अध्याय ७० वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
लोको विकर्मनिरतः कुशले प्रमत्तः कर्मण्ययं त्वदुदिते भवदर्चने स्वे ।
यस्तावदस्य बलवानिह जीविताशां सद्यश्छिनत्त्यनिमिषाय नमोऽस्तु तस्मै ॥२६॥
देहबुद्धि पृथग्द्रष्टे । कर्में करूनियां अभीष्टें । फळें पावती अनिष्टें । दुखें कनिष्ठें भोगिती ॥२॥
ऐसे प्राणी जिये ठायीं । तो हा मर्त्यलोक भवभयीं । बुडाला दुःखाच्या प्रवाहीं । तेचि नवायी निवेदिती ॥३॥
मृत्युलोकींची हे प्रवृत्ति । अनिष्ट इष्टत्वें आचरती । जेव्हां होय फळवाप्ति । तेव्हां रडती दुःखभयें ॥४॥
विवरीत होत्साते भयभय । नमस्कारिती रुक्मिणीप्रिय । तो हा श्लोकींचा अन्वय । पूर्वपीठिके संग्रहिला ॥२०५॥
आतां ऐका पदव्याख्यान । राजे भवभया वाखाणून । नमिती काळात्मा भगवान । विपरीत वयुन विशदर्थें ॥६॥
देहात्ममानी जेथिंचे जन । तो हा मृत्युलोक संपूर्ण । येथींचें विपरीत कर्माचरण । कथिती नृपगण जगदीशा ॥७॥
विकर्म म्हणिजे विरुद्ध कर्म । जें कां केवळ निषिद्ध काम । तयाच्या ठायीं धरिती प्रेम । निरतप्रेम होत्साते ॥८॥
आपणा मानूनि देहमात्र । विषयप्राप्तिसुख स्वतंत्र । ऐसें जाणोनि यत्नपर । होती तन्मात्र प्रलोभें ॥९॥
दृष्टादृष्ट जें कां कर्म । ज्यातें म्हणती निषिद्ध काम्य । तेथ होऊनियां सकाम । धरिती प्रेम सुखभोगीं ॥२१०॥
त्यांमाजि प्रथम कर्म दृष्ट । ज्याचें नाम निषिद्ध स्पष्ट । विषयभोगार्थ तें यथेष्ट । वृथापुष्ट आचरती ॥११॥
म्हणाल निषिद्ध कोण तें कैसें । ब्रह्महत्यादि हिंसादोषें । धन जोडी विषयसोसें । अन्याय मानसें न म्हणूनी ॥१२॥
जो स्वभावें आपणा निद्नी । त्यातें वधिती मानूनि दन्दी । स्तवन करिती होऊनि बंदी । त्यांतें वंदी आप्तत्वें ॥१३॥
बळात्कारें परस्त्रीगमन । अथवा कौटिल्यें प्रलोभून । प्रत्यक्षचि रतिसेवन । मातृगमन न विचारी ॥१४॥
सुवर्ण चोरी धूर्तपणें । विश्वासघातें व्यवहार करणें । आनंद मानी मद्यपानें । अगम्यमैथुनें सर्वत्र ॥२१५॥
कामी वामे उपासना । काली यक्षिणी स्वर्णाकर्षणा । यजिती अर्पूनि दिव्यें नाना । पिशिता मीना मद्येंसीं ॥१६॥
मुद्रा मैथुन विविधा शक्ति । प्रसंगें पंचमी आराधिती । तेथ प्रत्यक्ष फळावाप्ति । सकाम कामिती अभिचारें ॥१७॥
वश होऊनि क्रोधानळा । शत्रु मानूनि धर्मशीळा । निरपराध चाळिती सळा । लाविती अनळा तत्सदना ॥१८॥
