अध्याय ७० वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
न हि तेऽविदितं किंचिल्लोकेष्वीश्वरकर्तृषु । अथ पृच्छामहे युश्मान्पांडवानां चिकीर्षितम् ॥३६॥
हरि म्हणे गा देवर्षिवरा । तूं या जाणसी चराचरा । त्रिजगाचिया बाह्यान्तरा । विकारनिकरा वेत्ता तूं ॥३७५॥
ईश्वरनिर्मित जितुके लोक । त्यांमाजि तूतें कोणीं एक । विदित नाहीं हा विवेक । न करवें निष्टंक हरिहरां ॥७६॥
असो अखिलां लोकांची मात । त्यांमाजि किंचितही वृत्तान्त । तुज सर्वज्ञा नोहे विदित । ऐसा प्राकृता कोण वदे ॥७७॥
तस्मात् भूत भविष्य वर्तमान । अबाधित ऐश्वर्य त्रिकालज्ञ । आमुच्या भाग्यें तूं सर्वज्ञ । प्राप्त झालासि ये समयीं ॥७८॥
ऐसा अपार तुमचा महिमा । वर्णितां सहसा न करवे सीमा । यावरी अपेक्षित जितुकें आम्हां । पूर्णकामा तेंचि पुसो ॥७९॥
चिरकाळ पाण्डवांकडील कांहीं । आम्हां वर्तमान कळलें नाहीं । स्वामी सर्वज्ञ बैसले ठायीं । तें सर्वही प्रकाशिती ॥३८०॥
पाण्डवांचें मनोवांछित । आम्ही पुसतों यथातथ्य । यावरी तेचि कथा मात । इतुकें भगवंत बोलिला ॥८१॥
हें ऐकोनि नारदमुनि । साद्यंत विवरी भगवद्वाणी । इत्यर्थ करूनि अंतःकरणीं । मग निरूपणीं प्रवर्तला ॥८२॥
इत्यर्थ केला कोणे परी । म्हणसी राया तरी अवधारी । सर्वज्ञ असतां अज्ञापरी । मज कां श्रीहरि हें पुसतो ॥८३॥
तस्मात बार्हद्रथवधार्था । पाण्डवांचिया मनोवांछिता । मजला पुसे भीमकीभर्ता । विदित वार्ता असतांही ॥८४॥
नारद हे अवघी माया । अंतःकरणीं जाणूनियां । वदता झाला तें कुरुराया । अभिमन्युतनया अवधारीं ॥३८५॥
मायामय हा तुझा प्रश्न । तिहीं लोकीं प्रतिपादून । वदता झाला विधिनंदन । श्रोतीं श्रवण तो कीजे ॥८६॥
श्रीनारद उवाच - दृष्टा मया ते बहुशो दुरत्यया माया विभो विश्वसृजश्च मायिनः ।
भूतेषु भूमंश्चरतः स्वशक्तिभिर्वह्रेरिव च्छन्नरुचो न मेऽद्भुतम् ॥३७॥
भो समर्था जगदीश्वरा । तुझिये मायेचा पसारा । बहुत दुस्तर चराचरा । म्यां देखूनि बहु वेळां ॥८७॥
धालों निवालों जगदीशा । म्हणूनि अद्भुत न वाटे सहसा । जरी मी म्हणसी समर्थ कैसा । तरी ते परेशा अवधारीं ॥८८॥
विश्वा मोहक मोहक ब्राह्मी माया । त्या विश्वसृजकाही ब्रह्मया । तुझी माया दुरत्यया । ऐसा स्वामिया समर्थ तूं ॥८९॥
विद्यादिका तुझिया शक्ति । तिन्हीं लपवूनि आपणाप्रति । तूं वर्तसी सर्वां भूतीं । म्हणोनि श्रीपति अगम्य तूं ॥३९०॥
भूतान्तरीं वर्तमान । असोनि अलिप्त नित्य निर्गुण । त्या तव माया म्यां देखून । अद्भुत मम न मनी पैं ॥९१॥
म्हणसी भूतान्तरीं मम वसति । तरी कां भूतें न देखती । यदर्थीं ऐकावी उपपति । भो श्रीपति भगवंता ॥९२॥
बीजारोपणा भू आधार । जळेंचि वाढती जे तरुवर । तयां गर्भीं वैश्वानर । झांकूनि भासुरपण वर्ते ॥९३॥
शोषण दीपन उज्ज्वलीकरण । तरुवररूपें परिणमोण । इत्यादि दशधा शक्ति करून । लपे कृशान तरुरूपें ॥९४॥
तैसाचि तूंहीं जगदीश्वरा । मेधा कान्ति धृति स्मृति गिरा । विद्याप्रमुख शक्तिनिकरा - । माजि ईश्वरा लपसी तूं ॥३९५॥
