥७७॥
अहा हा येतुला तूं कष्टसी । कां सख्य केलें त्वां तेणेंसीं । कीं दुःखदायक निश्चयेंसीं । प्रसंगविशेषीं तयाचा ॥७८॥
जिहीं जिहीं सख्योत्कर्ष । केला तयासिं विशेष । शेखीं ऐसाचि खेद त्यांस । होय उदास हरि होतां ॥७९॥
ऐसिया आपुलेनि अंतर्वेधें । बोलिल्या नारी श्रीकृष्णच्छंदें । जलदा प्रति सुसंवादें । तंव कोकिळशब्द परिसिला ॥२८०॥
तये कोकिळेतें सप्रेमवेगें । बोलत्या जाहल्या प्रेष्ठानुरागें । तें तूं ऐकें अवधानयोगें । श्रीशुक आंगें नृपा म्हणे ॥८१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 13, 2017
TOP