विषप्रळया न शिणती । बळात्कारें सर्वस्व हरिती । घातपातीं प्रवर्तती । भेदभ्रान्ति देहलोभें ॥१९॥
आपण उपकरे जो पापकर्मी । तोचि जिवलग समागमी । दृष्टफळभोगाचे कामीं । निषिद्ध अधमी आचरती ॥२२०॥
यावरीं काम्य अदृष्ट कर्म । तें जे आचरती सकाम । धरून फळभोगाचें प्रेम । म्हणती निगमप्रतिपाद्य ॥२१॥
इहलोकींचें क्षणभंगुर । विषयसुख जें स्वप्नाकार । तें दृश्य फळ मानूनि अधर । म्हणती सधर आमुष्मिक ॥२२॥
पशुबंध सोम वाजपेय । चयन पौण्ड्रक राजसूय । हयनरगोमेध अध्वरनिचय । ज्योतिष्टोमप्रमुख जे ॥२३॥
इत्यादि यज्ञीं सुकृतवाप्ति । तेणें होय स्वर्गप्राप्ति । या निश्चयें व्यवसितमति । याज्ञिक होती सकाम ॥२४॥
सौत्रामण्याचरणीं मद्य । प्राशन करिती दीक्षित सद्य । तेणें होती जगद्वंद्य । म्हणती वैध्य अनुल्लंघ्य ॥२२५॥
एवं सकाम हिंसादोष । करूनि मानिती परम तोष । स्वर्गावाप्ति होय फोस । गर्भवास न चुकती पैं ॥२६॥
पुढती जनन मरण । पुढती जननीजठरीं शयन । सकाम यजमानालागून । काम्याचरणफळ ऐसें ॥२७॥
इष्टापूर्त द्विविध कान्य । त्यामाजि कथिलें इष्ट कर्म । आतां आपूर्ताचें वर्म । तेंही सप्रेम अवधारा ॥२८॥
वापी कूप सरें तडाग । गंगातटें सोपानमार्ग । देवायतनें शाळा अनेक । पुरें गोपुरें अग्रहारें ॥२९॥
प्रासाद पवळिया दीपमाळा । प्रवाहनिरोधसंग्रह जळा । वनें वाटिका पाटस्थळा । सर्वकाळ जळऋद्धि ॥२३०॥
वाटिका उपवनें आराम । चूताश्वत्थादि अनेक द्रुम । पल्लिका खेट खर्वट ग्राम । आपूर्तनाम पैं यांचें ॥३१॥
एवं काम्य इष्टापूर्त । निषिद्ध म्हणिजे घातपात । विकर्मशब्दें हें विख्यात । लोक हा निरत ये विषयीं ॥३२॥
नितराम म्हणिजे अतिशयेंसीं । मृत्युलोक या विकर्माविषीं । आसक्त होत्साता भवपाशीं । निज कुशलासी भांसळला ॥३३॥
स्वकीय कुशलधर्म तो कोण । तरी जें तुझें पादार्चन । पाञ्चरात्रादि विधिविधान । मिश्रपूजन त्वदुदित जें ॥३४॥
उपासनाकाण्ड वेदप्रवीण । तेंचि केवळ तव मुखोदित । अथवा सामान्य सर्वगत । स्मृतिसंमत तव भजन ॥२३५॥
जें जें निपजे कर्म सहज । तेथ या लोकांस अनुमज । विषयसेवनभ्रमाचा माज । त्वदर्पणवोज विसरले ॥३६॥
शुक म्हणे गा परीक्षिति । गीतेमाजि अर्जुनाप्रति । अहिंसाभजन सहजस्थिति । स्वमुखें श्रीपति जें वदला ॥३७॥
अर्जुना सहज जें जें करिसी । जें होमिसी जें भक्षिसी । जें जें देसी अनुष्ठिसी । हृदयस्थासि तें अर्पीं ॥३८॥
मी जो सहज सर्वगत । हें यथार्थ श्रुतिसंमत । तरी स्वतःसिद्ध हृदयस्थ । अर्पीं समस्त त्या मज तूं ॥३९॥
