मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६८ वा| श्लोक ४६ ते ५४ अध्याय ६८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५४ अध्याय ६८ वा - श्लोक ४६ ते ५४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५४ Translation - भाषांतर त्वमेवमूर्ध्नीदमनंत लीलया भूमंडलं बिभर्षि सहस्रमूर्धन् ।अते च यः स्वात्मनि रुद्धविश्वः शेषे द्वितीयः परिशिष्यमाणः ॥४६॥भो भो अनंता सहस्रशिरि । तूंचि हें भूमंडळ धरिसी शिरीं । अनंत लीलेच्या प्रकारीं । विश्वाकारीं अभिरमसी ॥२६॥आधारभूत अनंतमूर्ध्नी । तेथ आधेय अवघी धरणी । धराधर तूं पूर्णपणीं । लीलेकरूनि भू धरिसी ॥२७॥यथानुक्रमें प्रकृतिमान । पुरतां होसी संकल्पशून्य । निर्विकल्प करूनि मन । विश्व संपूर्ण सांठविसी ॥२८॥तैं अद्वितीय उरे जो शेष । शेषशायी म्हणणें त्यास । नित्य निर्गुण निर्गुण निर्विशेष । तो तूं परेश सन्मात्र ॥२९॥ गुणमय समष्टि ब्रह्माण्ड । अविद्यागुणात्मक व्यष्टि पिण्ड । तेणें आवृत होतां मूढ । झालों सदृढ भ्रमग्रस्त ॥३३०॥अविद्याभ्रमाची भुली पडली । एकीं अनेकता विरूढली । करणज्ञानें निष्ठा घडली । प्रतीति बिघडली वास्तव जे ॥३१॥यालागीं सगुण मर्त्यलिंग । प्रकाशे जैसा करणवर्ग । तोचि प्रत्यय बाणें चांग । नुमजे अव्यंग आत्मत्व ॥३२॥यालागीं अद्वया अखिलानंता । देऊं प्रत्यक्ष हे सगुणता । मानूं मानवासम प्राकृता । हा आमुचे माथां दोष नसे ॥३३॥दृश्य साच मानिती करणें । यास्तव तूंतें वृष्णिपणें । जाणोनि केलीं जीं हेळणें । क्षमा करणें तीं अवघीं ॥३४॥तुझा कोप हा आमुच्या ठायीं । सहसा उचिता नोहे पाहीं । म्हणसी यदर्थीं कारण कायी । तें सर्वही अवधारीं ॥३३५॥अनादिसिद्ध ब्रह्माण्डवर्ती । निगमप्रतिपाद्य जे कां स्थिति । तत्पथ दैत्य जे भंगिती । ते प्रतिपंथी धर्माचे ॥३६॥कोपस्तेऽखिलशिक्षार्थं न द्वेषान्न च मत्सरात् । बिभ्रतो भगवन्सत्त्वं स्थितिपालनतत्परः ॥४७॥ते धर्माची संस्थापना । करावया अवतार नाना । घेऊनि करणें स्थितिपालना । दुष्टां दुर्जनां दंडूनि ॥३७॥मुंगीपासूनि विरंचीवरी । धर्मोच्छेदनीं शिक्षा करी । अखिलशिक्षार्थ दंडधारी । तूं अवधारी जगदीशा ॥३८॥जितुका अपराध तितुका दंड । करूनि पाळिसी ब्रह्माण्ड । तात्पर्यार्थ कोप उदंड । दुष्ट प्रचंड निर्दळना ॥३९॥द्वेषा अथवा मत्सरास्तव । तुझ्याठायीं क्रोधोद्भव । न घडे निश्चय हा वास्तव । तव कृपेस्तव जाणतसों ॥३४०॥यादव मनुष्य तुज मानूनी । वास्तव तव ऐश्वर्य नेणोनी । हेलना केली मूर्खपणीं । ते तूं मनीं न धरिसी ॥४१॥तुवां मनुष्यमात्र व्हावें । तें हेलनोक्तीनें विषादा यावें । वास्तव स्वरूप झालें ठावें । कृपावैभवें स्वामीच्या ॥४२॥आतां स्वपादशरणां रक्ष । आमुचे अपराध लक्षेलक्ष । विसरूनि शरणागताचा पक्ष । कृपाकटाक्षें अवलोकें ॥