पृथ्वीमाजि पुण्यगंध । जळीं रसाळता जे विविध । चंद्रार्काग्न्यादिकीं प्रसिद्द । अनेक भेद तेजाचे ॥९६॥
तैसाचि भूतभौतिकीं पवन । सबाह्य व्यापक सर्वत्र गगन । भूतान्तरीं हे भूतगुण । स्वयें होऊन लपसी तूं ॥९७॥
आंबा गोड रसाळ मधुर । ऐसें वदती भोक्ते चतुर । परि न म्हणती रसाळ नीर । तेंवि अगोचर भूतीं तूं ॥९८॥
प्रकट असतांचि तूं अप्रकट । त्या तव मायांचा शेवट । पावे ऐसा ज्ञाता श्रेष्ठ । ब्रह्माण्डघटीं मज न दिसे ॥९९॥
विधि हर सुरवर मुनीश्वर । न पवती तव मायेचा पार । तेथ तुझा हा प्रश्नविचार । अद्भुततर मज न गमे ॥४००॥
तवेहितं कोऽर्हति साधु वेदितुं स्वमाययेदं सृजतो नियच्छतः ।
यद्विद्यमानात्मतयाऽवभासते तस्मै नमस्ते स्वविलक्षणात्मने ॥३८॥
भो भगवंता तव चेष्टित । जाणावया इत्थंभूत । तुजविण दुसरा ब्रह्माण्डांत । कोण समर्थ असे पां ॥१॥
माझें चेष्टित कोणे परी । म्हणसी तरी तें ऐकें हरि । लटिकेंचि जग हें साचपरि । मायाविकारीं भासविसी ॥२॥
रज्जूवरी अध्यारोप । नसतां साच प्रकाशी सर्प । मरणभराचा अहा कंप । विकार अमूप तो प्रकटी ॥३॥
रज्जु नेणे सर्पत्ववारें । अथवा घेपे तद्विकारें । जड आचेत निज निर्धारें । भय काविरें सचेतातें ॥४॥
सर्प केवळ अविद्यमान । परि द्रष्ट्याचें विपरीत ज्ञान । अविद्यायोगें परिणमोन । विद्यमानत्व त्या कल्पी ॥४०५॥
वास्तव आस्तिक्यें जो शुद्ध । अविद्याभ्रमें तो विपरीत बोध । लाहोनि भावे सर्प विरुद्ध । पावे खेद भ्रम कंपें ॥६॥
तैसें जग हें अविद्यमान । प्रत्यक्ष मृगाम्भासमान । मायात्मकत्वें विपरीत वयुन । विद्यमानत्व त्या प्रकटी ॥७॥
जड अचेत दुःखालय । अविद्यमान क्षणिकप्राय । तेथ विकारसमुच्चय । कैंचा काय कोठुनी ॥८॥
आत्मा निर्विकार निर्लेप । साक्षी सर्वग चिन्मात्रदीप । अविद्यामायाभ्रमसंकल्प । अध्यारोप तद्योगें ॥९॥
अविद्याबिम्बित चिदाभास । जीवचैतन्य बोलिजे त्यास । करणरूप तें तत्प्रकाश । भावी दृश्य साचवत् ॥४१०॥
चित्प्रकाशें मनाच्या ठायीं । विपरीत कल्पना स्फुरती पाहें । इन्द्रियद्वारा विषयप्रवाहीं । अवस्था दोन्हींमाजि रमे ॥११॥
तृतीय अवस्था जे सुषुप्ति । तीमाजि दोहींची लयोत्पत्ति । कल्पनाभ्रमें सत्यप्रतीति । स्वप्न जागृन्मय होय ॥१२॥
जागृतीमाजि जेव्हां असे । तेव्हां विश्व हें साचचि भासे । सुषुप्तिविसरें जागृति नासे । तैं स्वप्न आभासे सत्यत्वें ॥१३॥
एवं अवघी हे कल्पना । अवस्थाभेदें प्रत्यय नाना । मिथ्या असोनि विपरीत वयुना । सत्य भासूनि विचंबवी ॥१४॥
षड्रस पक्कान्नें पंचामृत । कल्पनेचीं करूनि बहुत । ताटें भरूनि शतानुशत । जेविल्या क्षुधित तैसाचि ॥४१५॥
तैसेंचि काल्पनिक हें जग । तेथ तुझा हा मायात्मयोग । विद्यमानत्व करी सांग । वास्तव अव्यंग न चोजवे ॥१६॥
ऐसिया तूतें नमस्कार । करावया शक्य अधिकार । नमनावांचूनि तूं साचार । अन्यप्रकारें न चोजविसी ॥१७॥
न्यायें सांख्यें पातंजळें । वैशेषिकें मीमांसाबळें । तुझें वास्तव तत्त्व न कळे । एवं सकळें तुज अरुयीं ॥१८॥