ऐसिये त्वदुदित तुझिये भजनीं । लोक हा प्रमत्त भवभ्रमेंकरूनी । देहलोभें विषयाचरणीं । निरत होऊनि विकर्मा ॥२४०॥
कुशलकर्मीं अनवधान । विरुद्धाचरणीं परम प्रवीण । फुकट सांडूनि सुधापान । मोल वेंचूनि विष घेती ॥४१॥
कोटि ब्रह्महत्या निरसती । तें हरिनीराजन न पाहती । श्वानमैथुनें कां चोरा वधिती । श्रमोनि धांवती तें पाहों ॥४२॥
नित्य प्रकटती शशिभास्कर । त्यांतें न करिती नमस्कार । ग्रहणीं विलोकिती सादर । अभिचारमंत्रजपनिष्ठा ॥४३॥
वृद्ध हेळूनि माता पिता । आप्त मानिती वनिताभ्राता । आदर करिती निज जामाता । जो कुटिळता व्यंग वदे ॥४४॥
नित्यनैमित्तिक नावडे । परंतु गळां घाली कवडे । यात्रोद्देशें वावडे । चार वेडे अवलंबी ॥२४५॥
दूर देशीं कुळस्वामिनी । मुख्य देवता मायराणी । रांड बोडकी सुवासिनी । पूजी आणूनि कुळधर्मीं ॥४६॥
हळदी वदना कज्जल डोळां । भांगीं शेंदुर कुंकुम भाळां । मस्तकीं कंठीं सुमनमाळा । परिमळउधळा वरी करिती ॥४७॥
पंचमहायज्ञलोप । बोडकी पूजून अतिसाक्षेप । मायराणीस येईल कोप । तरी कुळदीप केंवि राहे ॥४८॥
न यजी दर्श पौर्णमासी । निंब नेसे साक्षेपेंसीं । जाऊनि कुळस्वामिनीपासी । दंपती शष्पांसि दाखविती ॥४९॥
वेदमाता जे गायत्री । अनुष्ठिली वशिष्ठविश्वामित्रीं । तिये सांडूनि साबरमंत्रीं । पंचाक्षरी द्विज होती ॥२५०॥
कोटि गोदानें सत्क्षेत्रीं । ग्रहणीं केलीं यथोक्त पात्रीं । कीं ब्रह्मप्रयागीं आकल्पवरी । सदाचारी वसिन्नलिया ॥५१॥
किम्वा साङ्ग अयुत यज्ञ । कीं मेरूइतकें सुवर्णदान । एवमादि समस्त पुण्य । गोविंदस्मरणीं न तुळे पैं ॥५२॥
इत्यादि अनंत हरीच्या नामा । अमोध अक्षय अगाध महिमा । तेथ नुपजे अधमा प्रेमा । रुचती वामास्तवनिंदा ॥५३॥
अपान हागवणें पिटिपिटी । तैसा बैसूनि हाटवटीं । सांगे फुकटा निष्फळ गोठी । वृथा वटवटी तोंडबळें ॥५४॥
एका स्तवनें गगना चढवी । एका निंदूनि लघुत्व लावी । ऐसी वृथाच वाणी शिणवी । परि न शिणे जीवीं वयवेंचें ॥२५५॥
पूज्य ब्राह्मणा न लवे कधीं । पोटासाठीं नीचा वंदी । सज्जनाचा होय दंदी । दुष्टा आराधी इष्टत्वें ॥५६॥
ऐसा हा लोक समस्त । स्वकीयकुशली प्रकर्षे मत्त । विरुद्धकर्माचरणीं निरत । त्यजूनि अमृत विष प्राशी ॥५७॥
देहबुद्धीचा अहंकारी । स्वकीय कुशलीं उमज न धरी । विषयलोभें हांव धरी । उन्मत्त जोंवरी भ्रमगस्त ॥५८॥