४३॥नमस्ते सर्वभूतात्मन्सर्वशक्तिधराव्यय । विश्वकर्मन्नमस्तेऽस्तु त्वां वयं शरणं गताः ॥४८॥सर्व भूतांचा अंतरात्मा । सर्वसाक्षी सर्वोत्तमा । सवशक्तिधर तव गरिमा । अव्यय अनामा अक्षरा ॥४४॥ब्रह्माण्डसमुच्चय होय जाय । त्यामाजी तूं अज अव्यय । मायानियंता मायाश्रय । मायातीता अमायिका ॥३४५॥विश्वकर्मन्संबोधनें । याचिलागीं तूंतें म्हणणें । अखिल विश्वाचें होणें जाणें । स्थितिलयगोपनें तव सत्ता ॥४६॥कालकलनाप्रवर्तक । माया स्वसत्ता नियामक । नाहीं तुजपरता आणिक । जाणोनि पदाङ्क दृढ धरिलें ॥४७॥तूंतें आम्ही शरणागत । आलों कृतागस दुष्कृत । करीं अभयदानें सनाथ । आमुचें औद्धत्य विसरूनी ॥४८॥बाळकाचे अन्याय कोटी । कृपेनें माऊली घाली पोटीं । तेंवि आमुचें कृपादृष्टी । रक्षीं संकटीं दयाळुवा ॥४९॥भीष्मप्रमुखीं केला स्तव । रामें साद्यंत ऐकूनि सर्व । जाणोनि तयाचा अंतर्भाव । आला द्रव कारुण्यें ॥३५०॥श्रीशुक उवाच - एवं प्रपन्नैः संविग्नैर्वेपमानायनैर्बलः । प्रसादितः सुप्रसन्नो मा भैष्टेत्यभयं ददौ ॥४९॥नगर घालितां पालथें । थोर आकान्त नगरस्थांतें । भयें व्यापिलें कौरवांतें । उद्विग्नचित्तें यास्तव ते ॥५१॥एवं कौरव संविग्नचित्त । पूर्वोक्तप्रकारें शरणागत । स्तवनें नमनें रेवतीकान्त । प्रसन्न त्वरित तिहीं केला ॥५२॥प्रसन्न होत्साता बळराम । अभयहस्तें पूर्णकाम । सस्मितवदनें बोले क्षेम । येथूनि तुम्हां मम वरें ॥५३॥म्यां ओपिलें अभयदान । येथूनि सर्वांचें कल्याण । तुमचें दौर्जन्य तुम्हांसि विग्न । होतां शरण तें क्षमिलें ॥५४॥इत्यादि स्तवनीं वृष्णिपाळा । स्तवितां अपराध क्षमा केला । नांगर काढूनि पुरवप्राला । दडपिता झाला पूर्ववत ॥३५५॥अभय ओपितांचि बळभद्र । कौरवीं केला जयजयकार । मंगळतुरांचा वाद्यगजर । नेला हलधर नृपसदना ॥५६॥यथाविधि पाणिग्रहण । चारी दिवस संपादून । साडे ऐरणी वंशविधान । लक्ष्मीपूजन जानवसा ॥५७॥दुर्योधन जो कौवरराव । सांडूनि ऐश्वर्यमदाचा गर्व । देता झाला पारिबर्ह । संतोशार्ह जामात्या ॥५८॥दुर्योधनः पारिबर्हं कुंजरान्षष्टिहायनान् । ददौ च द्वादश शतान्ययुतानि तुरंगमान् ॥५०॥षष्टायन जे भद्रजाति । बारा शतें मत्त हस्ती । देता झाला सप्रेमभक्ति । जामात्या दुहितृवात्सल्यें ॥५९॥एक लक्ष वीस सहस्र । पर्वतसंभव तुरंगसार । जवें जिंकिती जे समीर । ते साळंकार समर्पिले ॥३६०॥रथानां षट्सहस्राणि रौक्माणां सूर्यवर्चसाम् । दासीनां निष्ककंठीनां सहस्रं दुहितृवत्सलः ॥५१॥सहा सहस्र सुवर्णरर्थ । रविभाभासुर रत्नखचित । आसनें वितानें शिबिकान्वित । तुरंगमंडित सूतेंसीं ॥६१॥एक सहस्र तरुणा दासी । सालंकृता लावण्यराशि । अमौल्य पदकें कंठदेशीं । उपचारेंसी समर्पिल्या ॥६२॥वस्त्रें पात्रें दिव्याभरणें । महिषी अजा अविक गोधनें । कन्यावत्सलें दुर्योधनें । नृपोपकरणें निवेदिलीं ॥