एवं सर्वांचीं लक्षणें । अचिंत्य अगाध अगम्य गहन । अलक्ष रजोनिर्गुण । तो तूं सगुण सुरकार्या ॥१९॥
जरी तूं म्हणसी जगदीश्वरा । अचिंत्य अगाध मी जरी खरा । तरी कां मायाजनित विकारा । आरोप करा मम माथां ॥४२०॥
मायाचेष्टित करून । काय मजला प्रयोजन । म्हणसी तरी तें निरूपण । ऐकें संपूर्ण सर्वगता ॥२१॥
जीवस्य यः संसरतो विमोक्षणं न जानतोऽनर्थवहाच्छरीरतः ।
लीलावतारैः स्वयशः प्रदीपकं प्राज्वालयत्त्वा तमहं प्रपद्ये ॥३९॥
तरी अविद्यावेष्टित जो कां जीव । त्यासि अविद्याभ्रमवेष्टनास्तव । दुःखालयवर्ष्मापासाव । मोक्षोपाव नावगमे ॥२२॥
पुढती पुढती जनन मरण । पुढती जननीजठरीं शयन । संतत विषयात्मक चिन्तन । वासनाबंधन बीजमय ॥२३॥
साळी विरूढोनि तृणवत होये । पुढती परिणमे बीजमये । जीवचैतन्या येणें न्यायें । अविद्यावरणें संसरनें ॥२४॥
एका देहापासूनि सुटे । कर्मजनित अन्य घटे । एवं भवभ्रमतमअव्हाटे । पासूनि न सुटे कल्पान्तीं ॥४२५॥
एवं पावतां संसरण । करूं न शके स्वमोक्षण । त्याची करावया सोडवण । कृपाळु पूर्ण होत्साता ॥२६॥
अध्यारोप भवभ्रम जो हा । जीवां दुर्गम जाला महा । त्याचा अपवादपावकें दाहा । करणें कणवां जीवांच्या ॥२७॥
वास्तव अपरोक्षज्ञानोदयें । जगदारोपा अपवाद होय । जीवा न लभे ज्ञानसोय । म्हणूनि उपाय करिसी हा ॥२८॥
धरूनि लीलावतार नाना । करिसी धर्मसंस्थाना । उत्पथ मारूनि रक्षिसी स्वजना । स्वयशें त्रिभुवना प्रकाशिसी ॥२९॥
तियें तव अवतारगुणचरित्रें । अमोघकीर्तिश्रवणमात्रें । पावन होती श्रोतृगात्रें । पुत्रकलत्रें मोहितही ॥४३०॥
मोहभ्रांतीचे सप्त पाश । तिंहीं बद्ध असतांही अशेष । श्रवणीं पडतां अमोघ यश । तत्काळ नाश भवपाशां ॥३१॥
स्वप्नीं चोरीं जो बांधिला । जागृती येतां मुक्तचि पहिला । तोचि न्याय तव यशें केला । चित्तशुद्धीला प्रकटूनी ॥३२॥
तव गुणश्रवणीं चित्तशुद्धी । होतां विषयीं न रमे बुद्धी । रमे वास्तव निजात्मबोधीं । अविद्योपाधी निरसूनी ॥३३॥
ऐसीं ज्याच्या गुणयशःश्रवणें । तुटती जीवांचीं बंधनें । तया अजन्मा तुजकारणें । नादर म्हणे मी शरण ॥३४॥
तो तूं मायालीलावतारी । नव्हसी मानवशरीरधारी । सर्वज्ञ असतां अज्ञापरी । वदासी वैखरी प्रश्नमिसें ॥४३५॥
असो तुझें हें वास्तव स्तवन । यावरी तुवां जो केला प्रश्न । तेंचि साकल्येंकरूनि कथन । ऐकवीन मी आतां ॥३६॥
अथाप्याश्रावये ब्रह्मन्नरलोकविडंबनम् । राज्ञःपैतृष्वस्रेयस्य भक्तस्य च चिकीर्षितम् ॥४०॥
ब्रह्मन् म्हणोनियां संबोधी । भो परमात्मया कृपानिधि । मनुष्यलोकींच्या अनुकारविधी । दाविता जो तूं त्या तूतें ॥३७॥
पुसिला तितुका समाचार । कथितों ऐकें सविस्तर । पितृभगिनीचा ज्येष्ठकुमर । राजा युधिष्ठिर जें वांछी ॥३८॥
करूं इच्छी जें धर्मराजा । तें तूं ऐकें गरुडध्वजा । ऐकोनि मिळे जें धर्मकाजा । तें मग पैजा अवलंबी ॥३९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 29, 2017
TOP