आपणा मानूनि अजरामर । करी विरुद्ध कर्माचार । तंव तूं काळात्मा ईश्वर । छेदिसी सत्वर जीविताशा ॥५९॥
कामप्रलोभें लोक हा हांवे । भरूनि विषयीं घेतां धांवे । प्रमादें वास्तव नाहींच ठावें । तंव जो स्वभावें निवटी या ॥२६०॥
निमेषासूनि ब्रह्मायुवरी । येवढी ज्याची परिणाहथोरी । तो काळात्मा तूं श्रीहरि । बळात्कारें संहरिसी ॥६१॥
मानूनि अजरामर शरीर । विषयार्थ जीविताशा फार । ते तत्काळ बळात्कार । करूनि सत्वर छेदी जो ॥६२॥
तया काळात्मका तुजकारणें । आम्ही नमितों दासपणें । जिये लोकीं आमुचें जिणें । तेथिंची जाणणें गति ऐसी ॥६३॥
असो प्रमादी लोक ऐसा । आम्हां केवळ तुझिया दासां । कायनिमित्त दुःखवळसा । विस्मय परेशा हा वाट ॥६४॥
लोके भवाञ्जगदिनः कलयाऽवतीर्णः सद्रक्षणाय खलनिग्रहणाय चान्यः ।
कश्चित्त्वदीयमतियाति निदेशमीश किंवा जनः स्वकृतमृच्छति तन्न विद्मः ॥२७॥
अगा ईशा जगदात्मया । जगदीश्वर तूं अवतरलिया । साधु सज्जन रक्षावया । खळ दंडाया ये लोकीं ॥२६५॥
तुजसारिखा रक्षक असतां । आम्हीं दासां दुःखव्यथा । कीं आणिक कोण्ही तुजहूनि परता । समर्थ तव आझालंघना ॥६६॥
आम्हां दासां दुःखावर्त । मागधादिकां विजय ऊर्जित । कीं अन्य कोणा हें सामर्थ्य । तव निदेश लंघावया ॥६७॥
जरासंधादिक तव द्वेष्टे । सुखें भोगिती विजयाभीष्टें । आम्ही प्रपन्न पीडतों कष्टें । केंवि उफराटें हें स्वामी ॥६८॥
तूं तव प्रपन्नार्तिहरणा । अवतरलासि भो जनार्दना । निग्रहावया खळ दुर्ज्जना । कीं विपरीत कोणा करवतसे ॥६९॥
किंवा तुवा रक्षिला स्वजन । तथापि जैसें पूर्वाचरण । तैसें सुखदुःख त्यालागून । न सुटे गहन हें न कळे ॥२७०॥
तर्हीही दोन्ही न होती युक्त । जे दुःख भोगिती तुझे भक्त । निदेश लंघिती ते समर्थ । विजयवंत सुखभोक्ते ॥७१॥
आणि तुवां रक्षिला असतां जन । कर्मदुःख पावेचि पूर्ण । द्विविध शंका न कळे म्हणून । आम्ही अनभिज्ञ विचंबतसों ॥७२॥
दुःख म्हणसी कोणें तुम्हा । तरी ऐकावें पुरुषोत्तमा । तुझिया शरणागतां आम्हां । या भवभ्रमाचा वरपडणें ॥७३॥
स्वप्नायितं नृपसुखं परतंत्रमीश शश्वद्भयेन मृतकेन धुरं वहामः ।
हित्वा तदात्मनि सुखं त्वदनीहलभ्यं विलश्यामहेऽतिकृपनास्तव माययेह ॥२८॥
इहलोकींचें नृपासन । क्षणिक सुख जैसें स्वप्न । तमिस्रातमीं विद्युत्स्फुरण । जे लखलखोन हारपे ॥७४॥
मनुष्यलोकीं सुखाची गरिमा । नृपैश्वर्यपर्यंत सीमा । ते उपभोग करणग्रामा । आत्मारामा क्लेशरूप ॥२७५॥