६३॥आंदण अर्पूनि दुर्योधन । म्हणे लक्ष्मणा नेणती सगुण । प्रतिपाळावी कृपेंकरून । वदतां नयनीं जळ आलें ॥६४॥सहित धृतराष्ट्र गांधारी । भानुमतीप्रमुख नारी । लक्ष्मणा निरवूनि रामाकरीं । देतां नेत्रीं जळ लोटे ॥३६५॥भीष्मप्रमुखां कौरवां सकळां । मोह जाकळी तये वेळां । म्हणती रामा वृष्णिपाळा । स्नेहें सांभाळा कुमरीतें ॥६६॥इत्यादि वचनीं लक्ष्मणा । निरोविली संकर्षणा । सवें देऊनि दुःशासना । द्वारकाभुवना बोळविती ॥६७॥प्रतिगृह्य तु तत्सर्व भगवान्सात्वतर्षभः । ससुतः सस्तुषः प्रायात्सुहृद्भिरभिनंदितः ॥५२॥रामें पारिबर्ह समस्त । सवें घेऊनि स्नुषा सुत । द्वारकापुरा आनंदभरित । सात्वतनाथ निघाला ॥६८॥इष्ट मित्र सुहृद आप्त । कौरवपाण्डवादि समस्त । गव्यूतिमात्र बोळवित । कलत्रेंसहित निघाले ॥६९॥स्तुतिस्तवनें रामाप्रति । स्नेहवादें तोषविती । सुप्रसन्न रेवतीपति । सुहृदप्रेमोक्ति परिसोनी ॥३७०॥गव्यूतिमात्र क्रमिल्या पंथ । रामें स्थिर करूनि रथ । सर्व कौरव कलत्रेंसहित । प्रार्थूनि तेथ राहविले ॥७१॥कुरुवृद्धाची घेऊनि आज्ञा । राम आरूढला स्यंदना । मंगळतुरांची गर्जना । द्वारकाभुवना चालियले ॥७२॥उद्धव केला पुरःसर । दुःशासन पार्ष्णिधर । मध्यें बळराम ओहर । सेनापरिवारवेष्टित ॥७३॥स्थिर स्थिर चाले सेना । मथुराप्रान्तीं लंघिली यमुना । चर्मण्वतीचिया जीवना । त्रितीय दिवशीं ठाकिलें ॥७४॥अर्बुदाचळेश्वर वंदून । साब्रमती उल्लंघून । आनर्तदेश अतिक्रमून । द्वारकाभुवन पावले ॥३७५॥बळराम येतां द्वारकेनिकटीं । कृष्ण सम्मुख पातला भेटी । सवें यदुचक्राची दाटी । पुजनदाटी बहुसाल ॥७६॥उद्धव आणि संकर्षण । नमिले ब्राह्मण अभिवंदून । वोहरें नमिती श्रीकृष्णचरण । मौळावघ्राण येरू करी ॥७७॥दुःशासनें नमिला हरि । येरू कवळूनि हृदयीं धरी । आलिंङ्गूनि स्नेहभरीं । तोष अंतरीं वोसंडे ॥७८॥त्यानंतरें यदुपुङ्गवां । अनुक्रमेंचि नमिलें सर्वां । कृष्णतनुजां अनुजां खेवा । देऊनि गौरवा मानविलें ॥७९॥मंगळतुरांचिया गजरीं । प्रवेशले द्वारकापुरीं । तें कुरुवर्या अवधारीं । शुकवैखरी वर्णीतसे ॥३८०॥ततः प्रविष्टः स्वपुरीं हलायुधः ममेत्य बंधूननुरक्तचेतसः ।शशंस सर्वं यदुपुंगवांनां मध्ये सभायां कुरुषु स्वचेष्टितम् ॥५३॥त्यानंतर हलायुध । द्वारका प्रवेशला सुस्निग्ध । त्या समयींचा परमानंद । कोण विशद कवि वर्णी ॥८१॥महाद्वारीं सांडिल्या बळि । भूरि वांटिली कनकाञ्जळी । जयजयकार करिती सकळी । वैष्णव धुमाळी नाचती ॥८२॥नृत्य करिती नृत्यांगना । सप्तस्वरीं तानमाना । गंधर्व गाती सामगायना । वेदाध्ययना द्विज करिती ॥८३॥ठायीं ठायीं ठाकती उभे । पुरजनदाटणी पाहती शोभे । वोहरें मिरवितां पंकजनाभें । समारंभ पुरगर्भीं ॥८४॥