अध्याय ७० वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
दूत उवाच - इति मागधसंरुद्धा भवद्दर्शनकांक्षिणः । प्रपन्नाः पादमूलं ते दीनानां शं विधीयताम् ॥३१॥
दूत म्हणे भो जगदीशा । कथिलें नृपाचिया संदेशा । विवरूनि कार्यार्था अशेषा । नृपाची आशा पुरवावी ॥५१॥
मागधें रोधिलें प्रतापशक्ती । ते तव दर्शना अपेक्षिती । शरण तुझिया चरणांप्रति । अनन्यभक्ति अंकित जे ॥५२॥
तया दीना भूपाळगणा । सुखी करावें जगज्जीवना । सर्व विदित तुज सर्वज्ञा । निमित्त प्रार्थना दूताची ॥५३॥
( ३५४ नं. नाही. )
इतुकें दूत वदों सरला । तंव प्रसंग अपूर्व झाला । तोही कथिजेत असें तुजला । कौरवपाळा अवधारीं ॥३५५॥
श्रीशुक उवाच - राजदूते ब्रुवत्येवं देवर्षिः परमद्युतिः । बिभ्रत्पिंगजटाभारं प्रादुरासीद्यथा रविः ॥३२॥
ऐसें दूताचें बोलणें । कृष्णेंसहित मंत्रिगणें । अवधारिलें तों देखती नयनें । गगनौनि येणें मुनीचें ॥५६॥
लोकां मान्य हरिहरांसि । ज्ञानवैराग्यतपोराशि । मौळें वंदिती ज्या महर्षि । तो देवर्षि नारद ॥५७॥
तेजःपुंज चामीकर । तैसा पिंगट जटाभार । तेणें मौलिभा भासुर । जैसा भास्कर प्रकटला ॥५८॥
चरमाद्रीवरी रविमंडळ । कीं गगनींहूनि विद्युल्लोळ । तैसा उतरला द्रुहिणबाळ । यादव सकळ विलोकिती ॥५९॥
शुद्ध पादुका शोभती चरणीं । वीणामंडित वामपाणि । सामगानपठनी वाणी । समदर्शनी निगमात्मा ॥३६०॥
ऐसा नारद द्वारकेआंत । सभेनिकटीं अकस्मात । देखते झाले जन समस्त । तो वृत्तान्त अवधारा ॥६१॥
तं दृष्ट्वा भगवान्कृष्णः सर्वलोकेश्वरेश्वरः । ववंद उत्थितः शीर्ष्णा ससभ्यः सानुगो मुदा ॥३३॥
तया मुनीतें देखून । लोकेश्वरांचा ईश्वर पूर्ण । सवेग उठिला श्रीभगवान । कृष्ण सर्वज्ञ जगदात्मा ॥६२॥
सभामान्य जे सभासद । अनुचर किंकरगण पार्षद । तिहींसहित श्रीगोविन्द । हर्षें नारद अभिवंदी ॥६३॥
सभाजयित्वा विधिवत्कृतासनपरिग्रहम् । बभाषे सूनृतैर्वाक्यैः श्रद्धया तर्पयन्मुनिम् ॥३४॥
नारदा देऊनि अभ्युत्थान । सभेसि सम्मानें येऊन । दिव्यासनीं बैसवून । केलें पूजन विधियुक्त ॥६४॥
आसनपूर्वक पूजा सर्व । अंगिकारूनि आर्यगौरव । बैसला असतां मुनींचा राव । त्यातें केशव बोलतसे ॥३६५॥
कल्याणकर आणि सुखतर । सूनृत पावन आणि मधुर । ऐसा गुणाढ्य वाक्यनिकर । बोले श्रीधर मुनीप्रति ॥६६॥
इत्यादि रसाळ सुभगा वचनीं । मुनीतें पूजूनि सभास्थानीं । बोलता झाला चक्रपाणिं । शुक वाखाणी तें ऐका ॥६७॥
अपि स्विदद्य लोकानां त्रयाणामकुतोभयम् । ननु भूयान्भगवतो लोकान्पर्यटतो गुणः ॥३५॥
भगवान म्हणे निश्चयेंसीं । त्रिजगामाजिही आम्हांसी । अभयावाप्ति झाली ऐसी । प्रतीति मानसीं दृढ झाली ॥६८॥
प्रतीति होवावया काय कारण । म्हणाल तरे तें ऐका पूर्ण । आजि देवर्षि सुप्रसन्न । सर्व सद्गण त्या योगें ॥६९॥
नाना भुवनीं वार्तिंक चार । प्रेरूनि आणिजे समाचार । त्रिजगीं मुनीचा संचार । तो सर्व साचार अवगत या ॥३७०॥
तस्मात् मुनीच्या दर्शनें । विदित झालीं समस्त सुवनें । ऐसा निश्चय केला मनें । कृपावलोकनें मुनीचिया ॥७१॥
आम्हांसि भयद कोणे भुवनीं । असता तरी ते जाणुनि ग्लानि । म्लानतेवरूनि सूचिता मुनि । प्रसन्नचिह्नीं अभय असे ॥७२॥
त्रिजगीं वर्तमान जें स्वयंभ । आम्हां येथें तो रहस्यगर्भ । अवगमला हा मुख्यलाभ । मुनिप्रसादसद्गुण हा ॥७३॥
इतुकें बोलोनि पुढती हरि । नारदातें मधुरोत्तरीं । वदता झाला तें अवधारीं । कुरुधरित्रीजनपाळा ॥७४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 29, 2017
TOP