इन्द्रियग्रामाधीन सुख । तस्मात परतंत्र निष्टंक । जें कां केवळ विषयात्मक । क्लेशजनक क्लेशमय ॥७६॥
शब्दावांचूनि श्रवणाप्रति । नाहीं सुखाची विश्रांति । शब्द प्रकटी अपकीर्त कीर्ति । निंदा स्तुति द्विविध पैं ॥७७॥
स्पर्शविषयें त्वचेसि सुख । तो स्पर्शही द्विविध देख । मृदु आणि कठिनात्मक । दुःख हरिख प्रकाशी ॥७८॥
रूपविषये नेत्राप्रति । सुंदर भयंकर उभय प्रतीति । करी सुखदुःखांची प्राप्ति । सर्व जाणती अनुभव हा ॥७९॥
जिह्वा जाणे कडू गोड । रसविषय तो द्विविध रूढ । घ्राण गंधाची धरी चाड । सुगंध दुर्गंध द्विविध पैं ॥२८०॥
एवं सुख हें विषयात्मक । प्राणिमात्र जाणती देख । नृपैश्वर्य तें विशेष । दोषजनक दुःखमय ॥८१॥
विषयसुख हें सर्वां कळे । परि दुःखही त्यामाज मिळे । नृपा सुखाचे सोहळे । जनाचे डोळे भाविती ॥८२॥
सर्वां आवडे आपुली स्तुति । आणि लोकीं प्रख्यात कीर्ति । परंतु नाहीं तैसी स्थिति । निंदा अपकीर्ति होय तेणें ॥८३॥
नृपासमोर न करिती निन्दा । आत्मस्तुति ऐके सदा । तेणें भोगी श्रवणानंदा । दुःखशब्दा नयकतां ॥८४॥
जे जे स्तविती होऊनि विनीत । त्यांचे पुरवी मनोरथ । निंदकाचा करी घात । यालागिं संतत सुखश्रवणें ॥२८५॥
त्वचेसि मृदु स्पर्श जे रुचती । ते संपादी ऐश्वर्यशक्ती । वनिता लिंगनीं धरी प्रीती । तैशा मिळती रतिरसिका ॥८६॥
रूपविषय आवडे नयनां । त्या त्या भूषी रत्नाभरणा । दिव्य वसना याना भुवनी । निर्मी आसना दृक्सुखदा ॥८७॥
जिह्वे आवडती नाना रस । मेळविती करूनि बहु सायस । पुरविती नृपाचें आवडीस । प्रजा विषेषयत्न्परा ॥८८॥
सुगंध आवडे नासिका । तदर्थ वेंचूनि रत्ना कनका । मोलागळीं द्रव्यें देखा । आणूनि तोषा पावविती ॥८९॥
मृगनाभिकस्तूरी दिव्य सुगंधी । बिडाळवृषणोद्भव जवादी । चंद्रकाश्मीर मलयजगंधी । द्रव्यीं विविधीं सुख भोगी ॥२९०॥
शरीरनिष्ठ इंद्रियद्वारा । विषयसुखाचा हा उभारा । नृपैश्वर्यें भोगी धरा । मानूनि खरा इहलोक ॥९१॥
परंतु नेणे हें परतंत्र । स्वप्नासारिखें क्षणभंगुर । विषान्न जिह्वेपासीं मधु । कीं संवचोरवसतींत ॥९२॥
उर्वशीसमान लावण्यखाणी । वनितारूप नटे यक्षिणी । भुलोनि रमतां आनंद मानी । परा प्राणहानि उमजेना ॥९३॥
नलिनीदलगतजळ । तेंवि विषयसुख बहळ । क्षणदासुप्तासि अळुमाळ । नृपसुख केवळ स्वप्नवत् ॥९४॥
देहाभिमानजनित नृपसुख । येर्हवीं केवळ साद्यंत दुःख । शरीरवंआसी हें सम्यक । विदित नावेक असे कीं ॥२९५॥
जर्ही नृपाचें शरीर झालें । तर्ही तें शरीरधर्माथिलें । शरीरधर्मारहित केलें । ऐश्वर्यबळें हें न घडे ॥९६॥
क्षुधा तृषा निद्रा तंद्रा । शीतोष्णादि पीडा प्रचुरा । बाल्य तारुण्य आणि जरा । शरीरमात्रा समसाम्य ॥९७॥
आधि व्याधि नाना आमय । हर्षामर्ष शोक भय । दैवोपलब्ध विकारनिचय । करी उदय देहामात्रीं ॥९८॥
वातपित्तकफादि त्रिविध । एतज्जनित व्याधि विविध । पीडितां न म्हणती बुधाबुध । दरिद्री धनद रंक नृप ॥९९॥
देवी गोंवर शरीरमात्रा । ते काय न पीडिती नृपगात्रा । बाळग्रहादि पीडा अपरा । नृपा किंकरा समसाम्य ॥३००॥
सेवितां दिव्योत्तमाहारा । नृपाचिया अपानद्वारा । सहसा न निघे सुगंध वारा । विवेक विवरा हृदयीं हा ॥१॥
सर्वेंद्रियीं याचिपरी । नृपा किंकरा सम शरीरीं । दुःखावाप्ति होय पुरी । कर्मसामग्रीअनुरूप ॥२॥
एकाकी नर कर्म करी । तें शुभास्भु त्याचेचि शिरीं । राष्ट्रकृतकर्माधिकारी । नृप निर्धारीं होतसे ॥३॥
राष्ट्रजनित जितुकें पाप । तें भोगावया समर्थ नृप । पापाचें फळ दुःख अमूप । लागे आकल्प भोगावें ॥४॥
स्वप्नप्राय नृपासन । पुढें न चुके यमशासन । गर्भवासी निर्बुजून । नवमास पचून उपजावें ॥३०५॥
विष्ठामूत्रीं नवमासवरी । सर्वशरीरीं मातृकोदरीं । कीं नृपशरीरालागिं कस्तूरी । माता जठरीं भरिजेतसे ॥६॥
अमूल्य सौरभ्य भोग वरिवरी । विष्ठामूत्र नृपादि जठरीं । कीं जरा जर्जर जनातें करी । नृपा न करी हें विवरा ॥७॥
जितुका भोग तितुका रोग । सुखदुःखाचा समान योग । काळ मृत्यु भयप्रसंग । न सोडी संग निरंतर ॥८॥
जितुकें वाढे तितुकें मोदे । उडे तें तें पुढें पडे । घडे तें तें काळें विघडे । नृपसुखाचें कोण सुखें ॥९॥
संचिलें त्याचा होय व्यय । तें तें पुढें पडे । घडे तें तें काळें विघडे । नृप सुखाडे कोण सुखें ॥३१०॥
ऐसें काळभय निरंतर । ज्यामाज वसे तें हें शरीर । जीतचि असतां प्रेत साचार । तेणें धुरंधर आम्ही झालों ॥११॥
अहो ऐसे महत्कष्ट । आम्ही भोगूं जे पापिष्ठ । तव पदभजन परम इष्ट । सांडूनि अनिष्ट कां भजलों ॥१२॥
महत्कष्टभोगाचे पूर्वीं । निष्काम होत्साते सर्वत्र सर्वीं । तव पदप्रणति परम उर्वी । होऊनि अगर्वी नाश्रयिली ॥१३॥
स्वामी म्हणसी धूर ते कोण । तरी पुत्र दारा धन धान्य सदन । इत्यादिचिंताविस्तीर्णगहन । वाहों अभिमान धरूनी ॥१४॥
अमृत टाकूनि घेतलें विष । हा कोणातें लाविजे दोष । मायाजनितविषयाभास । देखोनि अशेष भ्रमलों पैं ॥३१५॥
अविद्यावेष्टित जीव आम्ही । विषयसुखाची लिप्साउर्मी । उठतां दरिद्री कृपणकामीं । भयसभ्रमीं भांसळलों ॥१६॥
तुझिये मायेकरूनि येथ । दुःखीं वरपडलों अनाथ । आतां जाणूनि शरणागत । करीं सनाथ जगदीशा ॥१७॥
म्हणती टांकिलें अमृत कोण । ऐसें तयाचें लक्षण । जिहीं उपासिले तुझे चरण । निष्काम भजन करूनियां ॥१८॥
तिहीं निष्काम भजनास्तव । कैवल्यसुख जें तुजपासाव । पाविजेलें सांडूनि माव । प्रप्म्च सर्व भवभ्रम हा ॥१९॥
कर्मज्ञानचेष्टाप्रमुख । कर्तृकरणादिरहित देख । आत्मस्वरूपीं स्वतःसिद्ध सुख । अनीह उपासक जें लाहती ॥३२०॥
आम्ही ऐसें परमामृत । सांडूनि झालों विषयीं रत । तव मायेनें भुलविलों येथ । क्लेश संतत भोगीतसों ॥२१॥
तव मायाकृत कर्मबंध । त्यातें छेत्ता तूं मुकुन्द । यालागिं नमितों पादारविन्द । छेदीं अगाध भवपाश ॥२२॥
तव मायाकृत कर्मबंध । त्याचा छेदक तुजवीण आन । नाहींच निश्चय हा जाणून । करिती प्रार्थन तें ऐका ॥२३॥
तन्नो भवान्प्रणतशोकहरांघ्रियुग्मो बद्धान्वियुंक्ष्व मगधाह् वयकर्मपाशात् ।
यो भूभुजोऽयुतमतंगजवीर्यमेको बिभ्रद्रुरोध भवने मृगराडिवावीः ॥२९॥
तस्मात ज्याचें चरणयुगळ । प्रणतशोकहर केवळ । तो तूं आम्हां प्रप्रन्नपाळ । सोडवीं दयाळ होत्साता ॥२४॥
चरणयुगळाच्या चिन्तनें । तुटलीं बहुतांचीं बंधनें । पुढें तुटती हीं व्याख्यानें । श्रुतिपुराणें प्रशंसिती ॥३२५॥
तुम्हां निग्रहिलें म्हणसी कोणीं । तरी आमुच्या कर्में चक्रपाणि । जरासंधाख्य पाश होउनी । निगडबंधनीं निरोधिलों ॥२६॥
कोण म्हणसी जरासंध । तरी विप्रचित्तिनामा दैत्य । तो हा भूलोकीं मागध । जन्मला प्रसिद्ध नृपवर्गीं ॥२७॥
तेणें करितां दिग्विजयासी । जे जे शरण झाले त्यासी । ते ते लाविले परिचर्येसी । दास्यधर्मासि नियोजुनि ॥२८॥
आम्ही क्षात्रधर्मसमरीं । भिडतां जिंकूनि बळात्कारीं । धरूनि निग्रहिलों श्रीहरि । गिरिव्रजपुरीं निजदुर्गीं ॥२९॥
जरी तूं म्हणसी निजप्रतापें । क्षात्रवृत्तीच्या क्रूर कोपें । मागधा जिंकूनि शौर्यरूपें । विक्रमा आटोपें प्रकट करा ॥३३०॥
यदर्थीं ऐकें भो यदुवर्या । मागध असाम्य इतरां रायां । तयासि समरीं जिणावया । नर शूर शौर्या नागविती ॥३१॥
अयुत मत्त गजांचें बळ । तदुपरि शस्त्रास्त्रविद्याकुशळ । सेनासमुद्र महा प्रबळ । कोणपां भूपाळ त्या दमिता ॥३२॥
दहा सहस्र कुंजर मत्त । तितुकें बळ जो एकीभूत । आंगीं वाहे प्रतापवंत । मागधनाथ पटु ऐसा ॥३३॥
तेणें समरीं वीस सहस्र । राजे जिंकूनि प्रतापी शूर । रोधिलों जैसा कां मृगेन्द्र । मेंढरा कोंडी स्वदर्पें ॥३४॥
गिरीव्रजनामें आपुले भवनीं । कर्मपाशयमलोहदामनीं । बांधिल्या नपाचिया श्रेणी । हें श्रीचरणीं निवेदिलें ॥३३५॥
आमुची तुझिये चरणीं रति । तूं आमुचा पक्षपाती । यालागीं तो आम्हांप्रति । दिवसराती बहु जाती ॥३६॥
त्याचा प्रताप सर्वां विदित । सर्वज्ञ जाणसी तूं भगवंत । तुजसीं तेणें संग्राम बहुत । केलें वृत्तान्त तो ऐक ॥३७॥
यो वै त्वया द्विनवकृत्व उदात्तचक्र भग्नो मृधे खलु भवंतमनंतवीर्यम् ।
जित्वा नृलोकनिरतं सकृदूढदर्पो युष्मत्प्रजा रुजति नोऽजित तद्विधेहि ॥३०॥
अगा ये उदात्तचक्रा हरि । जो निश्चयें तुजसी समरीं । अठरा वेळा बळात्कारीं । धरूनि वीरश्री संघटला ॥३८॥
दोनी नवकें म्हणिजे अठरा । तुजसीं भिडतां येऊनि निकरा । तुवां भंगिला वेळां सतरा । सेनापरिवारा लुटूनियां ॥३९॥
परंतु आवेश न संडी कोपी । क्षोभें खवळे महाप्रतापी । सेनावीरश्रीसाटोपीं । संग्रामकल्पीं प्रवर्ततां ॥३४०॥
तुझा प्रताप अपरिमित । वर्णिता विधि हर न पवती अंत । यालागिं नामें तूं अनंत । अनंतवीर्य अगाध तूं ॥४१॥
परंतु नृलोकींची अवगणी । धरिली येथ भूभारहरणीं । तैसीच केली संपादणी । समरांगणीं मागधाच्या ॥४२॥
सतरा वेळ भंगिलें मागधा । अठराविये वेळे युद्धा । येतां देखोनि जरासंधा । पुरी गोविन्दा पळविली त्वां ॥४३॥
अनंतवीर्या तूतें समरीं । जिंकिलें ऐसी मिरवी थोरी । परम गर्व हा मागधा शरीरीं । अतुलवीरश्रीमय झाला ॥४४॥
तेणें गर्वें तो दुर्मति । आम्हां तुझिया लेंकुरांप्रति । बळात्कारें दिवसराती । करी विपत्ति बहुसाळ ॥३४५॥
आमुचा नाथ तूं गरुडध्वजा । आम्ही भूभुज तुझिया प्रजा । तुजपुढें आम्हां जाचितां लज्जा । अवघी तुजला जगदीशा ॥४६॥
त्रिजगज्जिता भो भो अजिता । आम्हां तवपदशरणागतां । मागध जाची या अनुचिता । उचित काय तें विवरीं पां ॥४७॥
शरणागतां वज्रपंजर । हा तव बिरुदाचा बडिवार । आम्ही शरणागत किंकर । जाची क्रूर तुज असतां ॥४८॥
आम्हां उपेक्षूनि क्षमा करणें । किंवा बिरुदातें रक्षिणें । दोहींमाजि युक्तपणें । तें आचरणें जें उचित ॥४९॥
मागधबद्धनृपांची विनति । बद्धांजलि नम्रवृत्ति । इतुकी कथूनियां श्रीपति । दूत प्रार्थी तें ऐका ॥३५०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 29, 2017
TOP