पुढें वाजती गजदुंदुभी । दीर्घपताका फडकती नभीं । तुङ्गातपत्रें छत्रें उभीं । भंवरी देती गरगरां ॥३८५॥रत्नदंडी चामरजोडें । वोहरा वीजिती चहूंकडे । वेत्रपाणि खोलती पुढे । मांदी निवाडें सारावया ॥८६॥ अस्ममाना गेला तरणि । पुरप्रवेशीं झाली रजनी । अग्निद्रव्याची विचित्र करणी । कौतुक नयनीं जन पाहती ॥८७॥पुष्पवृष्टि वोहरांवरी । परिमळद्रव्यें उधळिती भारीं । ऐसे अनेक उत्साहगजरीं । आले झडकरी भद्रपीठा ॥८८॥पुढें सुधर्मासभास्थानीं । राजा उग्रसेन सिंहासनीं । भोंवत्या यादवांचिया श्रेणी । जेंवि सुरगणीं अमरेन्द्र ॥८९॥देवकआनकदुंदुभिप्रमुख । विकट कृतवर्मा सात्यक । भानुदेवभागादिश्वफल्क । वृद्ध अनेक यदुवर्य ॥३९०॥ऐसिये नृपसभेमाझारी । संकर्षण ते अवसरीं । वधूवर दोहीं कडियेवरी । घेऊनि झडकरी प्रवेशला ॥९१॥रायें कवळूनियां वोहर । मुखावरून उतरिला कर । उभयतांची प्रीति स्थिर । उमामहेश्वरसम राहो ॥९२॥आज्ञा करूनि सेवकाला । उघडूनि नेपथ्यवसनशाळा । दिव्याभरणां दिव्य दुकूळां । वधूवरांला लेवविलीं ॥९३॥दुःशासन भेटला राया । समग्र वृष्णींच्या समुदाया । सभास्थानीं बैसोनियां । कथिती झालिया वृत्तान्ता ॥९४॥हस्तिनापुरींई समग्र कथा । उद्धवें निवेदिली नृपनाथा । दुर्योधनें चरणीं माथा । ठेवूनि दुहिता निवेदिली ॥९५॥कौरवीं सन्मान केला पूर्वीं । तुमची आज्ञा ऐकतां गुर्वी । क्षोभा चढले महागर्वी । जैसा पर्वीं जळराशि ॥९६॥हेलनोक्ति नानापरी । बोलोनि प्रवेशले नगरी । तेव्हां प्रळयरुद्रापरी । रामशरीरीं क्रोधोर्मी ॥९७॥पालथें घाला हस्तिनापुर । तुमचे आज्ञेचें उत्तर । स्मरोनि म्हणे नृपकिङ्कर । करीन साचार नृपाज्ञा ॥९८॥नांगर घालूनि वप्रातळीं । उचटूनि नगराची ढेंपुळी । पालथें घालितां गंगाजळीं । कौरवमंडळी गजबजली ॥९९॥भीष्मादिक आले शरण । मुकुटें वंदूनि संकर्षण । स्वतनें करूनि सुप्रसन्न । स्नुषा नंदन समर्पिली ॥४००॥विवाहसंभ्रम केला थोर । पारिबर्ह दिधलें फार । राया अर्पिलें तें समग्र । हयरथकुंजरदासीसीं ॥१॥उग्रसेनें तें आंदळ पुढती । वोहरां अर्पिलें परमप्रीती । ऐकोनि बळरामाची कीर्ति । यादव हांसती करधरणी ॥२॥ताम्बूल अर्पिले सर्वांप्रति । दुःशासनें पूजिला नृपति । अहेर वसनाभरण निगुतीं । पात्राप्रमाणें निवेदिलीं ॥३॥घेऊनि उग्रसेनाची आज्ञा । रामप्रमुख गेले सदना । करिते झाले श्रीपूजना । जाम्बवतीचे मंदिरीं ॥४॥गृहप्रवेश संपादिला । द्वारकेमाजी उत्साह झाला । सुहृदां स्वजनां सह द्विजाला । दिव्य भोजनें समर्पिलीं ॥४०५॥रेवती रुक्मिणी जाम्बवती । इत्यादि वरिष्ठा कृष्णयुवती । वरमातरा गौरविती । यादवपंक्ति सुहृदत्वें ॥६॥श्रेष्ठ यादव निजमंदिरीं । वोहरें वरमाय वाद्यगजरीं । अभ्यंगादि सर्वोपचारीं । पृथगाकारीं गौरविती ॥७॥ऐसा आनंद झाला थोर । वर्णिती सुर नर मुनि किन्नर । द्वारकेपुढें अमरपुर । भासे लघुतर पल्लिवत ॥८॥दुःशासन मास दोनी । राहिला स्नेहें द्वारकाभुवनीं । पुढती हस्तिनापुरीहूनी । विकर्ण शकुनि मूळ आले ॥९॥शकुनिप्रमुखां सर्वोपरी । यादवीं आपुलालिये मंदिरीं । पूजूनियां पृथगाकारीं । श्रेष्ठ अहेरीं गौरविलें ॥४१०॥उत्तम मुहूर्तीं माहेरा । बोळविली ते साम्बदारा । लक्ष्मणा घेऊनि हस्तिनापुरा । शकुनिप्रमुख पावले ॥११॥ये अध्यायीं इतुकी कथा । शुक सांगोनि कौरवनाथा । म्हणे रामाचें यश तत्त्वता । कोण वक्ता वदों शके ॥१२॥अद्यापि च पुरं ह्येतत्सूचयद्रामविक्रमम् । समुन्नतं दक्षिणतो गंगायामनुदृश्यते ॥५४॥अद्यापि राया हस्तिनापुर । कुरुवंशाचें राज्य भद्र । उत्तमभागीं निम्नतर । जाह्नवीतीरपर्यंत ॥१३॥वप्र भेदिले लाङ्गलघातें । यास्तव उच्छ्रित दक्षिणप्रान्तें । यश रामाचें जाणविते । उत्तरोत्तर युगानुयुगीं ॥१४॥अद्यापिही गंगातीरीं । दक्षिणोच्छ्रित हस्तिनापुरीं । देखिजे ते अमरीं नरीं । प्रतापथोरी रामाची ॥४१५॥इतिश्रीमद्भागवतीं । दशमस्कंधीं परीक्षिति । अद्भुत बळरामाची शक्ति । ऐकूनि चित्तीं स्मय मानी ॥१६॥श्रीशुक म्हणे राया चतुरा । संकर्षणा धरणीधरा । इत्यादि कर्में चमत्कारा । कारणरूप न भासती ॥१७॥एक ईश्वरद्विधा रूपें । भूभार उतरावयाच्या पडपें । नटला बळकृष्णस्वरूपें । पूर्वसंकल्पें सुरावना ॥१८॥त्यांचीं ऐसीं अगाध कर्में । येरां मानवां ज्यांचेनि नामें । सांडिजेतसे भवसंभ्रमें । जपतां प्रेमें अहर्निशी ॥१९॥ऐसें बळरामाचें यश । जे ऐकती नित्य निर्दोष । ते नर वरिती कैवल्यास । इतुका विशेष ये श्रवणीं ॥४२०॥पुढिले अध्यायीं कुरुवर्या । श्रीकृष्णाची अद्भुत चर्या । आला नारद पहावया । स्वर्गींहूनियां तें ऐका ॥२१॥प्रतिष्ठानकैवल्यनिलयीं । श्रीएकनाथशेषशायी । चिदानंदें लक्ष्मी पाहीं । स्वानंददायी पद सेवी ॥२२॥गोविंदपादपंकजरज । वाहिनी गंगा तेजःपुंज । दयार्णवीं ते भरतां सहज । त्रिजगाभोज निमज्जनीं ॥२३॥श्रवणमात्रें कीजे पान । अर्थानुप्रभवें अवगाहन । मननें निर्दोषसुखसंपन्न । तीर्थवीधान हें येथ ॥२४॥विधानवक्ता आचार्यमूर्ति । करूनि भवभयाघनिवृत्ति । शुद्ध प्रकटी आत्मप्रतीति । चिन्मात्र स्थिति वास्तव जे ॥४२५॥यालागीं हे त्रिजगत्पावनी । दयार्णवसंगमीं मंदाकिनी । सेवूनि वसिजे कैवल्यसदनीं । हे जाणवणी मुमुक्षूतें ॥३२६॥इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां बलभद्रविजयसाम्बलक्ष्मणाविवाहोनामाष्टषष्टितमोऽध्यायः ॥६८॥पिंगलाब्दे परे शुक्ले द्वादश्यां भौमवासरे । पिपीलिकापुरे पूर्णं लक्ष्मणाहरणं शुभम् ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५४॥ टीका ओव्या ॥४२६॥ एवं संख्या ॥४८०॥ ( अड्डसष्ठावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३१७१६ ) अडसष्टावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP